तुम्ही समाजसुधारणेचं, धर्मसुधारणेचं काम करणार असाल… समतेची, न्यायाची, विवेकनिष्ठतेची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची भाषा बोलणार असाल… देवाधर्माच्या नावाने होणार्या शोषणाविरुद्ध भूमिका घेणार असाल, तर तुमचा नरेंद्र दाभोलकर होईल… डॉ. दाभोलकरांचे मारेकरी आज महाराष्ट्राला हाच इशारा देत आहेत. दाभोलकरांचे मारेकरी कोण? हे आजही अस्पष्ट आहे, पण ज्यांनी ही हत्या केली त्यांना विवेकनिष्ठा, वैज्ञानिक दृष्टिकोन, धर्मचिकित्सा या गोष्टी मान्य नव्हत्या, हे सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे.
डॉ. दाभोलकर धर्मांधांना नकोसे व्हावेत, एवढं त्यांनी केलं काय? तर याचं उघड दिलं जाणारं उत्तर त्यांनी ‘जादूटोणा विरोधी कायदा’ यासाठी आग्रह धरला, हे आहे. आज महाराष्ट्राच्या जनतेत व अंनिसच्या कार्यकर्त्यामध्ये हीच भावना आहे. पण जादूटोणाविरोधी कायदा, बुवाबाजीला विरोध एवढीच डॉ. दाभोलकरांची आणि अंनिसची ओळख नाही. त्यांचं कार्यक्षेत्र अधिक व्यापक आहे. कदाचित काहींना जोखीम वाटली असावी.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक, साधना साप्ताहिकाचे संपादक, परिवर्तन या व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक, सामाजिक कृतज्ञता निधीचे सचिव, देशाचं प्रतिनिधित्व करणारा कबड्डीपटू, पेशाने डॉक्टर पण वृत्तीने पूर्णवेळ कार्यकर्ता, अशा डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या अनेक ओळखी आहेत. एक कार्यकर्ता ते उत्तम संघटक, असा त्यांचा प्रवास आहे. समाजप्रबोधनाचा ध्यास ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. त्यांच्या या ध्यासामुळेच अंनिसची ओळखही केवळ बुवाबाजीविरोधात कार्यक्रम घेणारी चळवळ, अशी न राहाता तिचा विविधांगाने विकास होत गेला.
यातनंच ‘विज्ञान बोध वाहिनी’ सारखा शालेय मुलांना विज्ञानाची माहिती देणारा उपक्रम सुरू झाला. ‘फिरतं नभांगण’ या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांना ग्रहतार्यांची शास्त्रीय ओळख करून देत ग्रहाच्या वक्र दृष्टीपासून वाचवण्याचं काम केलं. विज्ञानाच्या या सोबतीनेच होळीमध्ये लाकडं जाळू नका, कचरा जाळा, असं सांगत प्रदूषणविरहित सण साजरे करण्यासाठी उपक्रम सुरु झाला.
एकदा विज्ञानाचं, विवेकाचं बोट पकडलं की थांबता येत नाही. आंतरजातीय विवाहांना होणारा विरोध हा विज्ञान तर नाकारतोच; पण विवेकालाही सोडचिठ्ठी देतो. अशावेळी फक्त शोषण उरतं. यातनंच अंनिसने आंतराजातीय विवाह, जोडीदाराची विवेकी निवड, जातपंचायत मूठमाती अभियान या चळवळी सुरू केल्या. महिलांमध्ये अंधश्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत, त्यामुळे त्याची वेगळी कारणमीमांसा करत महिलांमधील अंधश्रद्धाविरोधी कार्यक्रम, परिषदा घेण्यात आल्या. उत्तर महाराष्ट्रातल्या आदिवासी भागात स्त्रीला चेटकीण ठरवून मारण्याची प्रथा आहे. या अनिष्ट प्रथेविरोधात अंनिसने 2003 पासून डाकीण प्रथा विरोधी जनजागृती सुरू केली. यात पोलीस पाटलांच्या परिषदेपासून ते युवती संवाद यात्रेपर्यंत विविध उपक्रम राबवण्यात आले.
डॉ. दाभोलकरांच्या मृत्यूनंतर समाजातल्या वेगवेगळ्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. पण गेली अनेक वर्षे डॉक्टरांबरोबर त्यांचे सहकारी म्हणून काम करणार्या अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या स्मृतीत डॉक्टरांचं समग्र व्यक्तिमत्व सामावलेलं आहे.
–संध्या नरे–पवार