जात हीच एक अंधश्रद्धा आहे आणि जातीच्या रक्षणासाठी जातबांधवांच्या आयुष्यावर जन्मापासून मरणापर्यत,नव्हे मरणानंतरही नियत्रण ठेवणारी जात पंचायत समूळ उखडून टाकण्याची वेळ आता आली आहे.
रायगड,रत्नागिरी,सिंधुदुर्ग जिल्ह्यांमधून वाढत्या संख्येने उजेडात येत असलेल्या जातपंचायत आणि गावकीच्या जुलुमांच्या आणि वाळीत प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाड येथे जातपंचायतीच्या मनमानीविरुद्ध चौथी परिषद 8 फ़ेब्रुवारी 2015 रोजी आयोजित केली होती. वाळीत, पिडीत अशा 72 कुटुंबांतील पावणे दोनशे सदस्यांनी आपल्या व्यथा वेदनांना वाचा फ़ोडण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी या कोकणस्तरीय ‘एल्गार परिषदे’ला हजेरी लावली.चवदार तळ्याच्या लढयाची पार्श्वभूमी असणा-या महाड शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या सभागृहात ही परिषद पार पडली.
जातपंचायतीला मूठमाती देण्यासाठी या परिषदेचे उद्घाटन अभिनव पद्धतीने करण्यात आले.जातपंचायतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या रोहा तालुक्यातील मोहिनी तळेकर आणि सुधागड तालुक्यातील वाळीत प्रकरणातील दुसरा बळी ऋषभ कदम यांच्या शेतातील माती अनिसच्या कार्यकर्त्यांनी आणली होती. त्या मातीमध्ये सोनचाफ़्याचे रोप लावून या परिषदेची सुरुवात झाली.
डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खुनापुर्वी अवघे काही दिवस आधी घेण्यात आलेल्या जातपंचायतविरोधी परिषदेपासून या प्रश्नावर आपले तन मन आणि सर्व उर्जा देऊन धडाडीने काम करणारे अंनिसचे कार्यकर्तेकृष्णा चांदगुडे यांनी या अभियानामागील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची भूमिका स्पष्ट केली. परदेश प्रवास केला आणि समुद्र ओलांडला म्हणून गांधीजींनाही त्या वेळच्या धर्मपीठाने नाशिकच्या रामकुंडात डुबकी मारून, गावजेवण घालून, दंड भरल्यानंतरच जातीत परत घेतले होते. स्वातंत्र्यानंतर राज्यघटना आस्तित्वात आली तरी आजदेखील केवळ भटके विमुक्तच नाही तर सर्व जातींतील, सर्व आर्थिक स्तरांतील आणि महाराष्ट्राच्या सर्व कानाकोप-यातील लोकांना जातपंचायतींचा काच सहन करावा लागतो आहे. पंचांना आजही देव समजले जाते. जन्मापासून मरणापर्यंत नियंत्रण करण्याची मुभा या पंचांना मिळते.जातीबाहेर लग्न केलं तर दोन जातींचा संकर होवून पुढची पिढी निर्माण होणं हे देवाच्या इच्छेविरुद्ध असल्याचं सांगितलं जातं आणि मग जातीचं रक्षण करण्याच्या नावाखाली अशी लग्नं केलेल्या लोकांना दंड ठोठावणं, वाळीत टाकणं इत्यादी मार्गांनी त्यांचा छळ केला जातो.जात पंचायतीच्या दबावाखाली या कारणाने नाशिक जिल्ह्यात बापाने आपल्या गरोदर मुलीचा खून केला तेव्हा हे भीषण वास्तव पुढे आलं. जातपंचायतीच्या न्याय निवाड्याच्या पद्धती या अंधश्रद्धांवर आधारित आहेत.महिलांना तिथे बोलायची परवानगी नाही, त्यांनी आपले प्रश्न पुरुषांमार्फ़त मांडायचे. अशा या जातपंचायतींविरुद्धचा हा लढा आत्मसन्मानाचा आणि जातीअंताचा लढा आहे असं कृष्णा चांदगुडे यांनी ठामपणे मांडलं. वाळीतांची वेगळ्या अर्थाने घरवापसी व्हावी म्हणून अहिंसात्मक आणि सनदशीर मार्गाने लढ्यासाठीचा हा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंनिसचे रायगड जिल्ह्याचे समन्वयक नितीनकुमार राउत यांनी परिषदेचे प्रास्ताविक केले. वाळीत प्रकरणांचा शोध घेण्याच्या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील अनिस कार्यकर्त्यानी माहितीचा अधिकार वापरला व वाळीत प्रकरणांच्या केसेस आणि त्यांचं स्वरूप याविषयी माहिती मागवली.पोलिस यंत्रणेचा याकडे बघण्याचा कल हा गावांतील परस्परांतील वाद इतका मर्यादित असल्याचं यातून जाणवलं. गेले चार महिने गावागावांत फ़िरून कार्यकर्तेवाळीत कुटुंबांना भेटले.त्यांचे प्रश्न समजून घेतले,पंचांच्या भेटी घेतल्या. काही प्रकरणे गाव पातळीवर सामोपचाराने मिटवण्याचा प्रयत्न केला.वाळीत टाकण्यासाठी अनेक कारणं सांगितली गेली, जसे की, प्रेम विवाह केला, आंतरजातीय विवाह केला, निवडणुकीत विरोधी मतदान केलं,निवडणुकीला प्रस्थापितांच्या विरोधात उभा राहिला,दारुबंदी केली! या सर्व पिडीतांच्या व्यथा जगासमोर याव्या,त्यांवर प्रशासन आणि पोलिस यंत्रणेने योग्य कार्यवाही करावी आणि जातपंचायतीच्या,गावकीच्या मनमानी अशा समांतर अन्याय्य व्यवस्थेला पायबंद व्हावा म्हणून ही परिषद असल्याचं त्यांनी सांगितलं.
महाड उपविभागाच्या प्रांताधिकारी सुषमा सातपुते या प्रशासनाच्या वतीने परिषदेला उपस्थित राहिल्या. त्यांनी सांगितले की ‘गेल्या चार महिन्यात जेथे अशा केसेस पुढे आल्या तेथे ग्रामस्थांबरोबर मिटींग घेऊन सामोपचाराने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला आहे. या स्वरुपाच्या केसेस सोडवण्यासाठी शासनाने ग्राम स्तरावर आणि तालुका स्तरावर लोक प्रतिनिधी, शासकीय कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्तेयांच्या समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांनी या परिषदेसाठी सहकार्य केले. संस्थेचे संचालक श्री. रामटेके यांनी आपल्या भाषणामध्ये धर्मातून उदयाला आलेल्या जात व्यवस्थेविषयी मांडणी केली आणि यासंदर्भातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा उपस्थितांना परिचय करून दिला. अंनिसचे उपाध्यक्ष आणि माजी पोलिस आयुक्त अशोक धिवरे यांनी जात आणि जात पंचायत, असहाय्यांचा फ़ायदा घेण्यासाठी कशी टपलेली असते व रुढी-प्रथा पालनाच्या जबरदस्तीतून लोकांचं आचरण आणि रोजचं जगणं कसं नियंत्रित करते हे सांगितलं. समाज मान्यता, प्रशासन व पोलिस यंत्रणेची मान्यता यांतून पंचांना ताकद मिळत असते. त्यामुळे या प्रश्नावर काम करताना आपण पंचांच्या कमकुवत जागा शोधल्या पाहिजेत असे ते म्हणाले.
ग्रामभेटींद्वारे वेगवेगळ्या स्त्रोतांकडून गोपनीय माहिती मिळवण्याची सूचना धिवरे साहेबांनी प्रशासनाला केली.
पहिल्या सत्राच्या अध्यक्षीय समारोपामधे अंनिसचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी या अभियानाचा एकूण प्रवास मांडला आणि गुलामाला गुलामीतून मुक्त करण्यासाठी गुलामीची जाणीव करून देण्याची आवश्यकता व्यक्त केली. ते म्हणाले की ‘लोकांनी पुढे येउन भयमुक्त वातावरणात आपले प्रश्न मांडले पाहिजेत. यासाठी केवळ प्रबोधन आणि संवाद पुरेसा नाही कारण जामिनावर सुटलेले आरोपी हे शोषित अशा फिर्यादी व्यक्तींवर दबाव टाकतात असा अनुभव आहे आणि म्हणून या परिषदेद्वारे जात पंचायतीची मनमानी व वाळीत टाकणे या विरुद्धच्या कायद्याची मागणीदेखील करावी लागेल. आज प्रशासन आणि पोलिस यंत्रणा या केवळ कायदा सुव्यवस्था राखण्याचं काम करत आहेत. लोकांना सुरक्षित आणि सन्माननीय जीवन जगता यावं यासाठी सामाजिक न्याय प्रस्थापित करणं, त्यासाठी काम करण्याची संवेदनशीलता वाढवणे याची आज गरज आहे. जातपंचायतींची समांतर न्याय व्यवस्था नव्हे तर केवळ राज्य घटनेवर आधारित न्याय व्यवस्था या देशात चालण्याचं महत्व त्यांनी मांडलं. मागास समाज शिकतो आहे,संपन्न होतोय हे वरच्या मानल्या जाणा-या जातींना खिलाडू वृत्तीने घेणं कठीण जातंय. या उच्च नीचतेवर आधारित जातीव्यवस्थेच्या विचारातून बाहेर पडण्याची गरज पाटील यांनी मांडली.
‘सामाजिक बहिष्कारासंबंधीच्या तक्रारींवर करावयाच्या कार्यवाहीबाबत’ 30/09/2013 रोजी महाराष्ट्र शासनाने परिपत्रक काढलेले आहे. उपस्थिताच्या माहिती करिता परिषदेमधे मोठ्या पोस्टरच्या स्वरुपात हे परिपत्रक लावण्यात आले होते.
एल्गार परिषदेच्या दुस-या सत्रामधे प्रातिनिधीक अशा बारा पिडीतांनी आपल्या व्यथा,वेदना मांडल्या. प्रत्येक कहाणी ही प्रथा,रुढी,जातीची शुद्धता वाचवणे इत्यादी कारणं देऊन माणुसकीला काळिमा फ़ासणा-या घटनांची लाजिरवाणी मालिकाच होती.
प्रेम करताना जात विचारली नाही हा गुन्हा केला म्हणून पोलादपूर तालुक्यातील चांदले गावच्या महेंद्र उंबाळकर या तरुणाला 2012 साली लग्न केल्यापासून गावकीने वाळीत टाकलं.त्यांच्याशी संबंध ठेवणा-या काकांनाही वाळीत टाकण्याचा फ़तवा गावकीने काढला. तंटामुक्ती अध्यक्ष, पोलिस स्टेशन इ. ठिकाणी पिडीत कुटुंबाने या प्रकरणाचा पाठ्पुरावा केला. गावात परत घेण्यासाठी गावकीने बसवलेला 25000 रुपयांचा दंडही भरला. तंटा मुक्ती अध्यक्षांनी लावलेल्या मिटींगला आजुबाजुच्या 20-25 गावांतील साडेतीनशे माणसे आलेली होती. बौद्ध समाजातल्या मुलीशी लग्न केल्याच्या अपराधासाठी ही मंडळी महेंद्र आणि त्याच्या घरच्या मंडळींना मारायला धावली. महेंद्र सांगतो की दंड भरूनही मिटींगनंतर गावकी आम्हाला गावात परत घेतल्याचे लिहून द्यायला तयार नाही.
चिपळूण तालुक्यातील संजय कदम यांनाही बौद्ध मुलीशी लग्न केले म्हणून गावकीने वाळीत टाकले. या लग्नाला हजर राहण्याची परवानगी नसल्याची आणि तसे केल्यास त्यांनाही वाळीत टाकण्याची धमकी गावकीने कदम यांच्या नातेवाईकांना दिली.संजय कदम अंनिसच्या संपर्कात आले आणि माध्यमांच्या मदतीने त्यांनी आपल्यावर केल्या गेलेल्या अन्यायाला वाचा फ़ोडली. पोलिस स्टेशन मधे तक्रार दाखल केली.अखेर गावकीने नरमाईची भुमिका घेत आपली चूक मान्य केली. अंनिसने केलेल्या मदतीमुळेच हे शक्य झाले ही कृतज्ञता व्यक्त करून यापुढे अंनिसच्या जात पंचायत मूठमाती अभियानात सक्रियपणे सहभागी होण्याचा निर्धार संजय कदम या युवकाने जाहीर केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील गावात आपल्या सासुरवाडीच्या माणसांना वाळीत टाकल्याची कैफ़ियत रफ़िक भाट्कर यांनी मांड्ली.सासरी गेले असता 30-35 जणांच्या जमावाने या घरावर केलेला हल्ला अनुभवल्यावर नको ते मामाच्या गावी जाणे असं मुलं म्हणू लागल्याचं दुःख रफ़िकभाईंनी व्यक्त केलं.
श्रीवर्धनच्या रोहिदासवाड्यात राहणारे लक्ष्मण चांदोरकर 1986 पासून म्हणजे गेली 28 वर्षेवाळीताचे जिणे जगत आहेत. त्यांचा अपराध काय तर ते सासुरवाडीला रहायला आले! 28 वर्षांपूर्वी वाळीत टाकलं तेव्हा, गावक-यांनी भांडण काढून चांदोरकरांना आणि त्यांच्या बायको मुलांना मारहाण केली होती. पोलिसांकडे मदतीसाठी गेल्यावर पोलिसांनी गावकीची बाजू घेऊन चांदोरकर यांच्यावरच केस केली होती .सासू मेल्यावर प्रेत उचलण्यासाठी भावकीतले किंवा गावकीतले कुणीही आले नाहीत.इतकी वर्षेउपेक्षिताचे जिणे जगत असल्याची व्यथा वयोवृद्ध चांदोरकरांनी मांडली.
रत्नागिरी तालुक्यातील गंगाराम पवार यांचा भावकीशी देवाच्या देव्हा-यावरून आणि तो हलवण्यावरून झालेला वाद गावकी पर्यंत नेला गेला आणि त्यातून पवार कुटुंबाला वाळीत टाकण्यात आलं. गावचे सरपंच हे पंचायत समितीच्या निवडणुकीला उभे राहिले असताना, सर्व गावाने त्यांनाच मत दिलं पाहिजे असा ठराव करण्यात आला होता; त्या विरुद्ध पवारांनी मत मांडल्याचा रागही यामागे होता.वाळीत म्हणून त्यांना गावातील दुकानात सामान मिळणं,चक्कीवर द्ळण मिळणं,मजुरीवर कामाला बोलावणं, कसायला मक्त्याने जमीन मिळणं, एव्हढंच काय पण वडाप म्हणजे शेअर रिक्षात बसून तालुक्याच्या गावी जाणे यावरही बंदी आली.या कुटुंबाशी बोलणा-या आणखी 5 कुटुंबांनाही वाळीत टाकण्यात आलं.शिरगाव पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी पंचांना चौकशीसाठी बोलावलं तेव्हा आम्ही कुणालाही जुमानणार नाही असा पवित्रा या पंचमंडळींनी घेतला. पारंपारिक ताकदीमधून ही जातपंचायतीची व्यवस्था किती मुजोर झाली आहे हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं.

जमिनीच्या वादावरून मांदाड, जि. रायगड मधील रजनी साळुंखे यांच्या कुटुंबाला गावकीने वाळीत टाकलं. ते नाभिक समाजातील आहेत. गावाने त्यांच्या सलूनवर बहिष्कार टाकल्याने त्यांचे पती बेकार झाले. त्यांचा दोन वर्षांचा मुलगा वारला तेंव्हा त्यांना व त्यांच्या पतीला स्वतः मुलाचे प्रेत पुरावे लागले कारण त्याच्या प्रेताला हात लावायलादेखील कोणी तयार झाले नाही. या प्रकरणी दाखल झालेल्या केसमध्ये माणगावच्या न्यायालयाने साळुंखे यांच्या बाजूने निकाल देऊन नऊ पंचांना प्रत्येकी तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. वाळीत प्रकारात शिक्षा झालेले हे पहिले प्रकरण आहे. माणगावच्या खामकर वकिलांनी ही केस मोफत लढवली. आपल्या 8 वर्षांच्या लहान मुलीला घेऊन हे कुटुंब परिषदेला आले होते. या चिमुरडीशी शाळेतली मुलं बोलत नाहीत,तिला खेळायला घेत नाहीत; का तर गावकी त्यांच्या आई वडिलांनाही दंड ठोकेल. साळुंखे कुटुंबाला गावच्या रेशन दुकानात धान्य दिले जात नाही. अशी मानसिकता असणा-या माणसाकडे शासनाने रेशन सारखी गरिबांच्या गरजेची यंत्रणा देऊच नये असे रजनी साळुंखे यांनी कळकळीने मांडलं.
मूळ म्हसळा या गावातील पण मुंबईत शिपयार्ड मधे मोठ्या हुद्द्यावर नोकरीस असणा-या हिराचंद भाऊंकडे त्यांच्या मुलाचं लग्न ठरल्यावर चक्क मुलीच्या जातीचं सर्टिफ़ीकेट मागितलं गेलं. लग्नात जेवढी म्हणून विघ्ने आणता येतील तेवढी आणण्याचा गावकीने प्रयत्न केला.
मुरूड,जि. रायगड येथील बौद्ध समाजातील पोलिस पाटील असणा-या चंद्रकांत तांबे यांना त्यांच्या समाजाने 2009 मधे वाळीत टाकल्याची लेखी नोटिसच चक्क दिली. समाज मंडळाशी झालेल्या सततच्या संघर्षाच्या परिणामी त्यांच्यावर खोट्या केसेस दाखल होऊन अखेर त्यांना नोकरीतून निलंबित करण्यात आलं आहे.
प्रसाद गायकवाड या तरुणाला आपली कहाणी मांडताना दुःख अनावर झालं. गावकीने वाळीत टाकलं म्हणून पालीच्या पोलिस स्टेशनला एफ़ आय आर दाखल करायला गेल्यावर पोलिसांनी टाळाटाळ करून खूप वेळ काढला. केस दाखल करून रात्री उशीरा घरी जात असताना त्यांच्यासोबत असलेल्या मामेभावाला गाडीखाली चिरडून ठार मारण्यात आले. पंच आणि पोलिसांचं साटंलोटं असल्याने पोलिसांनी ती केस अपघाती मृत्यू म्हणून नोंदवलेली आहे. या मुलाचे आई वडील दोघेही पोलिस खात्यात नोकरीला असूनही आजतागायत त्यांना न्याय मिळालेला नाही. आजही गावचे पुढारी म्हणून मिरवणारे हे पंच उजळ माथ्याने मोकाट फ़िरत आहेत.
परिषदेमधे हृदय पिळवटून टाकणारी सत्य कहाणी होती ती मोहिनी तळेकर यांची. मोहिनीताई यांच्या स्मृतीसाठी परिषदेच्या प्रवेशद्वाराला त्यांचे नाव देण्यात आलेले होते. मोहिनी ताईंचा 17 वर्षांच्या मुलगा राज याने गावकीच्या जाचाला कंटाळून आईने केलेल्या आत्महत्येबाबतचे निवेदन उपस्थितांना शरमेने मान खाली घालायला लावणारे ठरले. तळेकर बाई आपल्या नव-याच्या मृत्यृनंतर रोहा तालुक्यातील सासरच्या गावी हिंमतीने घर बांधून रहात होत्या. मुलांची परिक्षा जवळ आली होती म्हणून मोहिनी ताईंनी मोठ्या मुलाला राजला होळीच्या वेळी बोंब मारायला पाठवले नाही.गावची प्रथा मोड्ली म्हणून ग्रामस्थांनी त्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केली. याची तक्रार मोहिनीताईंनी पोलिसात दिली याचा गावकीला एवढा राग आला की त्यांनी हे कुटुंब वाळीत टाकले. त्यांच्याशी बोलणा-याला गावकीने 5000 रु. दंड बसवला. पुढे पंचायत समितीच्या निवडणुकीला त्या अपक्ष म्हणून उभ्या राहिल्या यावरून गावकीचे लोक खवळले ऱात्री अपरात्री त्यांना धमक्यांचे फ़ोन येऊ लागले.दोन्ही मुलांना ठार मारण्याच्या धमक्या दिल्या जाऊ लागल्या. गावकीने मिटींगमधे बोलावून त्यांना शिवीगाळ आणि मारहाण केली डांबून ठेवलं.या सगळ्याचा ताण असहय होऊन त्यांनी विष पिऊन आत्महत्या केली. आतातरी गावक-यांकडून आईवर केले जाणारे आरोप थांबवावेत, ज्यांच्या दबावामुळे ती जीव देण्यापर्यंत छळली गेली त्यांना शिक्षा व्हावी असं राजने कळवळून सांगितलं.
या सत्राचा समारोप करताना अंनिसच्या सुशिला मुंडे यांनी वाळीत टाकण्याच्या कारणांमधे असणारी विविधता आणि त्यातून रोजच्या दैनंदिन व्यवहारांतही ढवळाढवळ करण्याच्या गावकी, भावकी, जात पंचायतीच्या मुजोरपणावर प्रकाश टाकला. महाराष्ट्र अंनिस या सर्व पिडीतांना नैतिक, भावनिक आधार, कायदेविषयक सहाय्य आणि संघटनेचं बळ या तीनही पातळ्यांवर मदत करेल याची ग्वाही त्यांनी दिली.
शेवटच्या परिसंवादात राष्ट्र सेवा दलाचे प्रकाश कांबळे, रायगड जिल्ह्याचे पोलिस उप अधिक्षक राजा पवार, अंनिसच्या मुक्ता दाभोलकर आणि अविनाश पाटील सहभागी झाले. पवार साहेबांनी पोलिस तक्रार नोंदवून घेत नाहीत या पिडीतांनी केलेल्या वक्तव्यांवर उपरोधिक शब्दांत आश्चर्य व्यक्त केले. निर्भयपणे लोकांनी पोलिस स्टेशनला येउन तक्रार द्यावी असे आवाहन केले आणि तक्रार घेण्यास पोलिसांनी टाळाटाळ केल्यास रायगड कंट्रोल रुमला कळवण्यासाठी क्रमांक दिला.
मुक्ता दाभोलकर म्हणाल्या की ‘जात आणि वाळीत टाकणं हे प्रथा परंपरा, रुढी यांना अधोरेखित करतं तसेच सत्तेची गाव पातळीवरील छोटी छोटी केंद्र असतात त्या केंद्राला धक्का लागल्यावर वाळीत टाकण्यासारख्या घटनाबाह्य कृती केल्या जातात. गावगाड्यामधे एकत्र येणं शाबूत राहील परंतु तेथे अन्याय न करणारं वातावरण असेल अशी व्यवस्था गरजेची आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर सरदार पटेलांनी इथे असणारी राजे रजवाड्यांची संस्थानं खालसा करून या देशात राज्य घटना हीच सर्वोच्च असेल हे जनमानसावर बिंबवलं, त्याच प्रकारे जात पंचायतीची समांतर न्याय व्यवस्था रद्द होण्यासाठी आज कायद्याचा धाक आवश्यक आहे.व्यवस्था आपल्या मदतीला येऊ शकते हा विश्वास आज ढळलेला दिसतो.पोलिस आणि प्रशासन या विषयाकडे केवळ कायदा सुव्यवस्था राखणं एवढ्याच मर्यादित दृष्टीने पहाते. त्यामुळे शांततेचा आभास निर्माण होतो परंतु त्याखाली वंचितांचे आयुष्य कसे जळत आहे याकडे लक्ष वेधले जात नाही. म्हणून सामाजिक न्यायासाठीची ही लढाई आपल्याला सर्वांना मिळून लढावी लागणार आहे.’
परिषदेचा शेवट 6 ठरावांच्या वाचनाने झाला.
1.जातपंचायतींकडून आणि गावकीकडून दिले जाणारे अन्यायकारक निवाडे, आणि समाज घटकांना वेठीस धरून केलेल्या शोषणाचा निषेध
2.जात ही अंधश्रद्धा असून जातीच्या बळकटीकरणासाठी केलेले निवाडे, दंड,शिक्षा या गोष्टी संविधानातील मूलतत्वांशी विसंगत असल्याने अशा अनिष्ट बेकायदेशीर बाबी कोणत्याही समाजावर लादणा-या तथाकथित जातपंचायत समुहाला गुन्हेगार ठरविणे आवश्यक.
3.वाळीतांना पिडीतांना मानसिक आधार व प्रतिष्ठा देऊन कायदेशीर न्यायाचा प्रयत्न करणे
4.अन्याय्य जातपंचायतीला मूठ्माती देण्यासाठी आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणे, अंनिसच्या ‘जोडीदाराची विवेकी निवड’ या उपक्रमाचा प्रचार प्रसार करणे आणि सामाजिक न्यायाच्या प्रस्थापनेस् अनुकुल असे प्रबोधन करणे.
5. अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुयोग्य बदल करून त्याची कठोर अंमलबजावणी व्हावी, पिडीतांना न्याय मिळावा, बेकायदेशीर समांतर न्याय व्यवस्था चालवणा-याना कठोर शासन व्हावे यासाठी आग्रही असणे.
6. जात पंचायतीच्या समांतर न्याय आणि अन्यायाच्या विरोधात स्वतंत्रपणे प्रभावी व परिणामकारक कारवाई करणारा कायदा अस्तित्वात यावा अशा मागणीचा ठराव.
आचार-विचाराचे स्वातंत्र्य,समता,बंधुता,सर्व धर्म समभाव ही संविधानाने गौरविलेली मूल्ये सत्यात आणण्यासाठी आपण आपला लढा सुरूच ठेवूया हा संदेश परिषद संपताना प्रत्येकाने घेऊन जावा म्हणून सर्वांनी हातात हात गुंफून ‘हम होंगे कामयाब’ हे आशागीत म्हटले आणि या एल्गार परिषदेचा समारोप झाला. या परिषदेसाठी बार्टी, पुणे यांनी संपूर्ण सहकार्य केले होते.
– अश्विनी वैद्य, दापोली.