1.कोपर्यातला आवाज

आपल्यातील बहुतेकांना प्रकाश हा ध्वनीप्रमाणे तरंगांच्या स्वरूपात आहे, हे माहीत असावे. तरीसुद्धा प्रकाश व ध्वनी वेगवेगळ्या प्रकारे कार्य करत असतात. उदाहरणार्थ, आपण कोपर्याच्या दुसर्या बाजूचा आवाज ऐकू शकतो. परंतु कोपर्याआडची वस्तू पाहू शकत नाही. याचे कारण काय?
प्रकाश व ध्वनी हे दोन्ही तरंगाच्या स्वरूपात असले तरी त्यांच्या तरंगाच्या लांबीत फार मोठा फरक आहे. ध्वनीच्या तरंगाची लांबी सुमारे एक मीटर असल्यास प्रकाशाची एक दशसहस्त्रांश मिलीमीटर एवढी असते.
(1000 मि.मि. = 1 मीटर) ध्वनीच्या तरंगांची लांबी जास्त असल्यामुळे वाटेतील मोठमोठ्या वस्तूंभोवती वळसा घालून ते पुढे जाऊ शकतात. प्रकाशाच्या तरंगांची लांबी फारच कमी असल्यामुळे ते मोठ्या वस्तूंभोवती वळसा घालून पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणूनच आपण कोपर्याआडची वस्तू पाहू शकत नाही.
2. थंडगार पाय

रात्री झोप न लागल्यामुळे पाणी पिण्यासाठी म्हणून फ्रीजपाशी मी जात होतो. अंथरूणावरील पाय किचनच्या फरशीवर ठेवल्या ठेवल्या गार वाटू लागले. खरे पाहता किचन व माझ्या खोलीचे दरवाचे सताड उघडेच होते. मला भास तर होत नसेल ना?
अंथरूण व फरशी या दोन्हींचे तापमान सारखेच असते. परंतु अंथरूण फरशीच्या तुलनेने कमी प्रमाणात उष्णतेचे वहन करते. त्यामुळे आपण जेव्हा अंथरूणातून उठून फरशीवर पाय ठेवतो तेव्हा फरशी आपल्या पायातील उष्णतेला शोषून घेते त्यामुळे फरशी थंड आहे असे वाटू लागते.
– प्रभाकर नानावटी
एमिली झाली बालवैज्ञानिक
तिचे नाव एमिली रोझा. 12 वर्षांची अमेरिकेतील शाळकरी मुलगी. विज्ञान प्रदर्शनात ठेवण्यासाठी तिने एक प्रयोग मांडला. या प्रयोगांमुळे भल्याभल्यांची ढोंगे उघडकीस आली आणि एमिलीला बालवैज्ञानिक म्हणून अमेरिकेतील दूरदर्शनवर प्रसिद्धी मिळाली.
कशी बनली एमिली बालवैज्ञानिक ?
अमेरिकेत स्पर्श-उपचार नावाच्या रोग-निवारण तंत्राचे फॅड माजले होते. जवळपास सत्तर मोठ्या इस्पितळात हे तंत्र प्रचारात आले होते. या उपचारात रोगनिवारक तांत्रिक आपला हात रोग्याच्या शरीरावरून काही अंतरावरून फिरवितो. परिणामी रोग्याला आराम पडतो अशी समजूत आहे. याचे कारण दिले जाते ते असे- कोणत्याही व्यक्तीच्या सभोवती काही इंच अंतरापर्यंत त्याचे ऊर्जा वलय असते. स्पर्श-उपचार करणारा आपला हात रोग्याभोवती फिरविताना त्याचे ऊर्जा वलय रोग्याच्या ऊर्जा वलयावर परिणाम करते. तज्ञ उपचारक रोग्याच्या ऊर्जा-वलयाला दुरूस्त करते अशी ही कल्पना आहे.
पण व्यक्तीला ऊर्जा वलय असते हे तपासायचे कसे? यासाठीचा एक सोपा पण अफलातून प्रयोग एमिलीला सुचला. या प्रयोगात सहभागी होण्यासाठी तिने एकवीस तथाकथित स्पर्श-उपचारकांना आवाहन केले. बिच्चारे उपचारक. त्यांना हार पत्करावी लागली आणि एमिली बनली बालवैज्ञानिक.
एमिलीचे म्हणणे असे की, रोग्याच्या भोवती हात फिरवताना उपचारकला काही संवेदना होत असल्याच पाहिजेत. उदाहरणार्थ हाताला मुंग्या येणे किंवा हात गरम होणे किंवा हाताला विरोध जाणवणे. झालं तर मग. या लक्षणाद्वारे ऊर्जा-क्षेत्र खरे की खोटे व असा उपचार खरा की तकलादू हे तपासता येईल.
एमिलीने अवघ्या 10 डॉलर्समध्ये या चाचणीचे उपकरण बनवले.
चाचणी कशी झाली?
एका टेबलावर मध्ये मोठा पडदा. पडद्याला फूटभर अंतरावर दोन भोके पाडलेली. एका बाजूला एमिली बसली विरूद्ध बाजूला उपचार करणारा तथाकथित तज्ञ. हा तज्ञ आपले दोन्ही हात पडद्याच्या दोन भोकामधून पलिकडे तळवे खाली करून धरे. मग एमिली आपल्या हाताचा तळवा या तज्ञाच्या एका हाताखाली स्पर्श न करता धरे. एमिलीच्या ऊर्जा-क्षेत्रामुळे या तज्ञाच्या हाताला काही जाणीव होणारच. मग त्याने एमिलीचा हात आपल्या कोणत्या हाताजवळ (उजव्या की डाव्या) हे ओळखायचे. एमिलीने आपला हात त्याच्या कोणत्या हाताजवळ आणायचा हे नाणेफेकीने ठरवले जाई.
जे एकवीस तज्ञ या प्रयोगासाठी तयार झाले त्यांना असा पक्का आत्मविश्वास होता की, ते एमिलीचे ऊर्जाक्षेत्र 100 टक्के खात्रीने ओळखतील. ह्या सर्व प्रयोगाचे व्हिडीओ चित्रण केले गेले. एकूण 280 चाचण्या झाल्या. त्यातील फक्त 44 टक्के चाचण्यात तज्ञ पास झाले. म्हणजे निम्म्यापेक्षाही कमी. याचा अर्थ छाप की काटा प्रयोगात 50 टक्के यश मिळते त्याच्यापेक्षाही कमी यश या तज्ञांना मिळाले. हे तज्ञ ऊर्जा-क्षेत्र ओळखण्याच्या प्रयोगात नापास झाले.
याचा अर्थ ज्याला काहीच आधार नाही वा पुरावा नाही असा भोंदू उपचार अमेरिकेच्या 70 रूग्णालयातून दिला जात होता. हस्तोपचार या नावाखाली हे चालले होते. आईच्या मदतीने एमिलीने आपले निष्कर्ष अमेरिकन मेडिकल असोसिएशनच्या जर्नल्सला पाठविले. विशेषज्ञानी या संशोधनाला दाद दिली व त्याचा ‘अस्सल सोने’ म्हणून गौरव केला. एमिलीचा बालवैज्ञानिक म्हणून गौरव झाला व तिचा सत्कार होऊन राष्ट्रीय पातळीवरील दूरदर्शनवर प्रसिद्धी देण्यात आली. जेम्स रँडी फाऊंडेशनने तिला 1000 डॉलर्सचे बक्षीस देऊन पुढील संशोधनासाठी शुभेच्छा दिल्या.
मुलांनो, केवळ 12 वर्षांच्या एमिलीने विज्ञानाच्या क्षेत्रात हा पराक्रम केला. तुम्हीपण हे करू शकाल, होय ना?
– प. रा. आर्डे