Categories
प्रतिसाद

प्रतिसाद

मे - २०१२

            आरोग्यशास्त्र हे पूर्णपणे वैज्ञानिक सिद्धांतावर अवलंबून असले तरी ह्याही शास्त्रात, आजकाल अंधश्रद्धा बोकाळत चालली आहे. अनेक असाध्य(?) रोगांना/व्याधींना हा अंधश्रद्धेचा लेप लावला जात आहे. आता कर्करोग! आजमितीला तो रोग बराचसा असाध्य आहे! भविष्यात हे चित्र बदलेल!! पण आज तरी….

            काही दिवसांपूर्वी मी एका मित्राच्या घरी गेलो त्याची पत्नी नुकतीच ब्लड कॅन्सरने दगावली होती. मित्राकडे अनेक मंडळी आली होती. त्यातील एकजण सांगत होता की… पांढर्‍या रंगाला कॅन्सर म्हणे घाबरतो. म्हणून पांढर्‍या रंगाचा जास्तीत जास्त वापर करावा. कपडे- रूमाल, अंथरूण, खाद्यपदार्थ, दूध-दही वगैरे. ही जर वदंता सत्य असेल तर.. त्या व्यक्तीस नोबेल प्राईज मिळालेच पाहिजे. मधुमेह हा रोग आदल्या जन्मी मुंग्यांना त्रास दिल्याने होतो असेही पसरवले जात आहे. अशा अनेक गैरसमजुती एखाद्या किडीप्रमाणे मानवी बुद्धीला खात आहेत.

मुरलीधर छत्रे, डोंबिवली(प.)


            अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचा 2011 चा दिवाळी अंक मागेच मिळाला पाहूनच व नंतर वाचूनही खूप छान वाटले. तुम्हा सर्वांचे हार्दिक अभिनंदन. इतका मोठा 500 मोठ्या पानांचा अंक मुद्रणाची एकही चूक नसलेला प्रकाशित करणे ही सुद्धा कौतुकाची गोष्ट आहेच. ह्याशिवाय सर्व देणगीदारांची यादी(अर्थात नावे) प्रकाशित करणे नाविन्यपूर्ण गोष्ट आहेत व वार्तापत्राचे इतके खूप वर्गणीदार व देणगीदार आहेत ही सुद्धा एक समितीला प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे.

            ह्या अंकात अंधविश्वास दूर करण्यासाठी आजीवन झटणार्‍या एका दांपत्याची मंडपे सरांची सर्व वाचकांना ओळख करून दिली ह्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. धार्मिक तीर्थक्षेत्रांमध्ये चालणारी(अंधविश्वासांमुळे) लूट तुम्ही दोन क्षेत्रांतली प्रत्यक्ष आधारावर दाखवून दिली ही सुद्धा समाजासाठी उपयोगाची गोष्ट आहे. एकाच धक्क्याने हजारो वर्षांपासून आसन मांडून पक्के बसलेले अंधविश्वास जाणार नाहीत. सतत दीर्घ व भगीरथ प्रयत्न त्या दिशेने होत राहिले पाहिजे. तुम्ही (व मी सुद्धा) करतच आहोत. प्रयत्न चालू ठेवायचे आहेत हे मात्र खरे.

डी.डी.बंदिष्टे, इंदोर


            सध्या झी मराठीवर ‘उंच माझा झोका’ ही रमाबाई रानडेंवरची मालिका सुरू आहे. रमाबाईंच्या काळात असा समज होता की, स्त्रिया लिहावाचायला शिकल्या तर विधवा होतात. विधवेचे केशवपन केले नाही तर ती न्हायल्यानंतर तिच्या केसातून जितके थेंब पाणी पडेल तितके दिवस/वर्षे तिच्या नवर्‍याला नरकात वास्तव्य करावे लाागते. त्यावेळी समाजात शिक्षणाचे प्रमाण अत्यल्प होते. पण आत्ताच्या काळाची अजब अंधश्रद्धा ऐकून सखेद आश्चर्य वाटले. मी बाजारात एका म्हातार्‍या बाईकडे केळी विकत घेत होते. ती बाई भर उन्हात बसली होती. मी वाळ्याची हॅट वापरते. मी तिला म्हणाले, ‘आजी, तुम्हीही माझ्यासारखी हॅट घाला.’ त्यावर म्हातारी म्हणाली, ‘बायकांनी टोपी घालू नये. त्यामुळे महागाई वाढते. तुम्हीसुद्धा टोपी घालू नका.’

            आम्ही या अंधश्रद्धेबद्दल खेड्यातल्या काही मैत्रिणींना विचारले असता त्यांनी यास दुजोरा दिला. आतापर्यंत आमच्या दोन कामवाल्या बायकांना उन्हातान्हातून फिरण्यामुळे डोळ्यात मांस वाढल्याने डोळ्याचे ऑपरेशन करावे लागले. गरीबीमुळे त्यांना या ऑपरेशनसाठी पैशाची जुळवणी करणे त्रासाचेच गेले. भारतीय समाजात स्त्रीचे जगणे जास्तीत जास्त कष्टमय कसे होईल ते पाहिले जाते आणि म्हणे भारतीय संस्कृती सहिष्णु आहे! शेतकर्‍यांच्या मुलग्यांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून रडगाणे गायले जाते. खेडेगावात स्त्रियांबद्दल अशा बिनमाणुसकीने जर विचार केला जात असेल, तर मुलींनी बळीचा बकरा का व्हावे?

            उच्चवर्णीय स्त्रियांनी ब्युटीपार्लरचा व्यवसाय केला तरी चालतो. त्यांनी न्हावीकाम केले तर कुणाची ‘जातीविषयीची अस्मिता’ जागृत होत नाही. पण उच्चवर्णीय पुरूष मात्र बेकार राहील पण कधीही सलून चालवणार नाही. ते त्यांच्या प्रतिष्ठेच्या आड येते.

स्मिता पटवर्धन, सांगली.