या आघाताने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते काही क्षण भांबावून गेले होते. परंतु लागलीच एकत्र येवून पुन्हा नेटाने आपले कार्य पुढे नेण्यास सरसावले आहेत. डॉ. दाभोलकरांच्या हत्यार्यांचा निषेध करीत, त्यांच्या कार्याची दखल देशी विदेशी सर्वच ठिकाणच्या विवेकवादींनी घेतलेली आहे. इंग्रजी माध्यमांमधल्या त्यांच्या प्रतिसादाचा सारांश इथे मराठीमधे देण्याचा प्रयत्न आहे. त्यामधे घटनेचे वर्णन वगळून त्यामागच्या सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणार्या अभिप्रायांचाच विचार केलेला आहे.
प्रथम मोजक्याच भारतीय व्यक्तींच्या वैयक्तिक अभिप्रायांचा विचार करू.
दुबईहून केशव शेट रेवणकर म्हणतात, ‘सकाळच्या मराठी चॅनलवरच्या डॉ. दाभोलकरांच्या हत्त्येच्या बातमीने मन विषण्ण झाले. भगव्या शक्तीच्या हातात सत्ता दिल्यानंतर आपण कशाची अपेक्षा करायची याचे ही हत्त्या द्योतक आहे हे मेधा पाटकर यांचे विधान महत्त्वाचे आहे. सर्व तरुणांनी हाच प्रश्न स्वतःला विचारला पाहिजे.
“वैज्ञानिक दृष्टिकोनास विरोध करणार्या शक्तींचा प्रतिकार करा” अशा मथळ्याखाली राम पुनियानी, गौहर रझा, दिनेश अब्रोल, अमिताभ पांडे, इर्फान हबिब, सुबोध महंती, टीव्ही वेंकटेश्वरन आणि सुरजीत सिंग म्हणतात, ‘कलाकार, बुद्धीजीवी आणि बुद्धीप्रामाण्यवादी या सर्वांवरचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. डॉ. दाभोलकरांची हत्त्या म्हणजे आपल्या घटनेच्या मूलतत्त्वांवर केलेला हल्ला आहे. 1958 च्या नेहरूंच्या वैज्ञानिक धोरणाला लोकसभेने सर्वसंमतीने मान्यता दिली. तेथून जादूटोण्याचे विधेयक मंजूर करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका खंद्या विवेकवादी समाजसुधारकाचा खून करण्यापर्यंत मूलतत्त्ववाद्यांची मजल गेली आहे. असहिष्णुता आणि विज्ञानविरोध वाढवून आपल्या समाजास फाशीवादाकडे लोटण्याचं हेतुपूर्वक कारस्थान रचले जात आहे.
परदेशातील व्यक्तिगत अभिप्रायांपैकी निवडक अभिप्राय असे आहेत.
जॉन हेघाट्टी यांचे ट्वीट : धर्माचा बुरखा पांघरणार्या गुंडांविरुद्ध दाभोलकरांनी सातत्याने संघर्ष केला. (म्हणून) त्यांची गोळ्या घालून हत्त्या करण्यात आली. परंतु यातून त्यांचा संघर्ष आणखीनच बळकट होईल.
फ्रीथॉटब्लॉग वर पी झेड मायर्स लिहितात: लोकांना आकर्षित करणारे व्यक्तिमत्त्व आणि आपल्या अंगिकृत कार्याशी दृढ बांधिलकी बाळगणारे दाभोलकर आपलं कार्य महाराष्ट्राच्या बाहेरही पसरविण्यास तयार नव्हते. त्या आधी त्यांना महाराष्ट्रातील प्रत्येक खेड्यामधे अंधश्रद्धा निर्मूलन समितीची शाखा कार्यरत करायची होती. या व्यतिरिक्त ट्विटरवर सॅम स्नायडर, जे एम् अॅब्रॅसर्ट (गार्डियन), राइमो काग्नॅस्निएमी (गार्डियन), अशा अनेक व्यक्तींनी या घृणास्पद कृत्याची निंदा करून अंनिसप्रती सहानुभूती व्यक्त केलेली आहे.
आंतरदेशीय माध्यमांनी या घटनेची विशेष दखल घेवून हत्या करणारांची निंदा केली आहे.
टाइम्स न्यूज नेटवर्कवर विवेक वाघमोडे आणि राधेश्याम जाधव लिहितात, ‘एस् एम् मुश्रीफ महाराष्ट्राचे भूतपूर्व आय् जी पी, यांनी या घटनेबाबत असे उद्गार काढले की हे (राइटविंग मेंबर्स-प्रतिगामी वृत्तीचे)लोक असे अनेक गुन्हे करीत आहेत. आणि शासकीय यंत्रणा त्यांच्यापुढे अगतिक ठरत आहे. त्यांच्या विरुद्ध कारवाई करण्याची शासनाला भीती वाटते. कारण सर्व शासकीय व्यवस्थांमध्ये आणि सत्तास्थानांमध्ये त्यांचा शिरकाव झालेला आहे.’
फर्स्ट पोस्ट: इंडिया या वृत्तपत्रांत अभय वैद्य लिहितात: हे (दाभोलकर) ख्यातनाम सामाजिक परिवर्तनवादी आपल्या भाषणामधे विनोदाची पखरण करीत. 1823 मधे लोकहितवादी , गोपाळ गणेश देशमुख यांनी सुरू केलेली आणि 1933 पर्यंत (प्रबोधनकार ठाकरे जिवंत असेपर्यंत) 150 वर्षेअखंडपणे चालू असलेली परिवर्तनाची चळवळ ज्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये होते त्या महाराष्ट्रातील राजकारणी इतके असंवेदनशील असावेत याचे त्यांना आश्चर्य वाटते.
विदेशी माध्यमांनीही या घटनेची दखल घेवून प्रतिगामी शक्तींच्या कारवायांचा निषेध केला आहे.
बीबीसी वरील हे वृत्त पहा, ‘गूढवाद आणि अध्यात्मिकता यांच्याबाबत पूज्यबुद्धी बाळगणार्या देशात डॉ दाभोलकरांच्या विरोधकांनी त्यांची धर्मद्वेषी म्हणून निंदा केली. परंतु दोन वर्षांपूर्वी फ्रान्स प्रेस न्यूज एजन्सीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट सांगितले होते की (जादूटोण्याबाबतच्या) संपूर्ण बिलामध्ये देव किंवा धर्म यांचा उल्लेखही नाही. ते केवळ शोषण करणार्या लबाडीच्या धंद्याबाबत आहे. भारतातील दैवी शक्तीचा आणि चमत्कार करण्याचा दावा करणार्या अनेक सुप्रसिद्ध बाबा-बुवांना दाभोलकर आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिलेले आहे.’
‘द डिप्लोमॅट’ या वृत्तपत्रामधे जोनॅथन डेहार्ट यांनी लिहिलं आहे, ‘लोकशाही चळवळींना दाबून टाकण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांवर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार करण्याची जबाबदारी टाकणार्या घटनेवर घातलेला घाला आहे असे ऑल इंडिया पीपल्स सायन्स नेटवर्कचे विवेक मॉन्टेरो म्हणतात. जोनॅाथन पुढे लिहितात, ‘ज्या देशात बाबा-बुवा मृतात्म्यांना बोलावू शकतात, दृष्टीपलिकडच्या गोष्टी पाहू शकतात, रोगनिवारणाची अद्भूत शक्ती बाळगतात, धगधगत्या आगीवरून चालतात, हवेत तरंगू शकतात, आणखी असंच बरंच काही करण्याचा दावा करतात त्यांना डॉ दाभोलकरांनी दिलेले आव्हान पचणे अशक्य होते. असले काही चमत्कार (कसोटीच्या सर्व अटी पाळून) करून दाखविणार्यास आणि चमत्कार अशक्य आहेत हा दावा खोटा ठरविणार्यास दाभोलकरांनी एकवीस लाखाचे बक्षीस जाहीर केले होते.’ त्यांच्या विरोधात हिंदू साधू-संत किंवा बाबा-बुवाच होते असे नव्हे तर उजव्या विचारांचे हिदू राजकारणी आणि काही काँग्रेस जनांचाही जादुटोणाविरोधी कायद्याला विरोध होता. वैज्ञानिक दृष्टीचा आपला संदेश शाळेतील मुलांपर्यंत पोचविण्याचा दाभोलकर आणि त्यांच्या सहकार्यांचा सतत प्रयत्न असे.
‘स्केपचिक’मधे रिबेका वॉट्सन म्हणतात:‘ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेन्द्र दाभोलकर यांच्या हत्त्येचं भयानक वृत्त भारतातून आलं. त्यानंतर सर्व विरोधाला न जुमानता महाराष्ट्र शासनाने दाभोलकरांचे जादुटोणा विरोधी विधेयक विधानसभेमधे मांडण्याचा निर्णय घेतला आहे. हे विधायक मंजूर झाल्यावर खालील गोष्टींवर कायद्याने बंदी येईल.‘ यापुढे त्यांनी त्या सर्व गोष्टींची यादी दिली आहे. (ती येथे देण्याचे प्रयोजन नाही) त्या पुढे लिहितात, भारतातील समर्थ बुद्धिप्रामाण्यवादी समाजाला या घटनेने जबरदस्त धक्का बसला आहे. त्यामुळे जादुटोणाविरोधी बिलाचे समर्थन करणार्यांचा पाठिंबा प्रचंड वाढला आहे. तरीही बुद्धिप्रामाण्यवादी हे परिवर्तनाचे कार्य दाभोलकरांच्या धडाडीने प्रकाशझोतात येऊन करण्यास थोडेसे कचरतील. वृत्तपत्राचे संपादक म्हणतात स्टीव्ह नोव्हेला यांनी मला यावेळी अजिता कमल या बुद्धिप्रामाण्यवादीच्या संशयास्पद परिस्थितीत 2011 साली झालेल्या मृत्यूची आठवण करून दिली. त्यांच्या मृत्यूबाबत काही जास्त माहिती मिळविण्यात आम्ही अपयशी ठरलो आहोत. कोणाला याबाबत काही माहिती असल्यास कृपया आमच्याशी संपर्क साधावा.
रिबेका वॉट्सन या, संशयवादी महिला कार्यकर्त्यांच्या टीमची- स्केप्टिक या संघटनेची आघाडीची कार्यकर्ती आहेत.‘स्केप्टिक गाईड टु युनिव्हर्स ब्रॉडकास्ट’ या दर आठवड्याच्या कार्यक्रमामधे त्या लोकांसमोर येतात. त्या जगभर विज्ञान, निरीश्वरवाद, फेमिनिझम, आणि संशयवाद यावर मनोरंजक व्याख्याने देतात. सध्या त्यांच्या नावाचा एक लघुग्रह सूर्याभोवती फिरत आहे. अजिता कमल हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. ह्या निरीश्वरवादी, मानववादी तरुणाने जैविक उत्क्रान्तीचा विशेष अभ्यास केलेला होता. त्याने निर्मुक्त या संस्थेची स्थापना केली होती. बोधप्रद लेखन, मुलाखती घेण्याचे कसब, संगीतकार आणि जैविक उक्रान्तीवादी शास्त्रज्ञ असे हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व होते. अमेरिकेत असताना व भारतात आल्यानंतरही त्यांनी फ्रीथॉट (मुक्त विचार) चळवळीमधे भरघोस काम केले. डॉ दाभोलकरांच्या हत्त्येच्या प्रसंगी त्यांची आठवण होणे क्रमप्राप्त आहे.)
‘द टेलिग्राफ’ या वृत्तपत्रामधे जयदीप हर्डीकर लिहितात, ‘महाराष्ट्राच्या समाजवादी, विवेकवादी फुले-शाहू-आंबेडकर परंपरेतील परिवर्तनवादी नेत्यांच्या मार्गाने वाटचाल करणार्या नव्या चेहर्यांपैकी दाभोलकर हा प्रमुख चेहरा होता. सनातनी धार्मिक संघटना आणि जातपंचायतीच्या घटनाबाह्य वर्चस्वाखाली असलेल्या संघटनांकडून दाभोलकरांना सतत धमक्या येत असत.
डॉन या वृत्तपत्रासाठी जावेद नक्वी दिल्लीहून लिहितात, ‘भारतीय शासनाच्या अंधश्रद्धा आणि प्रतिगामी विचारांच्या विक्रेत्यांना निगरगट्टपणे राजकीय आश्रय देण्याच्या धोरणावर जे सवाल उठवतात त्यांना कोणत्या धोक्यांचा सामना करावा लागतो ह्याचा नमुना म्हणजे ही एका विवेकवादी नेत्याची भ्याडपणे केलेली हत्त्या आहे. देशाच्या विकृत राष्ट्रवादाला खतपाणी घालणार्या प्रतिगामी वृत्ती एकत्र येवून त्यातून धार्मिक फाशीवाद उफाळतो. या प्रतिगामी वृत्तींना कुरवाळण्यातून ह्या हत्त्येला प्रोत्साहन मिळाले आहे. दाभोलकर आणि त्यांचे सहकारी, उजव्या मताच्या राजकारण्यांचे दोस्त असलेल्या आणि माध्यमांमधून प्रचंड प्रसिद्धी मिळविणार्या भोंदू बाबा-बुवा आणि श्रद्धाळू यांच्या फसवणुकीच्या आणि शोषणाच्या कारवायांना आव्हान देण्यास कधीच कचरले नाहीत. टीव्हीच्या माध्यमातून पोसलेली अंधश्रद्धा म्हणजे सामाजिक नियंत्रणाच्या आणि वाढत्या राजकीय व आर्थिक आणिबाणीवरचा उतारा समजण्यात येते.ते पुढे म्हणतात, ब्रिटिशांनी वसाहतवादाविरुद्ध उभारलेल्या लढ्यामध्ये या आंधळ्या धर्मश्रद्धांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. एकूणच दक्षिण आशियामधे निरक्षरता आणि सामाजिक/आर्थिक असुरक्षितता यांच्यामुळे वाढणार्या अंधश्रद्धेचे बरेच उपयोग या (पाश्चिमात्य) लाभार्थींना कळून चुकलेले आहेत. प्राचीन काळातील श्रद्धा आणि सामाजिक नीतिनियमांमधे अडकलेल्या भारतामधील आज राबविण्यात येत असलेले विकासाचे नमुने हे त्याचे प्रतीक आहे.
न्यूयॉर्क टाईम्समधल्या आलेल्या बातमीमध्ये एलन बॅरी लिहितात, ‘दाभोलकरांचे ध्येय गुरू, बाबा, ज्योतिषी, व इतर आध्यात्माची दुकाने थाटून बसणार्यांच्या या देशामधे, वैज्ञानिकांच्यात प्रकर्षाने दिसून येणारा संशयवाद भारतीय मानसामधे रुजवणं हे आहे. या सहस्त्रकातील ही ताजी घटना म्हणजे श्रुतिस्मृतीपुराणोक्त मताचे सनातनी आणि पुरोगामी सुधारक यांच्यातील संघर्ष आहे. तातडीने बिल पास करण्याने फारसे काही साध्य होईल असे नाही. कोपरनिकसपासून सुरू झालेली ही लढाई शतकानुशतके चालणार आहे याची जाणीव सर्व पुरोगामी कार्यकर्त्यांना आहे.
डॉन डॉट कॉम/न्यूज मधे सुमित्रा पद्मनाथन यांनी म्हटले आहे, ‘भारत अजूनही अंधश्रद्ध देश असल्याने या देशात बुद्धिप्रामाण्यवादींवर सर्वत्र हल्ले होत आहेत. धर्माच्या नावाने इथे संघर्ष होतो. कारण कट्टरपंथी मतांना इथे खूप वाव मिळतो. लाखो हजारो लोकांना दैनंदिन आयुष्यात सुखशांती मिळण्यासाठी गुरूंचे आध्यात्मिक मार्गदर्शन हवे असते. सय्यद वसीम हैदर म्हणतात, दाभोलकर शोषितांचे आणि गरिबांचे मित्र होते.
वॉशिंग्टन पोस्टच्या येथील वृत्तामधे म्हटले आहे, ‘अंधश्रद्धा आणि श्रद्धाळुपणाचा फायदा घेवून लोकांना लुबाडणार्या ढोंगी बाबा-बुवांच्या विरुद्ध लढणार्या दाभोलकरांचा खून करणार्या असहिष्णु वृत्तीचा भारतीय वैज्ञानिकांनी धिःकार केला आहे. प्रोफेसर यशपाल, भौतिक शास्त्रज्ञ आणि युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनचे अध्यक्ष म्हणाले, ‘दाभोलकरांची हत्त्या म्हणजे विवेक आणि विज्ञान यांच्यावरच हल्ला आहे. अंधश्रद्धा आणि धर्मांधता यांना खतपाणी घालून भारत स्वतःचे भवितव्य धोक्यात आणीत आहे. विकासाचा एक महत्त्वाचा हेतू वैज्ञानिक दृष्टिकोनाची प्रगती हा असायला हवा. यशपाल यांच्यासह अनेक भारतीय वैज्ञानिकांनी बुधवारी काढलेल्या पत्रकात दाभोलकरांवर झालेल्या हल्ल्याला धार्मिक मूलतत्त्ववादी आणि इहवादी वैज्ञानिक यांच्यातील सातत्याने घडत असलेल्या संघर्षाचं फलित म्हटलं आहे. असहिष्णुता आणि विज्ञानाला विरोध करण्याच्या वृत्ती देशाला ग्रासत आहेत. आपल्या समाजाला धर्मांधतेकडे लोटण्याचं हे मोठं कारस्थान आहे.
या शिवाय डीटीएन् म्यानमार, द इरावद्दी, ढाका येथील द हिमालयन, बेलफास्ट टेलिग्राफ, इंडिपेंडंट अशा अनेक विदेशी वृत्तवाहिन्यांनी या घटनेची दखल घेवून खंत व्यक्त केली आहे. गार्डियन या वृत्तपत्रामधे दिल्लीहून वसीह रहमान यांची प्रतिक्रिया वाचायला मिळेल. बहुतांश वृत्तांमधे घटनेचे वर्णन आणि खेद व्यक्त केलेला आहे.
भारताच्या कानाकोपर्यातून आणि जगभरातील सर्व विवेकवादींनी दिलेला हा प्रतिसाद पाहून आपल्या बरोबर चालणारे सांगाती इतके सारे आहेत याची खात्री पटते. यातून दाभोलकरांचा वारसा जोमाने पुढे चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन मिळते.
संकलन : सुमन ओक
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाची बातमी येताच फेसबुकवर विविध मजकूर लिहिलेले डॉक्टरांचे अनेक फोटो आणि खुनाच्या निषेधाच्या ‘पोस्टर’चा अक्षरशः वर्षाव झाला. यातून डॉक्टरांची तरुणाईतील लोकप्रियता लक्षात यावी.
‘अंनिस’चे कार्यकर्ते व डॉक्टरांच्या चाहत्यांनी फेसबुकवर प्रोफाईलवरील स्वतःचे फोटो काढून काळे फोटो लावले. सोबत खालील आवाहन केले.
‘जो पर्यंत दाभोलकर यांच्या मारेकर्यांना अटक होत नाही तो पर्यंत आम्ही अंनिसचे कार्याकर्ते प्रोफाईलवरील काळा फोटो काढणार नाही…. यातून खरच ते मारेकरी पकडले जातील की नाही माहित नाही पण आम्ही रस्त्यावर येउन त्यासाठी दगडफेक नाही करू शकत किंवा आमची सत्ता नाही त्यामुळे तपासासाठी जोर नाही लावू शकत. आम्ही आमचा संताप असा व्यक्त करीत आहोत, लोकशाही मार्गाने सहमत असाल तर सामील व्हावं…’
कार्यकर्त्यांच्या या कल्पकतेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे.
महेंद्र नाईक या कार्यकर्त्याने जोपर्यंत डॉक्टरांच्या खुन्यांना अटक होत नाही तोपर्यंत घरातून बाहेर पडताना काळी फीत लावण्याची कल्पना मांडली तिलाही चांगला प्रतिसाद मिळाला.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी यापूर्र्वी विविध ठिकाणी केलेल्या भाषणांचे, डॉक्टरांच्या अंत्यदर्शनाचे, कुटुंबीय, राजकीय, सामाजिक नेत्यांच्या प्रतिक्रिया, शोकसभा आणि सनातन्यांचा बुरखा फाडणारे वृत्तवाहिन्यांचे कार्यक्रमांचे व्हिडीओदेखील मोठ्या प्रमाणात अपलोड करण्यात आले. विशेषतः वृत्तवाहिन्यांसमोर हमीद आणि मुक्ताने ज्या संयतपणे, शांतपणे आणि ठामपणे आपली सहिष्णु भूमिका मांडून डॉक्टरांचे घराच्या आघाडीवरील यशदेखील दाखवून दिले त्यांचे व्हीडीओ शेअर करून कौतुक केले जात होते.
जादुटोणा विरोधी कायद्याच्या परिशिष्टातील कलमे आणि त्यासंदर्भातील गैरसमज आणि अफवांचे निराकरण करणारे पोस्टर्सही मोठ्या प्रमाणात होते.
महाराष्ट्रभर डॉक्टरांच्या खुनाच्या निषेधार्थ निधणारे मोर्चे, सनातन प्रभात अंकांची होळी यांचे वार्तांकन करणारे फोटो आणि वर्तमानपत्रातील बातम्यांची स्कॅन केलेली कात्रणे यांनी कार्यकर्ते आणि चाहत्यांची फेसबुक खाती भरून गेली.
विविध व्यंगचित्रातून शासनाच्या नाकर्तेपणावर आणि सनातन्यांच्या असहिष्णुतेवर नेमकी टिपणी करणारे पोस्टर्स फेसबुकवर फिरत होते.
उष:काल होता होता काळरात्र झाली
हे असे आहे तरी हे असे असणार नाही
सरफारोशी की तमन्ना अब हमारे दिल में है
अशा कविता देखील लाईक आणि शेअर होत होत्या.
-कृष्णात कोरे