Categories
भानामती

 सिमकार्ड गायब करणारी भानामती

मार्च - २०१३

विदर्भाचा दौरा आटोपून नुकताच परतलो होतो. दौरा छान झाला. सर्व कार्यक्रमांना चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. त्याच आनंदात सकाळी सकाळी गरम गरम चहा पीत अरूणाला दौर्‍याची हकिकत रंगवून सांगत होतो. या वेळेस केलेल्या नवीन चमत्काराबद्दल तिला सांगत होतो. तेवढ्यात लँडलाईनच्या टेलिफोनची बेल वाजली. फोन बाहेरच्या खोलीत होता. मी आळसावलो होतो त्यामुळे खुर्चीवरून उठायचा कंटाळा केला. अरूणा पटकन उठली आणि फोन घ्यायला बाहेर गेली. लँडलाईनवर कोणी फोन केला असेल बरे? कारण हल्ली सगळे कार्यकर्ते, मित्र, नातेवाईक मोबाईलवरच संपर्क करतात. कोणीतरी जुना कार्यकर्ता असणार, असा विचार करीत होतो तेवढ्यात अरूणाची हाक आली. “शहाजी, फोन घे. तुझाच आहे.”

            कॉलर आयडीवर नंबर बघत फोन घेतला. कॉलर आयडीवरचा नंबर अनोळखीच होता. “हॅलो, मी प्राचार्य सय्यद मेहबूब बोलतोय.” मी म्हणालो “कुठून?” “फुलंब्रीहून बोलतोय” आणि माझी ट्युब एकदम पेटली. जवळ जवळ सात आठ वर्षांपूर्वी मी फुलंब्रीच्या बी.एड.कॉलेजात चमत्कारांचा कार्यक्रम केला होता. तो कार्यक्रम त्या वेळेस शिक्षक असलेल्या सय्यद सरांनी ठेवलेला मला आठवला. आपल्या स्मरणशक्तीवर खूष होत मी म्हटले “बोला सर.” “भोसले साहेब, एक तातडीचे काम आहे. भेटाल काय?” मी म्हणालो, “काय एवढे काम काढले आहे सर? कार्यक्रम करायचा की एखाद्या बुवाचा भांडाफोड करायचाय? हल्ली तेवढेच काम करतोय.” “तसेच काम आहे. आमच्या ओळखीच्यांकडे भानामती होती आहे. तिचा शोध घ्यायचा आहे,” सर म्हणाले. “शोध तर नक्कीच घेऊ. पण आमच्या काही अटी आहेत त्या मात्र मान्य करायला हव्यात, त्यांच्याकडे होत असलेल्या भानामतीचा शोध घेण्याबद्दल एक विनंती अर्ज अंनिसच्या नावे त्यांना करावयास सांगा आणि शोध चालू असलेल्या काळात आम्ही कोणत्याही बुवा, बाबा, मांत्रिकाकडे जाणार नाही व घरातील आम्ही सर्व भानामतीच्या शोधासाठी सर्व सहकार्य करू असे घरातील कुटुंब प्रमुखाचे लेखी पत्र द्यावयास सांगा.” “नक्कीच सांगतो, भोसले साहेब.” दुसर्‍या दिवशी सकाळी औरंगाबादला माझ्या घरी भेटायचे ठरवून मी फोन खाली ठेवला.

            दुसर्‍या दिवशी सकाळी मी आवरून तयारच होतो तेवढ्यात दारावरची बेल वाजली. अरूणाने दरवाजा उघडला. मी आतल्या खोलीतून पहात होतो. दारात दोन मध्यमवयीन साधारण शरीरयष्टीच्या व्यक्ती उभ्या होत्या. एक पँट-शर्टमध्ये तर एक पांढरा पायजमा-शर्टमध्ये. पँट-शर्टमधील व्यक्तीला मी पटकन ओळखले, ते सय्यद सर होते. गेल्या सात आठ वर्षांत त्यांच्यात फारसा फरक पडलेला नव्हता. पायजमा-शर्टमधील व्यक्तीच्या चेहर्‍यावरील तणाव स्पष्टपणे जाणवत होता, त्यांची कावरी बावरी नजर खोलीभर फिरत होती. अरूणाने दोघांना बसावयास सांगितले व पाणी आणावयास ती आत गेली आणि मी सर, नमस्कार! नमस्कार! म्हणत बाहेर आलो.

            “हे माझे मित्र सोपान चौधरी,” त्या पायजमा-शर्ट घातलेल्या व्यक्तीची ओळख करून देत सय्यद सर म्हणाले, “त्यांच्याच घरी गेल्या सहा महिन्यांपासून भानामती होत आहे. फारच त्रासून गेले आहेत ते. त्यांना तुमच्या सार्‍या अटी मान्य आहेत.” सोपान चौधरींनी “हो! हो!” म्हणत भानामती शोधण्यासंबंधीचा विनंती अर्ज आणि बुवा, बाबा, मांत्रिकांचे उपचार शोध काळात न घेण्यासंबंधीचे व घरातील सर्वांच्या सहकार्याची हमी देणारे लेखी पत्र माझ्या हातात दिले. मी काळजीपूर्वक पत्र वाचले व आश्वासक स्वरात सोपान चौधरींना म्हणालो, “ठीक आहे, सोपानभाऊ आता एकदम रिलॅक्स व्हा आणि गेल्या सहा महिन्यात जे जे काही घडले आहे ते ते काहीही लपवून न ठेवता मला सांगा. तुम्ही जर तपशिलाने व खरेपणाने सर्व घटना मला सांगितल्या तरच आपल्याला यातून मार्ग काढता येईल. तुमच्या सर्व गोष्टी फक्त माझ्यापाशीच राहतील या बाबत तुम्ही निश्चिंत रहा. तुम्ही सांगत असताना अधून मधून मी तुम्हाला मला वाटले तर प्रश्न विचारेन.” बोलता बोलता मी माझ्या खिशातील टेपरेकॉर्डर चालू केला. सोपान भाऊंनी पाण्याचा घोट घेतला आणि कहाणी सांगावयास सुरवात केली.

            सोपान चौधरी औरंगाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या फुलंब्री शाखेत शिपाई म्हणून काम करीत होते. बँकेतील नोकरी असल्यामुळे तशा आर्थिक विवंचना फारशा नव्हत्या. घरी पत्नी कमल(40 वर्षे), मुलगी सविता(4 वर्षे), मुलगा संजय(2 वर्षे), आणि भाची अनुसया(11 वर्षे) असं पाचजणांचे कुटुंब राहात होते. तसे कुटुंब खाऊन पिऊन सुखी होते. सोपानभाऊही कुणाच्या अध्यात मध्यात नव्हते. आपण बरे आपले काम बरे अशाच वृत्तीचे होते. असे सुखासमाधानात, खेळीमेळीत आयुष्य चालले असताना अचानक त्यांच्या घरातील आरसे, कंगवे अशासारख्या लहान वस्तू गायब होऊ लागल्या. मग पाच-दहा रूपयांच्या नोटा गायब होऊ लागल्या मात्र शंभर-पाचशेच्या नोटा मात्र तशाच असत. प्रथम लहान मुलांचे नंतर मोठ्या माणसांचे कपडे कुणीतरी कात्रीने कापू लागले. पण काही दिवसांतच हेच कपडे पेट घेऊ लागले तेव्हा मामला गंभीर बनला. एकदा तर स्वयंपाकघरातील डब्यातील धान्य, डाळी एका ताटात जमल्या होत्या. एका अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व व्यक्तींची नावे अंड्यांवर आणि सफरचंदांवर उमटली. सोपानभाऊंनी आपल्या मोबाईलच्या कॅमेर्‍यावरून या अंड्यांचे आणि सफरचंदांचे फोटो घेतले तर दुसर्‍याच दिवशी तो मोबाईलच गायब. संपूर्ण घर शोधूनही तो पुढील पंधरा दिवस सापडलाच नाही. पंधरा दिवसांनी तो सापडला पण त्यातील सीम कार्ड आणि मेमरी कार्ड दोन्हीही गायब झालेले होते.

            एके दिवशी घरातील भिंतीवर टांगलेले घड्याळ बंद पडल्याने सोपानभाऊंनी त्यात सेल टाकण्यासाठी ते घड्याळ खोलले तर त्या घड्याळात गायब झालेले सीम कार्ड आणि मेमरी कार्ड ठेवलेले आढळले.

            या सतत घडणार्‍या घटनांनी सोपानभाऊ चांगलेच त्रस्त झाले, घाबरले. शेजारी पाजारी, ऑफीसातच दबक्या आवाजात या घटना सांगू लागले. अशा होणार्‍या घटनांमुळे घरातील लहान मुलांवर, बायकोवर काही अनुचित प्रसंग गुदरणार तर नाही ना अशी त्यांना भीती वाटू लागली. बुवा, बाबा, मांत्रिकांकडे जाण्याचे सल्ले त्यांना मिळू लागले. सोपानभाऊ त्याला बळी पडले. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता येथील मौलानाकडे त्यांच्या फेर्‍या सुरू झाल्या. भानामतीचा असर होऊ नये म्हणून त्या मौलानाने तावीज, घरात शिंपडण्यासाठी मंतरलेले पाणी व एका कागदावर काही मंत्र लिहून त्याची पुडी बांधून दिली व घरात विशिष्ट ठिकाणी एका पिशवीत ठेवावयास सांगितले. पण तेथेही भानामती झाली आणि ती पिशवीच जळून खाक झाली.

            भानामतीची वार्ता हळूहळू परिसरात पसरू लागली होती. दररोज घडणार्‍या घटनांमुळे सोपानरावांचा मनस्ताप वाढू लागला होता. प्राचार्य सय्यदांचे बँक खाते सोपानरावांच्या बँकेत होते. बँकेत त्यांचे येणे जाणे नेहमीच असे. ते सोपानभाऊला ओळखतही. प्राचार्य सय्यद यांना गावाच्या सार्वजनिक जीवनात स्थान होते. त्यांनीच माझा चमत्कारांच्या भांडाफोडीचा कार्यक्रम फुलंब्रीला ठेवला होता. त्यांच्या कानावर या घटना गेल्याबरोबर त्यांनी सोपानभाऊंची भेट घेतली आणि त्याला समजाऊन त्यांनी माझ्याशी संपर्क साधला व त्याच्यासह माझी भेट घेतली.

            ही सगळी कहाणी ऐकल्यावर आम्ही एक प्लॅन बनवला व दुसर्‍या दिवशी मी मांत्रिक बनून मोटरसायकलवरून फुलंब्रीला गेलो. मी अंनिसचा कार्यकर्ता आहे हे सय्यद सर आणि सोपानभाऊ हे दोघे सोडले तर कोणालाच माहीत नव्हते. मी मांत्रिकाच्या वेषात घराची पहाणी केली. अर्धवट जळालेल्या, फाटलेल्या कपड्यांचा ढीग पाहिला. या सर्व घटनांचा विचार करताना यामागे घरातला कोणीतरी आहे हे जाणवतच होते मात्र आठ फुटावर असलेल्या घड्याळात सीम कार्ड आणि मेमरीकार्ड कसे काय कुणी ठेवले असेल? हा प्रश्न सारखा भेडसावत होता.

            अखेरीस भानामती काढण्यासाठी(शोधण्यासाठी) मी सर्वांना एकत्र बोलावले. पूजेच्या तांब्यावर नारळ ठेवला. सर्वांना उभे करून नारळावर हात धरण्यास सांगितले. घरातून पाणी मागवून ते पाणी त्यांच्या हातावर सोडले. हातातून पाणी हळूहळू नारळावर टपकू लागले व नारळाने पेट घेतला. तुमच्या घरातल्या भानामतीला मी या नारळात बंद केलेले आहे. जो कोणी पुन्हा असा प्रयत्न करेल त्याच्यावर हे पाणी पडल्यास ती व्यक्ती देखील पेट घेईल. असे मी खडसावून सांगितले व एकेकाला वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावले.

            माझ्या डोक्यात आठ फुटावरचे घड्याळ होते. त्यामुळे त्या घड्याळात सीम कार्ड ठेवू शकणारी व्यक्ती ही उंचच असणार व तीच भानामती करीत असणार, हे मी दोन व चार वर्षांची मुले, सोपानभाऊ यांना वगळत पक्के केले व त्या अनुषंगाने माझा सारा रोख सोपानभाऊंची बायको कमल हिच्यावरच होता. आता राहता राहिली अनुसुया ही सोपानभाऊंची अकरा वर्षांची भाची.

            सोपानभाऊंची धाकटी बहीण बुलढाणा जिल्ह्यातील एका छोट्याशा खेडेगावात होती. तिचा नवरा छोटा शेतकरी होता. चार मुलीतील ही सर्वात मोठी. शेतकर्‍याची स्थिती आधीच ओढगस्तीची त्यात कर्जबाजारीपणा. त्याला काही आयुष्य पेलवेना त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. अनुसुयेचे लहानपण करपून गेले. सोपानभाऊ तिला घेऊन फुलंब्रीला आले. अनुसुयाची कहाणी सोपानभाऊंनी सांगितलेली. मनात तिच्याबद्दल सहानुभूती. तिलाच मुलाखतीला बोलावले तर तिचा आपला एकच ठेका, मला काय माहित? प्रत्येक प्रश्नाला एकच उत्तर, मला कायचं माहीत? अखेरीस तिला एका कागदावर घरातील सर्वांची नावे लिहायला सांगितली आणि मी उडालोच. तिने नावे लिहिली कमल मामी, सोपानमामा  अनुसया, सविता, संजय. पण ही नावे लिहिताना तिने सोपानमामा हे नाव ‘सुोपानमामा’ असे लिहिले होते ते माझ्या डोक्यात पक्के बसले होते. मी त्या नाव उमटलेल्या अंड्यांचे पूर्वी काढलेले फोटो आधीच ब्लू टुथद्वारे माझ्या मोबाईलवर घेतले होते. मी ती लिखावट अनुसुयेच्या लिखावटीशी ताडून बघितली तर ती तंतोतंत जुळत होती.

            पण अनुसूया मानायला तयार होईना. खूप समजावले, धमकावले. अखेर पाणी असलेला तो ग्लास मी उचलला आणि तिला खडसावून सांगितले, हे बघ हे पाणी सर्वांसमक्ष मी तुझ्यावर टाकेन मग तू या पाण्याने पेटशील. ती घाबरली व कबूल झाली. मग मी तिला विश्वासात घेतले. मग ती घडाघडा बोलायला लागली. तिला फुलंब्रीला मामाकडे राहायचे नव्हते. मामी काम करून घ्यायची. तिला खूप कंटाळा यायचा. आईची, छोट्या बहिणींची, गावाची, गावातल्या मैत्रिणींची आठवण यायची. मग ती कधी कात्रीने तर कधी हाताने कपडे फाडायची, आगपेटीने कपडे पेटवायची, खुर्चीवर तीन डबे ठेवून त्यावर उभे राहून घड्याळात सीम कार्ड आणि मेमरी कार्ड ठेवल्याचे तिने सांगितले. अखेर वार्षिक परीक्षा झाल्यावर तुला गावी आईकडे पाठविण्याचा वादा मी केला. तेव्हा ती खुलली आणि पुन्हा असे प्रकार न करण्याचे तिने मान्य केले.

            अखेर एक उपचार म्हणून कमलाचीही मुलाखत घेतली व आता यापुढे असे प्रकार पुन्हा होणार नाहीत याची खात्री देत मी सय्यद सरांचा आणि सोपानभाऊंचा निरोप घेतला.

-शहाजी भोसले

            (शहाजीने भानामती शोधण्यासाठी व अनुसुयाचा कबुलीजबाब घेण्यासाठी वापरलेल्या तंत्राबद्दल वाचकांना काय वाटते हे जाणून घेण्यास आम्ही उत्सुक आहोत. कृपया आपल्या प्रतिक्रिया 15 मार्चपर्यंत पाठवाव्यात.-संपादक)