Categories
परिसंवाद

संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन

वार्षिकांक – २०१३

इथे आता मला जो विषय दिलेला आहे तो ‘संत साहित्य आणि अंधश्रद्धा निर्मूलन’ असा आहे. मी संतसाहित्याचा अभ्यासक आहे. आणि मी स्वतः वारकरी सांप्रदायिक आहे आणि मी संत साहित्याविषयी लिहीत असतो, बोलत असतो आणि संपूर्णपणे याची भूमिका मांडत असतो. त्या अनुषंगाने मला इथे काहीएक विचार मांडायचे आहेत. महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतिक आणि सामूहिक जीवनावरती संत साहित्याचा मोठा प्रभाव आहे. हे मी मुद्दाम इथे सांगावे अशातला भाग नाही. आपले जे अध्यक्ष-नागनाथ कोतापल्ले- हे गेल्या साहित्यसंमेलनाचे सुद्धा अध्यक्ष होते. त्यांची संपूर्ण करियर मराठी भाषेचे प्राध्यापक म्हणून त्यांनी व्यतीत केली. त्यामुळे तेही तुम्हाला सांगतील की ही गोष्ट खरी आहे की मराठी भाषेवरती संतसाहित्याचा प्रभाव आहे. त्याचं कारण असं आहे की मुळात मराठी भाषा आणि साहित्य घडविण्यामधे संतांचा फार मोठा सहभाग आहे. पण गेली जवळजवळ 4-5 शतकं म्हटलं तरी चालेल मराठी साहित्याची, ही खरं तर संतसाहित्याचीच होती. म्हणजे साधारणपणे तेराव्या शतकाच्या अखेरीस संत ज्ञानेश्वर , संत नामदेव म्हणजे वारकरी सांप्रदायिकांनी जी रचना केली आणि दुसर्‍या बाजूला चक्रधरांच्या अनुयायांपैकी म्हाइंभट , नरेन्द्र वगैरे अशा लोकांनी जी रचना केली त्याने मराठी साहित्याचा पाया घातला. मराठी भाषेची जडण घडण केली. ही परंपरा-वारकरी सांप्रदायाची-ही कमीत कमी इ.स. 1750 पर्यंत चालू होती. 1750 मी का म्हणालो कारण त्या वेळेला संत ऩिळोबा राय हे संत होवून गेले. आणि ते वारकरी पण होते; अत्यंत सच्चे, सुसंकृत वाटणारे. 13व्या शतकापासून ते 18व्या शतकाच्या मध्यापर्यंत, जवळ जवळ, संत साहित्य आहे. आणि मराठी भाषेची जी ओळख होती ती संतसाहित्यामुळे होती. आता त्याकाळी इतर काही प्रवाह आलेच नाहीत अशातला मुद्दा नव्हता. म्हणजे उदा: पंडित कवींनी काही लिहिलं होतं; वामन पंडित, आणि सगळ्यात शेवटी मोरोपंत पंडित कवी मानले जातात. परंतु या पंडीत कवींचा प्रभाव महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांच्या वरती काही पडला असं काही आपण म्हणू शकत नाही. त्यामुळे मराठी भाषा-म्हणजे आपण जी बोलतो ती-तिच्यावर त्यांचा फारसा असर राहिलेला नाही.

त्याचप्रमाणे दुसरे काही प्रभाव निर्माण झालेले आहेत. एक प्रभाव कोणता होता, तर त्याला आपण लावणी म्हणतो. लावणी रचणार्‍या ज्या काही कविता 0झाल्या त्यांचाही प्रभाव इथे आला. त्याला आपण शाहिरी म्हणायचो. परंतु हा प्रभाव संत साहित्य नाकारणारा प्रभाव नव्हता हे लक्षात घ्या. तर लोक आपापल्या पद्धतीने संतांचे अभंगही म्हणायचे, ओवी म्हणायवे तसे लावणी म्हणायचे. आणि त्यांच्यामधे एक प्रकारची आंतरक्रिया होती, देवाणघेवाण होती. सगळ्या शाहीरांनी संतांची प्रशंसा करणार्‍या लावण्या घेतल्या आहेत. आणखी कित्येक लोक लिहून गेले संतसाहित्यामधे. त्यांच्यामध्ये -संतसाहित्य काय, दुसरं शाहीरांचं काय, आणि पंडितांचं काय-हे सगळं पद्यामध्येेच असायचं. तर गद्य लिहिणारे सुरुवातीलाच लीलाचरित्र स्मृतिस्थळ या रूपामधे, महानुभावांच्या रूपामधे. पण तरी यांचं फारसं चाललं नाही. शिवकालामध्ये बखरी निर्माण झाल्या आहेत. एवढं जर सोडलं आपण तर हा सगळा एवढा प्रभाव आहे तो संत साहित्याचाच प्रभाव आहे. त्यामुळे संतसाहित्याने भाषा घडविली, महाराष्ट्राची संस्कृती घडवली, महाराष्ट्राचं मन सुद्धा घडवलं. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे सगळ्या लोकांच्यावरती संतांच्या विचारांचा प्रभाव पडणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. आणि ज्यांचा संतांना विरोध होता त्यांनाही संतांचीच भाषा आवडायला लागली. राजवाड्यांनी संतांना खूप नावे ठेवली पण त्यांचा एक चांगला लेख आहे महाराष्ट्रातल्या प्रतिभावंतांच्यावर-आणि त्या लेखात ते सांगतात की प्रतिभावंत ही काही नेहमी नेहमी मिळणारी वस्तु नाही, शतकामधून एक दोन लोक प्रतिभावंत असतात. तेव्हा प्रतिभावंत जर तुमच्यात असेल तर त्याला ओळखा आणि त्याचं जीवन सुसह्य करा, सुकर करा. त्याला मदत करा. त्याची प्रतिभा करपून देवू नका. त्यांनी उदाहरणं दिली. महाराष्ट्रामध्ये किती शक्ती वाया गेली, समाजाने पुरेशी साथ न दिल्यामुळे! हा त्यांच्या प्रतिपादनाचा एकूण मुद्दा होता. आणि मग शेवटी समारोप करताना ते असं म्हणतात, ‘आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश प्रतिभेचा.’ आता हे त्यांनी कसं लिहिलं? तुकारामांचा हा अभंग त्यांच्यापुढे आहे, ‘आता तरी पुढे हाच उपदेश, नका करू नाश आयुष्याचा.’ हा तुकोबांचा अभंग त्यांच्यापुढे आहे, आणि त्या अभंगाचं त्यांनी अनुकरण केलं. म्हणजे संत वाङ्मयाशिवाय सुद्धा लोकांशी संवाद साधताना संतांच्याच वाड्.मयाचा उपयोग करतात. ख्रिश्चनांच्या हातामध्ये बायबल असतं कधीकधी आणि तो त्यांचा पवित्र ग्रंथ आहे, कारण बायबलचा प्रभाव असतो ना ख्रिश्चनांवरती! तसाच संतांचा प्रभाव महाराष्ट्रियांवर आहे, म्हणून जे काही महाराष्ट्रीय करत असतात तेव्हा त्यांना संतांच्या वाङ्मयाचा उपयोग होत असतो.

भारत हा खंडप्राय देश आहे. मग महाराष्ट्रातच सामाजिक सुधारक व त्यांच्या चळवळी का निर्माण झाल्या? फुले-आंबेडकरांची पुरोगामी चळवळ असेल किंवा महाराष्ट्रातील आणखी काही पुरोगामी चळवळी असतील, आगरकर असतील किंवा आणखी कुणी लोक असतील, शाहू महाराज असतील, हे लोक महाराष्ट्रातच का निर्माण झाले?आणखी कुठे का नाही झाले? हे महाराष्ट्रातच निर्माण झाले याचं कारण तुम्हाला माहिती आहे का? महाराष्ट्राची मनोभूमिकाच अशी संतांच्या साहित्याने निर्माण करून ठेवली होती की या लोकांचे विचार मानणारे पुष्कळ लोक इथे आहेत. परंतु त्यांना (सुधारकांना) ही भूमिका मांडण्यास अनुकूल अशी भूमी आधीच तयार करून ठेवली होती. आणि त्या भूमीमधे बीज पेरल्याबरोबर त्याचा वृक्ष झाला. बाकीच्या ठिकाणी असं झालं नाही. अशा प्रकारचे संत तिथे झाले नाहीत त्याविषयी मी बोलणार आहे नंतर. म्हणून यांच्यावरती संतांचा प्रभाव पडणं अतिशय स्वाभाविक होतं. कारण महाराष्ट्रामधे संस्कृति-समाज ज्याला म्हणतो आपण, तो घडविण्यामधे संतांचा फार मोठा भाग आहे.

खूप पूर्वी मी साधनेमध्ये एक लेख लिहिला होता आणि मला वाटतं डॉक्टरांनी एक व्याख्यान आयोजित केलं होतं आणि ‘संत साहित्य आणि महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळी’ असा काहीतरी विषय होता. आणि त्याबद्दल मला वाटतं त्यांना बरीच प्रतिकूल टीकाही सोसावी लागली होती की कशाला तुम्ही अशा लोकांना इथे स्थान देता, वगैरे वगैरे. अशा म्हणजे जे लोक धर्म वगैरे मानतात, पाळतात. तर त्यामधे दाभोलकरांचे मत असं होतं, आणि माझंही होतं की त्यांचा ‘धर्म’ या संस्थेला विरोध असण्याचं काही कारण नाही. पण मुद्दा असा होता की धर्माच्या दुरुपयोगाला आपण विरोध केला पाहिजे. धर्म हा माणसाला आधार देणारा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु जे लोक धर्माने जगतात त्याना धर्माने जगू द्यावे. पण धर्म नाकारणं ही देखील भूमिका आहे. लोकशाहीमधे तोही भाग आहे. त्याच्याविषयी काही वाद नाही. फक्त धर्म मानणार्‍यांना धर्माच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी करता येणार नाहीत. आणि त्या चुकीच्या गोष्टी ज्यांच्यामुळे, एकूणच समाज, समाजाचे आरोग्य, समाजाची नीतिमत्ता धोक्यात यायला लागली तर त्यांना विरोध करणं, त्या गोष्टींना थांबविणं हे जसं धर्मसमीक्षकांचं काम असतं तसंच धर्मवाद्यांचंसुद्धा काम आहे.

धर्मांमध्ये आपण नेहमी भेद करतो. खरा धर्म की खोटा धर्म? एकनाथ हे फार मोठे धर्माचे समीक्षक होते. लक्षात घ्या, आपल्याकडे समीक्षा फारशी झालीच नाही. धर्माची समीक्षा करणारे जे काही थोडे संत आहेत-हाताच्या बोटांवर मोजण्यासारखे-त्यामधे आपल्याला सगळ्यांचं नाव घ्यावं लागतं. मग ते संत एकदाच धर्मसमीक्षा करून थांबत नाहीत. त्यांना जिथे जिथे चुकीच्या गोष्टी आढळतात, फक्त हिंदूंच्याच नाही, मुसलमानांच्याही असतील; त्याच्यावर त्यांनी टीका केलेली आहे. एकनाथ हे महाराष्ट्रामध्ये धर्माचे चिकित्सक असे समीक्षक होवून गेले. आणि त्यांनी धर्माचं स्वरूप काय असलं पाहिजे हेही सांगितलं. ते म्हणाले धर्म खोटा असतो, एक पोटा धर्म असतो आणि एक आव्हाटा धर्म असतो; हे तीन धर्म आणि एक खरा धर्म. पोटा धर्म म्हणजे काय की लोक पोटासाठी धर्माचं थोतांड माजवतात, त्याला ते म्हणतात पोटा धर्म. अशा धर्मात लोकांच्या धार्मिक भावनांचा फायदा घेतात. पूर्वीच्या काळात आपल्याकडे एक पद्धत प्रचलित होती. त्याला म्हणतात अग्निहोत्र. तर अग्निहोत्र म्हणजे काय असतं? आपल्या घरामधे 24 तास अग्नि प्रज्वलित ठेवला पाहिजे. ते कसं काय निघालं, त्याच्यामागची ऐतिहासिक कारणं काय होती, भौगोलिक काय होती, त्याच्यामधे आपण जाणार नाही. परंतु आपल्याकडे अशा प्रकारची धार्मिक उपासनेची एक पद्धत होती. तर त्याला एकनाथांनी विरोध केला ते म्हणाले, ‘अग्निहोत्राचा सुकाळ; वडपिंपळाचा काळ.’ एकनाथ म्हणाले, अग्निहोत्राने -कुणी काही समिधा वगैरे टाकतात त्याच्यामुळे-काय होतं? त्यामुळे वड, पिंपळ ही झाडे नष्ट होत असतात. त्याच्यावरती एकनाथांनी टीका केली आहे. पण असे काही लोक जे अग्निहोत्री होते, ते पोटा अशा तर्‍हेच्या धर्माचे होते. त्यांच्या बाबत ते म्हणाले की ते लोक असे हुशार असतात की त्यांचं अग्निहोत्र-तोतया असतं ते. तिथे त्यांना कुणीतरी येवून सांगतं की यजमान आलेले आहेत. मग ते दक्षिणा देणार आपल्याला या आशेने घाईघाईने अग्निकुंड फुंकतात आणि ते परत प्रज्वलित करतात. यजमान ते पाहून चकीत होतो. ‘हे सगळं चाललेलं आहे-भजन पूजन सगळं चांगलं चाललेलं आहे, वावावा;! बरं काय गरज आहे तुमची, किती पैसे पाहिजेत तुम्हाला?’ यजमान पैसे देतो आणि निघून जातो. लगेच ते अग्निकुंड विझवतात. हा झाला पोटा धर्म. आणि खूपसे धार्मिक पद्धतीने वागणारे लोक, वरकरणी जरी धार्मिक वाटले तरी त्यांच्या मनामधे धर्माच्या नावाने पैसे वगैरे किती मिळतील हेच बघायचे सर्व विचार असतात.

त्याच्यानंतर आव्हाटा धर्म. आव्हाटा म्हणजे संकटाचा असाही एक धर्म आहे. म्हणजे मघाशी उत्तमराव कांबळे यांनी सतीच्या चालीचा उल्लेख केला. एका बाईला संपवली. तिचा जीवच संकटात टाकला. अशा तर्‍ह्ेच्या हिंसेला संतसाहित्यात विरोध केलेला आहे. पण मुद्दा हा आहे की धर्माची समीक्षा ही संतांनीसुद्धा फार परखडपणे केलेली आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलं आहे-आणि मला ते फार महत्त्वाचं वचन वाटतं- ‘ऐसे उफराटे वर्म, वर्माअंगीच अधर्म’. म्हणजे एखादा बुवा तुम्हाला खूप धार्मिक दिसतो पण तो बुवा प्रत्यक्षात अधर्मी असतो. त्यामुळे धर्म कशाला म्हणायचं, अधर्म कशाला म्हणायचं हे सांगणं तेवढं सोपं नाहीये. पुष्कळ लोकांना काय वाटतं की पोथीमधे जे सांगितलं तो धर्म. आणि मग ते सगळं तुम्हाला पटतं. परंतु ते तसं नाहीये. कधी कधी पोथीतला धर्मही अधर्म होवू शकतो आणि त्याचे अनुभव आपल्याला आहेत. त्याची खूप चर्चाही झालेली आहे. पण मुद्दा हा आहे की धर्म ही गोष्ट अत्यंत गुंतागुंतीची आहे. आपण सर्वांनी धर्माचं स्वरूप समजून घेताना ते कधीही बाजारू स्वरूपाचे करता कामा नाही, कुंठित करता कामा नाही. आणि तेच संतांच्या संदर्भात मला दिसतं.

हिंदू धर्माचं सर्वमान्य वाङ्मय कुठलं आहे? तर वेद. मुळात वेदाचा अधिकार फार थोड्यांना होता. आणि समजा दिला तरी ते संस्कृतमध्ये आहेत. म्हणजे ज्यांना अधिकार दिला त्यांना संस्कृतमधलं काही कळतंय का? अजिबात नाही. म्हणजे प्रत्यक्ष धर्माचं जे मुख्य प्रमाण आहे तिथपर्यंत फार थोडे लोक पोचू शकतात. इस्लाम बघा. इस्लामचा मूळ ग्रंथ आहे अरेबिकमधे. किती मुसलमानांना अरेबिक भाषा कळते? मग ते मुल्लामौलवी सांगतील तेच खरं मानणार. बायबल जे सांगितलं गेलं; अवतरित झालं-जुना करार, नवा करार-ते हिब्रू भाषेत आहे. किती ख्रिश्चन किंवा ज्यू लोकांना हिब्रू भाषा येते? खूप थोड्या. शेवटी होतं काय की धर्माचे मूळ ग्रंथ आणि सामान्य अनुयायी यांच्यामध्ये कुणीतरी एक तिसरा इसम येतो. अनुयायांना, धर्म सामान्य लोकांना सांगणारा असा एक वर्ग तयार होतो. आणि पुष्कळ वेळा हे जे लोक असतात ते धर्माचा चुकीचा अर्थ लोकांपुढे सादर करतात. हे सारं पहिल्यापासून चाललेलं आहे. अर्थाचा संबध भाषेशी आहे. आणि भाषेला अनेक अर्थ असतात पर्यायी. त्यात काही खोटे असतात. आणि आपण चुकीचा अर्थ लावू शकतो. तेव्हा अर्थ लावण्यात चुकणं हे स्वाभविक आहे. तुकाराम महाराजांनी काय सांगितलं, ‘अर्थे लोपली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषयलोभीमणे साधने बुडविली।’ खरा अर्थ पुराणांचा लोकांपर्यंत पोचलाच नाही. कारण काय, विषयलोभी जे लोक आहेत, ते मधे आले आणि त्यांनी पुराणांचा भलतासलता अर्थ सांगितला. ‘पुराणाचा अर्थ आणिता मनास, पुढे कासाविस जीव माझा.’ लोक खर्‍या अर्थाने वागत नाहीत, खोट्या अर्थाने वागतात. अशा पद्धतीने धर्म कळणं ही अतिशय जटिल आणि अवघड अशी गोष्ट आहे. आणि अशा पद्धतीने धर्माचा जर ठेका चुकीच्या लोकांकडे गेला तर नक्कीच ते धर्माला स्वतःच्या स्वार्थासाठी वापरणार असं दिसतं.

म्हणून संतांनी वेळोवेळी अशा प्रकारच्या खोट्या धर्माला विरोध केलेला आहे. म्हणून एकनाथांचं उदाहरण सांगितलं आहे. आणि मग शेवटी खरा धर्म वर येतो. त्यांनी असं सांगितलं की वाचिक, कायिक, आर्थिक- लक्षात घ्या-तिन्ही धर्माचं महत्त्व सारखं आहे आणखी मानसिक असा एक धर्म असतो. आता धर्माची काहीही गोष्ट करायला पैसा लागतो. म्हणून अर्थ हे धर्माचं अंग आहे. हे एकनाथ सांगतात. नंतर दुसरं असं की आचार हा आपल्याला करायलाच पाहिजे. प्रत्यक्ष काही कर्मकाण्ड करायला शरीर लागतं. म्हणजे शारीरिक धर्म आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं वाचिक. म्हणजे धर्मामधे आपण (स्तोत्र, प्रार्थना वगैरे जे काही म्हणतो) ते म्हणजे वाचिक. आणि शेवटी काय सांगितलं? मानसिक धर्म. मनातून जी भावना असते ती. तर एकनाथ महाराज सांगतात सगळ्यात श्रेष्ठ जर कुठला धर्म असेल तर तो मानसिक धर्म आहे. तुमच्या मनातला भाव हाच खरा धर्म आहे. आणि त्या मानसिक धर्मापुढे बाकीचे हे सारे धर्म -कायिक,वाचिक, आर्थिक-हे काय बापुडे? यांची काहीच मातब्बरी नाही म्हणून तो श्रेष्ठ. हे अतिशय महत्त्वाचं धर्माच्या चार अंगांचं विवेचन सुद्धा एकनाथांनी केलेलं आहे. संतांच्या धर्मकल्पनेमध्ये अंधश्रद्धांना अगदीच थारा नाही. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल. एकनाथांनी ग्रहणाबद्दल लिहिलेलं आहे. आता सगळ्या भारतामधे ती कल्पना अजूनही आहे की राहू सूर्याला गिळतो आणि ग्रहण होतं. एकनाथांनी भारूडात असं लिहिलं आहे, की राहू कुणीही आणि कसाही असला तरी त्यानं जर सूर्याला गिळायचं ठरवलं तर त्याचं तोंड जळून जाईल. त्यामुळे ती खोटी गोष्ट आहे असं एकनाथ त्यांच्या भारुडातून म्हणतात. आता हा पूर्णपणे संतांनी केलेला बरोबर विचार. आणि तुकोबांच्या भाषेत सांगायचं म्हणजे, ‘धर्म रक्षावयालागी करणे आटी आम्हास ’; किंवा धर्माचे पालन करणे, पाखंडन करणे हे जे आम्हाला धार्मिक काम आहे, धर्माचं पालन करणं, धर्म सुरक्षित करणं हे आमचं काम आहे आणि त्यासाठी खरा धर्म कोणता हे त्यांना पहिल्यांदा सांगावं लागलं. आणि हे सांगताना त्यांनी खोटा धर्म पूर्णपणे एक्सपोझ केलेला आहे. मी अग्निहोत्राचं उदाहरण दिलं- तेव्हा एकनाथांनी, तुकोबांनी अग्निहोत्राबद्दल सांगितलं की तीळ आणि तांदूळ टाकले यज्ञात किंवा त्याची आहुती दिली. पण ‘काम क्रोध तैसे खळं’. काम आणि क्रोध तसेच राहिले; काय त्याचा उपयोग? काहीना वाटतं की कपडे घातले विशिष्ट प्रकारचे अंगामध्ये की आपण धार्मिक झालो. सोवळं नेसलं की धार्मिक झालो. भगव्या कपड्यांवरती फार लोकांचा भर आहे. तेव्हाही होता. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, काही कुत्री सुद्धा भगव्या रंगाची असतात, ‘भगवे सहज श्वान, तरी वेष त्यांचा’ त्यांच्या अनुभवाचा काय पार? त्यांना काही गरज नाही भगव्या वेषाची वगैरे. तर त्याच्यामुळे असे जे बाह्य स्वरूप आहे आपल्या धर्माचं त्याच्यावर संतांनी प्रहार केलेला आहे. आणि त्याला बळी पडू नका; खरा धर्म हा मानसिक आहे. तुमचा ईश्वरावर खरा भाव असला तर तो तुमच्या त्या हाकेला प्रतिसाद देतो. असं संतांचं म्हणणं आहे.

आता प्रश्न कुठे आला तर ह्या सगळ्या अंधश्रद्धा वगैरे गोष्टींचा संतांची एक व्याख्या संत निळोबांनी केलेली आहे. आणि दुसर्‍या कोणी करण्यापेक्षा संतांनीच केलेली चांगली. तर निळोबा असं म्हणतात, ‘तोचि संत, तोचि संत; ज्याचा हेत विठ्ठली.’ संत त्यानाच म्हणावं की पूर्णपणे विठ्ठलचरणी त्यांचा भाव आहे, ‘नेणती काही टाणाटोणा, नामस्मरणावाचुनी.’ नामस्मरणाशिवाय कुठल्याही प्रकारचा टाणाटोणा-जादूटोणा ज्यांना माहीत नाही, ते खरे संत. आणि असा एक धर्माकडे पाहण्याचा , बुद्धीच्या आधारे पाहण्याचा विचारही संतांमधे होता. परंतु काही का कारणामुळे म्हणा, लोकांचा असा समज झाला किंवा करून दिला म्हणा, की संतांचं साहित्य म्हणजे धर्माशी संबंध आहे; जुन्या काळातलं आहे; म्हणजे याचा अर्थ ते प्रतिगामी असलं पाहिजे. ते बुद्धीच्या विरुद्ध असलं पाहिजे. असा एक समज निर्माण होत गेला आणि त्याला आवरण्याचं काम ज्या कोणी करायला पाहिजे त्यांनी केलं नाही. त्यामुळे मग हे गैरसमज वाढत गेले. आणि मग जेव्हा आपण लोकांची प्रतिगामी आणि पुरोगामी अशा प्रकारची विभागणी करतो, तेव्हा – संतांचे विचार मानणारे जे कोणी असतील -जाणणारे, पाळणारे, ऐकणारे, पालन करणारे आचरणात आणणारे – त्यांना सुद्धा आपण प्रतिगाम्यांमधे टाकायला लागलो. आणि मग त्याचा फायदा कोणी घेतला? अशा लोकांनी घेतला की त्यांना धर्माचं राजकारण करायचं आहे.

त्याचं एक उदाहरण सांगतो. काही लोकांना ते आवडणारं नाही. ते असं की पुण्याहून पंढरपूरला दर वर्षी ज्ञानोबा-तुकोबांच्या पालख्या जातात. कैक वर्षांची परंपरा आहे. आता पालख्यांबरोबर जाणारे तिकडे हजारो लाखो वारकरी त्या पालख्यांच्या बरोबर असतात. आता हजारो लाखो लोक असल्यानंतर (रोगाचा प्रादुर्भाव) होतो. तेव्हा तिथे त्यांना आपण वैद्यकीय सेवा पुरवली पाहिजे हा साधारणपणे मेडिकल लोकांचा एक स्टँड असला पाहिजे. ही पालखी- ज्ञानोबा-तुकोबांची-हडपसरवरून पुढे जाते. हडपसरमधे समाजवादी लोकांचं एक चांगलं रुग्णालय आहे, मोठमोठे लोक, म्हणजे बाबा आढावांसारखे, तिथे एकेकाळी काम करायचे. परंतु या मंडळींना असं कधी वाटलं नाही की आपण वारकर्‍यांच्या आरोग्यसेवेसाठी एक पथक घेवून जावं. कारण त्यांना धर्म आणि वारकरी प्रतिगामी वाटायचे. लोक आपल्याला काय म्हणतील असं वाटायचं. मग ही जी पोकळी होते त्याचा फायदा आणखी लोक घेतात. धार्मिक संघटनांची (आरोग्यसेवा) पथके असतात वारकर्‍यांच्या बरोबर. ते विश्वहिंदुपरिषदेचे असतील किंवा आणखी कुणी असतील. मग सामान्य माणसाला काय वाटतं की पहा हे लोक आमची सेवा करायला उभे आहेत. तुम्ही जर हे आपले नाहीत अशा पद्धतीने वागणूक दिलीत तर मग ते लोक तुमच्या जवळ कशाला येतील?

म्हणजे कित्येक वर्षांपूर्वी मला आठवतंय, ज्यावेळेला धर्मवादी संघटना नव्हत्या, (त्यावेळी) पंढरपूरचं दैवत हे त्यांचं दैवत कधीच नव्हतं. वारकरी संप्रदाय हा त्यांचा संप्रदाय कधीच नव्हता. पण त्यांच्या लक्षात आलं की या वारकरी संप्रदायात फार मोठा फोर्स आहे. मग या संप्रदायाशी आपण आपल्याला जोडून घेतले, तर त्याचा उत्तम उपयोग करून घेता येईल, अशा तर्‍हेने त्यांनी यंत्रणा तयार केली. मग त्यांनी काय केलं ते तुम्हाला सांगतो. विश्वहिंदुपरिषदेचे लोक आले, आणि काय त्यांनी केलं? संतपूजा! मग पंढरपूरमधे सगळे लोक आले-वारकरी, दिंडीवाले, त्यांची पूजा केली; शाल, श्रीफळ असं देत. आता हे लोक आपल्याला बोलवत नाहीत त्यामुळे जे बोलावतात ते आपले अशी त्यांच्या मनात भावना होते. अरे तुम्ही का नाही बोलवलंत? कारण ते धर्म मानणारे लोक, देवदेव करणारे लोक! त्याचा बरोब्बर फायदा घेतात-पक्के आहेत हे लोक. खूप खूप वर्षांपूर्वी हे नुकतंच सुरू झालं होतं. तर मला एक पत्र आलं; एका संघटनेच्या चालकांचं की, आमच्या धर्मसंघटनेच्या वतीने असा असा कार्यक्रम अमक्या अमक्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. आणि तुम्ही या विषयावरती व्याख्यान द्यावं. माझ्यापुढे प्रश्न पडला की काय करावं. मला ते काय करतात ते माहिती होतं. जावं की न जावं; मग विचार केला आपण काय करूया; येतो म्हणून त्यांना सांगितलंच नाही तर? पण येतो म्हटलं तर वाट पाहतील आपली आणि नाही गेलो तर ऐन वेळी आपल्याला आमंत्रण आलंय त्यामुळे आलो नाही असं समजतील. म्हणून येतो असं लिहून टाकलं आणि गेलो मात्र नाही. आणि म्हटलं दिलगिरीचं पत्र लिहावं. दोन दिवस तसेच गेले. पण, दोन दिवसांनी त्यांचं पत्र आलं की, काही अपरिहार्य कारणामुळे आपण येवू शकला नाहीत याची आम्हाला कल्पना आहे. आणि पुढच्या वेळेस नक्की आपण आमच्या हाकेला प्रतिसाद द्याल.

कुणी असं बोलायला सुरुवात केली की, मुळात देव आहे की नाही तर मला असं वाटतं की बहुतेक लोक तेथे थांबणार नाहीत. कारण मी पहिल्यांदाच सांगितलं की समाजात हे सगळे आपले लोक आहेत त्यांना एक असा महत्त्वाचा आधार निश्चितपणे लागतो तर त्या सीमेपर्यंत जायला त्यांना त्याची गरज आहे. एक त्यातला मुख्य भाग आहे-आणि मोठमोठे लोक सांगतात बरं का, मोठमोठे लोक सांगतात- एक गोष्ट आहे, कित्येक वर्षाच्या आधीची. पुण्यामधली फार जुनी महाराष्ट्रामधलीच एक चळवळ आहे. आणि त्या चळवळीचा एक साधा उद्देश असा होता की एक बिल आलं की मुलामुलींच्या लग्नाचं वय वाढवायचं. संमतीवयाचा कायदा असं त्याचं नाव आहे. लहान वयामधे लग्नं करून द्यायची म्हणजे मुलींना त्रास होतो. आणि खूप चर्चा झाली त्याच्यावरती. तर पुण्यामधे जे प्रतिगामी लोक होते त्यांचा विरोध होता या बिलाला. आणि पुरोगामी मंडळींचा, म्हणजे रानडे, भांडारकर या मंडळींचा पाठिंबा होता.. या बिलाला पाठिंबा देणार्‍या लोकांची ती चळवळ होती. आणि ती चालू असताना आगरकर, रानडे, भांडारकर असे जे लोक होते, त्या चळवळीमधे एक वारकरी आला. एक देशस्थ वारकरी. अर्थात आगरकरांनी सुधारकामधे दिलेलं आहे. आपण ते पाहू शकता. तो आला आणि त्याने भाषण दिलं तिथे आल्यानंतर अवचितपणे. त्याने बिलाला पाठिंबा दिला. तो काय म्हटला असेल? तिथे चार्वाकांचं वचन आहे. चार्वाकांनी काय म्हटलं की एखादा माणूस गेला तर त्याचे श्राद्ध करतात आणि श्राद्धाच्या दिवशी ब्राह्मणांना काहीतरी दान देतात ना; म्हणजे जेवू घालतात. मुद्दा असा की त्याच्यामुळे त्या ब्राह्मणाच्या पोटात जे काही अन्न जाईल ते पितरांपर्यंत पोचतं. असा एक मुद्दा होता. तर त्या मुद्याला चार्वाकांनी विरोध केला. कसा केला; तर असं जर असेल तर तुमचा कोणी मित्र वा घरातला माणूस बाहेर गेला तर त्याच्याबरोबर कशाला शिदोरी देता? डबा देता (त्याऐवजी) इथेच कोणालातरी जेवायला घाला-ब्राह्मणाला. म्हणजे आपोआप त्याचं पोट भरेल. असा चार्वाकांचा एक युक्तिवाद आहे. तर या वारकर्‍याने तिथे काय सांगितलं? ‘हे लोक अत्यंत लबाड आहेत, काहीतरी लोकांना भजनी लावतात. अशा तर्‍हेने पोचत असेल तर’, तो पुढे जावून असं म्हणाला, ‘तर त्या मृत माणसाच्या पत्नीला सुद्धा का पाठवू नये अशा एखाद्या मध्यस्थाकडे?’ तर हे कोण म्हणाला? एक वारकरी, आगरकरांच्या स्टेजवरती. आगरकरांना त्याचं फार कौतुक वाटलं. आणि आगरकरांनी त्याचा उल्लेख त्यांच्या लेखात केला.

पण मित्रहो मला तुम्हाला असं विचारायचं आहे की आगरकरांना ही बुद्धी झाली नाही की त्याला विचारायचं की बाबा तू कुठनं घेतलं हे? तुझं ट्रेनिंग काय आहे? तू कुठल्या फडावरचा वगैरे आहेस का? हे धडे तुझ्यापाशी कसे आले जे आमच्याही पाशी येत नाहीत? गंभीरपणे घेतलंच नाही ना! उलट ही संधी होती की त्याच्यासारखी माणसं पाहिजेत आपल्याला. मग त्यांच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोचता येईल ही संधी घेतलीच नाही ना. हा जो संधीचा गॅप आहे पुरोगामी शक्तींमधला आणि वारकर्‍यांच्या मधला, तो मला असं वाटतं की दूर करण्याची खरोखर गरज आहे. गाडगे महाराजांचं हे काम होतं, गाडगेमहाराज ते करायचे. पण नंतरच्या काळात ती प्रक्रिया थंडावली. थांबली आणि त्याचा फायदा आत्ता मी सांगितलं त्याप्रमाणे लोक घेतात. पण मुख्य मुद्दा हा की गेले कित्येक दिवस दाभोलकर आणि त्यांचे सहकारी महाराष्ट्रातल्या लोकांच्यात असलेल्या काही अंधश्रद्धा ज्यांचा समाजजीवनामधे, निकोप निरोगी नैतिक जीवनामधे अडथळा येतो-त्या नष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. आणि त्या संदर्भात त्यांचे काही विचार आहेत आणि सरकार मात्र तिथे कच खातं. असा आत्तापर्यंतचा अनुभव आहे. सरकार का कच खातं? सरकारने ते बिल आणण्याची घोषणा केली किंवा पुरोगामी प्रतिक्रिया दिली की त्याच्या विरोधात कुणीतरी उभे राहतात आणि सांगतात आमचा याला विरोध आहे. आणि त्यामधे वारकर्‍यांचे सुद्धा काही लोक पकडले जातात. मी परवा एकदा बोलताना- नागपूर अधिवेशनामधे वारकर्‍यांचं एक शिष्टमंडळ घेवून मंत्र्यांना भेटलो. आणि त्यांना सांगितलं की आमचा ह्या विधेयकाला पाठिंबा आहे; त्यानंतर आता पुण्यामधे 2-3 दिवसांपूर्वी भाषण केलं. त्यात मी म्हणालो, जादुटोणाविरोधी तो कायदा आहे; आणि जो त्याला विरोध करतो तो खरा वारकरी नव्हे. किंवा त्याची दिशाभूल झालेली आहे.

मला काही लोक म्हणतात की तुम्ही कोण? दाभोलकरांचं काम करताय? तर मी त्यांना म्हणतो की तसं काही नाही. दाभोलकरच आपलं काम करतायत. अंनिस जी आहे ती मी वारकरी संप्रदायाचीच विंग म्हणतो. त्यांचं तेच काम होतं. अशा प्रकारच्या चुकीच्या गोष्टींपासून समाजाला मुक्त करायचं. म्हणणं काय होतं, काही वारकर्‍यांचं, की तुम्ही आम्हाला विश्वासात घ्या; आम्हाला विचारा नेमकं काय आहे ते सांगा. आणि यात काही गैर नाही. याउलट काही मंडळी मंत्र्यांबरोबरच्या बैठकीत आम्हाला वेदांचा धाक घालू लागली! त्याच्यामधे असं आहे तसं आहे वगैरे; मग आमच्या वेदांचं काय झालं? इत्यादी. मी त्यांना बोलू दिलं आणि नंतर त्यांना म्हणालो, ‘अहो महाराज, तुम्ही काय सांगताय, कुठला वेद? माझा मुद्दा हा आहे की ज्या वेदांचा सामान्य माणसाशी काही संबंधच नव्हता, त्याबाबत त्याला काही अधिकारच नव्हता त्याचं प्रामाण्य आम्ही काय म्हणून मानावं? तुम्हाला जर या संबंधात काही बोलायचं असलं तर ज्ञानेश्वर आणि गाथा यासंबंधी बोला. मी वेदांचं ऐकून घेणार नाही. ज्या वेदांपासून आम्हाला वंचित करण्यात आलं त्यांचा अधिकार आम्ही का मानायचा? वारक र्‍यांमधे दोन पंथ आहेत. एक वेदप्रामाण्य मानणार नाही, जातिव्यवस्था मानणार नाही; आणि दुसरा जो पंथ आहे तो थोडा आहे पण हुशार आहे. तो सगळ्या गोष्टी मानतो. आणि त्या लोकांना हाताशी धरून अशा प्रकारचा विरोध करतात. आणि तेहीे वारकर्‍यांमार्फत आणि त्यांना हाताशी घेवून. कारण त्यांच्यात तेवढी शक्ती नाही. समाजाच्या जवळ आणून बिलाला विरोध करण्याची शक्ती त्यांच्यामधे नाहीये. मग ते वारकर्‍यांमधल्या अशा लोकांना हाताशी धरून असा प्रयत्न करतात. त्यांच्या माध्यमातून सांगायचं सगळ्यांना की वारकर्‍यांचा याला (प्रस्तावित विधेयकाला) पाठिंबा नाही. पण खर्‍या वारकर्‍यांचा या बिलाला पाठिंबा आहे.ज्यांचा विरोध आहे त्यांची दिशाभूल झालेली आहे. ती दिशाभूल होवू नये म्हणून प्रयत्न करावेत.

दाभोलकर आणि त्यांच्याबरोबर काम करणार्‍या लोकांबाबत सामान्य लोकांमधे गैरसमज खूप पसरविलेले आहेत. माझा समाजातल्या सगळ्या थरांच्या लोकांमधे वावर आहे. म्हणजे धर्मातील सुद्धा आहे. ते काय गोष्टी करतात? ते असं म्हणायला लागले आहेत की तुकारामांचा एक छान अभंग आहे. ‘कपट काही एक, नेणे भुलवायाचे लोक’-म्हणजे लोकांना फसविण्याचं मला काहीएक माहीत नाही. त्यामधे खूप वर्णन आहे त्या लोकांचं जे धर्माच्या नावाने लोकांना फसवत होते. सगळं वर्णन केलेलं आहे -कौल लावायचा, अंगारा द्यायचा वगैरे वगैरे-आणि शेवटी तुकाराम म्हणाले, ‘नव्हे त्यांच्या ऐसा, तुका निरमवासी पिसा.’ मी या लोकांप्रमाणे वेडा नाही. आणि या लोकांप्रमाणे मला नाटक पण करता येत नाही. म्हणजे खोट्या धर्माचं पालन करणारे लोक एकतर वेडे आहेत किंवा शहाणे असले तर नाटक करणारे आहेत. वेडे असले तर ते क्षम्य आहे, कारण त्यांना कळत नाही. पण नाटक करणारे ते गुन्हेगार आहेत. अशा पद्धतीने तुकोबांनी त्यांची हजेरी घेतलेली आहे. तेव्हा संतसाहित्याचा अभ्यास करणार्‍या लोकांचा, त्यांच्या संप्रदायाला मानणार्‍या लोकांचा अशा पद्धतीच्या उपक्रमाला विरोध असायचं काहीही कारण नाही. मला असं म्हणायचं आहे की हा जो संवाद होत नाही दोन प्रकारच्या लोकांमधला तो व्हायला पाहिजे. हे सांगायची संधी आपण मला दिलीत, या व्यासपीठावर, त्यासाठी धन्यवाद.

डॉ. सदानंद मोरे