नांदगावच्या जत्रेत दुपारी दोन वाजता मटणवडे खाऊन झाल्यावर 73 वर्षांचे आबा पवार मजा पहात फिरत होते. आणि तेवढ्यात तो प्रकार दिसला. विशी पंचवीशीतला तो तरूण अचानक खाली कोसळला. तो विचित्र ओरडला. त्याचवेळी त्याने हातपाय ताठ केले. त्याची मान वाकडी झाली. त्याने डोळे फिरवले. आजूबाजूची मंडळी दचकली, काही घाबरून जागीच उभी राहिली, काही दूर पळाली. सर्व घाबरून त्या तरूणाकडे पहात राहिली. पहाता पहाता त्याने हातपाय झाडत आचके द्यायला सुरवात केली. एखाद्याचा प्राण जातोय असे दृश्य कसे पहावणार? मग कुणी धावले. कुणी त्याला घट्ट पकडू लागले. कुणी त्याची दातखीळ उघडण्याच्या कामाला लागले. दातात सारायला लोखंड शोधू लागले. कुणी पाण्याचे सपकारे मारू लागले. कुणी त्याच्या नाकात हुंगण्यासाठी चप्पल घुसवली.
आबा चटकन सावरले. ताबडतोब त्यांनी गर्दीला बाजूस सारले. त्याला दाबून धरणार्या मंडळींना त्यांनी ‘इतकं घट्ट धरू नका, थोडं सैल सोडा, आचके खानार त्यो, पर एकदम घट पकडू नका’ असं सांगितलं. पाणी मारणं थांबवलं, चपला नाकापासून बाजूला केल्या. गालावर थपडा मारण्यापासून थांबवलं. त्याला कुशीवर वळवलं, तोंडाला येणारा फेस फेट्याच्या टोकानं पुसला. त्याचं दात, ओठ खाणं चालू असताना, त्याची जीभ दाताखाली सापडू नये म्हणून रूमालाची छोटी घडी दातामध्ये हळू सारली. कपडे थोडे सैल केले. मग आबा थांबले. त्याच्या कपाळावरून, केसावरून हळूवार हात फिरवीत राहिले. गर्दी फक्त पहात राहिली, आता अधिक आदराने.
हळूहळू झटके बंद झाले. त्याने दीर्घ श्वास घेतले, सोडले. मग डोळे हळूहळू उघडले. आबांनी त्याच्या डोळ्यावर येणार्या उन्हाला आडोसा करून थांबवलं. त्याचा गोंधळलेला चेहरा हळूहळू नीट झाला. डोळ्यात जीव आला. मग आबांनी त्याला चुचकारत हळूहळू बसतं केलं, पाणी पाजलं. 10 मिनिटांत तो बर्यापैकी सावध झाला, सावरला.
आबांनी त्याचं कुणी आहे का चौकशी केली. पण तो सोपान मोरे दूरच्या गावावरून एकटाच आला होता. सकाळधरनं काही खाल्लं नव्हतं. आबांनी त्याला पुसलं, ‘लेका तू असा पयल्यांदी पडला की, नेमी पडतो?
‘कवा तरी’, सोपान.
‘मग औशीद कायी घेतो का? आबा
‘न्हाई बा! ह्यो तरास भाईरचा हाय त्याले औशीद न्हाई, गोळ्या घेतल्या पर आकडी काई थांबत न्हाई’-सोपान.
‘आरं X X X X च्या X X ला. कुन्या गाडवानं ह्ये आसले भाईरचं सांगितलं लेका. ही मिरगी हाय, मेंदूचा करंट बिगडला की, असं होतंय. कायी खाल्लयस का?’ उनात उपाशी फिरलास तर आकडी येनारच की, गड्या तुला!’ आबा.
आबांनी सोपानला माझ्याकडे आणलं. आणि बजावलं, ‘डाक्टरसायेब ह्ये पन मशीन फिट करून द्या हे सात वरसं चाललंय. औशद केलं आन् सोडलं बी. अंगारं धुपारं केलं, करनी उतरवली, आता घराण्याचा शाप उतरवायला चालल्येत म्हाराज, नाशिकला! बक्कळ पाच हजाराला लुटनार बगा ते’ आबा.
‘आबा! तुमचा हा कोण?’ मी.
‘एक माणूस! माणुसकी पलिकडं कुठलं नातं नसतं बगा! माझ्यासमोर बादंदिशी पडलं म्हून बरं झालं. परवा पडलं काल घरच्यांशी बोललो. आज आनलं. घरच्यांना पटत न्हाई मग मीच खर्च करतो मनल्यावर पटलं. पैसा बोलतोय बगा! डॉक्टर आता तुमी काय औशीद द्याल तो खर्च माजा!’ आबा.
‘आबा! मी पण तुमच्याबरोबर आहेच! हा तुमचा कुणीही नाही तरी एवढं करताय! मग मी पण माझी फी सोडली. सँपल्सच्या असतील तेवढ्या गोळ्या देतो. वेळेवर आणत जा. लागतील ते तपास, गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये करून घेऊ. मग खर्च पण कमी येईल.’ मी.
ते तर आपलं ठरलंच हाय! मी कटकट आननार आन तुमी सोडवणार!” आबा खुशीत म्हणाले. ‘पन डॉक्टर हे मला कुणी माझ्या मातीच्या आकडीवेळी शिकवलं म्हणून सोपान आता वाचला, अगदी बरा व्हनार बग बाब्या तू!’ आबा सोपानला म्हणाले, ‘ह्यो मेंदूच्या वीजमंडळाचा कारभार बिगडलाय बग! सरकारच्या वीजेच्या कारभारासारकी गफलत हाय, तितं करंट जातो वीज बंद पडते. हितं करंट बिगडतो वोल्टेज वाढतंय आन तुमी कागदावर(ई.ई.जी.) दाकवता. तशा टोकाच्या मोठ्या उंच तारासारकं करंट येतंय. त्यो आला की फिट आलीच, त्यो थांबला की माणूस सरळ झाला एवढं शिकलो बगा मी तुमच्याकडनं.’ आबा खुशीत म्हणाले.
‘गावागावातबी भजनानंतर हे एवडं सांगतो बगा! पन एक इचार तुमी बी करा डाक्टर! मी आज हाय पण मी कवातरी वर जानार, तुमी बी कवातरी जायचेच. मग कसं व्हायचं? आपल्याला डाक्टर तर बनवता येनार न्हाईत. मानसं आळसात पडून र्हातील, टी.वी. बगतील पन शिकनार न्हाईत, पुस्तकं वाचनार न्हाईत. आता तुमीच एक केलं पायजे डाक्टर!’ आबा थोड्या निश्चयाने मला बजावू लागले.
‘काय करायला पाहिजे आबा?’ मी
‘डाक्टर! निदान छोट्या छोट्या गोष्टी शिकवल्या पायजेत अशा पेशंटची काळजी कशी घ्यायची, घरी कसं त्यांना सांबालता ईल, मला जसं सांगता तसं गावागावात माझ्यासारकी म्हाईतवाली मंडळी तयार करायला पायजेत तुमी आसं मला वाटतं बगा! पन हे तुमी जमवाच!’ आबा. ‘आबा! तुम्ही मोठ्ठं काम सांगताय मला. तुम्ही सांगताय ते योग्यचं आहे. कसं करू या? असे मेेंदू व मनाचे अनेक रोग आहेत ज्यात प्राथमिक मानसोपचार, घरच्या घरी देता यायला हवेत. रोग्यांची संख्या प्रचंड आणि डॉक्टर फार थोडे अशी परिस्थिती आहे आपल्या देशात! आणि ही परिस्थिती कितीतरी वर्षात बदलेलसं वाटत नाही. तुम्ही सांगताय तसं केलं तर काहीतरी चांगलं होऊ शकेल. कमी त्रासाचं, कमी खर्चाचं आणि जास्त उपयोगाचं आणि वेळच्या वेळी! आबा! तुम्ही रविवारी या. आपण बसू या काय, कसं करायचं ते ठरवू या!’ मी. आबानी खुशीत मान डोलावली. ‘मी बी मदत करीन जमेल तशी!’ सोपानही म्हणाला.
मानसमित्र गावागावात व्हायला हवेत ही संकल्पना गेली कित्येक वर्षेमनात घोळतेय. तालुक्यात मानसिक आधार केंद्र आणि गावात मानसमित्र. मन व मेंदूची माहिती समजावून देणं, विज्ञानाचा फायदा घेत अंधश्रद्धा पासून आर्थिक शोषणापासून रूग्ण व त्याच्या नातेवाईकांना वाचविणं, योग्य उपचार लवकरात लवकर, कमीत कमी खर्चात कुठे कसे करता येतील त्याचं मार्गदर्शन करणं, रूग्णांना सोबत देणं, आधार देणं, प्रथमोपचार करणं जमेल ती मदत जमेल तशी समाजात उभी करणं, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्रमात मानसिक उपचाराची व्यवस्था रूजवणं व त्यावर लक्ष ठेवणं, अशा कित्येक गोष्टी आबांना-मानसमित्रांना करता येतील. ना शिक्षणाची अट ना वयाची अट. फक्त जवळ हवी माणुसकी, मोठं मन आणि थोड्या कष्टाची तयारी.
‘आबा’ गावोगावी असतील तर कित्येक ‘सोपान’ वाचतील! सोपान बरे होतील, शिकू शकतील, कामे करून कमाईही करू शकतील. आयुष्याच्या वाटचालीत खोळंबून न रहाता पुढे जाऊ शकतील.
हे स्वप्न आहे, तुमची साथसोबत मात्र हवी!!
-डॉ. प्रदीप पाटकर
e-mail : patkar_pradeep@gmail.com