Categories
अभिवादन

पुढील पिढ्यांसाठी त्यांचे कार्य महत्त्वाचे

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाची बातमी कळल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला हादरा बसला आणि पुरोगामी, वैचारिक, वैज्ञानिक चळवळीवर विश्वास असणारे अवाक् झाले. वास्तविक डॉ. दाभोलकरांचा खून होईल, असे काही त्यांचे व्यक्तिमत्त्व नव्हते. साने गुरुजी, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पगडा होता. त्यांचे आंदोलन सनदशीर मार्गाने चालू होते. त्यांनी भडकविणारी भाषणे केली नाहीत. कोणत्याही धर्माच्या ते विरोधी नव्हते. इतकेच नव्हे ‘मी नास्तिक असलो तरी कोणत्याही देवाविरुद्ध नाही.’ असेही त्यांनी सांगितले. अशा स्वभावाच्या माणसाचा खून होऊ शकतो, हेच पटण्यासारखे नाही. तरीही त्यांचा खून झाला, याचा अर्थ अतिरेकी भूमिका घेणारे घटक त्यांच्या विरोधात होते हे उघड सत्य आहे.

ज्यांना समाजव्यवस्था बदलावी असे वाटत नाही. समाजव्यवस्था आहे तशीच असावी, असा ज्यांचा आग्रह आहे, अशांचे हे दुष्कृत्य आहे. वास्तविक आपला समाज हा विषमतेच्या पायावर उभा आहे. आपल्याकडे अंधश्रद्धा, बुवाबाजी, जादूटोणा या निखालस खोट्या गोष्टीवर जनतेचा विश्वास आहे, हे पाहून डॉ. दाभोलकर अस्वस्थ होत असत. बुवाबाजी, जादूटोणा या गोष्टींतून सर्वसामान्य माणूस फसवला जातो, त्याचे आर्थिक नुकसान होते. काही बुवा आणि त्यांचे शिष्य अंधश्रद्धा टिकवण्याचा प्रयत्न करतात. हा काहींचा पोटापाण्याचा धंदा झाल्यामुळे अंधश्रद्धेच्या विरोधात काम करणार्‍यांवर त्यांचा राग असतो. समाजातून हे सर्व नष्ट व्हावे, यासाठी डॉ. दाभोलकर झटत होते. त्यासाठी त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. अनेक बुवांचे पितळ उघडे पाडले. यामुळे त्यांच्यावर यापूर्वी शारीरिक हल्लेही झाले. धमक्या दिल्या गेल्या. काही भोंदूबाबांनी त्यांच्या शिष्यांमार्फत डॉ. दाभोलकरांना इजा करण्याचा प्रयत्न केला, तरीही डॉ. दाभोलकर डगमगले नाहीत. काही चमत्कार करणार्‍या बुवांना त्यांनी आव्हान दिले. चमत्कार सिद्ध करून दाखविण्यासाठी लाखो रूपयांची बक्षिसे त्यांनी जाहीर केली होती, परंतु एकाही भोंदूबाबाने आपले चमत्कार सिद्ध केले नाहीत. काही बुवांना त्यांनी पळवून लावले. जगात जादू हा प्रकार नाही, हे त्यांनी अनेक वेळा सांगितले. आपला सर्वसामान्य माणूस भोळाभाबडा आहे. त्याचा चमत्कारावर लगेचच विश्वास बसतो आणि शेवटी तो फसवला जातो. केवळ अंधश्रद्धा निर्मूलनच नव्हे, तर अनेक उपक्रम त्यांनी राबविले. उदा. जातिप्रथा निर्मूलन, आपला समाज विषमतेच्या पायावर उभा आहे. आंतरजातीय विवाह केल्याने काही तरूण-तरुणींना जीव गमवावा लागला.

डॉ. दाभोलकरांनी जाती निर्मूलनासाठी अनेक मेळावे घेतले. आंतरजातीय विवाह त्यांनी घडवून आणले. साधनाच्या कार्यालयातही अनेक विवाह लावले. तसेच जातपंचायतीमुळे काही व्यक्ती आणि कुटुंबे वाळीत टाकली जातात. त्यासाठीही त्यांनी ‘जातपंचायतीला मूठमाती’ हा कार्यक्रम सुरु केला होता. त्याचाही राग काही जातीयवाद्यांच्या मनात असू शकतो.

डॉ. दाभोलकरांच्या खुनाची कारणे शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. प्रश्न आहे तो अतिरेकी धार्मिक सनातनी विचारांच्या लोकांचे काय करायचे? या वेळी गांधींच्या खुनाची तीव्र आठवण होते. गांधींजींचा खून झाला, पण त्यांचे विचार नष्ट झाले नाहीत. म्हणून डॉ. दाभोलकरांच्या खुनानंतर त्यांचे काम थांबेल, त्यांचे कार्यकर्ते घाबरून माघार घेतील, असे खुन्यांना वाटत असेल तर ते चूक आहे. खुनाच्या कृत्यात दोघांनी भाग घेतला असला तरी हा खून योजनापूर्वक असल्याने काही संस्था आणि संघटना त्याच्यामागे आहेत, हे उघड आहे. अशा संस्था व संघटनांचा शोध घेऊन त्यांना उघडे पाडले पाहिजे. विज्ञानाचा संपूर्ण स्वीकार न केल्याने अशा घटना घडतात. जगातील इतर देशांच्या मानाने आपला देश मागासलेला राहिला आहे. मागासलेपणाचे मोठे लक्षण म्हणजे आपल्या देशात असलेली जातीव्यवस्था होय. आपले अनेक सण, रुढी, परंपरा हे विषमतेवर आधारित आहेत. त्यातल्या त्यात स्त्रियांवर अन्याय करणारे आहेत. तसेच मागासल्या समजल्या गेलेल्या जातींनाही अन्यायकारक रुढी आणि परंपरा घालून दिल्या आहेत. हे सर्व टिकविण्यासाठी कट्टर धार्मिक तत्त्वे काम करीत असतात. त्यांना सुधारणा आवडत नाहीत. परंपरेने त्यांना मिळालेले उच्चस्थान टिकविण्याचा ते प्रयत्न करीत असतात. वास्तविक त्यांचे समज, त्यांच्या कल्पना भ्रामक असतात. त्याला वास्तवता व विज्ञानाचा आधार नसतो. आपली संस्कृती महान, असा त्यांचा समज असतो. ती टिकविली पाहिजे. यासाठी ते आग्रही असतात. म्हणून त्यांच्या आड येणार्‍यांचा ते खूनही करू शकतात. त्यामुळे डॉ. दाभोलकरांचा बळी गेला. देशाला पुरोगामी बनविण्यामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. तसेच ते स्वत: डॉक्टर असल्याने समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी ते झटले. त्यांच्या या महान कार्याचा पुढील पिढ्यांना नक्कीच उपयोग होईल. पुरोगामी बलशाली भारतनिर्माणाच्या कार्यात डॉ. दाभोलकरांच्या कार्याचा बहुमोल वाटा असेल, या महान कार्याबद्दल त्यांना लाख लाख सलाम!

विलास वाघ