महाराष्ट्र सरकारच्या अधिकारी गु्रपने विज्ञानग्राम अंकोली(जि.सोलापूर)ला भेट दिली. शेतीच्या क्षेत्रफळापेक्षा घनफळ महत्वाचे हा मुद्दा स्पष्ट झाल्यावर अरूणशी झालेली चर्चा पुढे चालू राहिली.
(संदर्भ : मागील अंकावरून पुढे चालू)
देशपांडे सर! तुम्ही शांत व्हा! मला माहिताय की आम्हा खाकी डोक्यांमुळं तुम्ही किती संतापलाय! पण काही मार्ग निघतोय का? काही मार्ग निघाला नाही तर असंतोषाचा भडकाच नव्हे तर स्फोट होईल. खरं तर ज्याची जमीन जाते त्या जातिवंत शेतकर्यांचं कसलंही आणि कधीच समाधान जगातली कोणतीही शासनव्यवस्था करू शकणार नाही. त्या जमिनीवर कितीही गांधीबाबा अगदी एकमेकांना लावून अंथरले आणि नोटांच्या गड्ड्या सरांच्या घनफळात रचल्या तरी त्याच्या डोळ्यातलं पाणी पुसू शकणार नाही. सर! मला ‘दो बिघा जमीन’ सिनेमा आठवतोय! शेती कॉलेजातल्या फिल्म सोसायटीनं दाखवला होता. मदर इंडिया तर कितीतरी वेळा पाहिला आणि रडलोयसुद्धा. कमिशनरसाहेब आता भावुक झाले होते. मला एकदा वाटलं मसुरी डेहराडून अॅकॅडमीमध्ये आय.ए.एस.होणार्या अधिकार्यांना नाट्य सिनेमातलं अभिनयाचं प्रशिक्षण देतात की काय? पण मला त्यांच्या डोळ्यात सच्चाई दिसत होती. कारण नकळत म.गांधींनी आता त्यांचा चष्मा माझ्या डोळ्यावर लावला होता. त्यातून या अधिकार्यांच्या डोळ्यातली सच्चाई दिसली.
हे बघा साहेब! आपल्या सर्वांना शांतपणे म.गांधींच्याच मार्गानेच जावं लागेल. आम्हाला जेव्हा जेव्हा संताप येतो जेव्हा जेव्हा डोकं चालत नाही तेव्हा तेव्हा मी मनानं सेवाग्रामला पोहोचतो, बापू कुटीत जातो. मला तिथं अल्बर्ट आईन्स्टाईन, चाली चॅपलीन आणि माओ त्से तुंग म.गांधींच्याबरोबर हास्य विनोद करताना व गप्पा मारताना दिसतात. त्या चर्चेचं लाईव्ह ट्रान्समिशन जगभर चालू असतं. डोळ्यात आणि कानांत प्राण आणून लाखो लोक ती चर्चा पहात व ऐकत असतात. अगदी व्हाईट हाऊसमधील ओबामाच्या केबिनमध्ये, क्रेमलीनमध्ये त्या चर्चेचे प्रतिध्वनी येत असतात. चार्ली चॅपलिनची मूक फिल्म बॅकग्राऊंडला चालू असते.
माओ? आणि सेवाग्रामच्या बापू कुटीत? बहुधा मला वेड लागलं असावं असंच एका तहसीलदाराला वाटलं. बहुधा तो तिकडेच विदर्भात कुठंतरी नक्षलग्रस्त(!) भागात कार्यरत असावा.
होय हो! माओच म्हणतात बापू! आता जर तुमच्या मार्गानं जर गेलं नाही तर कधी कधी मीच दाखविलेल्या माझ्याच मार्गानं या देशातले तरूण जातील. तो मार्ग विनाशाचा आणि अत्यंत चुकीचा आत्मनाशाचा असेल. अगदी आमच्या चीनमध्येही बापू तुमचीच गरज आहे. तिथेही चकचकाटाच्या एसईझेड हव्यासापोटी माझे शेतकरी कॉम्रेडस् त्यांच्या जमिनींवरून कायमचे हुसकावले जाताहेत. असंतोषाचा भडका उडेल हो! तिएनमेन चौकात माझ्यासमोर युवकांच्या रक्ताचा सडा मला पुन्हा: पुन्हा पहावा लागेल! माओ अगदी काकुळतीला आलेले असतात. ते पाहून चार्ली चॅपलीन आईन्स्टाईनला डोळा मारून आणखी एक मॉडर्न टाईम्स किंवा ग्रेट डिक्टेटरची नवी आवृत्ती काढतो.
आणि काय सांगू? बापू कुटीतून बाहेर पडत असताना मला माझ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली असतात. देशपांडे सर काय म्हणताय? ती उत्तरं आम्हाला तरी कळू द्यात.
सांगतो सांगतो अगदी डिटेलवार सांगतो. पण तुम्हा मंडळींना वेळ आहे काय? तुम्हाला पंढरपूरला दर्शनाला जायचंय! अर्थात वशिल्यामुळे तुम्हाला मागच्या दारानं दर्शन मिळेल. खर्या भक्तांसारखं रांगेत उभं राहायचं नाहीच म्हणा!
तुम्ही सांगा सांगा! आम्हाला विठ्ठल! रूकमाई इथंच भेटलेत. हे बघा आपण आता पुन्हा शेतीच्या वैज्ञानिक व्याख्येकडे जाऊ. असं सांगा की शेतकर्याची काय काय कामं आहेत? तो जगाला काय देतो?
अन्न आणि धागा आणखी काय? तो तर अन्नदाता आहे. एक उत्तर आलं. शेतकरी फक्त अन्नच देतो? ते अन्न पोटात जाळायला म्हणजेच पचन व्हावयाला त्याचं मंद ज्वलन करण्यासाठी लागणारा प्राणवायूही तोच देतो. एक एकर उसाचा फड सरासरीनं चाळीस टन ऊस देतो. तसेच साठ टन ऑक्सिजनही देतो. ऑक्सिजनची सध्याची बाजारात किंमत चाळीस हजार रूपये प्रति टन आहे. चाळीस रूपये प्रति किलोग्राम! आणि फक्त अन्न जाळायलाच श्वसनासाठीच ऑक्सिजन लागतो असं नाही, तर तुम्ही ज्या गाड्यांनी इथं आलात त्यांच्या इंजिनातील घोड्यांनाही पेट्रोल पितांना प्रचंड ऑक्सीजनच लागतोय. तुम्ही शंभर शंभर घोडे(हॉ.पॉ.)जोडलेल्या रथातून इथंवर आलात, हे विसरू नका. त्या घोड्यांसाठीही म्हणजे सुमारे पंधराशे माणसांना लागतो तेवढा ऑक्सिजन आम्ही शेतकर्यांनीच तयार केलेला आहे. आता त्यांना सर्वांना शाळेत कधी काळी शिकलेलं विज्ञान आठवू लागलं होतं.(त्यांच्या स्पर्धा परिक्षेत या विज्ञानाची परीक्षा नसावी.)
बरं फक्त ऑक्सिजन देतोय का? अहो तुम्ही आणि तुमच्या असंख्य घोड्यांनी हवेत केलेली हागंदरी पादरी घाणही तो शेतकरी साफ करतोय. म्हणजे कार्बन डायऑक्साईड आपल्या पिकांमार्फत शोषून घेतो की नाही? तुमच्या त्या मुंबईच्या म्यु.कार्पोरेशनमध्ये सफाई कामगाराला तुम्ही किती वेतन देता? तो सफाई कामगार जेवढा कचरा घाण साफ करतो त्याच्या शंभर पटीनं हवेतील घाण शोषून घेण्याचं काम एक एकर उसाचा फड करतो. चला मोजा शंभर सफाई कामगाराचं वेतन आणि द्या त्या शेतकर्याला वनस्पती कार्बन डायऑक्साईड घेऊन प्रकाश संश्लेषणाद्वारे अन्न तयार करतात आणि ऑक्सिजनही बाहेर टाकतात. हे शालेय विज्ञान त्यांना आठवू लागलं.
बरं पृथ्वी जास्त तापायला लागलीय हे मान्य आहे ना? कार्बन डायऑक्साईड कमी करायला पाहिजे आहे की नाही? तसेच तिचे वातावरण थंड करायला हवं की नको? तुम्ही तुमची ऑफिसं उन्हाळ्यात कशी गार करता?
आमच्या विदर्भात वाळ्याचे पडदे लावून त्यावर पाणी मारतो किंवा वाळ्याच्या ताट्या लावलेले डेझर्ट कूलर्स असतात त्यावर पाणी मारण्यासाठी त्यातच पंप असतो आणि एका मोठ्या पंख्यानं गार हवा बाहेर फेकली जाते. लेटंट हीट ऑफ इव्हॅपोरेशन म्हणजे बाष्पीभवनासाठी लागणारी उष्णता त्या पाण्यातून आणि पर्यायानं हवेतून काढून घेतली जाते, म्हणून हवा गार होते. आता माझं विज्ञान शिक्षकामध्ये आणि त्या अधिकार्यांचं हुशार पटापटा उत्तर देणार्या शालेय विद्यार्थ्यांमध्ये रूपांतर झालं होतं. 10 बाय 10 फुटांच्या एका खोलीला दिवसभर गार ठेवण्यासाठी पाणी किती लागतं या प्रश्नावर किमान 100 लिटर दिवसाला लागतंच असं उत्तर आलं.
एक हेक्टर ऊस वाढत असताना 25,0000 घनमीटर पाण्याचं वर्षभरात बाष्पोत्सर्जन करतोच. त्यातलं उन्हाळ्यात सर्वात जास्त करतो. म्हणजे थोडं गणित केलं तर लक्षात येईल की एक हेक्टर ऊस दोन हजार डेझर्ट कूलर्सचं काम भर उन्हाळ्यात करीत असतो. म्हणजे तुमच्या औद्योगिकरणानं, शहरीकरणामुळं आणि सतत उष्ण प्रदूषित हवा सोडणार्या घोड्यांमुळं पृथ्वी तापतेय तिला थंड ठेवण्यासाठीही शेतकरी काम करतोय. ऑक्सीजन देणे, हवेतील घाण साफ करणे आणि ती थंड व सुलभ करणे ही कामं शेतकरी करतो. असं पटत नाही का? मला वाटतं हे समजायला शालेय पातळीवरचं विज्ञान आणि गणित पुरेसं आहे. मी त्या सर्व अधिकार्यांना आता शालेय पातळीवर आणलं होतं.
उगाच आमच्या उसाच्या नावानं बोंबलत जाऊ नका! एक उत्स्फूर्त कोल्हापुरी प्रतिक्रिया उमटली. ऊस फुकट न्या पन ह्या ऑक्सीजनचं सफाईचं अन् दोन हजार कूलर्सचं पैकं मोजा आदी. डोळं पाढरं हुत्याल! आता कोल्हापुरी गडी रंगात आला होता आणि शेतकर्याच्या भूमिकेत गेला होता.
आणि तुम्ही? त्या शेतकर्यांच्या जमिनी, पाणी ताब्यात घेणार. आदिवासींना हाकलून देऊन जंगलं साफ करणार आणि काँक्रिटची जगलं आणि हवेची हागंदारी पादारी करणारे उद्योगधंदे आणि घोड्यांच्या फॅक्टर्या उभ्या करणार? मी विचारलं.
पण सर! औद्योगिक विकास नको आहे काय? प्रगती कशी व्हायची? एक विकास पोपट त्यांची विकास पोपटपंची विसरले नव्हतेच.
अहो तुम्ही पुन्हा म.गांधींना विचारा ना! त्या महात्म्यानं ‘हिंद स्वराज्य’ केव्हाच लिहिलंय. त्यानंतर त्या डॉक्टर जे.सी.कुमारप्पांनी ‘इकॉनॉमी ऑफ परमनंस’ लिहिलं, ती पुस्तकं वाचा की! उत्तरं मिळतील. तथाकथित चंगळवादी शहरी, महानगरी लोकांच्या चैन्या आणि बांडगुळी उधळ्या जीवनपद्धतींसाठी सारे उत्पादन होणार असेल आणि त्यांच्याच सेवेसाठी पर्यावरणाचा विनाश होणार असेल तर तसले औद्योगिकरण नको. आणि औद्योगिक विकास करताना पर्यावरणाचा विनाश करावा लागतो हे कुठल्या शहाण्यानं तुम्हाला सांगितलंय? औद्योगिकरणानं आणि नव्या शतकाच्या नागरीकरणानं पर्यावरणाचा शाश्वत विकास व्हायला हवा, ते जास्त जास्त समृद्ध व्हायला हवं. जरा डोकं वापरा की! डोकी गहाण टाकलीत त्या जागतिक बँकेकडं? मी त्या विकास पोपटावर उगाच रागवलो. होतो. मलाच मग वाईट वाटलं. मी समजावू लागलो. असं बघा भविष्यकालीन पर्यावरणपोटी पर्यायी विकासनीतीसाठी जंगलं साफ करण्याची किंवा शेती व शेतकरी नष्ट करण्याची गरजच उरली नाही.
म्हणजे? शेती आणि उद्योग व्यवसाय शहरं एकत्रच नांदतील? मला नाही पटत! विकासपोपट ऐकायलाच तयार नव्हता.
आता असं करा माझ्या प्रश्नांची नीट उत्तरं द्या.
मी : तुम्ही म्हणताय ते औद्योगिकरण शहरीकरण कशासाठी?
विकासपोपट : कशासाठी म्हणजे? आर्थिक प्रगतीसाठी, पैसा मिळविण्यासाठी!
मी : पण तुम्ही म्हणताय ती प्रगती कशासाठी?
विकासपोपट : कशासाठी म्हणजे सर्वांना चांगले जीवनमान मिळवण्यासाठी!
मी : चांगले जीवनमान म्हणजे?
वि.पो. : अहो असं काय करता? जिथे सर्व गरजा खात्रीशीररित्या भागविता येतील असं जीवनमान!
मी : सर्व गरजा म्हणजे? गरजा तरी किती आहेत? नेमक्या कोणत्या आहेत? मानवी मूलभूत गरजा कोणत्या?
वि.पो. : अन्न, वस्त्र, निवारा झालंच तर शिक्षण….
मी : जरा नीट विचार करून सांगा बरं! की मी सांगू? 21 व्या शतकातील समृद्धी आणि सुसंस्कृत जीवनमानाच्या गरजा कोणत्या? त्या एकूण 15-16 असतील. आपल्याला तुम्ही म्हणताय ते औद्योगिकरण लागेल का ते नीट पाहू….
हे जे सर्व औद्योगिकरण, शहरीकरण, महानगरीकरण संस्कृती आणि जी प्रगती म्हणतात ती सर्व सर्व विकासनीती ही सर्व कोळसा आणि पेट्रोलियम या कधी ना कधी संपून जाणार्या इंधन साठ्यांवर व ते जाळून मिळणार्या ऊर्जेवर अवलंबून आहे. थोडा विचार करून बघा अगदी उद्या सकाळपासून पेट्रोलपंपावर पेट्रोल, डिझेल वगैरे मिळणार नाही. काय होईल? ती परिस्थिती येऊ शकते की नाही? भारतात वापरल्या जाणार्या पेट्रोलियम पैकी 85 टक्के पेट्रोलियम आयात करावे लागते. साधे कुठे खुट्ट झालं उद्या इराण आणि इस्त्रायलमध्ये युद्ध पेटलं तर एक थेंब क्रूड तेल तिथून येणार नाही. आपल्या देशातले पेट्रोलियम एकट्या मिलिटरीलाच लागेल, कारण एवढं अराजक माजेल आणि असंतोष होईल की लवकरच वापरावं लागेल. मग रेशन, काळाबाजार होऊन सध्याच्या दहापटीनं किंमत द्यावी लागेल! ज्या औद्योगिक विकासाचे सोंग मॉडेल आपण स्वीकारले आहे त्या आदर्श अमेरिकेत एक व्यक्ती वर्षाला 22,000 लिटर पेट्रोलियम एवढी ऊर्जा वापरते आणि भारतीय व्यक्ती फक्त 195 लिटर. आपली बेडकी फुगून फुगून किती फुगणार? अमेरिकन बैलाएवढी होईल का? अमेरिका हे पेट्रोलियम चक्क युद्ध करून दरवर्षी लाखो माणसं मारून मिळवते. आपण कसं आणतो? आपण आपलं लष्कर वापरून युद्धे करून पेट्रोलियम आणत नाही तर आपण तिथं अरब देशात गोरगरीब माणसं उन्हातान्हात राबायला पाठवितो. ते कष्ट करून पेट्रोलियम मिळवतात. शिवाय आपण चांगले अन्न, फळ, फळावळ, भाजीपाला, दुधाचे पदार्थ, अंडी, मांस मोठ्या प्रमाणावर पाठवितो. शिवाय त्यांच्या करमणुकीसाठी मुली, स्त्रियाही पाठवितो. त्यांचेही बाजार आहेतच. एक लिटर पेट्रोलच्या बदल्यात दीड किलोग्राम मांस पाठवावे लागते. मांस तयार होण्यासाठी 50 टन पाणी खर्च झालेले असते. म्हणजे आपण नैसर्गिक भांडवलाची निर्यात करून पेट्रोलियम आणतो. लक्षात ठेवा, पेट्रोल भारतात आणताना आपण 50 टन पाणी, अश्रु रक्त व घाम भरतो आहोत.
वि.पो.: मग ते अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत? ते आहेतच. सूर्यऊर्जा, पवनऊर्जा, अणुऊर्जा, पाणीऊर्जा झालंच तर ते बायोडिझेल, इथेनॉल, बायोगॅस, वूडगॅस, सहवीजनिर्मिती(को-जनरेशन) झालंच तर…. आणखी काही शोध लागतीलच की,
मला असं वाटतंय की, हे सर्वजण आणि तुम्हीसुद्धा विकास कैवारी अंधश्रद्धाळू आहात. पायाभूत विज्ञानाचे ऊर्जाविषयक वैश्विक नियम विसरले आहात. त्यांना लॉज ऑफ थर्मोडायनॅमिक्स म्हणजे औष्मिक गतीशास्त्र नियम म्हणतात. ते वैश्विक आहेत. त्यांना कुठेही अपवाद नाहीत.
नियम पहिला : लॉ ऑफ काँझरवेशन ऑफ एनर्जी : विश्वातली ऊर्जा आणि वस्तुमान कायम राहते. ते कमी होणार नाही किंवा जास्त ही होणार नाही. उर्जेचा नाश होत नाही तसेच ऊर्जा तयार होत नसते.
नियम दुसरा : विश्वातली ऊर्जा नेहमी सतत विरळ विरळ होत असते. सर्व विश्वातल्या उर्जेची घनता एकसारखी होईपर्यंत संतुलनपूर्ण अनावस्था येईपर्यंतशी परस्परांशी शून्य संबंध असणारी अवस्था होईपर्यंत हे चालूच राहणार आहे. यालाच एन्ट्रोपी म्हणतात. एन्ट्रोपी नेहमी वाढतच राहते. लॉ ऑफ इन्क्रिजिंग एन्ट्रोपीचे साधे उदाहरण द्यायचे तर… एखाद्या तेलवाहक जहाजात तेल भरलेले आहे. त्यात ऊर्जा ठासून भरलेली आहे. कारण अगदी थोड्या जागेत ते तेल भरलेलेआहे. परंतु समजा अपघात होऊन ते जहाज फुटले आणि तेलाचा पातळ तवंग समुद्राच्या पृष्ठभागावरून हजारो चौरस कि.मी. पाण्यावर नैसर्गिकरित्या संतुलन येईपर्यंत पसरला गेला, तर पहिल्या नियमानुसार ऊर्जा मात्र तेवढीच राहील. त्यात काहीही फरक पडणार नाही. परंतु ती ऊर्जा पसरलेली असल्यानं अत्यंत विरळ असणार. तिचा उपयोग नाही. तो संपूर्ण तवंग गोळा करून पुन्हा तसलेच नवीन तेलवाहू जहाज भरण्यासाठी जेवढी तेलऊर्जा खर्च करावी लागेल ती त्या गोळा झालेल्या तेलापेक्षा जास्त असेल. एवढेच नाही, तर ते तेल गोळा करण्यासाठी जी यंत्रणा उभी करावी लागेल ती यंत्रणा तयार करण्याला जेवढी ऊर्जा लागली असेल तेवढी ऊर्जाही त्या यंत्रणेच्या आयुष्यभरात गोळा होणार नाही. हा दुसर्या नियम लॉ ऑफ इनक्रिझींग एन्ट्रोपीचा आहे. सूर्यावर दरक्षणी अणुस्फोट होऊन त्याचं वस्तुमान कमी कमी होत आहे. संपूर्ण विश्वात सूर्य पसरत जातोय. त्यातली काही अत्यल्प ऊर्जा पृथ्वी मार्गात आल्यामुळे तिच्यावर आदळते. जमिनीवर आलेली ऊर्जा, जमीन, हवा, पाणी तापविते त्यातून वारे, लाटा, पाऊस असे ऊर्जा अविष्कार पहायला मिळतात.
सूर्याचं ऊन अर्थात सूर्यऊर्जा म्हणजे सुद्धा असंच समुद्रावर जमिनीवर सांडलेलं अत्यंत पातळ तवंग असणारं तेल समजा. तेलाच्या भाषेत म्हणायचं तर एक चौरस मीटरवर तेलाचा एक थेंब ही ऊर्जा प्रचंड आहे, परंतु ती अति विरळ आहे. ती ऊर्जा एकत्रित करण्यासाठी गोळा करण्यासाठी आणि विजेसारखा अतिघनतेचा लो एन्ट्रोपी एनर्जीत-उर्जेत रूपांतर करण्यासाठी जी साधने, संयंत्रे तयार करावी लागतात त्यासाठी जेवढी ऊर्जा लागते, त्यातील बहुतांश सर्व ऊर्जा पेट्रोलियम किंवा कोळसा जाळूनच मिळविलेली असते. उर्जेच्या पायाभूत नियमांनुसार त्या संयंत्रांच्या आयुष्यात तेवढी ऊर्जा मिळणे केवळ अशक्य आहे. तेव्हा ही पर्यायी ऊर्जासाधने किंवा स्त्रोत आहेत. ते कठोर ऊर्जा ताळेबंदावर चक्क दिवाळखोर शाबीत होत असतात. पवनचक्की बनविण्यासाठी लागलेली ऊर्जा तिच्या आयुष्यात सतत चालली तरी तिच्यापासून मिळणार नाही. शेती करून बायोडिझेल बनविण्यासाठी नक्कीच जास्त ऊर्जा लागणार. उदा.1 लिटर बायोडिझेलसाठी नीट गणित केलं तर 3 लिटर डिझेल एवढी ऊर्जा लागते. तीच गोष्ट इथेनॉलची, तीच गोष्ट बायोगॅसची, तीच गोष्ट अणुशक्तीची, अत्यंत विरळ असणारे म्हणजेच सांडलेल्या तेलासारखे युरेनियम गोळा करणे होय. अणुभट्टीतून तिच्या जीवनकाळात मिळणारी संपूर्ण ऊर्जा वापरून त्याच क्षमतेची दुसरी अणुभट्टी बांधताच येणार नाही. त्यामुळं ती ऊर्जाही दिवाळखोरच आहे. हे सर्व पर्यायी तथा कथित हरित, पर्यावरणापोषी समजले जाणारे ऊर्जास्त्रोत वापरणे म्हणजे पेट्रोलियम व कोळसा वापरापेक्षा जास्त वेगानं वापरणे होय. पेट्रोलियम व कोळसा हाही खोलवर असणारा कोळसा काढण्यासाठी त्या कोळशात असणार्या ऊर्जेपेक्षा जास्त ऊर्जा लागते. तेव्हा ती खाण दिवाळखोर होते.
जमिनीलगत पृथ्वीच्या पृष्ठभागालगत मिळालेला ऊर्जास्त्रोत संपला की हे तथाकथित अपारंपारिक पर्यायी हरित ऊर्जा स्त्रोतही संपणारच आहेत. कितीही कटु आणि अपचनीय असले तरी हे वैश्विक वैज्ञानिक सत्य आहे.
(क्रमश:)
-अरुण देशपांडे