Categories
अभिवादन

अखेरचा निरोप….

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

20 ऑगस्टची सकाळ.. रक्षाबंधनाचा दिवस.. सकाळपासून मोबाईलची रिंग… सुट्टी नसल्यामुळे कॉलेज, ऑफीसमध्ये जाण्याची लगबग सुरू… संध्याकाळी बहिणींकडे जाण्याचा निर्णय… एवढ्यात मोबाईल वाजतो… मी किचनमध्ये नाष्ट्याच्या तयारीत… ह्यांना विचारले. फोन कुणाचा होता… दोन तीन वेळा विचारूनसुद्धा उत्तर नाही… ह्यांनी टी.व्ही.सुरू केला… आणि बातमी कानावर पडली… डॉ.नरेंद्र दाभोलकरांची हत्या… ओंकारेश्वराच्या पुलावर सकाळी फिरायला गेले असता गोळ्या झाडून हत्या… हल्लेखोर मोटरसायकलवरून पसार… बातमी ऐकून पायाखालची जमीनच सरकली…. डोळे विस्फारले गेले… मन सुन्न झाले…. आम्ही दोघे बधीर. कोमात गेल्यागत… हतबल… काय करू. कोणाला फोन करू… कोणी केली हत्या… कशासाठी…. काही वेळानंतर काहीतरी क्लीक झाले…. अरे आपणाला तिकडे पोहचायचे आहे… मिलिंद देशमुखकडून ससूनमध्ये पोहोचण्याचा निरोप…. कसेबसे आवरून निघालो… मोबाईल वाजत राहतो… काय बोलावं ते कळत नाही… कुणी कुणाशी बोलत नाही… जीवघेणी असहाय्य शांतता…. ससून आले.. आतमध्ये पोस्टमॉर्टेमच्या इमारतीजवळ अलोट गर्दी… गर्दीत ओळखीचे व अनोळखी. सर्व कायकर्ते, सामाजिक, राजकीय, चित्रपट क्षेत्रातील व्यक्ती… तेवढ्यात मनिषा महाजन, क्रांती, बागूल, राजन आणि अनेक कार्यकर्ते दिसतात… आणि एवढा वेळ आवरून ठेवलेला मनाचा बांध फुटला…. अनावर झाला…. सर्वांच्या चेहर्‍यावर अविश्वास, राग, चीड, संताप, उद्विग्नता… कार्यकर्त्यांच्या संतापातल्या घोषणा… कायदा झालाच पाहिजे, दाभोलकर अमर रहे, आबा, दादा उत्तर द्या… वगैरे. वगैरे… घोषणांनी आवार दुमदुमून जाते….

यावेळेस गर्दीतून आवाज आले. खून करणार्‍यांना जोपर्यंत पकडत नाही तोपर्यंत डॉक्टरांचा देह हलविला जाणार नाही… पण असे करणे उचित नव्हते… डॉक्टरांच्या विचारांना धक्का पोहोचवणारे होते… डॉक्टर हमीद व इतर कुटुंबीय आल्यावर कागदपत्रांची पूर्तता झाली… हमीदने सर्वांना शांत राहण्यास सांगितले… आणि डॉक्टरांचा देह साधना मीडिया सेंटरमध्ये अंत्यदर्शनासाठी ठेवण्याचा निर्णय झाला… ह्या गर्दीत अच्युत गोडबोले, अतुल पेठे, अमोल पालेकर, संध्या गोखले, सुभाष वारे, भाई वैद्य, सुनिती सु.र., विलास वाघ, जयदेव गायकवाड असे अनेक मान्यवर शोकाकूल दिसत होते… कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव डॉक्टरांची बॉडी मिरवणुकीने साधनापर्यंत आणली गेली…. आता साधनाकडे गर्दीचा लोंढा सुरू झाला.. साधनाकडे पोहोचण्याचा रस्ता अरूंद असल्याने पोलिसांनी वाहनांसाठी तेथील रस्ते बंद केले होते….

साधनात अलोट गर्दी…. डॉक्टरांवर प्रेम करणारे अनिल अवचट, लागू दांपत्य, मोहन धारिया, रत्नाकर महाजन, प्रतापराव पवार, रझिया पटेल, जतिन देसाई असे अनेक नामवंत हजर… साधनाच्या प्रवेशद्वाराजवळ डॉक्टरांचा देह ठेवला गेला आणि रांगेतून दर्शन घेण्यास सुरवात झाली… पोलिसांना पण नियंत्रण करणे कठीण जात होते… अमर रहेच्या घोषणा सुरूच…. उचंबळून येणार्‍या भावना… अनावर अश्रू….

डॉक्टरांचा निष्प्राण देह बघून भडभडून आले. आतापर्यंत त्यांना असं शांत कधीच बघितलं नव्हतं. नेहमी हसतमुख. कामामध्ये मग्न. उदंड आशावादी, बघितलेले. साधारण दुपारी तीन वाजता डॉक्टरांना घेऊन गाडी सातार्‍याकडे निघाली. आणि त्या गाडीपाठोपाठ पुण्यातून अनेक गाड्या निघाल्यात…. आमच्या लढवय्या बापाला अखेरचा निरोप देण्यासाठी…

संध्याकाळी पाच साडेपाचला सातार्‍यात… सातार्‍यात शिरता शिरताच सातार्‍यावरची शोककळा दिसायला सुरवात झाली…. बर्‍याच ठिकाणी भ्याड हल्ल्याच्या निषेधाचे तसेच भावपूर्ण श्रद्धांजलीचे बोर्डस दिसू लागले…

त्यांच्या घराकडे जाणार्‍या रस्त्यांवर मोठा पोलीस बंदोबस्त…. घरासमोरच्या मोकळ्या मैदानावर मंडप… अंत्यदर्शनासाठी देह ठेवला गेला…. दर्शनासाठी लोंढे वहातच होते…. न थांबता…. दर्शनासाठी दोन वेगळ्या रांगा… एक महिलांसाठी व दुसरी पुरूषांसाठी…. न संपणार्‍या अव्याहतपणे सरकणार्‍या रांगा…. संपूर्ण राज्यातून येणार्‍या कार्यकर्त्यांचा ओघ सुरूच…. त्यात मान्यवर… मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, गृहमंत्री आर.आर.पाटील, हर्षवर्धन पाटील, सतेज पाटील, शशिकांत शिंदे, एन.डी.पाटील, गोविंद पानसरे, आ.ह.साळुंखे… आदी अनेक….

त्यांचं पार्थिव बघितल्यावर कुटुंबाला झालेला अनावर शोक…. इथेही सतत घोषणा सुरूच…. मुख्यमंत्र्यांच्या गाडीला घेराव…. आरोपींच्या अटकेची मागणी… रात्री सव्या आठ वाजता अंत्ययात्रा संगम माहुली स्मशानभूमीकडे…

खरं म्हणजे डॉक्टरांची इच्छा देहदानाची…. पण तसे होणे नव्हते…. कारण दुर्दैवी हत्या… व पोस्ट मार्टेम… म्हणून देहदान शक्य नाही….

हजारो कार्यकर्त्यांच्या आणि सर्व थरातील समाजाच्या उपस्थितीत हमीद व मुक्ता ह्यांनी दिलेला अग्नी. डॉक्टर नरेंद्र दाभोलकर अमर रहे च्या घोषणा दुमदुमत राहिल्यात…. आकाशात झेपावणार्‍या ज्वालांबरोबर मनात येत होते, ‘कशासाठी उतरावे तंबू ठोकून, कोण मेले कुणासाठी रक्त ओकून.’ स्वागत थोरातांची कविता मनात कुजबुजली….

आशा आहे अजूनही
ढिगार्‍याखाली आग असेल.
फुंकर मारून राख उडविताच
ज्वाला पुन्हा पेटून उठेल… ज्वाला पुन्हा पेटून उठेल.

समाजासाठी आपल्या हाडांची काडं करणार्‍या लढवय्या सेनापतीला अखेरचा त्रिवार सलाम!

प्रतिभा आणि अरविंद पाखले

हम होंगे कामयाब एक दिन…

हम होंगे कामयाब
एक दिन…

होगी जीत सचाई की,
होगी जीत सचाई की,
एक दिन…

ओ हो मन मे है विश्वास
पूरा है विश्वास…
होगी जीत सचाई की, एक दिन…

हम चलेंगे साथ साथ
डाले हाथों में हाथ
हम चलेंगे साथ साथ
एक दिन…

ओ हो मनमें है विश्वास
पूरा है विश्वास
हम चलेंगे साथ साथ एक दिन…

युग बदलेगा चारो ओर
युग बदलेगा चारो ओर
एक दिन…

ओ हो मनमें है विश्वास
पूरा है विश्वास
युग बदलेगा चारो ओर एक दिन…