आपल्याकडे सामाजिक, पुरोगामी चळवळीचे काम करणे बरेच कठीण असल्याचे वेळोवेळी दिसून येते. किंबहुना, तसा इतिहास आहे. त्यामुळे अशी चळवळ चालवणार्यांवर प्रतिगाम्यांकडून सदैव हल्ले होत आले आहेत. अशा प्रवृत्तींचा सामना करण्याचे आव्हान कायम आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येतून हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य जिद्दीने आणि तळमळीने करणारे ते एक अलौकीक व्यक्तिमत्त्व होते. आता ही चळवळ नेटाने पुढे चालवणे आणि त्याद्वारे अनिष्ट रुढी-परंपरा नष्ट करणे हीच त्यांना खर्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल.
पुरोगामी चळवळीचा वारसा चालवणार्या महाराष्ट्रात तळमळीच्या नेतृत्वाची हत्या व्हावी ही सार्यांसाठीच अंतर्मुख करणारी आणि संतापजनक बाब आहे. महात्मा फुले, आगरकर, महात्मा गांधी आणि एस. एम. जोशी यांना अशा हल्ल्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे अशा प्रवृत्तींचा सामना करण्याचे आव्हान कायम आहे. त्यासाठी प्रतिगाम्यांच्या हल्ल्यांचा संघटितपणे प्रतिकार केला पाहिजे. त्यांनी बाबा आढावांच्या ‘एक गाव, एक पाणवठा’ या सामाजिक चळवळीत महत्त्वपूर्ण सहभाग घेतला हेता. पुढे त्यांनी 1989 मध्ये ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ची स्थापना केली. साने गुरूजींनी सुरू केलेल्या ‘साधना’ साप्ताहिकाच्या संपादकाची धुरा त्यांनी 16 वर्षापूर्वी हाती घेतली होती. सातार्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अॅकॅडमी या संस्थेच्या परिवर्तन केंद्राचे ते संस्थापक सदस्य होते.
समाजावरील अंधश्रद्धेचा पगडा दूर करण्यासाठी विविध पातळ्यावर प्रयत्न करावे लागतील याची दाभोलकरांना जाणीव होती. त्या दृष्टीने त्यांनी वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले. त्यासाठी संघटनेच्या माध्यमातून माध्यमिक शाळांमधील शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार केला. विविध शिबिरांचे आयोजन घडवून आणले. या माध्यमातून 15 ते 16 हजार शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आले. अशा स्वरूपाच्या उपक्रमामुळे ग्रामीण भागात ‘अंनिस’ चर्चेचा विषय बनली. या प्रकल्पाचा एक भाग म्हणून राज्यातील तीन लाख विद्यार्थ्यांना परीक्षेला बसवण्यात आले. या माध्यमातून विद्यार्थ्यांना वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे काम करण्यात आले. याचाच पुढचा भाग म्हणून ‘विज्ञान बोधवाहिनी’ हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत व्हिडीओ प्रोजेक्टरवर चित्रफिती दाखवण्यात आल्या. मनोरंजनातून विज्ञान, चमत्कारामागचे विज्ञान दाखवून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात आले. या वाहिनीच्या निमित्ताने शाळांमधून विज्ञान महोत्सव साजरे करण्यात येऊ लागले. धर्माची विधायक आणि कृतीशील पद्धतीने चिकित्सा करण्याचे काम ‘अंनिस’ ने दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली केले. या उपक्रमांतर्गत ‘अंनिस’ ने हाती घेतलेले कार्यक्रम वेगळे आणि प्रेरक ठरले. शनी शिंगणापूरच्या मंदिरात महिलांन प्रवेश मिळत नसल्याबद्दल ‘अंनिस’ने केलेले आंदोलन अशा प्रकारचे पहिलेच आंदोलन होते. धर्माच्या नावाने स्त्रीला एखाद्या धर्मस्थळी प्रवेश नाकारता येतो का, असा प्रश्न करणार्या दाभोलकरांच्या अर्जावर न्यायालयाने दिलेला निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या इतिहासातील ऐतिहासिक घटना ठरली.
अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे काम सुरू झाल्यापासून चमत्कार करणारा कोणताही नवा बाबा महाराष्ट्रात जन्माला आला नाही. ही सुद्धा मोठी उपलब्धी म्हणायला हवी. ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी ‘चमत्कार दाखवा आणि अकरा लाख रूपये मिळवा’ असे आव्हान समितीने दिले. ते कोणीही पेलू शकले नाही. चमत्कार अस्तित्वात नसतात हे पटवून देण्यासाठी समितीने महाराष्ट्रव्यापी यात्रा काढली. एका बाजूला धर्मचिकित्सा आणि दुसर्या बाजूला शोषण करणार्या अंधश्रद्धा अशा पार्श्वभूमीवर अंधश्रद्धाविरुद्ध समितीने आक्रमक तंत्र विकसित केले. पुढे अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा करण्यासाठी समितीने प्रयत्न सुरू केले. त्यासंदर्भात गेल्या काही वर्षापासून नरेंद्र दाभोलकर रान उठवत होते. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात यासंदर्भातील विधेयक मंजूर व्हावे असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली विविध प्रकारची आंदोलने पार पडली. यासंदर्भात व्यापक जनमत तयार करण्यासाठी त्यांनी राज्यभर दौरे केले होते. या कायद्याचे महत्त्व सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न दाभोलकरांनी सातत्याने केला. एवढेच नव्हे तर, या विधेयकाला विरोध करणार्यांची बाजू समजून घेण्यासाठी प्रयत्न केला होता. त्यांचे हे सारे कार्य क्रांतिकारी म्हणायला हवे. त्यांच्या हत्येमुळे चळवळीची मोठी हानी झाली आहे. अर्थात, त्यांचे विचार समाजाला कायम प्रेरणादायी ठरणार आहेत.
–भाई वैद्य