एके दिवशी सकाळीच डॉक्टरांचा फोन, ‘अरे विनायक तुझं संघटना बांधणीचं टिपण मिळालं, फारच सुंदर झालंय, तुझं अभिनंदन. छान! आपण संघटना बांधणीच्या पुस्तिकेत घालू या.’ हे ऐकल्यावर स्वाभाविकपणे फार आनंद झाला. खरं तर त्यातील मुद्दे डॉक्टरांचेच होते, एखादं दोन माझे, मी केवळ डॉक्टरांच्या मुद्द्यांचं विस्तारीकरण केलेलं, पण माझं अभिनंदन असं की जणू काही मी एकटाच त्याचा कर्ता करविता.
ही डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वातली खुबी होती. कोणत्या कार्यकर्त्याला कोणत्या विषयात आवड आहे, बरोबर त्याला ती जबाबदारी डॉक्टर द्यायचे, त्यातून तो कार्यकर्ता अधिक खुलायचा. काम ‘ताणाचं’ राहायचं नाही तर आनंद देणारं व्हायचं. महाराष्ट्रभर डॉक्टरांनी अशा अनेक कार्यकर्त्यांना अनेकविध क्षेत्रांसाठी, विषयांसाठी कामाला लावलं. यातून संघटना पुढे गेली. ही कार्यकुशलता डॉक्टरांच्या व्यक्तिमत्वात होती.
संघटना बांधणी हा डॉक्टरांचा आस्थेचा विषय होता. कल्पकतेनं घेतलेल्या विविध परिषदा, यात्रा, मेळावे, मोहिमा या संघटनेला नाव जरूर देतील. पण संघटनेची बांधणी मात्र चिकाटीने करणं हेच महत्वाचं आहे याची जाणीव डॉक्टरांना होती.
संघटना बांधणीत मला आवडही होती आणि थोडीफार गतीही; अविनाशभाई पाटील, परेशभाई शाह यांच्याशी रात्र-रात्र जागून संघटनेच्या गप्पा व्हायच्या. त्यातून संघटना बांधणी विषयाचा एक एक धागा उलगडायचा, मग आम्ही ते फोनवर डॉक्टरांशी शेअर करायचो, डॉक्टरांना आम्ही सांगितलेल्या कल्पना आवडायच्या, आणि मग म्हणायचे, विनायक, हे तू लिहून काढ, आपल्याला संघटना बांधणीचे शिबीर घ्यायचे आहे, त्यात तू हे मांड.’ हे ऐकून आमचा उत्साह अधिक वाढायचा.
कोणत्या कार्यकर्त्याला कसं प्रोत्साहित करावं आणि त्याला कार्यरत कसं ठेवावं, याचं जबरदस्त आकलन डॉक्टरांकडे होते, डॉक्टर कुशल संघटक होते. अतिशय विपरित परिस्थितीत एवढी संघटना उभारणं, तिचं चैतन्य जिवंत ठेवणं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तिला कालसुसंगत उपक्रमांची जोड देत तिची उपयुक्तता सिद्ध करणं, यासाठीची अद्वितीय क्षमता डॉक्टरांकडे होती.
उत्तम वक्ते, कठोर शिस्त, भन्नाट क्षमता, साधं आणि काटकसरीनं जगणं, नैसर्गिक नम्रता असे अनेक गुण विविध प्रसंगातून आम्ही बघत होतो, प्रेरीत होत होतो.
एकदा असे घडले- सार्वजनिक जीवनात फार मोठे काम करणार्या एका व्यक्तीने डॉक्टरांबाबत केलेला अपप्रचार आम्हाला समजला, मी तो डॉक्टरांना बोलून दाखवला आणि त्या व्यक्तीबाबत नाराजी व्यक्त केली, आणि अस्वस्थही झालो. मी विचारले, “डॉक्टर, यावर आता आपली भूमिका काय?” डॉक्टर – काहीही भूमिका नाही, आणि आपण शांतपणे हे विसरून जायचं. जर तुम्हाला सार्वजनिक जीवनात अधिकाधिक वर्ष काम करायचं असेल तर अशा गोष्टी विसरत चला, मनात कुठली अढी ठेवू नका.” आम्ही ते ऐकलं, प्रयत्न करतोय, पण विसरणं अजून पूर्ण जमलेलं नाही.
संघटना बांधणी करणारा नेता केवळ कर्तृत्ववान असून चालत नाही, तर तो आंतरबाह्य सच्चा असावा लागतो, डॉक्टर अनेकदा बसने फिरायचे, आमच्या जिल्ह्यात तर एकदा चक्क मोटर सायकलवर मागे बसवून डॉक्टरांना फिरविले, दौर्यादरम्यान अनेकदा अव्यवस्था व्हायची, पण डॉक्टरांनी एका शब्दानेही कधी तक्रार केली नाही, डॉक्टरांचा साधेपणा हा आंतरबाह्य होता, तो दिखावा नव्हता तर त्यात सच्चेपणा होता.
संघटना बांधणीसाठी डॉक्टरांनी सातत्याने विविध प्रयोग केले. आणि म्हणून आज संघटनेला डॉक्टर गेल्याचा धक्का जरूर बसला, पण संघटना कोलमडली नाही, नव्या जोशात उभी राहण्यासाठी अधिक निर्धारपूर्वक सज्ज झाली. ही डॉक्टरांचीच बांधणी. केवळ विचारांनी संघटना बांधता येत नाही आणि केवळ प्रेमाने बांधलेली संघटना टिकत नाही. हे डॉक्टरांना माहीत होतं, म्हणून त्यांनी संघटनेतील कार्यकर्त्यांसाठी ‘विचार व संघटना मार्गदर्शिका’ काढली.
डॉक्टरांसारखा कुशल संघटक पुन्हा होणे नाही, पण त्यांनी तयार केलेला संघटनेचा आकृतीबंध टिकवणे आणि वाढवणे हे संघटितपणे उभे राहिल्यास नक्कीच शक्य आहे, आणि तीच खरी डॉक्टरांना आदरांजली आहे.
लढेंगे! जितेंगे!
– विनायक सावळे