Categories
कविता

कविता

वार्षिकांक – २०१३

डॉ.दाभोलकरांचा खून झाल्यावर अनेक कार्यकर्त्यांनी, कवींनी दाभोलकरांविषयी आपल्या काही भावना कवितेतून मांडल्या. त्यापैकी काही कविता आम्ही देत आहोत. यापैकी काही कविता इतरत्रही यापूर्वीच प्रसिद्ध झाल्या आहेत.

तुझं जाणं.....

तू वक्ता, तू द्रष्टा
तू विधायक, तू नायक
कबड्डीचा कप्तान तू
सिद्धहस्त लेखक तू
उत्तम संपादक तू
समर्पित समाजसेवक तू
कुशल संघटक तू
कृतीशील विचारवंत तू
संविधान मूल्यांचा पुरस्कर्ता तू
अपराजीत योद्धा तू
तू कणव, तूच करूणा
तू ऊर्जा, तू प्रेरणा
तू सहिष्णू, तू अजातशत्रू
तू तत्वज्ञ, दार्शनिक अन् युगुपुरूष ठरावा
फुले शाहू आंबेडकरांचा वारस तू
गांधी गुरूजींचा पाईक तू
ही सारी तुझीचं रूपं
ही सारी तुझीच विशेषणं
दु:ख एकच,
यासाठी आवश्यक होतं का
तुझं जाणं?
खरंच,
याशिवाय अशक्य होतं का
जगाला हे सारं समजणं?

-परेश शहा
... आणि अशा मृत्यूच्या अंतहीन वेदनाही!

विवेकाचा आवाज
कधी गोळ्यांनी मरत नाही
मित्रांनो-
तो कशानेच मरत नाही
उलट तो प्रज्वलीत होत जातो
राखेतून उडणार्‍या फिनिक्स सारखा
पण पामरांनो-
तुम्हाला हे कसं कळावं
कीव येते तुमच्या
गुडघ्यातल्या मेंदूची....
गोळ्यांनी छिन्न-विछिन्न
होत असेल शरीर
पण विचार कसे मारणार!
अरे, विवेक तर-
जगाला तारणारी संजीवनी आहे
विवेक धर्माचे प्राणभूत सारतत्त्व आहे
विवेक माणूस असण्याचा
प्रथम निकष आहे.
विवेकाचा आवाज ऐकायला
माणसांवर श्रद्धा असावी लागते
विवेक जगणं सुंदर करण्याची
एक कला आहे!
पण मित्रांनो-
हे सारं तुम्हाला कसं कळावं
कसे कळावे. तुम्हाला
येशूचे वधस्तंभावरचे विवेकी मरण
..... आणि अशा मृत्यूच्या अंतहीन वेदनाही!

-प्राचार्य सीताराम गोसावी
जोमाने नेऊ पुढे चळवळ!

अभिवादन करून तुम्हां, डॉक्टर दाभोलकर
डॉक्टर दाभोलकर, जोमाने नेऊ पुढे चळवळ ॥धृ॥

तुम्ही विचार आम्हा दिले, जनमानसात रूजविले
विवेक आणि विज्ञानाने, दिले आम्हांला बळ ॥1॥

गड समतेचा लढविला, तुम्ही रणांगणी जिंकला
हतबल होऊन दांभिकांनी, कशी साधली वेळ ॥2॥

श्रद्धेच्या दुनियेमधी, भोंदूची जमली गर्दी
भोंदूबुवांना तुम्ही नमविले, कुणी काढिला पळ ॥3॥

अंधश्रद्धांचे क्षालन, हवा सरकारी कानून
लढा उभारून तुम्ही मिळविले, कायद्याचे पाठबळ ॥5॥

तुम्ही बलीदान जे दिले, आज सर्वांना उमगले
बीज पेरीले सुधारकीचे, येईल त्याला फळ ॥6॥

- एस. एस. शिंदे
डॉक्टर तुम्ही!

डॉक्टर तुम्ही असताना,
आमचा रूबाब होता.
पुरोगामी, प्रगल्भ लोकांत,
आमचा आब होता!
डॉक्टर तुम्ही बोलताना,
शब्दांचे कारंजे उडायचे.
हसवत खुलवत कोपरखळीने,
अबोध तत्वज्ञान रूजायचे!
डॉक्टर तुम्ही असल्यामुळे
मान, इमान, अभिमान आहे.
विज्ञान-निर्भयता-नीतीने
भलेभले गनिमही गारठले!
डॉक्टर तुम्ही आज गेलात-
आम्ही आमचे नाही राहिलो.
मृत्यूंजय उर्जेसह झळाळून
सगळेच! डॉ.दाभोलकर झालो!

-शंकर चौगुले
नवी पेटली वात रे!

गोळी बंदुकीची सुटली वेध घेती हाय रे
पडे रक्ताच्या थारोळ्यात माझ्या साथीचे प्रेत रे
माझ्या भाईचे प्रेत रे॥धृ॥
हा कलंक महाराष्ट्राला ह्या पुरोगामी किल्ल्याला
हा विरोध विज्ञानाला आणि घटनेच्या मूल्याला
शाहू-फुल्यांच्या भूमीत चालली खुनाखुनीची बात रे॥1॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात....
नव वारसा विचाराचा त्याने कृतीतून दावला
नव्वदीच्या पिढीला त्याने समाजकार्यात गोवला
अंधश्रद्धेला गाडण्याची मागत होता साथ रे॥2॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात....
सनातनी धर्मगंडांचा होतो जळफळाट रे
शोषक धर्मासाठी त्यांचा चाले तडफडाट रे
बंदुकीला डरणार नाही कार्यकर्त्यांची जात रे॥3॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात....
त्याची शुचिता साधनेची वैरी परशुचा दांडा रे
हृदयात साने गुरूजी आता आंबेडकर मांडा रे
त्याच्या रक्ताने प्रबोधनाची नवी पेटली वात रे॥4॥
पडे रक्ताच्या थारोळ्यात....

-संतोष पद्माकर पवार
डॉक्टर.....

सातार्‍यात ‘निर्धार परिषद’ झाली अंनिसची....
तुमच्याविना.
पूर्वी नेहमी प्रत्येक कार्यक्रमात तुम्ही असताना
किती उत्साह असायचा कार्यकर्त्यांत
पण त्या दिवशी
प्रत्येकाच्या मनात ‘बाप’ गेल्याचं दु:ख होतं.
जो तो एकमेकांन धीर देत होता
एरवी सर्वांशी हसून बोलणारे तुम्ही.
विचारमंचावर कुठे दिसत नव्हतात
दिसत होतं एक तुमचं डिजीटल
त्या दिवशी ‘निर्धार’ केला आम्ही सर्वांनी
हातात हात घालून आणि आपले ‘होंगे कामयाब’
हे गीत म्हणून.
‘अंधश्रद्धा निर्मूलनाचं’ आणि ‘जातीला मुठमाती देण्याचं’
काम जोमानं पुढं नेण्याचं.
इथून पुढे तुम्ही आमच्यात नसलात तरी,
तुम्ही दिलेल्या विचारांची, साहित्याची शिदोरी घेऊन
निघालो आहोत आम्ही
सर्व साथी....!
पण तरीही डॉक्टर.....
तुम्ही असायला हवे होतात आमच्या बरोबर.
पाठीवर थाप टाकून,
‘लढ’ म्हणायला....!!

-रमेश दास
आम्ही सारे अखंडित

विज्ञान युगांतले पुरोगामी संत। अभ्यासू वृत्ती स्वभावाने शांत॥
विवेकी प्रिती, वाचेत सिद्धी। शब्दात गोडी स्पष्टोक्ती झोडी॥
आचरणांत शुद्ध, ज्ञानी प्रबुद्ध। सहकारात सदैव सिद्ध॥
भोळ्या जीवांना शहाणे करावे। विज्ञान तयांनी जाणून घ्यावे॥
काळानुरूप मनी जनानी वर्तावे। अंधश्रद्धा ‘बलां’चे साध्य न व्हावे॥
अनिष्ट प्रथांनी सडतो समाज। बुवा बाबा दादास येतोच माज॥
गंडा दोरा ताईत मंत्र जादूटोणा। बुवाबाजी त्यांची जाणून घ्या ना।
निकोप निरामय जीवन व्हावे। ध्यास त्यांना होता जीवेभावे॥
समर्थ जनाचा बलदंड देश। नव विचारांचा नवाच उन्मेष।
भयमुक्त जगणे अंधश्रद्धा वैरी। विज्ञान सर्वांचा असे कैवारी॥
ऐसा हा नरेंद्र अमृताचा पुत्र। विचाराचे सूत्र अजरामर होई
कायेने जरी जनलोकी नाही। अंधश्रद्धा निर्मूलन ध्येया पंथी
आम्ही सारे अखंडित॥

-शं. म. माळी
मिळो त्या विधेयकास जादूटोण्याने सद्गती!

चला करूया नवे विधेयक भलता सलता अर्थ भरूया
बीभत्स ओंगळ अन् विध्वंसक, विनाशी असा सुर धरूया

कशास उत्तम, उदात्त, उन्नत हवे कुणाला नम्र सुसंस्कृत
अधम नराधम कळप मागती भोंदूगिरी अन कृत्ये विकृत

हसवे चेहरे फसवे हासू गळ्यात माळा जरी तुळशीच्या
नामघोष जरी उच्च स्वराने मनामध्ये राशी मुडद्यांच्या

वरवर दिसते भाविक वारी मनी परि कपटी स्वारी
मुखात जप तेहतीस कोटींचा खिशात पिस्तुल सतरा बारी

कर्म विघातक मर्म विनाशक खुनी प्रसवती धर्म विभाजक
भरकटल्या भेजांचे भोंदू वापरती भाषा विध्वंसक

कशास भक्ती नको देवबिव हवेत गंडेदोरे ताईत
श्रद्धेला गाडण्या चालली आंधळ्या श्रद्धांची बागाईत

अशा खालमुंडी कळपाला नकोत श्रद्धा नकोच शांती
मिळेल आता विधेयकाला जादू टोण्यानेच सद्गती

- अरूण म्हात्रे
संवाद

किंचित जरी कल्पना दिली असती दाभोलकरांना
तर खरंच,
तुम्ही मारलंच नसतं त्यांना
फक्त समोरुन...
जरी दोनच शब्दांचा झाला असता संवाद
तरच खरंच,
निर्भयता आणि नीतीचा ‘चमत्कार’
पुन्हा एकदा पहायला मिळला असता...
बुद्ध आणि फुलेनंतर...
मैत्रीबळाच्या कार्यकारण भावासहित!
फक्त समोरून
दोन शब्द...
तर खरंच,
तुम्हीच झाला असता त्यांचे अंगरक्षक!
त्या विवेकी संगतीने
तुमचा भविष्यकाळ नक्कीच उजळला असता!

-अतुल जगताप