Categories
कविता

माझ्या बापाची अंत्ययात्रा…

एप्रिल - २०१५
तू माझ्या बापाच्या अंत्ययात्रेस होतास काय.....?
वेळ नव्हता म्हणतोस!
हो असेलही खरं....
नाहीतरी कुठे असतो वेळ तुला
अशा ‘किरकोळ’ घटनांकडे लक्ष द्यायला!

माझा बाप जेव्हा
मोलकरणींसाठी रस्त्यावर उतरायचा
तेव्हाही तू असायचास
तुझ्या महत्वाच्या कामात ‘बिझी’
मोलकरणींचं काय घेऊन बसायचं
त्यांना दोन वेळचं खायला मिळतंच की!

माझा बाप जेव्हा
कामगारांचा आवाज बनून
भांडवलशाहीवर हल्ला बोलायचा
तेव्हाही तुझ्या डोळ्यात 
असायची स्वप्नं ‘विकासाची’
कामगारांचं काय
यंत्रंच की नुसती विकासातली!

माझा बाप जेव्हा
विज्ञानाचा जागर करायचा
दैव सोडून प्रयत्न घ्या म्हणायचा
तेव्हाही तू टिकटिक करत असायचास काहीतरी
टेबलवरच्या लॅपटॉपवर
विज्ञानाचं काय व्यर्थ धडपड सारी!

माझा बाप जेव्हा
कुळवाड्यांचा राजा
आणि
धर्मनिरपेक्ष राज्यकर्ता म्हणून
खरा शिवाजी सांगायचा
तेव्हाही तू चघळत असायचास
प्रत्येक दहशतवादी मुसलमान असल्याचे किस्से
धर्मनिरपेक्षता आणि कल्याणकारी राज्य काय
बोलण्यातले शब्द नुसते!

अरे माणसा
माणूस तरी कसा म्हणू तुला
तुझ्याकडून कशी धरावी अपेक्षा
माझ्या लढव्य्या बापाच्या अंत्ययात्रेत
सहभागी होण्याची?

माझे मात्र साथी असंख्य
चार्वाकापासून...... बुद्धापर्यंत, 
तुकोबापासून.... गाडगेबाबापर्यंत,
जोतिबापासून...... दाभोलकर, पानसरेंपर्यंत

आता म्हणशील,
‘त्यांचं काय घेऊन बसलास?
त्यांचा काय जगणं होतं?
गाडी नाही, माडी नाही
क्षणाक्षणाला झुरणं होतं
एवढ्या ‘सुंदर’ जगात
साधेपणाचं झुरणं होतं’
मनातल्या मनात हेही म्हणशील,
‘आणि तुझं काय?

आज कामगार, उद्या शेतकरी
आज परित्यक्त्या, उद्या मोलकरणी
आज अंधश्रद्धा, उद्या जातीपाती
आज कलेक्टर कचेरीसमोर, 
उद्या मंत्रालयासमोर
सगळीकडे हेलपाटे.....
नुसती फरपट.....
शी! हे काय जगणं आहे?’

पण
याद असू दे तुला.... 
मी लढलो म्हणूनच
धर्माच्या बंधनातून तू मुक्त झालास
मी लढलो म्हणूनच
तुझी आई, बहीण माणूस झाली
आणि म्हणूनच...

मी लढणार आहे.....
राबणार्‍या हातांसाठी
कष्टकर्‍यांच्या हक्कासाठी
स्त्री जातीच्या मुक्तीसाठी
विज्ञानवादाच्या आग्रहासाठी
माझ्या बापाच्या विचारांसाठी

तु खुशाल बस
माझ्या वैचारिक बापांच्या अंत्ययात्रा
टी.व्ही.वर बघत, 
मी उतरेन प्रत्येक अंत्ययात्रेत!
ओळख सांगतो जाता जाता
मी आहे
मानवमुक्तीच्या महासंग्रामातील
छोटासा कार्यकर्ता!!!

कृष्णात कोरे, कोल्हापूर

मोबा.8600230660