Categories
इतर कार्याध्यक्षांची डायरी

सण-उत्सवांना दिली अंनिसने विधायक दिशा

ऑक्टोबर - २०११

श्रावण सुरु झाल्यापासून व्रत, वैकल्ये, सण, उत्सवांचा मोसम सुरु झाला आहे. आता पुढचे 6-7 महिने सलगपणे कुठला ना कुठला सण-उत्सव-व्रत असणार आहे, दिवसेंदिवस त्यामध्ये भरच पडतांना आपण बघतो. त्याच्याशी संबंधित अनेक घटकांचे पोटपाणी त्यावर अवलंबून आहे हे पण आपल्याला माहित आहे. पूजा विधीला लागणार्‍या साहित्यापासून पुजा सांगणार्‍या पुजार्‍यापर्यंत आणि वर्गणी जमविणार्‍या मित्र मंडळ कार्यकर्त्यांपासून मंडप, लाईट, माईक लावणार्‍या ठेकेदारापर्यंत  अनेकांचे व्यवसाय या सण उत्सवांवर अवलंबून असतात. त्यातल्या फक्त थेट निसर्गातून घेतल्या जाणार्‍या वा निसर्गात टाकून दिल्या जाणार्‍या  घटकांची नोंद केली आणि त्याच्या बर्‍यावाईट परिणामांची माहिती घेतली, तरी आपण सण-उत्सवांच्या नावाखाली किती निसर्ग ओरबाडतो व पर्यावरणाचा र्‍हास करतो हे लक्षात येऊ शकेल. अंधश्रद्धा निर्मूलन समिती सण-उत्सवांची कालोचितता तपासू इच्छिते आणि त्यामधील शोषण, फसवणूक व दिशाभूल समाजासमोर आणू इच्छिते. तसेच सण-उत्सवातील वेळ, श्रम, कौशल्य व पैशांच्या अनुत्पादक गुंतवणूकीचा देखील विचार करुन त्याला समाजोपयोगी कृतीकडे वळविण्याला आम्ही प्राधान्य देऊ इच्छितो. त्यामुळे सण-उत्सव साजरे करण्याला आमचा विरोध नाही, तर त्यांचा उपयोग सुबुद्ध नागरिकांनी कालसुसंगत, शोषणमुक्त आणि विधायक वर्तनासाठी केला जाणे अपेक्षित आहे.

            आज सण-उत्सवांच्या धार्मिक पायाला आता अवतारवादाचा मुलामा दिला जात आहे. तेवढे कमी म्हणून की काय त्याला चमत्काराची  फोडणी देऊन समाजाला गुढतेत रमण्याचा ठसका आणला जात आहे. कारण त्यामुळे त्यातील हितसंबंधितांच्या गंगाजळीत  मानसन्मान, प्रतिष्ठा, भौतिक सुविधा, गर्दी आणि पैसा आपसुकच येऊन पडत असतात हे त्यांना चांगले माहित आहे. भारतासारख्या कृषीप्रधान संस्कृतीवर उभारलेल्या देशात येथील समाजजीवनातील व सण-उत्सव हे निसर्गचक्राच्या बदलावर अवलंबून राहिले आहेत. प्रत्यक्षात आता त्याचा निसर्गाशी संबंधित मुलाधार मागे पडला असून त्याचे कलेवर फक्त उरलेले दिसते. त्यामुळे त्याची कालोचित चिकित्सा आम्हाला महत्त्वपूर्ण वाटते. कारण जीवनाचा अविभाज्य भाग असणार्‍या सणउत्सवांसह आधुनिक माणूस म्हणून जगण्यास लायक व्हायला त्याची आवश्यकता आहे.

            अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्रात सण-उत्सवांमध्ये जमा होणारे निर्माल्य दान व मिळालेल्या  विसर्जित मूर्तींना निर्गत करण्याची पद्धत रुढ केली. त्यामुळे होणारे मोठ्या प्रमाणातील पाणी प्रदूषण कसे व किती घातक आहे याचे प्रबोधन  घडवून आणले. आज आम्ही घेतलेल्या भूमिकेला व सुरु केलेल्या कृती कार्यक्रमाला शासन,न्यायालय व प्रसिद्धी माध्यमांनी अधिकृत मान्यता दिली आहे, प्रश्न आहे त्याच्या अंमलबजावणीतील राजकीय व सामाजिक इच्छाशक्तीचा!

            कोल्हापूर शहरातील समितीच्या शाखेने सुरु केलेला हा उपक्रम आता महाराष्ट्राचा झाला आहे. त्यासाठी एका तपाच्या टप्प्यात अनेक  कार्यकर्त्यांनी अनेक प्रकारचे कष्ट, ताण तणाव व नुकसान सोसले आहे. सुरुवातीची वर्षे तर विसर्जनाच्या दिवशी सलगपणे 12 तास उभे राहून लोकांना विनम्रपणे हात जोडून आवाहन करण्यापासून निर्माल्य संकलन करणे, त्यातील प्लास्टिक -थर्माकोल आदी पदार्थ वेगळे करणे, उत्तरपूजा झालेली विसर्जित  मूर्ती संकलन करणे, स्वच्छ पाण्याच्या टाकीत टाकणे किंवा सजविलेल्या  वाहनात ठेवणे, जमा झालेले निर्माल्य व मूर्त्या निर्गत  करण्यासाठी घेऊन जाणे-उतरविणे-टाकणे आणि हे सर्व कमी म्हणून की काय विरोध करणार्‍या हिंदूत्ववादी संस्था संघटनांच्या अत्यंत शिवराळ व भावनिक चिथावणीखोर आवाहनांना शांतपणे तोंड देणे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी अत्यंत चिकाटीने यशस्वीपणे निभावली आहे. त्यामुळे आज जी मान्यता व स्विकारार्हता ‘विसर्जित मूर्ती व निर्माल्य दान करा मोहीम’  राबवायला लागते आहे, त्याचे श्रेय आमच्या सचोटीने, सातत्याने, निराश न होता, अथकपणे काम करणार्‍या सहकार्‍यांना द्यावे लागेल. खरं तर असे अनेक प्रसंग आहेत की, ज्यामध्ये कार्यकर्त्यांची -संघटनेची अडवणूक झाली, दमदाटी झाली, आर्थिक चणचण जाणवली, ब्लॅकमेलींग करण्याचे प्रयत्न झाले, जातीय-धार्मिक तेढ निर्माण केली गेली आणि कायदा-सुव्यवस्थेच प्रश्न म्हणून कायदेशीर नोटीसा देखील प्रशासनाकडून पदरात पडल्या. त्या सर्वांमधून तावून सुलाखून, जोखीम पत्करुन अंनिसचे कार्यकर्ते तरुन गेले आणि त्यांनी महाराष्ट्राला सण-उत्सव पर्यावरण सुसंगत साजरे करण्याचा आदर्श यशस्वीपणे उभारुन दाखविला, त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत. आता ही मोहीम अंनिस शिवाय इतर अनेक सामाजिक संघटनांचा उपक्रम झाली आहे याचा आनंद वाटतो.

            पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी वापरलेले सूत्र अंनिसने इतरही सण-उत्सवासाठी लावले असता त्यालाही काही विधायक व कृतीशिल पर्याय आज उभे राहिल्याचे चित्र आहे. ‘साप वाचवा, माणूस वाचवा’ घोषवाक्य घेऊन सर्प विज्ञान प्रबोधन सप्ताह नागपंचमीच्या निमित्ताने, स्त्री-पुरुष समता व वृक्षारोपण-संवर्धनाचा आग्रह धरण्यासाठी हरितालिका व्रताचे निमित्त, भ्रूण हत्त्या रोखण्यासाठी ‘बेटी बचाव अभियान’ घेऊन नवरात्रोत्सव, व्यक्तिमत्त्व विकारहीन होण्यासाठी व आपल्या गुलामीच्या सिमोल्लंघनासाठीचा दसरा आणि बालमजुरी-अनुत्पादकता-अपघात-प्रदूषण टाळण्यासाठी फटाकेमुक्त दिपोत्सव साजरा करण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्याने करीत आली आहे. महाराष्ट्रात  त्याचा दृश्य परिणाम आता दिसायला लागला आहे. थोडा विचार करणारी माणसे, आपले सण-उत्सव कालसुसंगत पद्धतीने साजरे करण्याचा प्रयत्न करु लागली आहेत. त्यामुळे मागील वर्षी फटाके फोडू नका किंवा कमी फोडा या विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या व महाराष्ट्र अंनिसच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन राज्यातील शालेय विद्यार्थ्यांनी  आपल्या पालकांच्या संमतीने 15 कोटी रुपयांचे फटाके न फोडण्याचा  संकल्प पत्रे  भरुन आम्हाला दिलीत. ही घटना बोलकी व भविष्याचा अधिक व्यापक समर्थनाच्या दिशेने होणार्‍या वाटचालीची निदर्शक आहे.  त्यामुळे आम्ही आश्वस्त आहोत की, समितीने चालविलेल्या विवेकाधिष्ठित जीवन जगण्याच्या पर्यायाचा दृष्टीकोन समाज टप्प्याटप्प्याने  पण निश्चितपणे स्विकारण्यास तयार आहे.

– अविनाश पाटील