“पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी।
या, मनामनातून बांधू या एक वाट जाणारी….”
परिषदेचा आशय सांगणारी गाणी इस्लामपूर अंनिसचे कार्यकर्ते मोठ्या जोमाने म्हणत होते. संपूर्ण महाराष्ट्रातून तरूण-तरूणी व कार्यकर्तेलातूरला मुक्ताई मंगल कार्यालयात जमले होते. तरूणाईच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ‘जोडीदाराची विवेकी निवड राज्यव्यापी युवा संकल्प परिषदेची’ सुरवात दि. 2 फेबु्रवारी 2013 रोजी सकाळी 11 वाजता झाली. व्यासपीठावर परिषदेचे उद्घाटक ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा, अध्यक्षा प्रा.पुष्पा भावे, निमंत्रक प्राचार्य अनिरूद्ध जाधव, प्रमुख पाहुणे डॉ.विजय सुरासे, डॉ. मनोहरराव गोमारे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, अविनाश पाटील, माधव बावगे, दिलीप आरळीकर आणि अंनिसचे राज्यकार्यकारणीचे सदस्य मिलिंद देशमुख, सुशीला मुंडे, संजय बनसोडे, डॉ.हमीद दाभोलकर, प्रशांत पोतदार, वैजनाथ कोरे, बाबा हलकुडे इ. उपस्थित होते.
परिषदेचे प्रास्ताविक करताना लातूरच्या आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्राचे निमंत्रक दिलीप आरळीकर म्हणाले की, “आंतरजातीय विवाह लावण्यामध्ये लातूर केंद्राचा मोठा अनुभव आहे. या कामाचा मराठवाड्याला वारसा आहे. रेणापूरच्या भोसले गुरूजींनी आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्र 70 वर्षांपूर्वी सुरू केले होते. आर्य समाजाचाही या कामाला पाठींबा आहे. अंनिसने 2008 साली या विषयावरच लातूर येथे घेतलेल्या परिषदेनंतर या कार्यास वेग आला आहे. हे काम संपूर्ण महाराष्ट्रभर पोचले पाहिजे यासाठी या परिषदेचे आयोजन केले आहे.”

महाराष्ट्रभर येत्या दोन वर्षात आंतरजातीय विवाह मार्गदर्शन केंद्रे उभी करणार-अविनाश पाटील
आरळीकरांच्या प्रास्ताविकानंतर म.अं.नि.स.चे राज्य कार्याध्यक्ष मा.अविनाश पाटील यांनी या परिषदेमागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “लातूर आणि कोल्हापूर केंद्राच्या कामाचा आदर्श घेऊन महाराष्ट्रभर येत्या दोन वर्षात मार्गदर्शन केंद्रे उभी करणार आहोत. जोडीदारांची निवड करताना विवेक जागृत ठेवावयास हवा. जात ही अंधश्रद्धा आहे असे म.अं.नि.स.चे ठाम मत आहे. आंतरजातीय विवाहास सहाय्य केल्यामुळे जाती निर्मूलनास मदत होते म्हणून समितीने या विषयावर राज्यव्यापी परिषदेचे आयोजन केले आहे.” असे अविनाश पाटील शेवटी म्हणाले.
प्रत्येक आंतरजातीय विवाह हा जाती व्यवस्थेवरचा वज्राघात असतो. – खासदार डॉ.वाघमारे
यानंतर परिषदेचे स्वागताध्यक्ष खासदार डॉ.जनार्धन वाघमारे यांचे लिखीत भाषण अॅड.मनोहरराव गोमारे यांनी वाचून दाखविले. आपल्या भाषणात डॉ.जनार्धन वाघमारे म्हणतात की, “अंनिसने आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून जाती निर्मूलनाचे कार्य अतिशय जोमाने हाती घेतले आहे. खरे तर जात हीच एक प्रकारची अंधश्रद्धा आहे. जात ही स्वजातीच्या लोकांना जवळ करते आणि परजातीच्या लोकांना दूर लोटते. त्यामुळेच सामाजिक अभिसरण होत नाही. ती उच्चवर्णीयांना प्रगतीसाठी उपयोगी पडते अन् सामान्य लोकांच्या प्रगतीच्या आड येते.”
आपली विवाह पद्धती जातीवर आधारलेली आहे. जातीबाह्य विवाह आपण वर्ज्य मानलेले आहेत. विवाह जातीतच झाला पाहिजे. जातीला शाश्वत स्वरूप देण्याचे काम जातीतल्या विवाहाने केले आहे. ही गोष्ट अगदी उघड आहे. जात नामशेष करायची असेल तर आणि जातीव्यवस्था संपवायची असेल तर जातीबाह्य विवाह झाले पाहिजेत. प्रत्येक आंतरजातीय विवाह जाती व्यवस्थेवरचा वज्राघात असतो. आंतरजातीय विवाहांची संख्या वाढली पाहिजे. ती वाढवायची असेल तर आंतरजातीय विवाहांची चळवळ उभी केली पाहिजे.
त्या चळवळीला प्रबोधनाची जोड द्यायला पाहिजे. तिला व्यापक स्वरूप द्यावे लागेल, जाती-जातीच्या संघटनांनी जाती व्यवस्था मजबूत केली आहे. जातीसाठी माती खाण्याची प्रवृत्ती वाढत आहे. देशाच्या काही प्रांतामध्ये जात पंचायतीचे पुनरूज्जीवन होत आहे. आपल्या देशातील ग्रामरचना देखील जातीवर आधारलेली आहे. जातीतला जन्म हाच जातीव्यवस्थेचा पाया आहे. जातीबाह्य विवाह हाच जाती निर्मूलनावर उपाय आहे. जाती निर्मूलनाच्या कार्यात स्त्रिया अधिक प्रभावी ठरू शकतात, महिलांची मानसिकता क्रांतीप्रवण बनली, तर सामाजिक क्रांती अशक्य नाही.
आंतरजातीय विवाह त्यासाठी महत्वाचे आहेत. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या नेतृत्वाखाली माधव बावगे आणि इतर कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून एकशे एकवीस आंतरजातीय विवाह झालेले आहेत. ही फार मोठी उपलब्धी आहे. त्यांच्या प्रयत्नात खंड पडता कामा नये. असे शेवटी डॉ.वाघमारे म्हणाले.
स्वागताध्यक्षांच्या भाषणानंतर पाहुण्यांचा परिचय राज्य सचिव मिलिंद देशमुख यांनी करून दिला.
खर्चिक लग्नास उपस्थित राहू नये. – पन्नालाल सुराणा
ज्येष्ठ समाजवादी विचारवंत साथी पन्नालाल सुराणा आपल्या उद्घाटनपर भाषणात म्हणाले की, ‘एकीकडे जागतिकीकरणाच्या रेट्यात जात-धर्म बाजूला सारले जात आहेत तर दुसरीकडे आंतरजातीय विवाह करणार्या मुलीचा खून जन्मदाता पिता करतो आहे. अशा विवाहांना विरोध करताना जातीची अस्मिता समोर केली जाते. मात्र ही अस्मिता नव्हे तर अहंकार आहे. तो हद्दपार करावा लागेल. ते पुढे म्हणाले की, धर्म नष्ट होईल असे म्हणण्याचे धाडस मी करणार नाही. पण जात नष्ट होण्यास अडचण नाही. त्यासाठी आंतरजातीय विवाह होणे गरजेचे आहे. जाती निर्मूलनासाठी अशा परिषदा उपयुक्त ठरतील.
साथी पन्नालाल सुराणा यांनी दुसर्या एका महत्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचे लक्ष वेधले. तो मुद्दा म्हणजे आजकाल प्रचंड पैसा खर्च करून होणारी लग्ने. समाजातील श्रीमंत वर्ग लग्नावर करोडो रूपये खर्च करीत आहे. अशा लग्नाच्या विरोधात एक भूमिका घेणेची वेळ आता आली आहे. साधेपणाने विवाह करण्यात लोकांना कमीपणा वाटता कामा नये. खर्चिक लग्नाला परिवर्तनवादी चळवळींच्या नेत्यांनी ‘आम्ही उपस्थित राहणार नाही’ असे एखादे संयुक्त पत्रक काढावे असे वाटते. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहाला सहाय्य करण्याचे काम अंनिस पद्धतशीर व संघटीतपणे करत आहे. त्याबद्दल सुराणा यांनी अंनिसचे कौतुक केले.
ठाणे येथील हृदयशल्यचिकित्सक व परिषदेचे प्रमुख पाहुणे डॉ.विजय सुरासे म्हणाले की, “युवकांनी जातीचा नव्हे तर कर्तृत्वाचा गर्व बाळगावा, माझा आंतरजातीय विवाह झालेला आहे. इतर कोणत्याही गोष्टीची निवड करताना आपण आनंद शोधतो मग जोडीदाराची निवड करताना जात का शोधतो? आंतरजातीय विवाहितांची अपत्ये सदृढ जन्मतात. आज माझ्या मुलींना स्वत:ची जात माहीत नाही. अंनिसच्या या कार्यास युवकांनी पाठींबा द्यायला हवा!”

चहा-पोहे वर विवाहसंस्था उभी करण्यापेक्षा विवेकी निवड हा योग्य मार्ग आहे. – प्रा.पुष्पाताई भावे
परिषदेच्या उद्घाटिका प्रा.पुष्पाताई भावे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाल्या की, जात ही प्रत्येकाच्या मनात आहे पण आजच्या धावपळीच्या जगात ती दुसर्याला विचारायला फुरसत नाही. जात ही जात नाही तर ती एक उतरंड आहे. वर्षानुवर्षे आपण जातीच्या कुंपणात जगत आलो आहोत. ही कुंपणे आता तोडा. अनेकदा आंतरजातीय विवाहात मुलीवर उपकार केल्याची भावना व्यक्त होते. ती चुकीची आहे. आंतरजातीय विवाहांना पालकांचा विरोध वाढत चालल्याचे समोर येत आहे. आंतरजातीय लग्न करणार्या जोडप्यांना कुटुंब प्राप्त करून देणे, त्यांना आधार देणे हे कार्य समितीला पुढील वाटचालीत करावे लागेल. परिषदेबाहेर मोठा समाज आहे त्याला आंतरजातीय विवाह चळवळीचे महत्व पटवून द्यावे लागेल. त्यांच्यातील सर्वजण विरोधात असतील असे नाही, त्यांना धीर देत आपले विचार पेरण्याची गरज आहे. चहा-पोहे वर विवाहसंस्था उभी करण्यापेक्षा विवेकी निवड हा योग्य मार्ग आहे. ज्यात चर्चा, विचारांची आदान प्रदान अभिप्रेत आहे. आंतरजातीय विवाह हा निकोप समजाव्यवस्थेकडे जाणारा मार्ग आहे. असे मत प्रा.भावे यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषणानंतर परिषदेमध्ये दोन आंतरजातीय सत्यशोधकी विवाह संपन्न झाले. वधू-वर होते महेश कदम(मराठा) आणि सोनम साळुंखे(पारधी), यतीन अनघळ(ब्राम्हण) आणि पूजा कळसकर(लिंगायत) या सत्यशोधकी विवाहाचे पौरोहित्य माधव बावगे यांनी केले. या विवाहास महेश कदम यांचे वडील आणि भाऊही उपस्थित होते. ‘आमच्यात जातीवरून मतभेद, मनभेद होणार नाहीत. आम्ही समानतेने वागू’ अशी शपथ वधू-वरांना देण्यात आली. म.फुले यांनी रचलेल्या मंगलअष्टका म्हटल्या गेल्या. आंतरजातीय सत्यशोधकी विवाह कसा साजरा केला जातो याची उत्सुकता जमलेल्या तरूण-तरूणींना होती. त्यामुळे तरूणाई हा विवाह सोहळा आपल्या जवळील मोबाईल कॅमेर्यात चित्रीत करण्यासाठी धावपळ करीत होती. वधू-वरांच्या अंगावर पुष्पवृष्टी करून खर्या अर्थाने कृतीशीलपणे परिषदेचे उद्घाटन झाले.
उद्घाटन सत्रानंतर परिषदेच्या पहिल्या सत्राला सुरवात झाली. पहिल्या सत्राचा विषय होता, ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह : समस्या व उपाय’ या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित होते पुण्याच्या सुगावा प्रकाशनचे संपादक आणि आंतरजातीय विवाहास सहाय्य करणारे जेष्ठ विचारवंत प्रा.विलास वाघ आणि एस.एम.जोशी सोशलिस्ट फाऊंडेशन, पुणे चे कार्यवाह प्रा.सुभाष वारे. अध्यक्षस्थानी होते समाजवादी कार्यकर्ते संदीपान बडगीरे.
आंतरजातीय विवाह हे जात मोडायची पहिली पायरी. – प्रा.सुभाष वारे
यावेळी बोलताना प्रा.सुभाष वारे म्हणाले की, राष्ट्र सेवा दलात पूर्वी असे विवाह मोठ्या प्रमाणात होत होते. त्यामुळे आर.एस.एस.वादी मंडळी सेवा दलाला विवाह जुळणी मंडळ म्हणत. प्रेमामुळे होणारे आंतरजातीय विवाह हे जात मोडायची पहिली पायरी आहे. एका बाजूला असे विवाह सहजपणे होतात परंतु दुसर्या बाजूला खाप पंचायतसारख्या समाजाकडून कडाडून विरोध होत आहे. आपल्या मुलाने दुसर्या जातीची मुलगी केली तर चालते पण आपल्या मुलींनी दुसर्या जातीच्या मुलाबरोबर विवाह केलेस मान्य होत नाही. हा प्रश्न जातीचा नसून स्त्री-पुरूष समानतेचा आहे. तो बाईला कमी लेखण्याचा आहे. आंतरजातीय विवाह केला म्हणून पोटच्या मुलीस मारण्यास बाप तयार होतो तेव्हा त्याला समाजातील जातीच्या प्रतिष्ठेची भीती असते. पोटच्या मुलीपेक्षा त्याला लोक काय म्हणतील? हे महत्वाचे वाटते. त्यामुळे जातीला जी धर्माने मान्यता दिली आहे ती तपासली पाहिजे. प्रा.सुभाष वारे पुढे म्हणाले की, एकीकडे सुप्रिम कोर्ट लिव्ह इन रिलेशनशीपची चर्चा करतेय तर दुसर्या बाजूला पोलीस असा विवाह करणार्या मुलामुलींना गुन्हेगारासारखी वागणूक देत आहेत. खरेतर अशा विवाहाला प्रशासन आणि पोलिसांनी संपूर्ण सहकार्य केले पाहिजे किंबहुना ती त्यांची संवैधानिक जबाबदारी आहे. जातीअंताच्या दिशेने पडणार्या प्रत्येक पावलाचे आपण स्वागत केले पाहिजे असे प्रा.वारे शेवटी म्हणाले.

आपल्या देशात जातीचे स्थान सुप्रिम कोर्टाच्याही वरती आहे. – प्रा.विलास वाघ
यानंतर सुगावा प्रकाशनचे संपादक प्रा.विलास वाघ यांचे प्रेरणादायी भाषण झाले. आपल्या भाषणात ते म्हणाले की, कोणतीही जात दुसर्या कोणत्या जातीसारखी नाही. त्यांच्यात श्रेष्ठ-कनिष्ठत्व आहे. त्याचे बीज धर्मग्रंथात आहे. त्यामुळे धर्मग्रंथाची चिकित्सा करा असे बाबासाहेब आंबेडकर म्हणाले. त्यापुढे त्यांनी मनुस्मृती दहन हा कार्यक्रम घेतला. जातीअंत का करायचा? जात कोणाला टाकायची आहे? प्रत्येकास आपल्या जातीचा अभिमान का वाटतो? असे प्रश्न उपस्थित करून प्रा.वाघ पुढे म्हणाले की, आपल्या देशात जातीचे स्थान सुप्रिम कोर्टाच्याही वरती आहे. जात लोकशाहीवर मात करते. माणूस धर्म बदलू शकतो पण जात नाही. धर्मांतर केल्यावरही जात जात नाही. आंतरजातीय विवाह करताना पुरोगामी आचार विचार स्वीकारा. स्त्री-पुरूष भेदभाव नष्ट करा. स्त्री ही विवाहित आहे हे मंगळसूत्र-कुंकू पाहून कळते. मग पुरूषांचे काय? अशा बंधनातून स्त्री बाहेर पडली पाहिजे. यापुढे स्त्रियांनी मंगळसूत्र, कुंकू, बांगड्या याचा त्याग केला पाहिजे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी आपल्या सहकार्यांच्या स्वतंत्र व्यक्तीमत्वाचा आदर केला पाहिजे. असेही प्रा.वाघ यावेळी म्हणाले.
अध्यक्षीय समारोप करताना ज्येष्ठ कार्यकर्ते संदीपान बडगीरे म्हणाले की, प्रेम विवाहातून आज जरी आंतरजातीय विवाह होत असले तरी ही बाब स्वागतार्हच आहे. राजकीय क्षेत्रातील जातीच्या वापरास आपण विरोध केला पाहिजे. त्याचबरोबर सामाजिक विषमता दूर करण्यासाठी युवक-युवतींनी ठरवून आंतरजातीय विवाह केले पाहिजेत.
या सत्राचे स्वागत प्रकाश पोळ यांनी केले तर आभार रूक्साना मुल्ला यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.सुशिला पिंपळे व रामकुमार रायवाडीकर यांनी केले.
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहितांचे अनुभव कथन
त्यानंतर सुरू झाले सत्र दुसरे. याचा विषय होता, ‘आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहितांचे अनुभव कथन’ हे अनुभव कथन ऐकण्यास तरूणाई उत्सुक होती त्यामुळे दुपारच्या जेवणानंतरही सभागृह संपूर्णपणे भरले होते. या अनुभव कथनात भाग घेतला होता आसिफ इकबाल, सतीश चव्हाण, सुनील स्वामी, अॅड.मनिषा महाजन, राजन दांडेकर, कुणाल बडगीरे, शोभा स्वामी यांनी.
धनक या स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते आसिफ इकबाल(दिल्ली) यांनी सांगितले की, या संस्थेद्वारे दिल्ली, हरियाणा भागामध्ये आंतरधर्मीय विवाह केलेल्या जोडप्यांना मदत व मार्गदर्शन देण्याचे कार्य 2004 सालापासून सुरू आहे. या संस्थेद्वारे विशेषत: आंतरधर्मीय लग्नास मदत केली जाते. धर्म परिवर्तन न करता असे विवाह झाले पाहिजेत असा प्रयत्न केला जातो. अशा प्रकारचे कार्य महाराष्ट्रात अंनिस करते आहे. हे समजल्यामुळे मी या परिषदेस उपस्थित राहिलो. या कामाचे नेटवर्क राष्ट्रीय पातळीवर उभे करू या. यानंतर आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह केलेल्यांनी अनुभव कथन केले.
इचलकरंजीचे सुनील स्वामी म्हणाले की, “आमचा विवाह लिंगायत-मराठा असा 22 वर्षांपूर्वी झाला. माझ्या पालकांचा मला पाठींबा मिळाला पण बायकोचे नातेवाईक गेली 22 वर्षे झाले तरी आमच्या घरी येत नाहीत. म्हणजे जातीचा पगडा आजही किती घट्ट आहे ते पहा.” सतीश चव्हाण म्हणाले की, “मी घटस्फोटीत मराठा मुलीशी विवाह केला. तिला असणार्या मुलीचाही मी स्वीकार केला; परंतु माझ्या पत्नीचे आई-वडील त्या मुलीस घेऊन गेले, कारण काय तर ती लहान मुलगी मोठी झाल्यावर मी तिचा विवाह माझ्या वडार जातीतच करून देईन म्हणून.” यानंतर अॅड.मनिषा महाजन म्हणाल्या की, “आमच्या आंतरजातीय विवाहास माझ्या घरच्यांचा विरोध होता. परंतु माझ्या विवाहानंतर माझ्या अशिक्षित सासूने माझी जात विचारली नाही.” कुणाल बडगीरे हा युवक आपले अनुभव कथन करताना म्हणाला की, “माझ्या विवाहास माझ्या बायकोच्या घरातील मंडळींचा तीव्र विरोध होता रात्री-अपरात्री मला धमक्यांचे फोन यायचे. अंनिसचे माधव बावगे सर रात्री दोन वाजता सुद्धा माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला आले. यातच या कार्यात कार्यकर्तेकिती समर्पित भावनेने काम करतात हे सिद्ध होते.” यानंतर राजन दांडेकर म्हणाले की, “आमच्या विवाहास मुलीच्या घरच्यांचा विरोध होता. कारण मी एका वेगळ्या चळवळीत काम करत होतो. नोकरी करत नव्हतो. परंतु विवाहानंतर नोकरी करावी लागेल अशी अट माझी पत्नी क्रांती हिने घातली. आमच्या विवाहास प्रा.विलास वाघ सरांनी मदत केली. आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यांकडून पैसे उकळण्याचे काम शासकीय नोंदणी कार्यालयातील दलाल करतात. त्यांना आपण रोखावयास हवे.” यानंतर शोभा स्वामी म्हणाल्या की, “मी आंतरजातीय विवाह केल्यामुळे 22 वर्षे माहेरी जाऊ शकले नाही. पण सासरच्यांनीही मला माहेरची आठवण येऊ दिली नाही. त्यामुळे माझी निवड विवेकी होती याचा मला अभिमान आहे.” या सत्राचा अध्यक्षीय समारोप शिवाजी शिंदे यांनी केला.
‘आम्ही पुरोहित आंतरजातीय/आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहाचे.’
यानंतर सायंकाळी सहा वाजता परिषदेच्या तिसर्या सत्राची सुरवात झाली. आंतरजातीय लग्न लावणार्या कार्यकर्त्यांचे मनोगत या सदरात होते. सत्राचा विषय होता, ‘आम्ही पुरोहित आंतरजातीय/आंतरधर्मीय सत्यशोधकी विवाहाचे.’ या सत्रात कोल्हापूरच्या आंतरजातीय विवाह सहाय्य केंद्राच्या निमंत्रक प्रा.मेघा पानसरे, गिरीष फोंडे, लातूर केंद्राचे माधव बावगे सहभागी होते. वक्त्यांचा परिचय प्रा.शिवदास हमंद यांनी करून दिला. यावेळी बोलताना प्रा.मेघा पानसरे म्हणाल्या, “कोल्हापुरात 2006 सालापासून हे केंद्र सुरू आहे. एका हिंदू-मुस्लीम विवाहातून या केंद्राची निर्मिती झाली. माजी न्यायमूर्ती पी.बी.सावंत यांच्या हस्ते या केंद्राचे उद्घाटन झाले आहे.” प्रा.पानसरे पुढे म्हणाल्या की, “समाजातील काही तरूण-तरूणी आंतरजातीय विवाहासाठी पुढे येत आहेत. परंतु कुटुंबांकडून होणार्या संघर्षात त्यांच्या पाठीशी उभे राहणार्या कार्यकर्त्यांची गरज आहे.”
“मुलांच्या विवाहास विरोध करणार्या पालकांचे समुपदेशन ते पोलीस न्यायालय आणि लग्नानंतर काही काळ संरक्षण अशा सर्व पातळ्यांवर मदत करण्याची जबाबदारी आम्ही कोल्हापुरात उचलली आहे. अशा पद्धतीने राज्यभर काम सुरू होण्यासाठी संस्थात्मक फळी उभी करणे गरजेचे आहे” अशी अपेक्षा प्रा.पानसरे यांनी व्यक्त केली.
यानंतर गिरीश फोंडे यांनी आपले विचार व्यक्त केले. ते म्हणाले की, “काही वेळा पालकांच्या मनात जात नसते परंतु समाज काय म्हणेल ही मोठी भीती असते. या भीतीतूनच पालक अशा विवाहास विरोध करतात. त्यामुळे अशा विवाहांना समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. कोल्हापूर केंद्राच्या वतीने लावलेल्या काही संघर्षमय विवाहांची कहाणी गिरीश फोंडेंनी सांगितली.”
माधव बावगे यांनी लातूरात 123 विवाह लावताना आलेल्या अनुभवांचे गाठोडे उलगडून सांगितले, ते म्हणाले की, “आम्ही वेगळ्या पद्धतीचे पुरोहित आहोत. पारंपारिक लग्नातील पुरोहितास दक्षिणा, मानसन्मान मिळतो. परंतु आम्हास शिव्या ओव्या मिळतात. हे काम करताना धमक्या येतात. एकदा तर माझे घर जाळण्याचा प्रयत्न झाला होता. हे सर्व धोके अंगावर घेऊनही हे काम करण्यात आनंद वाटतो. कारण या कामामुळे जातीची बंधने तुटत आहेत. आमच्याकडे आलेल्या प्रत्येक जोडप्यांचा विवाह आम्ही लावतोच असे नाही. प्रथम त्यांची संपूर्ण माहिती घेतो. त्यांची वयाची कागदपत्रे तपासतो. त्यांचेकडून लेखी अॅफिडेव्हीट घेतो. आमची संपूर्ण खात्री झाल्यानंतरच त्यांचा विवाह लावतो. आत्तापर्यंत लातूर केंद्राच्या वतीने 123 विवाह संपन्न झाले. या प्रत्येक लग्नाची एक स्वतंत्र गोष्ट आहे. संघर्ष आहे, तडजोड आहे.” यातील काही संघर्षमय विवाहाची कहाणी बावगे सर सांगताना परिषदेस जमलेली तरूणाई आश्चर्यचकित झाली होती.
या सत्राचा अध्यक्षीय समारोप दै.लोकमतचे उपसंपादक धर्मराज हल्लाळे यांनी केला. ते म्हणाले की, “वरील 123 आकडा पार करणे सहज सोपे नव्हते. त्यामागे कार्यकर्त्यांचे कष्ट, कामाप्रती आदर दिसतो. त्यामुळे या चळवळीस प्रसारमाध्यमांनी संपूर्ण सहकार्य करणे गरजेचे आहे. त्याशिवाय धर्मनिरपेक्ष समाज निर्माण होणार नाही.”
रात्रीच्या भोजनानंतर अ.ंनि.स. इस्लामपूर शाखेने तयार केलेल्या ‘प्रेम’ या विषयावरील गाण्यांच्या मैफलीचा कार्यक्रम पार पडला. या रात्रीच्या मैफलीस सभागृह तुडुंब भरले होते. उत्कृष्ट संगीत, उत्कृष्ट गायन व बहारदार सूत्रसंचालनाने मैफल रंगत गेली.
आंतरजातीय/धर्मीय सत्यशोधकी विवाहितांचे अनुभव कथन
दुसर्या दिवशी रविवार दि.3 फेबु्रवारी 2013 रोजी सकाळी 9 वाजता परिषदेच्या चौथ्या सत्राची सुरवात झाली. ‘आंतरजातीय/धर्मीय सत्यशोधकी विवाहितांचे अनुभव कथन’ असा सत्राचा विषय होता. यामध्ये सहभागी झाले होते प्रा.अनुपमा परदेशी, विद्या हातोळकर, बबिता वाकडकर(पी.एस.आय.) विशाल व जास्मीन हल्लाळे आणि ज्ञानेश्वरी पाटील. या सत्राच्या सुनिता आरळीकर अध्यक्षा होत्या.
आपल्या अनुभव कथनामध्ये कुर्डुवाडीच्या प्रा.अनुपमा परदेशी म्हणाल्या की, “लातूर अं.नि.स.ने आंतरजातीय विवाह लावण्याची चळवळ माझा विवाह लावून सुरू केली होती. मी माझ्यापेक्षा कमी शिकलेल्या मुलाशी लग्न केले. आमच्या विवाहास चळवळीतील मित्रांनी साथ दिली. चळवळ अजूनही अशा विवाहांना मदत करण्यास कमी पडते आहे.” यानंतर विद्या हातोळकर म्हणाल्या की, “आम्ही दोघेही एम.एस.डब्ल्यू.आहोत. मी एका कट्टर पारंपारिक कुटुंबात वाढले होते. त्यामुळे आंतरजातीय विवाहास कुटुंबियांचा विरोध होता. लग्नानंतर दोघांपैकी एकाने पूर्णवेळ समाजकार्य करायचे असे आम्ही ठरविले होते. त्याप्रमाणे आम्ही एड्सग्रस्त मुलांसाठी ‘सेवासदन’ या संस्थेतर्फे काम करतो.” पी.एस.आय.असलेल्या बबिता वाकडकर म्हणाल्या की, “स्वत:च्या पायावर उभं राहिल्याशिवाय लग्न करायचं नाही असे ठरविले होते. श्रीमंत कुटुंबातील मुलाशी लग्न करायचे नाही असेही ठरविले होते. माधव बावगे सरांनी प्रा.सोमनाथ रेड्डीचे स्थळ सुचविले. दोन तास आम्ही एकमेकांशी चर्चा केली. घरच्यापेक्षा जास्त विश्वास बावगेसरांवर होता. त्या विश्वासामुळे लग्नास होकार दिला. माझी सासू अशिक्षित असूनही माझ्या नोकरीमुळे तडजोड करते.”
आंतरधर्मीय विवाह केलेला विशाल हल्लाळे म्हणाला की, “मी मुस्लीम मुलीशी लग्न केल्यामुळे परिस्थिती स्फोटक बनली होती. पण सर्व परिस्थिती बावगे सरांनी व्यवस्थितपणे हाताळली. आम्ही लग्न केलेनंतर तीन महिने घरी सांगितले नाही. माझे लग्न अडीच हजारात झाले पण बहिणीच्या लग्नास दोन लाख खर्च आला. माझी पत्नी जास्मिन हिच्या खंबीर साथीमुळेच संकटकाळातून आम्ही बाहेर पडलो.”
यानंतर पूनम पाचंगे, ज्ञानेश्वरी पाटील यांनी अनुभव कथन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना सुनिता आरळीकर म्हणाल्या की, “आमचा विवाह दलित-ब्राम्हण असा आहे. आजही आम्हास असा विवाह केला म्हणून चटके बसत आहेत. आमची घरमालकीण माझ्या घरी चहा पीत नाही. आजही आमच्या अपत्यावर अविश्वास दाखवला जातो. आपल्या खाजगी आयुष्यात समाजाला किती महत्व द्यायचे हे ठरविले पाहिजे. समाजाकडून अपेक्षा करू नका, कारण अपेक्षाभंगाचे दु:ख मोठं असते. आंतरजातीय विवाह करणार्या जोडप्यासाठी माझं घर नेहमी उघडं असतं” असे शेवटी आरळीकर म्हणाल्या.
गांधी प्रतिज्ञा
म.गांधींनी आयुष्याच्या अखेरच्या पर्वात अशी भूमिका घेतली की ते फक्त आंतरजातीय विवाहालाच उपस्थित राहतील. पण जोडप्यांपैकी एकजण दलित असणे आवश्यक आहे. या गांधी प्रतिज्ञेची आठवण पन्नालाल सुराणा यांनी करून दिली.
गटचर्चा रिपोर्टिंग
अनुभव कथनाच्या सत्रानंतर विविध विषयावर गटचर्चांचे आयोजन केले होते. या गटचर्चांचे विषय होते, 1)प्रेम आणि आकर्षण यातील फरक समजून घेणे, 2)जोडीदाराची शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक व आर्थिक समज 3)साधी लग्नं-हुंड्याशिवाय लग्नं, 4)ज्योतिषाशिवाय विवाह, 5)व्यसनी मुलाच्या नकाराचा निर्धार, 6)आंतरजातीय/आंतरधर्मीय लग्न, 7)सत्यशोधकी नोंदणी विवाह
या सर्व गटचर्चामध्ये तरूण-तरूणी मोठ्या उत्साहाने सहभागी होऊन आपापली मते व्यक्त करीत होते. गटचर्चेनंतर त्याचे रिपोर्टिंग झाले. ‘आंतरजातीय लग्न’ या विषयाच्या गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना अॅड.मनिषा महाजन म्हणाल्या की, “आज खेड्यामध्ये अशा विवाहाची चर्चा जास्त होते. उच्च जातीचे लोक असा विवाह स्वीकारत नाहीत परंतु दलित जातीमध्ये असे विवाह स्वीकारले जातात.” ‘व्यसनी मुलाच्या नकाराचा निर्धार’ या विषयावरील गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना डॉ.हमीद दाभोलकर म्हणाले की, “कुटुंबियांना मुलगा व्यसनी आहे हे माहिती असूनही केवळ संपत्तीकडे बघून काही विवाह लावले जातात. मुलींना नकाराचे स्वातंत्र्य दिले पाहिजे. मुलींना व्यसनी नवर्यास नकार देण्याचे बळ मिळावं यासाठी चळवळीने प्रयत्न केले पाहिजेत.”
प्राचार्या सविता शेटे यांनी ‘साधी लग्नं-हुंड्याशिवाय लग्नं’ या गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना सांगितले की, “हुंडा दिल्यावरही मुलीला त्रास होतोच. कायद्याची जबाबदारी असणारी माणसे हुंडा घेऊन लग्नं करतात. अशा लोकांनी साधी लग्नं केली पाहिजेत.” या गटचर्चेत सहभागी झालेल्या मारवाडी समाजातील एका मुलीने मी हुंडा घेऊन लग्न करणार नाही अशी शपथ घेतली. ‘प्रेम आणि आकर्षण’ या विषयाच्या गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना सुशिला मुंडे म्हणाल्या की, “भिन्नलिंगी आकर्षण हे नैसर्गिक आहे. प्रेम आहे का हे ओळखण्यासाठी कालावधी जावा लागतो. आकर्षण-प्रेम-विवाह असे काही टप्पे असतात. स्वातंत्र्य-सन्मान व सुरक्षा देऊ शकणार्या जोडीदाराची निवड करावी.”
‘ज्योतिषाशिवाय लग्न’ या विषयावरील गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना स्वाती कोरे म्हणाल्या की, “आजकाल मुलां-मुलींना ज्योतिषातील फोलपणा समजू लागला आहे. परंतु याबाबत पालक आग्रही असतात. 36 गुण जुळूनही काही विवाह अयशस्वी होतात.” ‘जोडीदाराची शारीरिक, बौद्धिक, भावनिक, मानसिक व आर्थिक याबाबतची समज’ या विषयावरील गटचर्चेचे रिपोर्टिंग करताना चिद्रावार म्हणाले की, प्रेम विवाहात मुलास लग्नाअगोदर शरीरसंबंध हवा असतो. त्यामुळे मुलींनी काळजी घेतली पाहिजे. विवाहात आर्थिक मुद्दा महत्वाचा आहे पण तो एकमेव नाही.
गटचर्चेच्या रिपोर्टिंग नंतर परिषदेच्या समारोपाचे सत्र सुरू झाले. समारोपाच्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून तरूण सिनेअभिनेते नंदू माधव, ज्येष्ठ विचारवंत कॉ.गोविंद पानसरे एन.एस.एस.चे प्रमुख प्रा.डी.डी.पवार, प्रा.पुष्पा भावे इ.जण उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय प्रशांत पोतदार यांनी करून दिला.
खासदार सिताराम येचुरी यांची सदिच्छा भेट
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे पॉलिट ब्यूरो सदस्य खासदार सिताराम येचुरी यांनी परिषदेस सदिच्छा भेट दिली. यावेळी तरूणाई समोर बोलताना येचुरी म्हणाले की, “माझाही आंतरजातीय विवाह झाला आहे. धर्माने स्वार्थासाठी निर्माण केलेली जातीची बंधने आजच्या युवक युवतींनी नाकारली पाहिजेत. अंनिसने या विषयावर आज घेतलेल्या परिषदेचे नक्कीच कौतुक केले पाहिजे. माझा पक्ष आपल्या चळवळीस नेहमीच सहकार्य करेल. आपण चालविलेल्या या परिवर्तनवादी चळवळीस माझ्या सदिच्छा!”
आंतरजातीय विवाहामुळे प्रभावी धर्मचिकित्सा होते. – डॉ.नरेंद्र दाभोलकर
यावेळी परिषदेचा जाहीरनामा व संकल्पपत्राची मांडणी करताना डॉ.नरेंद्र दाभोलकर म्हणाले की, “प्रेमात पडणे हा युवा पिढीचा हक्क आहे. त्याचवेळी स्वत:ला सांभाळणे हा शहाणपणा आहे. या दोन्ही गोष्टींची सूत्रे जीवनामध्ये स्वत:कडे ठेवणे म्हणजे विवेक होय. आपण जेव्हा विवेकी निर्णय घेतो त्यावेळी स्वत:च्या जीवनाची सूत्रे स्वत:च्या हातात घेतो. या परिषदेने तयार केलेला जाहीरनामा हा तरूण-तरूणींना कमीकमी सोसावं लागावं आणि त्यांचं जास्तीत जास्त कौतुक व्हावं असा आहे. डॉ.दाभोलकर बोलताना पुढे म्हणाले की, आंतरजातीय विवाहात व्यक्ती स्वातंत्र्याची कदर होते तसेच प्रभावी धर्मचिकित्सा होऊन जातविरहित समाजव्यवस्थेची निर्मिती होण्यास मदत होते.”
यानंतर डॉ.नरेंद्र दाभोलकरांनी परिषदेच्या जाहीरनाम्याचे(मागणीपत्राचे) वाचन केले. व्यासपीठावरील मान्यवरांनी जाहीरनाम्यावर सह्या करून त्याचे जाहीर प्रकाशन केले.(जाहिरनामा पुढे चौकटीत देत आहे.) यानंतर उपस्थित तरूण-तरूणीस डॉ.दाभोलकरांनी संकल्प दिला. तरूण-तरूणींनी हा संकल्प उत्स्फूर्तपणे व मोठ्या संख्येने स्वीकारला. ‘आम्ही जोडीदाराची निवड करताना विवेकाने निर्णय घेऊ, व्यसनी मुलाशी लग्न करणार नाही, विवाह साधेपणाने कर्ज न काढता करू, जोडीदाराची निवड करताना जाती-धर्माचा विचार करणार नाही.’ अशा स्वरूपाचा संकल्प तरूणाईने स्वीकारला. तरूणाईच्या या संकल्पास सर्वांनी टाळ्यांच्या गजरात पाठींबा व्यक्त केला. (संकल्प पत्र चौकटीत देत आहे.)
लातूर शाखेचे उत्कृष्ट संयोजन
दोन दिवशीय परिषदेचे उत्कृष्ट संयोजन लातूर जिल्हा शाखेने केले होते. शाखेचे कार्यकर्तेयासाठी परिश्रम घेताना दिसत होते. निवास, भोजन, बैठक, व्यासपीठ व्यवस्था उत्कृष्ट होती. याबद्दल उपस्थितांनी लातूर शाखेच्या सर्व कार्यकर्त्यांचा सत्कार करून कौतुक केले.
आडनाव न लिहिण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी. – सिनेअभिनेते नंदू माधव
यानंतर प्रमुख पाहुणे तरूण सिने-नाट्य कलावंत नंदू माधव यांचे भाषण झाले. यावेळी ते म्हणाले की, सिनेमा क्षेत्रातील रंगीत पार्ट्यांना जाण्यापेक्षा चळवळीतील कार्यक्रमांना जाण्यात मला जास्त आनंद वाटतो. आज समाजात जात ठासून भरली आहे. ही जात व्यवस्था आपणास मोडावी लागेल त्याआधी जातीची ओळख सांगणारी आपली ‘आडनावे’ कागदपत्रावरून हटवावी लागतील. आडनाव न लिहिण्याची मोहीम पुन्हा सुरू करावी लागेल. आंतरजातीय विवाहानंतर दोघांनीही आयुष्यात स्त्री-पुरूष समानता, वैज्ञानिक दृष्टिकोन तसेच सार्वजनिक चारित्र्य जपले पाहिजे. आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांनी आपल्या कागदपत्रावर ‘मानवता’ हा धर्म नोंदवावा असे आवाहन नंदू माधव यांनी शेवटी केले.

शाहू महाराजांचे नाव घेऊन आंतरजातीय विवाहाची चळवळ चालवावी.- कॉ.गोविंद पानसरे
ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत कॉ.गोविंद पानसरे आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की, गौतम बुद्धांच्या काळापासून जातीव्यवस्थेला विरोध होऊनही जात नाहीशी झाली नाही. हे वास्तव आपण मान्य करायला पाहिजे. त्यामुळे हा जातीचा रोग कसा निर्माण झाला त्यावर चर्चा करून त्यावर घाव घातला पाहिजे. जाती पाळा हा कायदा नाही. हा कायदा कुठल्याही विधानसभेने/लोकसभेने केला नाही. लोकसभेने तयार केलेले कायदे मोडले जातात पण धर्माने तयार केलेला हा कायदा मोडत नाही. कारण जाती पाळा या कायद्यास ‘देवाची मान्यता’ आहे असे पुरोहित सांगतात. पुरोहित म्हणतात की, देवाने जाती निर्माण केल्या. या मुद्द्याचा आपण प्रतिकार केला पाहिजे. धर्म निर्माण होण्याआधी माणूस होता. त्यामुळे जाती देवानी नाही तर माणसाने निर्माण केल्या असे सांगून पानसरे पुढे म्हणाले की, देव धर्माशी आपणास संघर्ष हुशारीने करावा लागेल. त्यासाठी म.फुलेंचे अनुयायी विचारे गुरूजींनी सांगितलेली रणनीती वापरावी लागेल.
जातीव्यवस्थेविरूद्ध छोट्या छोट्या लढाई करून त्यावर आपण ओरखडे उठवू शकतो परंतु ती नष्ट करू शकत नाही. समाजातील जाती नष्ट करायच्या असतील तर देव आणि धर्माबरोबर संघर्ष करावाच लागेल.
आंतरजातीय विवाहातून निर्माण झालेल्या ‘अनौरस’ संततीस शाहू महाराजांनी कायदा करून कायदेशीर हक्क दिले. आणि आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला. त्यामुळे राजर्षी शाहू महाराजांचे नाव घेऊन आंतरजातीय विवाहाची चळवळ चालवावी असा सल्ला कॉ.पानसरे यांनी शेवटी दिला.
जाती-धर्माची अनिष्ट बंधने झुगारण्यास आम्ही नक्कीच यशस्वी होऊ हा निर्धार घेऊन परिषदेची सांगता ‘हम होंगे कामयाब’ या गीताने झाली.
-राहुल थोरात
जोडीदाराची विवेकी निवड संकल्पपत्र
पार्श्वभूमी :- जोडीदाराची निवड ही जीवनातील अतिशय महत्त्वाची बाब आहे. म्हणूनच त्याबाबतचा निर्णय स्वत:च्या विवेकाने घ्यावयास हवा. आज हुंडा, भपकेबाज विवाह, कुंडली, जात अशा अनेक अनावश्यक बाबींचा प्रभाव विवाह ठरवताना जाणवतो. दुसर्या बाजूला प्रेम आणि आकर्षण यातील फरक ओळखणे, उभयतांच्या शारीरिक तपासणीचा आग्रह, व्यसन करणार्या साथीदाराला नकार याबाबत फारच अपुरी समज असते. हे सर्व लक्षात घेऊन जोडीदाराच्या विवेकी निवडीचा संकल्प करावयास हवा.
संकल्प पत्र :- स्वत:च्या सद्सद्विवेकबुद्धीस स्मरून आम्ही खालील संकल्प करतो की, आमची जोडीदाराची निवड करताना आम्ही हा निर्णय क्षणिक, शारीरिक, भावनिक आकर्षणाच्या आधारे करणार नाही. जीवनाचा साथीदार निवडीसाठी त्याची शारीरिक, बौद्धिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक समज व क्षमता याचा गांभीर्यपूर्वक विचार करू. विवाह शक्य तेवढ्या साधेपणाने करू आणि उभय बाजूंनी विवाहासाठी कोणतेही कर्ज काढले जाऊ नये याचा आग्रह धरू. हुंडा, लग्नपत्रिका पहाणे या बाबी विवाहाबाबत अमान्य करण्याचा संकल्प मी करत आहे. संभाव्य जोडीदार कमी जास्त प्रमाणातही व्यसनी असल्यास व विवाहासाठी अन्य सर्व अनुकूल बाबी असल्यासही मी त्याला निर्धारपूर्वक नकार देईन. माणसात फक्त स्त्री व पुरूष या दोनच जाती असतात आणि मानवता हाच धर्म असतो असे मी मानतो/मानते. माझ्या विवाहाचा निर्णय घेताना याबाबीचे मी सजग व प्रसंगी कृतीशील भान राखेन असा संकल्प मी करत आहे.
नाव : पत्ता : फोन :
आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाहासाठीचे मागणीपत्र
(परिषदेचा जाहीरनामा)
गेली अनेक वर्षेवरील क्षेत्रात सातत्याने भरीव काम केल्यानंतर त्यामधून लक्षात आलेल्या आंतरजातीय/आंतरधर्मिय विवाह यशस्वी होण्यासाठी पुढील मागणीपत्र आम्ही शासनापुढे तसेच जनतेपुढे ठेवत आहोत.
1. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह हे कोणत्याही कारणाने होत असले तरी त्यामुळे जातीविरहित समाज, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता बळकट होत हे लक्षात घेऊन समाजाने असा विवाह केलेल्या जोडप्यांना आदर, सन्मान आणि शक्य ती मदत द्यावी.
2. अशा विवाहांना सध्या रूपये 50 हजार दिले जातात. ती रक्कम रूपये 1 लाख करावी, यामुळे विवाहितांच्या संसाराला किमान आधार लाभू शकेल.
3. सध्या आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह यापैकी फक्त आंतरजातीय विवाहांनाच मदत मिळते. आंतरधर्मिय विवाहांनाही अशीच मदत मिळणे अत्यंत आवश्यक आहे.
4. असे विवाह लावल्यानंतर पती-पत्नी यापैकी एकाच्या गावी प्रत्यक्ष जाऊन तेथील ग्रामपंचायत वा नगरपालिका येथे विवाह नोंदणी करावी लागते. विवाहानंतर परिस्थिती अनेकदा अत्यंत स्फोटक असते. यामुळे याबाबत बर्याच अडचणी येतात. तरी जिल्हा विवाह उपनिबंधकाकडे जी नोंद होते ती त्याच्यामार्फत संबंधित ग्रामपंचायत वा नगरपालिका यांना पाठवून देण्यात यावी.
5. अशा लग्नांना उभयंतांच्या नातेवाईकांच्याकडून प्रचंड दबाव येतो अशा वेळी त्यांना फक्त पोलीस यंत्रणाच खर्या अर्थाने संरक्षण देऊ शकते. याबाबत पोलीस व प्रसंगी त्यांचे अधिकारी यांना गांभीर्य कमी असल्याने ‘ते लग्न केलेल्या मुलां-मुलींऐवजी पालकांची बाजू घेतात. त्यामुळे आणखी अवघड परिस्थिती तयार होते. प्रत्येक जिल्ह्यात उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाचा एक अधिकारी यांना या विवाहांना न्याय देण्यासाठी विशेष जबाबदारी दिलेली असावी. त्यांना फोन केल्यास त्यांनी संबंधित पोलीस स्टेशनला योग्य ती सूचना देऊन विवाहित जोडप्यांना त्वरीत व योग्य संरक्षण मिळेल हे पहाणे त्याची जबाबदारी मानावी.
6. स्पेशल मॅरेज अॅक्टनुसार विवाहाची नोटीस एक महिना आधी द्यावी लागते हा कालावधी एक आठवडा करण्यात यावा.
7. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह होण्यापूर्वी व विवाहानंतर धमकी, मारहाण सर्वप्रकारचे दबाव आणून असे विवाह मोडून काढण्याचे प्रयत्न केले जातात. याचा प्रतिबंध करण्यासाठी एका सक्षम कडक स्वतंत्र कायद्याची निर्मिती करण्यात यावी.
8. आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह हे व्यक्ती स्वातंत्र्याचा आदर जात विरहित समाज व धर्मनिरपेक्षता यासाठी उपकारक असतात. हे लक्षात घेऊन जिल्हा पातळीवर जिल्हा पोलीस प्रमुखांच्या अध्यक्षतेखाली आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह सहाय्यता समितीची स्थापना व्हावी.