Categories
इतर

लोकविज्ञानाचा निष्ठावंत प्रसारक – डॉ.मंगल धारवाडकर

एप्रिल - २०११

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती काय काम करते हे आता उभ्या महाराष्ट्राला पक्के माहीत आहे. त्याची योग्य नोंद महाराष्ट्राच्या मानसिकतेने व माध्यमाने घेतली आहे. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या या संघर्षाबरोबर कळत नकळत धर्म चिकित्साही येते. त्याचे रागलोभ समितीला चिकटतात. त्याहीबाबत वाचकांना थोडीबहुत जाणीव आहे. पण या दोन्हीबरोबरच एक तिसरे अंग संघटनेला आहे ते आहे. संविधानाच्या मूल्यजाणीवासह विज्ञान प्रसाराच्या प्रबोधनाचे. खरेतर याबाबत आज प्रामुख्याने काम चालू आहे औरंगाबाद शहरात आणि तेही डॉ.मंगल धारवाडकर यांच्याकडून. ते नीट समजावून घेतले तर त्यांच्या कार्यकर्तृत्वावर तर प्रकाश पडेलच पण अनेकांना आपापल्या ठिकाणी ते पथदर्शक ठरू शकेल.

            डॉ.मंगल धारवाडकर हे तंत्रज्ञानातील उच्चपदवी विभूषित आहेत. अनेक वर्षे अमेरिकेत राहिलेले आहेत. औरंगाबाद येथील प्रथितयश कॉलेजात त्यांनी विभागप्रमुख आणि प्राचार्य म्हणून जबाबदारी निभावली आहे. सध्या ते निवृत्त आहेत. गेली वीस वर्षे ते महाराष्ट्र अंनिसशी संबंधित आहेत. वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हा त्यांचा आवडीचा विभाग.

            समिती महाराष्ट्रभर फिरते नभांगण आयोजित करते. हा उपक्रम अत्यंत विद्यार्थीप्रिय व समितीला नवी ओळख करून देणारा ठरला. पण याच्या प्रारंभाचे श्रेय जाते डॉ.मंगल धारवाडकरांच्याकडे. त्यांनी प्रथम आयुकाचे फिरते नभांगणाचे कार्यक्रम औरंगाबादला घेतले. त्यानंतर त्यातील ताकद ओळखून आपण महाराष्ट्रात त्याचा विस्तार केला.

            महाराष्ट्र अंनिस औरंगाबाद शाखेच्या वैज्ञानिक प्रकल्पाला त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटची जोड दिली. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना सर्वांनाच माहीत आहे. मात्र त्यासाठी महाविद्यालयातीलच विद्यार्थी त्याच कॉलेजातील राष्ट्रीय सेवा योजना केंद्राशी संबंधित असावे लागतात. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिटचे तसे नसते. त्यामध्ये कोणतेही विद्यार्थी, निवृत्त नोकरदार, नागरिक सहभागी होऊ शकतात. महाराष्ट्रातले हे या स्वरूपाचे पहिलेच युनिट आहे.

            भारतीय संविधानात लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, सामाजिक न्याय व स्त्री-पुरुष समता अशा बाबींचा प्राधान्याने उल्लेख आहे. विद्यार्थ्यांच्यापर्यंत हे विचार पोचण्यासाठी दरवर्षी त्यातील एक विषय धारवाडकर निवडतात. महाविद्यालयाच्या प्राचार्यांना अशी विनंती केली जाते की, या विषयावर दोन तासांची कार्यशाळा आपल्या महाविद्यालयात होईल. त्यांनी हॉल, ध्यनिक्षेपक द्यावा. वक्त्याला प्रवास खर्चापोटी हजार रूपये द्यावेत. विद्यार्थ्यांना उपस्थितीसाठी आवाहन करावे. आता यावर्षी 15 महाविद्यालयात स्त्री-पुरूष समतेबाबत अशा कार्यशाळा झाल्या. सर्व ठिकाणी तरूण-तरूणींची उपस्थिती 100 ते 150 होती. वेगवेगळ्या तारखांना हा उपक्रम झाला. त्यातील 1 दिवसासाठी पूर्णवेळ मेधा पाटकर आवर्जून आल्या होत्या.

            या वर्षीच्या उपक्रमावर जरी नजर टाकली तरी त्याचा वेगळेपणा चटकन लक्षात येईल. 28 नोव्हेंबरला म.फुलेंच्या स्मृतीदिनी विवाहपद्धतीवर तरूणांच्या विचाराची खुली चर्चा झाली. त्यांच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर त्यांनी मन:पूर्वकतेने मतप्रदर्शन केले. 26 डिसेंबरला बालविज्ञान प्रदर्शन झाले. पाणी अडवणे, जिरवणे, जलप्रदूषण रोखणे अन्न भेसळ ओळखणे अशा अनेक बाबींचा परिचय बालचमूना झाला. 2 जानेवारीला फुले दांपत्य फातिमाबी शेख यांचे जीवन कार्य नाटिका पोवाडा या रूपाने सादर करण्यात आले. विशेष म्हणजे या सादरीकरणात हमाल मापाडी, मोलकरीण यांच्या संघटनातील कामगारांच्या मुलांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला. राष्ट्रीय सेवा योजना ओपन युनिट बरोबर होतीच. बालविज्ञान आनंद मेळाव्यात विज्ञान भूगोल या अभ्यासक्रमातील प्रयोग सादर करण्याची कार्यशाळा शाळेतील मुलांसाठी झाली. तज्ञ प्राध्यापकांनी स्वयंसेवी पद्धतीने त्यात मुलांना मार्गदर्शन केले. याबरोबरच मुलांनी स्वत: दोन प्रयोग करावयाचे होते. त्याचे सामाजिक महत्व सांगावयाचे होते. एकून 120 मुलांनी भाग घेतला. त्यांना अगदी आगळे वेगळे बक्षीस देण्यात आले. पहिल्या 20 जणांना लोणारचे प्रख्यात सरोवर, 21 ते 40 या नंबरांना पाबलचा विज्ञानाश्रम आणि 41 ते 60 यांना आयुका भेट असे ते बक्षिस होते. या प्रवासाचा एक वेळचा खर्च सोसण्यात आला. 26 फेबु्रवारीला मग मानसिकता व समाज यावर एक दिवसाची कार्यशाळा आयोजित झाली. मन, मानसिकता, ताणावर मात. यशस्वी परस्पर संवाद अशी ही सशुल्क कार्यशाळा झाली. 7-8 मार्चला अगदी वेगळीच कार्यशाला होती. त्याचा विषय होता लाईफ सायन्सेस (मेडिसीन, केमिस्ट्री, बॉटनी, मायक्रोबायॉलॉजी, झुलॉजी) व तंत्रज्ञान विषय या विषयातील मराठवाडा विभागातील महिलांची कामगिरी त्याची दखल घेणे. मूल्यमापन करणे भावी वाटचालीचे चिंतन करणे. 8 मार्चच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर याचे वेगळे महत्व सांगायला नकोच. एक सामाजिक जाणीवा प्रकल्पही संकल्पित आहे. आपल्या शहरातील सांडपाण्याचा निचरा, ध्वनीप्रदूषण, पाण्याची गुणवत्ता, भाजीपाला, फळे याची गुणवत्ता ट्रॅफीक नियोजन या दृष्टीने काम करू इच्छिणारे जे जे कोणी आहेत त्यांना एकत्रित, प्रशिक्षित व कार्यान्वित करणे असे त्याचे स्वरूप आहे.

            औरंगाबाद शहरात मोठ्या प्रमाणात उर्दू शाळा आहेत त्या शाळेतील सर्वेक्षण असे दाखवते की, या शाळेतील आठवी नववीमधील 10 टक्के मुले व 20 टक्के मुली शाळेतून बाहेर फेकली जातात. घरचे दारिद्य्र आणि शिक्षणाचा पालकांच्यात अभाव ही त्याची महत्वाची दोन कारणे आहेत. धारवाडकरांनी एकूण 13 शाळांतील अशी गरीब 40 मुले निवडली. त्यांना प्रत्येकी पाचशे रूपयांची शैक्षणिक साधनसामुग्री लोकदेणग्यातून दिली. 12 फेबु्रवारीला हे वाटप झाले. सर्व पालकांची मुले आली होती. त्यांच्या पालकांनी आम्ही या मुलांना शाळेतून गळू देणार नाही. तुमच्या मदतीने आमचा उत्साह उमेद वाढली आहे असे सांगितले. 18 ते 25 मेचे बाबा आमटेंच्या आनंदवनचे शिबीर आणि जूनमधील डॉ.अभय बंग यांच्याकडचे शिबीर यांना विद्यार्थ्यांनी जावे अशी ही धारवाडकरांची धडपड चालू आहे.

            धारवाडकरांना या वर्षात गंभीर आजाराला तोंड द्यावे लागले. त्यांचे उपचार, पथ्यपाणी अजूनही चालूच आहे. काळजी कमी झाली पण पूर्णांशाने गेली असे नाही या सर्व परिस्थितीवर मात करत ते झपाट्याने हा लोकविज्ञानाचा कार्यक्रम राबवित आहेत. मला वाटते तो अंनिसचे कार्यकर्ते व हितचिंतक सर्वांनाच पथदर्शक ठरावा.

– डॉ.नरेंद्र दाभोलकर