कोट्यवधी जनतेच्या मनात वर्षानुवर्षे चिकटलेली अंधश्रद्धेची वटवाघुळं दूर करत तेथे ज्ञान, विज्ञान आणि विवेकाचा उजेड पसरवू पाहणारे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यात भल्या सकाळी झालेली हत्या म्हणजे विवेकवादाला मोठा हादराच म्हणावा लागेल. रात्रंदिवस कष्ट उपसत, छोट्या-मोठ्या लढाया जाग्या करत दाभोलकरांनी चालवलेली अंधश्रद्धा विरोधी चळवळ विवेकवादाचे रूप धारण करत होती. देव, धर्म, रुढी, परंपरा यांच्या नावाने तयार झालेल्या अंधश्रद्धांना आणि बुवाबाजीला जबरदस्त धक्के देत होती. एक-दोन वर्षे नव्हे तर सतत पंचवीसहून अधिक वर्षेचालणारी देशातील ही चळवळ एकमेव ठरली. या कालखंडात मोजता येणार नाहीत एवढ्या अंधश्रद्धा आणि बुवाबाजी या चळवळीने संपवली. या सर्वांची चिकित्सा केली. सत्य साईबाबापासून ते गल्लीबोळातल्या देवदेवर्षीपर्यंत अनेकांना आव्हान दिले. लाखो लोकांची पिळवणूक थांबवली. संघटन, लेखन, भाषण, अभ्यास आदी विविध आयुधे वापरून दाभोलकर ती चळवळ नेटाने चालवत होते. त्यासाठी त्यांनी संघटनेची खालपासून वरपर्यंत भरभक्कम बांधणी केली होती. संघटनेचा आवाज उठवण्यासाठी मुखपत्र दिले होते. ज्ञान आणि विचार याबाबत कार्यकर्त्यांना अद्ययावत ठेवण्यासाठी राज्यभर आणि बाहेर हजारो अभ्यास शिबीरे भरवली. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या चळवळीत प्रथमच तरूणाई मोठ्या प्रमाणात उतरली होती. या चळवळीत काम करणे प्रतिष्ठेचे असते, अशी तिची धारणा झाली होती. चळवळ चालवण्यासाठी फुले, शाहू, आंबेडकर, संत तुकाराम, कबीर, गाडगेबाबा अशा आपल्याच मातीतून उगवलेल्या त्यांच्या तत्वज्ञानाचा वापर, जबरदस्त तर्कशास्त्र, जबरदस्त वाद-युक्तीवाद आणि जबरदस्त पर्याय या सूत्रांनुसार ते चळवळ चालवू लागले. जेथे जेथे अंधश्रद्धा अशा सर्वच ठिकाणी चळवळ पोचली. पर्यावरण, निरक्षरता, हुंडाबळी, आंतरजातीय विवाह, जात-पंचायती, पाठ्यपुस्तकातील अभ्यासक्रम, शनिमंदिरात महिलांचा प्रवेश, असे अनेक टप्पे या चळवळीने पार केले आहेत. संघटनेच्या अजेंड्यावर नित्य नवे विचार यायचे. त्याबाबतची व्यूहरचना यायची. प्रश्नांना वाचा फुटायची. अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा दाभोलकरांच्या लढाईतील सर्वात मोठा क्रांतिकारी टप्पा होता. कायदा मंजूर व्हावा आणि अंधश्रद्धा दूर करण्यासाठी घटनात्मक बळ प्राप्त व्हावे, अशी त्यांची धारणा होती.
समाजवादी विचारांच्या मुशीत दाभोलकर यांची जडणघडण झाली होती. स्वभाव न्यायप्रिय आणि न्यायासाठी संघर्ष करणारा होता. जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीत ‘कुछ-बनो’ हा मंत्र त्यांना सापडला आणि या मंत्राचे त्यांनी लढाईत रुपांतर केले. प्रबोधनासाठी रस्त्यावर जशा त्यांनी लढाया केल्या तशाच संशोधन ग्रंथातूनही ते लढले. भ्रम आणि निरास, अंधश्रद्धा प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम, अंधश्रद्धा विनाशाय, विचार तर कराल, लढे अंधश्रद्धेचे आदी त्यांची ग्रंथसंपदा आहे. मराठी साहित्यात अंधश्रद्धा निर्मूलनावरील साहित्याची खूप मोठी कामगिरी आहे. अशा प्रकारचे साहित्य गावोगावच्या कार्यकर्त्यांनी लिहिले. अंधश्रद्धा निर्मूलनाला वाहिलेले स्वतंत्र साहित्य संमेलनही त्यांनी पुण्यात घेऊन दाखवलं. चिकित्सेच्या चळवळी चालवणे ही सर्वात मोठी गोष्ट आहे. ती चालविणार्या अनेकांना मोठ्या दिव्यातून जावे लागले आहे. दाभोलकरांनी या सर्वांची क्रांतिकारी परंपरा मोठ्या अभिमानाने स्वीकारली होती. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही अनेक प्रदेशांना रणमैदान बनवले होते. पोटाला स्पर्श करून मुले देणार्या पार्वती माँविरुद्धही ते लढले आणि सरकारी निवासात अंधश्रद्धेचा जागर करणार्या मंत्र्यांविरुद्धही लढले दाभोलकर यांची भूमिका चकचकीत, पारदर्शी होती. मताचा आग्रह होता. तडजोड नव्हती. अनेक प्रसंग असे आले की त्यातून मोठे पेचप्रसंग उभे राहिले, पण दाभोलकर डगमगले नाहीत. भूमिका स्पष्ट असल्याने मागे वळण्याचे नावही त्यांनी घेतले नाही. विविध घटकांकडून येणारे दबाव त्यांनी झुगारून लावले. अंधश्रद्धा जन्माला घालणार्या असंख्य कारणांना ते भिडत राहिले. केवळ धार्मिक किंवा दैवाविषक कारणातूनच अंधश्रद्दा जन्माला येतात असे नाही. अगतिकता, दारिद्य्र, अडाणीपणा, स्त्री-पुरूष भेद अशी असंख्य कारणे त्यांनी लोकांसमोर मांडली. जात ही सर्वात मोठी अंधश्रद्धा असल्याचे सांगत ते जात-पंचायतीविरुद्धही अलीकडे उभे ठाकले होते. देश आणि समाज राज्यघटनेनुसार चालावा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तत्वे घेऊनच तो चालत राहावा यासाठी त्यांचा आग्रह होता. अघोरी शक्ती वापरून कोणतेही बदल होत नसतात किंवा झाले तरी ते फार काळ टिकत नसतात. प्रबोधन, आंदोलन, शिक्षण आणि घटनात्मक तरतुदी सक्रिय करूनच ते घडवावे लागतात, याविषयी त्यांना खात्री होती. लोकशाहीतील सनदशीर मार्ग ते समूहाच्या मनावर बिंबवत होते. अंधार दूर करणारी त्यांची चळवळ कोणा एक विशिष्ट जाती-धर्माची राहिलेली नाही. विविध घटकांतील समूह तिच्यात सहभागी झाले होते. विचारांची एक क्रांतिकारी परंपरा घेऊन ते निघाले होते. ग्रंथप्रामाण्य, बाबावाक्य, दैववाद वगैरे मानवी मन आक्रसून टाकणार्या गोष्टींना त्यांनी मुळापासून नाकारले होते. चौकात उभे राहून प्रश्न विचारले होते. आधुनिक महाराष्ट्राच्या सामाजिक इतिहासात उगवलेले, वाढलेले, विलक्षण वाटावे असे हे दाभोलकरी पर्व होते.

अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी प्रचंड प्रमाणात प्रबोधन व्हावे लागते. शिकलेल्या आणि बिन शिकलेल्या अशा सर्वांचे प्रबोधन व्हावे लागते. गेली काही वर्षे दाभोलकर इकोफ्रेन्डली असलेल्या गणेशमुर्तीचा आग्रह धरत होते. आपल्या श्रद्धा आणि भक्ती व्यक्त करताना नद्या-नाले प्रदूषित करू नका, गायब करू नका असे सांगत होते. त्यांना प्रतिसादही मिळत होता. अलीकडे दोन-चार वर्षात त्यांनी आंतरजातीय विवाहांनाही चळवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या (अंनिस) पुढाकाराने राज्यभर शेकडो आंतरजातीय व आंतरधर्मीय लग्ने लागली आहेत. ‘अंनिस’ म्हणजे केवळ बुवाबाजीविरुद्ध आवाज नव्हे, तर प्रबोधनातून उजेडाकडे असा एक विलक्षण प्रवास होता. या प्रवासाचा इतिहास बनत होता. जणू काही महाराष्ट्रातील ही रेनेसॉ चळवळ होती. एका व्यापक उद्दिष्टाकडे ती निघाली होती. एका पुरोगामी विचारांची मानसिकता ती बनत होती. अर्थात या सर्व गोष्टींवर नाराज होणार्यांची संख्या काही कमी नव्हती. काही झाले तरी आपल्या देव धर्माचा अवमान झाला असे म्हणणारे काही कमी नव्हते आणि धमक्या देणार्यांची संख्याही काही कमी नव्हती. एका सच्च्या आणि लढाऊ कार्यकर्त्यांला या सर्व अवस्थांमधून जावे लागते. निखार्यांवरूनच चालावे लागते. दाभोलकर तसे चालत राहिले. एक मोठा सळसळत्या तरूण पिढीचा कबिला घेऊन चालत राहिले. समग्र सामाजिक परिवर्तन हेच त्यांच्या प्रवासाचे अंतिम ठिकाण होते. आत्मविश्वासाने भरलेला लढाऊ प्रवास चालू असताना त्यांचा बळी जावा ही खरोखरच सुन्न करणारी घटना आहे. अंधार उजेडावर घाला घालू शकतो, हे जसे खरे, तसे उजेडच अंधाराला संपवू शकतो. हेही तितकेच खरे. एका मोठ्या समाजात दाभोलकरांनी अंधाराकडून उजेडाकडे जाणारे उत्तरायण सुरु केले होते. एका अर्थाने उत्तरायण अधिक प्रकाशमान होत होते. गेल्या दोन महिन्यांपासून जात पंचायतीविरुद्ध त्यांनी आवाज उठविला होता. जात पंचायती नागरिकांच्या विकासात अडसर ठरतात व पिळवणुकीचे साधनही ठरतात, असे ते सांगत. राज्यभर परिषदा घेऊन त्यांनी या पंचायतीविरुद्ध दबावही तयार केला होता. उच्च न्यायालयानेही महिन्याच्या आत जात पंचायतींना निर्बंध घालणारा कायदा करावा, असा आदेश दिला होता. नव्या लढाईचे फलित एक प्रकारे जवळ येत होते आणि जादुटोणाविरोधी कायदाही कोणत्याही वेळेला जन्माला येवू घातला होता. अशा परिस्थितीत दाभोलकरांचे आपल्यातून निघून जाणे चटका लावणारे होते, ‘माणसाची स्वप्ने मारणारी क्षेपणास्त्रे अजून कोणी जन्माला घातलेली नाहीत.’ दाभोलकरांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. उजेडाकडे जाणारा प्रवासच त्यांना श्रद्धांजली असणार आहे.
–उत्तम कांबळे