Categories
व्यक्तिविशेष

तुम्ही आम्हाला हवे आहात!

ऑगस्ट - सप्टेंबर - २०१४

डॉक्टर तुम्ही आम्हाला हवे आहात आमचे पूर्ण कुटुंब पोरके झाले. तुमच्या आठवणींनी रडू आवरता येत नाही, रडता रडता अंगावर शहारे येतात. त्या दिवशी तुमच्या बातमीने कानावर विश्वासच बसेना. काय? कसे? एक ना अनेक प्रश्न मनात आले. आजदेखील त्या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.

17 ऑगस्टला तुमच्या कार्यक्रमाच्या दिवशी पुणे अंनिसचे अध्यक्ष माधव गांधी यांच्या लग्नाला 50 वर्षे झाली. कार्यक्रमाला त्यांनी मलापण बरोबर नेले. कार्यक्रम लांबला. शेवटी तुमची भेट होऊ शकली नाही. यांना तुम्ही 19 ऑगस्टच्या कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती. पण तुम्हाला सातारला जाण्यासच उशीर झाला. तरीदेखील त्या गडबडीत मिलिंदसाठी भाषणातील महत्वाचे मुद्दे तुम्ही लिहून आणलेले पोहचवले. सर्व कामे तुम्ही किती काटेकोर करत असावयाचे याची ही आठवण 7 ऑगस्टला मुंबईचा कार्यक्रम आटोपून पुण्याला आलात. आमच्याकडे मुक्काम केलात. जेवणाची स्तुती तर विचारूच नका. नंतर बराच वेळ गप्पा मारल्या. पेंडसे काका अमेरिकेला जाताना घराची गाडीची चावी यांना देऊनच सहा महिन्यासाठी गेले होते. त्यामुळे मुक्कामाला तुम्ही ड्रायव्हर व हे त्यांच्या घरी निघालात. जाताना तर तुम्ही म्हणालात की, तुझा नवरा तुझ्या हवाली परवा करतो. काळजी करू नको. त्या दिवशी झालेली भेट ही शेवटची ठरेल अशी कल्पनाही नव्हती.

लग्न झाल्यापासून सर्व महत्वाच्या कार्यक्रमात मी यांच्याबरोबर जात असायची. सातार्‍यातली कुटुंब मेळावा, पुण्यातील युवा एल्गार दशकपूर्ती, शनि शिंगणापूर आंदोलन अथवा महिला परिषद एक ना अनेक सर्वच कार्यक्रमात मी सहभागी होत असे. पण मला डॉक्टरांनी स्टेजवर नेऊन बसवणे तो प्रसंग मी कधीच विसरू शकत नाही.

पिंपरी चिंचवड शाखेला 20 वर्षे होणार म्हणून साहित्य संमेलन व द्विदशकपूर्ती दोन दिवसांचा कार्यक्रम ठरला होता. नेमके त्याच दरम्यान पेंडसे काकांना अमेरिकेला जावयाचे होते. त्यांनी मग मिलिंदच्या वर्ल्ड रेकॉर्डला 13 मे ला 20 वर्षे होणार तर हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात करावयाचा. त्याचा सत्कार करावयाचा, दाभोलकरांना बोलवावयाचे असे ठरवले व मग पिंपरी चिंचवडचे कार्यकर्ते कामाला लागले.

प्राधिकरणातील तक्षशिला बुद्ध विहारात हळूहळू कार्यकर्ते, नातेवाईक, मित्रमंडळी जमू लागले. कार्यक्रम सुरू झाला तेव्हा मी खाली प्रेक्षकांत होते. डॉक्टर खाली उतरले व मला हाताला धरून स्टेजवर नेले व शेजारी बसवले. तुमच्या भाषणात तुम्ही म्हणालात सुद्धा मला कार्यकर्त्यांपेक्षा त्यांच्या बायकांचे जास्त कौतुक आहे. द्विदशकपूर्तीला त्यांना स्टेजवर बसू द्यात गुमान चार शिव्या दिल्या तरी ऐकून घ्या. आज त्यांच्यामुळेच समिती चालते आहे. खरे तर मी काहीच बोलणार नाही असे ठरवून स्टेजवर बसले मात्र यांच्याविषयी इतके जण बोलत होते तेव्हा मात्र मी पण धाडस करून बोलले. त्यात “मिलिंद देशमुख आगे बढो, हम तुम्हारे साथ है।” ही वीस वर्षांपूर्वीची घोषणा मी पुन्हा दिली. त्याचे तुम्ही किती कौतुक केले. त्यावेळचे तुमचे भाषण हा आमच्या सर्व कुटुंबियांचा तो पुरस्कारच आहे. आज देखील ते भाषण ऐकताना रडू आवरत नाही. तुम्ही म्हणाला होता, अशा कार्यक्रमाने जो विकास होणार आहे तो मिलिंदमधील कार्यकर्त्याचा होणार आहे. ता अधिक चांगला सक्षम व संघटनेला आधार देणारा कार्यकर्ता बनणार आहे. तुम्ही हे पण म्हणालात की, पुन्हा असे काही रेकॉर्ड करू नको. कारण आपल्याला जी परिवर्तनाची वाट चालवावयाची आहे ती खूप जास्त अवघड आहे. या वाटेवरून जाताना तुझ्या माझ्या तर सोड पण तुझ्या माझ्या मुलीच्या आयुष्यातही रेकॉर्डची नोंद होणार नाही. मात्र इतिहासातही नोंद नक्की होईल की ही माणसे अतिशय चिकाटीने परिवर्तनाची वाट चालली.

तुम्ही हे पण म्हणालात की, मी काही सर्व लोकांना बदलले नाही. ‘तुका म्हणे झरा आहे मुळचाच खरा’ ही सर्व सारी माणसे होती मी फक्त त्यांना एकत्र केले. व अंनिस समाज परिवर्तनाचे एक नवे प्रारूप आकाराला आणत आहे व जसे बिल्डर एखादा सॅम्पल फ्लॅट ठेवतो तसे उद्या मला कोणी विचारले की, तुम्ही समाज परिवर्तनाचे नवे प्रारूप ठेवता आहात तुमचे सॅम्पल कोठे आहे तर मी मिलिंदकडे व अंजलीकडे बोट दाखवून म्हणेन की, आमचा सॅम्पल फ्लॅट रेडी आहे. आजदेखील आम्ही वारंवार कॉम्प्युटरवर ते तुमचे भाषण ऐकते व इतरांना ऐकवते तेव्हा खूप भरभरून येते. माझे कौतुक करताना मिलिंद सर्व गोष्टींची चिकित्सा करतो हे ठीक आहे पण त्याच्या बायकोने त्याच्या स्वेच्छा निवृत्तीची चिकित्सा केली नाही. पूर्णवेळ अंनिसचे काम करणार याची चिकित्सा केली नाही ती प्ले ग्रुप चालवते आपल्याला एक मूल सांभाळणे अवघड. पण ती 40 ते 50 मुले सांभाळते. घरचे सर्व सांभाळून मिलिंदला साथ देते हे सर्व अवघड आहे. मिलिंदने घेतलेल्या तो निर्णयचा तो क्षण अवघड असतो व आयुष्य संपल्यावरच कळते की, तो निर्णय योग्य होता का ते.

दोन वर्षांपूर्वी रोज रात्री यांना ताप येत असे. तरी यांचे कार्यक्रम चालूच होते. डॉ.माटेकडे हे गेले त्यांनी ब्लड चेक केले. यांना टॉयफाईड झाला होता. डॉ.माटेंनी एक फोन मला व एक तुम्हाला केला व मिलिंदला विश्रांतीची गरज असल्याचे सांगितले मग तुमचा मला फोन आला. घरीच बसू दे समितीचे कोणतेही काम करू देऊ नको. तसेच यांना पण टॉयफाईड आजार कसा गंभीर असतो. काळजी घेणे कसे महत्वाचे आहे हे सांगितले.

डॉक्टर तुम्ही नसताना 1 सप्टेंबरला मी सातार्‍याच्या कार्यक्रमाला आले तेव्हा अंनिसमधील सर्वच प्रमुख मंडळी तुमच्या विषयी जी भरभरून बोलत होती ते ऐकून तर माझे सारखे डोळे भरून येत होते. सर्वजण डॉ.दाभोलकर अमर रहे। फुले, शाहू, आंबेडकर आम्ही सारे दाभोलकर इ. घोषणा देत होते. आज देखील त्या घोेणा कानात ऐकू येतात.

अंजली देशमुख, पिंपरी चिंचवड