मुस्लीम सत्यशोधक मंडळाचे सक्रिय कार्यकर्ते, मुस्लीम तलाख पीडित महिलांच्या प्रश्नांवर कार्य करणारे सय्यदभाई यांना “सुधारक”कार आगरकर पुरस्कार ज्येष्ठ नाट्यकर्मी आणि विवेकवादी विचारवंत श्रीराम लागू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ अभ्यासक पुष्पा भावे पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. पुरस्काराला उत्तर देताना सय्यदभाई म्हणाले की, “मुस्लीम सत्यशोधक मंडळ आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीची धर्मचिकित्सेबाबत एकच भूमिका असून समाज विवेकाच्या मार्गावर घेऊन जाण्यासाठी आपण सर्व एकत्र आहोत” तसेच एकूण कार्याचा आढावा घेताना सय्यदभाई यांनी तलाख पीडित महिलांच्या विषयावर भाष्य केले. “प्रत्येक धर्माने स्त्रीला दुय्यमच स्थान दिले आहे त्यामुळे इतर धर्मातील स्त्रियांप्रमाणे मुस्लीम स्त्रीवर देखील अन्याय झाला, तोंडी तलाख, बहुपत्नीत्व अशा अनेक गोष्टींमुळे तिचे शोषण झाले आहे. केवळ भारतातच नव्हे तर जगभरातील स्त्रियांचा हा प्रश्न आहे. माझी छोटी बहिण जाहीरा हिच्या तलाखमुळे मी या प्रश्नाकडे वळलो. हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली लढत असताना समाजातील विरोध सहन करून हे कार्य आज इथवर पोहोचले आहे.”
एकूणच मुस्लीम समाजातील परिस्थितीवर भाष्य करताना सय्यदभाई यांनी मुस्लीम समाजात मोठ्या प्रमाणावर परिवर्तनाची गरज अधोरेखित केली.
“आगरकर आणि फुले यांच्या विचारांनी घडवलेल्या महाराष्ट्रात स्त्रियांवर अन्याय अत्याचार वाढत आहेत. स्वयंघोषित स्त्रीरक्षक निर्माण झालेत. त्यामुळे खर्या अर्थाने समाजात हमीद दलवाई आणि सय्यदभाई यांच्यासारख्या विचारवंत कार्यकर्त्यांची गरज निर्माण झाली आहे. आगरकरांचा विवेकाचा मार्ग पुढे नेण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.” असे पुष्पाताई भावे यांनी मत व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणाले, “आचार आणि संघर्ष जरी माणसाला करता आला नाही तरी योग्य विवेकी विचार करणे आणि तो बोलणे हे देखील तेवढेच महत्वाचे आहे. आगरकरांच्या “इष्ट बोलेन आणि साध्य ते करेन” या विचाराला समाजाने जगवले पाहिजे. धर्मचिकित्सा आणि धर्मनिरपेक्षता या तत्वांसाठी सय्यदभाई यांनी जो संघर्ष केला त्यात अंनिस कायम त्यांच्याच बाजूची आहे आणि त्यांच्या संघर्षात त्यांची साथी आहे.” यावेळी राज्यकार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी प्रास्ताविक केले, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मनीषा महाजन यांनी आभार मानले.