Categories
आवाहन

मराठा समाजाची कालसुसंगत चळवळलग्न समारंभातील अनावश्यक खर्च टाळणेबाबत आवाहन.

एप्रिल - २०११

मराठा परिवार, सांगली गेली काही वर्षे वधू-वर सूचक उपक्रम राबवित असून संबंधितांना आवश्यक ते मार्गदर्शन करीत आहे. सध्या लग्नविधीला समारंभाचे स्वरूप आले आहे. त्यामुळे स्वत:च्या अनिच्छेने किंवा परिस्थितीनुसार ऐपत नसतानाही नाईलाजाने वारेमाप खर्च केला जात असून त्याचे परिणाम संबंधितांना बराच काळ भोगावे लागतात आणि त्यामुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत आहे. यावर विचार होणे जरूरीचे आहे व यथा योग्य बदल करणे गरजेचे आहे.

या संदर्भात खालील बाबींवर विचार करावा

1) पत्रिकेला वैज्ञानिक आधार नसल्यामुळे पत्रिकेवर जास्त भर न देता मुला-मुलींची वैद्यकीय तपासणी जरूर करावी.

2) लग्न समारंभ जवळचे नातेवाईक व मित्र परिवार एवढ्या पुरताच मर्यादित ठेवावा. विवाह नोंदणी करून नोंदणी दाखला घ्यावा.

3) विवाह प्रसंगी मुला-मुलींसाठी उपयुक्त असेच कपडे व जरूरी पुरतेच संसारोपयोगी साहित्य वधु-वरांच्या पसंतीनुसार घ्यावे.

4) वाजंत्री(बँड, बँजो) कमी करून सनईच्या टेपरेकॉर्डरचा वापर करावा. त्याचप्रमाणे शोभेची दारू, औटगोळे इत्यादीमुळे हवा व ध्वनी प्रदूषण होत असल्याने आणि त्याच्या आवाजाचा आजारी माणसांना त्रास होत असल्याने तसेच पर्यावरण संतुलनासाठी सदर बाबी टाळाव्यात. लग्नविधीनंतर वापरला जाणारा स्प्रे आरोग्यास विघातक आहे.

5) सामाजिक संबंधांना बाधा येऊ नये म्हणून आहेराची देवाण घेवाण करू नये. रूकवत लग्न मंडपांत मांडू नयेत.

6) लग्न कार्य साध्या पद्धतीने, आवश्यक तेवढाच खर्च करून करावे आणि बचतीची रक्कम वधुवरांच्या भावी काळातील आवश्यक खर्चासाठी राखून ठेवावी.

7) जुन्या रूढी परंपरेनुसार सर्वसामान्यपणे शेवटी म्हटली जाणारी मंगल अष्टका “आली लग्नघटी समिप नवरा घेऊनिया वाघरा!….” ही सुरवातीला म्हणावयाची आहे. कारण या मंगलअष्टकेमध्ये शांत राहणेचे व गलबला न करण्याचे आवाहन केले आहे ते प्रथमच करणे योग्य आहे. एकूण पाच मंगल अष्टका म्हणाव्यात. शेवटी टाळ्या वाजवून वधू वरांना शुभाशिर्वाद द्यावा.

8) अक्षतांचे पावित्र्य राखणेसाठी स्टेजवरील मोजक्याच लोकांना अक्षता द्याव्यात. तशी माईकवरून सुरवातीस लोकांना कल्पना द्यावी.

9) स्टेजवर मोजक्याच गरज असणार्‍या लोकांनीच थांबावे, लग्नानंतर नवरा नवरी एकमेकांना हार घालताना त्यांना कोणीही  उचलू नये.

            आपणही आपले मित्र परिवार, नातलग, ग्रामस्थ यांना याबाबतीत प्रबोधन करावे आणि लग्नविधीचे पावित्र्य राखून लग्न समारंभ साध्या पद्धतीने करून अनावश्यक खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करावेत.

            वरील सर्व बाबींवर वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करून सकारात्मक प्रतिसाद द्यावा आणि समाज बांधवांचे हित जोपासण्याचा प्रयत्न करावा.

सुबराव पाटील (परिवार प्रमुख-फोन नं.02346-255540)
शिवाजीराव पाटील (पवार गुरूजी-फोन नं.0233-2310514), 
एन.बी.धनवडे (तासगाव), बी.एम.खराडे-पाटील (सांगली), ए.के.पाटील (बिसूर)