विज्ञान विषयात रस असलेल्यांच्यात रिचर्ड फेनमन हे नाव न ऐकलेले अपवादानेच सापडतील. रिचर्ड पी फेनमन, स्टीफन हॉकिंग, कार्ल सॅगन, पॉल डेव्हिस, फ्रीमन डायसन, रिचर्ड डॉकिन्स, स्टीफन जे गूल्ड इत्यादी वैज्ञानिक-संशोधकाने आईन्स्टाईन, फेर्मी, ओपेलहायमर, डिरॅक नंतरच्या दुसर्या महायुद्धोत्तर पिढीला घडवले असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरणार नाही. त्यातल्या त्यात फेनमनचे बिनधास्त व्यक्तिमत्व कुणालाही आकर्षक ठरेल असेच होते. फेनमन हा केवळ वैज्ञानिक नव्हता तर एक सच्चा दिलाचा, सामान्याच्या गुणदोषासकट असलेला एक ‘माणूस’ त्याच्यात होता. याचीच प्रचीती माधुरी शानभाग या लेखिकेने लिहिलेल्या ‘रिचर्ड फेनमन : एक अवलिया संशोधक’ हे पुस्तक वाचत असताना येते. लेखिकेने फेनमन यांनी लिहिलेल्या ‘शुअर्ली यू आर जोकिंग, मि फेनमन आणि व्हाय डू केअर व्हाट अदर्स थिंक’ या आत्मचरित्रवजा लेखांच्या संग्रहाबरोबरच त्याच्यावरील इतर पुस्तकं, लेख वाचून व नेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचे संकलन करून या अवलिया संशोधकाचा मराठी वाचकांना फारच छानपणे करून दिल्याबद्दल त्यांचे जितके कौतुक करावे ते कमी पडेल.
रिचर्ड फेनमन यांच्या संशोेधन कारकिर्दीविषयी, वैज्ञानिक प्रतिभेविषयी लेखिकेने परिचय करून दिला आहे. फेनमन यांनी क्वांटम इलेक्ट्रोडायनॅमिक्स(क्यू इ डी) विषयी मूलभूत संशोधन केले होते. त्याच्या फेनमन आकृत्या विषय समजून घेण्यात आजही उपयुक्त ठरतात. नॅनोटेक्नॉलॉजीचा पाया त्यानीच घातला. आयुष्यभरात त्यांनी अनेक भूलमूत विज्ञान विषय हाताळले व पुढील संशोधनाला दिशा दिली. या सर्व गोष्टींचा लेखिकेने परिचय करून दिला आहे. फेनमनमधील माणुसकीचे दर्शन घडवून देण्यात त्यांचा जास्त भर आहे.
रिचर्ड फेनमनमधील मॅड जिनियस हा गुणविशेष अगदी बालपणापासून प्रकर्षाने जाणवत होता. गणितीय समस्या सोडवण्याची हतोटी, संशोधक वृत्ती, भौतिकीच्या नियमांचे नेमके आकलन, किचकट गॅजेटशी दोस्ती, रेडिओ दुरूस्तीतील कुशलता इत्यादीमुळे त्याच्या शेजारच्यानी त्याला मॅड जिनियस ही उपाधी देऊन टाकली होती. शालेय शिक्षण संपून त्यांनी एम.आय.टी.या जगप्रसिद्ध कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्याच्या प्रतिभेला जणू पंख फुटले. गणिताचा वापर अभियांत्रीकीतील मोठमोठ्या किचकट समस्या सोपी करत सोडवायचे तंत्र त्यांनी आत्मसात केले होते. डोक्यातच सगळी समीकरणे सोवून मधल्या पायर्या गाळत उत्तराकडे यायच्या त्याच्या कौशल्याने कॅलेजविश्वात त्याला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. ‘अमेरिकेत आईन्स्टाईननंतर गणित अन् फिजिक्समधील कोणत्याही समस्येवर जर फेनमन उत्तर शोधू शकले नाहीत, तर जगात कुणीही ते शोधू शकणार नाही.’ असा नावलौकिक फेनमनने त्याकाळी मिळविला होता. व हा नावलौकिक पुढील आयुष्यभर टिकून राहिला.
प्रिस्टन विद्यापीठात जॉन व्हीलर या दबदबा असलेल्या संशोधकाकडे संशोधक सहाय्यक म्हणून पुढील शिक्षणासाठी फेनमन रूजू झाला. याच कालखंडात बालमैत्रिण असलेल्या ऑर्लिनवर त्याचे प्रेम जडले. लग्नाच्या आणाभाका झाल्या. परंतु ऑर्लिन क्षयरोगाची शिकार झाली होती. तरीसुद्धा तिला दिलेले वचन मोडण्यास तो तयार नव्हता. ती मृत्यूमुखी आहे, क्षयरोग सांसर्गिक असतो व तिला मूल होणार नाही, या गोष्टी माहीत असूनसुद्धा तिच्या समाधानासाठी त्यांनी तिच्याशी लग्न केले. घर-संसार करण्याचा बेत आखला. परंतु तिच्यासाठी हॉस्पिटलच घर होते.
लॉस अल्मॉस येथील अणुबाँब विकसित करणार्या मॅनहाईटन प्रकल्पावर फेनमन काम करत असताना ऑर्लिनचा मृत्यू झाला. तिच्या सोबतचे आनंदाचे क्षण आणि तिच्या मृत्यूचे दु:ख या पर्वाकडे मागे वळून पाहत फेनमननी एक अप्रतिम लेख लिहिला आहे. प्रकल्पावरील कामाचा आनंद व ऑर्लिनची शुश्रुषा यात अडकलेल्या फेनमनच्या गमतीचा स्वभावविशेष या वेळीसुद्धा लक्षात राहण्यासारखी ठरली. सुरक्षेच्या नावाखाली सैनिकी शिस्तीची त्रासदायक अंमल बजावणी, सेन्सॉरशीपमुळे होत असलेली अडचण, सैनिकशाहीची अरेरावी इत्यादीवरील फेनमनची मल्लीनाथी व त्याच्या चेष्टेखोर स्वाभावामुळे इतरांची भरपूर करमणूक होई. बंद कुलूप उघडणे हा त्याचा छंद होता. तिथली सुरक्षितता किती तकलादू आहे हे दाखविण्यासाठी आकडे जुळवून उघडणार्या कुलुपांचा सिक्रेट कोड तो सहजपणे ओळखत असे.
या प्रकल्पानंतर कार्नेल विद्यापीठ व कॅल्टेक येथे त्यांनी प्राध्यापकाची नोकरी केली. भरपूर संशोधन केले. त्याच्या संशोधनाला फिजिक्ससाठीचा नोबल पारितोषिकही मिळाले. मुळात तो हाडाचा शिक्षक होता. त्याची शिकविण्याची पद्धत अत्यंत वेगळी होती. याच काळात त्यांनी लिहिलेले फिजिक्सवरील फेनमन लेक्चर सिरीजची पुस्तकं त्याकाळी जगभरातील विद्यार्थी वापरत होते.(व अजूनही वापरत असतील!)
त्याच्यातील उपजतच असलेल्या निगर्वी स्वभावविशेषामुळे तो सर्वांमध्ये मिळून मिसळून वागत असे. बारमधील वेटरशीसुद्धा अत्यंत अदबीने वागत असे. याच काळात त्याचे ग्वेनेथशी लग्न झाले. त्याला कौटुंबिक सौख्य मिळाले. त्याचा पत्रव्यवहार प्रचंड होता. कुणीही पत्रं लिहिली तरी त्याला ते उत्तर देत असे. त्यांच्या पत्रातील मूळ विषयाला बगल न देता थेट व प्रामाणिकपणे उत्तर पाठविण्याचा त्याचा स्वभाव होता. सुप्रसिद्ध मॅजिशियन व चमत्कारांचा भांडाफोड करणार्या जेम्स रँडीबरोबर त्याचे मित्रत्वाचे संबंध होते. रँडीच्या जादूच्या ट्रिक्समागे असलेल्या विज्ञानाचा तो काही क्षणातच ओळखत होता.
जन्मजात उत्सुकतेच्या स्वभावामुळे विज्ञान व विज्ञानाबाहेरील अनेक विषयांवर तो अभ्यास करत होता. त्याची विधानं अभ्यासपूर्ण असत. देव, धर्म, अतींद्रियशक्ती, मानवी वर्तन, स्वभाव, प्रेम, शालेय शिक्षण, पाठ्यक्रम, पाठ्यपुस्तकं इत्यादी अनेक विषयावर तो सहज व मार्मिक टीका टिप्पणी करत असे. माणसांना येणार्या अतिंद्रिय अनुभवामध्येसुद्धा त्याला कुतूहल होते. अशाच एका प्रत्यक्ष प्रयोगात त्याने भागही घेतला होता. परंतु पदरी निराशा पडली. फेनमन त्याकडे अगदी वैयक्तिक स्वरूपाचा अनुभव या नजरेने पाहत होता. अतींद्रिय अनुभव म्हणजे मनाचे शिथील अवस्थेतील भटकणे आहे व हा अनुभव अगदी खाजगी असतो. आपल्याला जाणवू न शकणार्या जगाशी संपर्क होणे या गोष्टी त्याला पटत नव्हत्या. असले अनुभव स्वप्नसदृश्य असतात, हे त्याचे ठाम मत होते.
नोबल पारितोषिक मिळेपर्यंत फेनमनला कुठेही भटकणे, अती सामान्यात मिसळणे, कुठल्याही बारमध्ये जाणे, मौजमजा करणे, यावर कुठलेही बंधन नव्हते. परंतु पारितोषिक मिळाल्यानंतर एखाद्या पिंजर्यातल्या प्राण्याला पाहायला जमावेत असे लोक त्याच्याभोवती जमू लागल्यामुळे त्याचा फार विचका होत असे. त्यामुळे समारंभाना जाणे टाळत असे. अनेक वेळा सामान्यांचेच नव्हे तर तज्ञांचेसुद्धा त्याच्या विद्वत्तेबद्दल, बहुश्रुततेबद्दल गैरसमज होत असत. फेनमनमधील अफाट आकलनशक्तीमुळे त्याला कुठलाही विषय वर्ज्य नव्हता व फारच कमी कालावधीत विषय आत्मसात करून घेत असे. शिक्षकी पेशातील अनुभवामुळे समोरच्यांना समजून सांगण्याची हातोटी होती. त्यामुळे त्याच्या आवडत्या फिजीक्स विषयाबरोबरच इतर अनेक विषयात गती असून तो मूलभूत असे काही तरी सांगू शकतो अशी समजूत पसरली होती. माया संस्कृतीतील गणिताविषयी त्याची फक्त तोंडओळख असूनसुद्धा तज्ञाला लाजवेल असे त्याविषयी तो बोलत असे.
भटकण्याचा छंद जोपासल्यामुळे तो जगभर फिरत होता. ब्राझिल, जपानसारख्या ठिकाणी गेल्यानंतर त्याच्यातील लोकासारखेच राहण्याचा प्रयत्न तो करत होता. अनोळखी शहरात गेल्यानंतर तेथील नेहमीचे टूरिस्ट स्पॉटस् न बघता गरीबांच्या वस्तीत फिरणे त्याला आवडत असे. ब्राझिलमध्ये असताना तेथील एका विशिष्ट प्रकारचे वाद्य शिकून त्याने कार्निव्हालमध्ये भागही घेतला होता. काही काळ त्याला चित्रं काढण्याची गोडी लागली होती.
नोकरशाहीचा त्याला तिटकारा होता. त्यांनी दिलेल्या एका व्याख्यानाला सरकारकडून काही किरकोळ मानधन मिळणार होते. परंतु नेहमीच्या सरकारी खाक्याप्रमाणे शंभर ठिकाणी सही केल्याशिवाय पैसे मिळणे जिकिरीचे ठरत होते. व फेनमनला हे पसंत नव्हते. त्यामुळे त्यांनी संयोजकाला मी फक्त तेरा सही करीन व त्यापेक्षा जास्त सह्या करणार नाही अशी अट घातली होती. शेवटी त्याचे काय झाले हे मुळातूनच वाचायला हवे. अमेरिकेने सोडलेल्या चॅलेंजर या अवकाशयानाच्या अपघाताची कारणं शोधणार्या समितीत त्याचा समावेश होता. तेव्हासुद्धा त्याला अशाच प्रकारच्या नोकरशाहीचे अनुभव आले. त्याच्यातील सत्यशोधनाच्या चिकाटीमुळे त्यांनी योग्य कारणावर बोट ठेवून सर्वांना आश्चर्यचकित केले व नोकरशाहीस नामोहरम केले.
फेनमन अनेक ठिकाणी विविध विषयांवर व्याख्यान देत असत. नॅनोटेक्नॉलॉजी, अतीसूक्ष्मविश्व, संगणक इत्यादी विज्ञान-तंत्रज्ञानाशी संबंधित विषयाबरोबरच आधुनिक समाजात विज्ञान संस्कृतीची भूमिका, धर्म आणि विज्ञान, विज्ञान म्हणजे काय, कार्गोकल्ट सायन्स, विज्ञानाची अनिश्चितता यासारख्या विषयावरील गंभीर चिंतनानंतर त्यांनी दिलेली व्याख्यानंसुद्धा भरपूर गाजल्या. जे संशोधक देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या अन् आस्तिक लोकांच्या देवावर विश्वास ठेवण्यात बराच फरक आहे असे फेनमनला वाटत होते. ‘मला देव असावा असे वाटते’ अन् ‘देव आहेच’ या दोन वाक्यात फरत आहे. देवाच्या अस्तित्वावर आस्तिक माणसाचा संपूर्ण अन् ठाम विश्वास असतो तर संशोधकाचा त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वास नसतो, समर्पण नसते तर एक संशयाचा पदर राहिलेला असतो. (फेनमन यांच्या आस्तिक-नास्तिक या विषयाच्या मताबद्दलची सोबतची चौकट पहावी.)
विज्ञान जास्तीत जास्त लोकापर्यंत पोचायला हवे. त्यामागचा विवेक, प्रयोगाची सार्वकालिकता, नव्या कल्पना पडताळून पाहण्याची पद्धत अन् वैज्ञानिक नीती समाजाच्या सर्व थरापर्यंत पोचण्यासाठी प्रयत्न यावर फेनमनचा भर होता. आजच्या राजकारणात जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन रूजवू शकलो तर कितीतरी फरक पडेल यावर त्याचा विश्वास होता. या जगापासून विज्ञान खूपच दूर आहे; आपण यासाठी काही करत नाही; विज्ञानाचा याच्याशी काय संबंध म्हणून आपण चूप राहतो, अशी खंत तो व्यक्त करतो. कल्पना लढवायला मदत करत विज्ञान शिकवले तर मुलांच्या मनात कुतूहल निर्माण होईल, प्रयोग करत, निरीक्षण करत स्वत: निष्कर्ष काढायचे कौशल्य त्यांच्यामध्ये विकसित होईल, असे त्याला वाटत होते. विज्ञानामध्ये प्रामाणिकपणा, सत्याच्या बाजूने ठामपणे उभे राहणे किती महत्वाचे आहे हे न शिकविल्यामुळे अतोनात नुकसान होत आहे. अशी खंत त्यांनी एका व्याख्यानाच्या वेळी मांडली. धर्मातील, विज्ञानातील, इतिहासातील, समाजातील जे जे चांगले ते घेऊन पुढे जात राहील यावर त्याचा विश्वास होता. मानवी मूल्ये शाबूत ठेऊन दया, क्षमा, शांती, बंधुभाव, समता या चिरंतन मूल्यांना सोबत घेत प्रगतीच्या दिशेने मानव पुढे जात राहील अन् विज्ञान त्यात महत्वाची भूमिका बजावेल हा आशावाद त्याच्यात होता.
वयाच्या साठाव्या वर्षी त्याला कर्करोगाने ग्रासले. तरीसुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत सर्व कार्यात तितक्याच उत्साहाने तो भाग घेत होता. 15 फेबु्रवारी 1988 रोजी वयाच्या एकोणसत्तराव्या वर्षी त्याने जगाचा अखेरचा निरोप घेतला. व एक हरहुन्नरी व्यक्तीमत्व काळाच्या पडद्याआड कायमचे गुप्त झाले. एक सुंदर व संग्राह्य पुस्तक!
– प्रभाकर नानावटी
- पुस्तकाचे नाव : रिचर्ड फेनमन एक अवलिया संशोधक
- लेखिका : माधुरी शानभाग
- प्रकाशक : राजहंस प्रकाशन, पुणे
- किंमत : 275 रू., पृष्ठ संख्या – 325
आस्तिक नास्तिक
एकीकडे नोबेल पुरस्कार मिळवणारे उत्तुंग संशोधन तर दुसरीकडे सोपे, सुबोध विज्ञानलेखन. एका बाजूला धर्म, तत्वज्ञान, मानवी जीवन यावर गंभीर चिंतन तर दुसर्या बाजूला नर्म विनोद. रिचर्ड फेनमन या अवलिया संशोधकाचं हे रंगतदार चरित्र साकारलंय, माधुरी शानभाग यांनी….
मी जेव्हा देवावर विश्वास आहे असे म्हणतो तेव्हा देव म्हणजे काय? इथून प्रश्नांना सुरवात होते. माझ्या मनात इथे आपापला वैयक्तिक देव अभिप्रेत आहे. ज्याची आपण प्रार्थना करतो, ज्याने हे विश्व निर्माण केले असे मानतो अन् आपल्या नितीनियमांवर, सच्छील वागण्यावर त्याच्या अस्तित्वाच्या विश्वासाचा अंकुश असतो.
विज्ञानाच्या विद्यार्थ्याला धर्म आणि विज्ञानात संगती राखण्यासाठी दोन समस्या उद्भवतात. पहिली म्हणजे हे असे का, हा प्रश्न सतत विचारत राहिल्याशिवाय विज्ञानात प्रगती होऊच शकत नाही. त्यासाठी तुमच्या मूळ स्वभावातच प्रत्येक बाबीचा कार्यकारणभाव शोधायची चिकित्सक वृत्ती असावी लागते. विज्ञानात काहीच शाश्वत नसते. कोणतेही अंतिम असे सत्य नसते. अमूक एक ‘संशयातीत सिद्ध’ झालेले आहे, असे आपण म्हणू शकत नाही.’ हे असे असेल कारण असे परिणाम मिळत आहेत किंवा असे परिणाम मिळत आहेत म्हणून असे असायला हवे’ अशीच भाषा विज्ञानाच्या साहाय्याने सत्य शोधताना वापरावी लागते. तेव्हा हे खरे आहे व खोटे आहे असे नसून असे असण्याची शक्यता आहे अशीच भाषा या वाटेवर योग्य ठरते अन् ज्ञानाच्या प्रत्येक क्षेत्रात एका बिंदूपाशी तर ‘पुढे काय आहे ते ठाऊक नाही’, असेच शब्द योग्य ठरतात. आपले अज्ञान स्वीकारणे ही विज्ञानाची परंपरा सर्वच विषयांनी स्वीकारायला हवी. कारण त्यामुळे प्रगती होते. आपण निर्णय घेतो ते बरोबर आहेत, असा दावा कुणीच करू नये.’ प्राप्त परिस्थितीत मला हे योग्य वाटते’, असा विचार करूनच आपण निर्णय घ्यायला हवेत.
आपण सर्व अनिश्चिततेच्या भोवर्यात जगत आहोत हे स्वीकारणे गरजेचे आहे. अनेक प्रश्नांना आपल्याकडे उत्तरे नाहीत, हे जाणून विज्ञानात पुढचे पाऊल टाकले जाते. विज्ञानाचा अभ्यास करणार्या प्रत्येक विद्यार्थ्याने अशी अनिश्चितता स्वीकारायची वृत्ती आधी अंगी बाणवली पाहिजे तरच त्यांच्या हातून काहीतरी भरीव होऊ शकते. या अनिश्चिततेपासून सुटका नाही. त्यामुळे एकदा का अशी संशयी वृत्ती विकसित झाली की ती सर्वच न पटणार्या गोष्टींना प्रश्न विचारू लागते. आता बदलणे त्याच्याही हातात राहत नाही. म्हणजे ज्याच्या अस्तित्वाचा कोणताही थेट पुरावा आजवर सापडलेला नाही तो देव खरेच अस्तित्वात आहे का? असा प्रश्न मग स्वाभाविक ठरतो. जे संशोधक देवावर विश्वास ठेवतात, त्यांच्या अन् आस्तिक लोकांच्या देवावर विश्वास ठेवण्यात बराच फरक आहे. ‘मला देव असावा असे वाटते’ अन् ‘देव आहेच’ या दोन वाक्यांत फरक आहे. देवाच्या अस्तित्वावर आस्तिक माणसाचा संपूर्ण अन् ठाम विश्वास असतो, तर संशोधकाचा त्याच्या अस्तित्वावर संपूर्ण विश्वास नसतो, समर्पण नसते तर एक संशयाचा पदर राहिलेला असतो. लहानपणापासून धार्मिक वातावरणात वाढलेला तरूण जेव्हा विज्ञान शिकू लागतो तेव्हा त्याचा देवावरचा विश्वास पहिल्याइतका अभंग अन् संपूर्ण राहूच शकत नाही असे मला वाटते.
अर्थात ही प्रक्रिया एका दिवसात घडत नाही. प्रथम त्याला मृत्यूनंतर आयुष्य आहे का, देवाच्या अन् संतांच्या चरित्रांमध्ये जे चमत्कार लिहिलेले आहेत ते खरेच घडलेत का, असे प्रश्न पडायला सुरवात होते अन् मग अविश्वासाचा शिरकाव होऊन त्याचे प्रमाण वाढत जाते. त्याच्या वडिलांचा देव अन् त्याचा देव आता वेगळा झालेला असेल. माझ्या बाबतीत हेच घडले अन् अनेक तरूणांना असेच अनुभव येतात, हे मी त्या वयात जाणलेले आहे.
नास्तिकता अन् चांगले नीतीपूर्ण आचरण असणे, या दोन्ही गोष्टी आहेत. त्या एकाच माणसात सहकार्याने नांदू शकतात. अनेक नास्तिक माणसे ‘देवमाणसा’ सारखी आहेत, असे म्हणण्यात काहीही विसंगती नाही.
(संकलन – अनिरूद्ध अभ्यंकर)