Categories
व्यक्तिविशेष

‘माणूस’ घडवण्याचा श्रोत

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम करणे म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहण्यासारखे आहे. अशा वेळी हे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना त्यांच्या कुटुंबियांची साथ मिळणे, त्यांचा आधार मिळणे खूप गरजेचे असते. कुटुंबातूनच प्रत्येक वेळी विरोध झाला तर कार्यकर्त्याचे धैर्य खचण्याची आणि मग तो काम सोडून देण्याची शक्यता असते. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा चळवळीच्या उपक्रमांची माहिती करुन देणे किंवा त्यासाठी कराव्या लागणार्‍या संघर्षाची जाणीव करुन देणे यासाठी डॉ. दाभोलकर नेहमीच आग्रही होते. कुटुंबियांचा पाठींबा जर कार्यकर्त्यांना असेल, त्यांच्या अडचणी, त्यांचे प्रश्न जर आपण जाणून घेऊन सोडविण्याचा प्रयत्न केला तरच ही चळवळ जास्त जोमाने काम करु शकेल हाच दृष्टिकोन ठेवून खेड्यापाड्यातल्या कार्यकर्त्यांच्या कुटुंबियांशी सुद्धा डॉक्टरांचा संवाद होता. कार्यकर्त्यांच्या घरीच राहणे, त्यांच्याच सोबत जेवण करणे, आपुलकीने प्रत्येकाची चौकशी करणे. त्यामुळेच डॉक्टर दाभोलकर आणि अंनिस प्रत्येकालाच आपलीशी वाटत गेली. वैयक्तिकरित्या प्रत्येकजण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या कारणाने चळवळीकडे आकर्षिला गेला. चळवळीचा सच्चेपणा, साधेपणा, जसं बोलतो तसं वागण्याचा डॉ. दाभोलकरांनी घालून दिलेला परिपाठ यामुळेच चळवळीचाच भाग होऊन बसला.

अंनिसशी संबंध येण्यापूर्वी मी आणि नागेश सामंत दोघेही डोळ्याला झापडं लावून चालणार्‍या असं का हा कधीही प्रश्न न पडलेल्या, कुठल्याही गोष्टीची कधीही चिकित्सा न करणार्‍या या समाजाचाच एक भाग होतो. आमचे गाव कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड तालुक्यात आहे. तिथे श्रीपादवाडी म्हणून जागृत दत्ताचे स्थान आहे. हे देवस्थान इतके श्रीमंत झाले आहे की दत्तजयंतीला गाड्या भरुन भरुन भाविक लोक पुण्या मुंबईहून इथे येतात आणि देवाच्या नावावर सगळा बाजार चालतो. तिथेच पिशाचदेव म्हणून एक दगड ठेवलेला होता. त्याला बकर्‍याचा बळी दिला जायचा आणि प्रसाद म्हणून तो वाटला जायता.

आम्ही अंनिसचा संबंध येण्यापूर्वी दर दत्तजयंतीला तिकडे जायचो. तो सगळा सोहळा बघून कृतकृत्य व्हायचो. दर गुरूवारचा उपास, सोवळे नेसून दत्ताची पूजा हे ठरलेले असायचे.

लोकविज्ञान चळवळीतर्फे चाळीसगावात एक वैज्ञानिक परिषद झाली. त्यावेळी पहिल्यांदा डॉ. दाभोलकरांची ओळख झाली. त्यांचे प्रभावी वक्तृत्व, समोरच्याला आपले मत पटवून देण्याची हातोटी यामुळे पहिल्यांदा अंधश्रद्धा निर्मुलन हा विषय मनाला इतका भावला की अरे आपण या दृष्टीने कधी विचारच केला नाही असे वाटले. 1989 मध्ये महाराष्ट्र अंनिस स्थापन झाली आणि आम्ही तिच्याशी पूर्णपणे जोडले गेलो. तेव्हा आयुष्य पूर्णच बदलून गेले. नागेश सामंतांवर तर डॉ. दाभोलकरांचा एवढा प्रभाव पडला की देवाच्या अनुषंगाने येणारी सगळी कर्मकांड, उपासतापास त्यांनी सोडून दिले. वाचनाचे वेड त्यांना आधीपासूनच होते. पण फारसे वैचारिक वाचन नव्हते. पण तेव्हापासून वैचारिक वाचनाची ओढच त्यांना लागली. फक्त आणि फक्त डॉ. दाभोलकरांच्या सहवासामुळे. त्यांचा आदर्श सतत समोर असल्यामुळे अतिशय संवेदनशील, स्त्रीपुरुष समानता प्राधान्याने मानणारा आणि स्वत:च्या जीवनात आचरणारा एक वेगळाच नागेश सामंत जन्माला आला. त्यानंतर बरीच वर्ष मला मात्र देव या जगात नाही हे मानण्याचा धीरच होत नव्हता. कुठली तरी शक्ती नक्कीच आहे. तिची आराधना केलीच पाहिजे, त्याचा आधार नसेल तर जगताच येणार नाही असे मला वाटायचे. बाकी बुवाबाजी, ज्योतिष, कर्मकांड यावर माझा विश्वास नव्हता. पण देवाला नाही म्हणायचे धैर्य होत नव्हते. लहानपणापासून नागेश सामंताचं आयुष्य श्रीमंतीत गेल्यामुळे मनात आली ती वस्तु लगेच हजर झाली पाहिजे अशी जी एक जीवनसरिणी झाली होती ती डॉ. दाभोलकरांच्या सहवासात त्यांच्याकडे बघून पूर्णपणे बदलली. अतिशय साधी जीवनपद्धती नागेश सामंतांनी स्वीकारली. कुठलेही समारंभ जिथे पैशांची उधळपट्टी आहे, डामडौल, मोठेपणा आहे तिथे जाणे त्यांनी सोडले. अगदी सख्ख्या भावांच्या मुलांच्या लग्नातही, खूप थाटामाटाचे लग्न आहे म्हणून ते गेले नाहीत.

मला या वागण्याचा पहिल्या पहिल्यांदा त्रास व्हायचा कारण मला कुटुंबाबरोबर, समाजाबरोबर संबंध तोडून चालणारे नव्हते. कुटुंबातील लोक म्हणायचे तो एक चक्रम सारखा वागतो. तू का त्याचे एकेतेस? तुम्हाला तीन मुली आहेत, तुम्ही असे वागलात तर त्यांची लग्न कशी होणार? कोण तुमच्याशी संबंध जोडणार? असे सारखे ऐकून घ्यावे लागल्यामुळे माझी चिडचिड व्हायची. पण विचारांचा ठामपणा आणि तो कृतीत आणण्याचे धैर्य डॉ. दाभोलकरांकडून शिकायला मिळाले. मी माझ्या मुलींना भरपूर शिकवले आहे. स्वत:च्या पायावर उभे केले आहे. मुलींची बाजू म्हणून मी कुठलाही कमीपणा घेणार नाही ही सामंतांची ठाम भूमिका होती. आमच्या तिन्ही मुली पण त्यांच्या विचारांशी पूर्णपणे सहमत होत्या. आज मला आनंदाने सांगावेसे वाटते की आमच्या तिन्ही मुलींची लग्ने पत्रिका न बघता रजिस्टर पद्धतीने अगदी घरच्या लोकांना बोलावून झाली. तिन्ही जावई आणि त्यांच्या घरची माणसे पण खूप छान मिळाली.

8 वर्षांपूर्वी नागेश सामंतांचं अगदीच अचानक हार्टअटॅक येऊन निधन झाले. खूपच मानसिक धक्का बसला. पण केवळ अंनिसच्या विचारांमुळे, डॉ. दाभोलकरांच्या विवेकवादी शिकवणीमुळे मी दु:खातून लवकर सावरु शकले. म्हणजे ज्या दिवशी निधन झाले त्या अतीव दु:खातसुद्धा मी यांची देहदान करण्याची इच्छा बोलून दाखविली आणि माझ्या मुलींनी ती अंमलात आणली. आपण जसे बोलतो, समाजाला बदलायला सांगतो तसे स्वत: वागण्याची शिकवण आणि तसे धैर्य डॉ. दाभोलकरांनी शिकवले.

गेली 25 वर्ष मी डॉक्टरांना ओळखते आहे. पण कधीही रागावलेले, चिडलेले, आरडाओरडा केलेला असे मी त्यांना पाहिले नाही. त्यांचे कार्यकर्त्यांना सांगणे असायचे की विरोध करण्यासाठी मोठ्याने बोलायची गरजच नाही. आपल्या विचारांची स्पष्टता हवी आणि ते सहजपणे व्यक्त करण्याचे, पटवून देण्याचे कौशल्य हवे.

स्वत:च्या जीवनात वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवून जगणारे अनेक जण असतात. पण हा वैज्ञानिक दृष्टीकोन चळवळीच्या रुपात तळागाळात पसरविण्याचा ध्यास घेणारे आणि त्यासाठी अथक परिश्रम करुन स्वत:चे सर्वस्व अर्पण करणारे डॉ. दाभोलकर एकटेच होते. डॉ. दाभोलकरांनी आखून दिलेला हा मार्ग कितीही कठीण असला तरीसुद्धा विवेकवाद आणि मानवतावाद अंगीकारुन अतिशय सच्चेपणाने, संयमाने सर्वांशी संवाद साधून अंनिसची चळवळ पुढे नेणे हेच त्यांच्या स्मृतीस खरे अभिवादन ठरेल.

नीता सामंत, चाळीसगाव

मोबा. नं. 9766614994