दिल्लीमध्ये बसमध्ये तरूणीवर जो बलात्कार झाला त्याने अवघा देश हादरून गेला. सर्वत्र संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. तरूण-तरूणींनी उत्स्फूर्त मोर्चे व निदर्शने केली. बलात्कार्यांना फाशी व्हावी असा आग्रह व्यक्त केला गेला. या सर्व प्रतिक्रिया स्त्रियांवरील अत्याचारांच्या विरोधात होत्या व त्या योग्य आणि आवश्यक होत्या. पण या बलात्काराच्या बाबतीत भारतातील तथाकथित आध्यात्मिक बुवा-बाबांनी जे अकलेचे तारे तोडले त्याबद्दल काय बोलावे?
बलात्कारीत तरूणीने सरस्वती मंत्राचा जप केला असता तर बलात्कार झालाच नसता असे विधान एका बापूने केले. आज तक या वृत्तवाहिनीने या महाराजाच्या आश्रमात जाऊन त्याचे स्टिंग ऑपरेशन केले होते. ते दूरदर्शनवर गाजलेसुद्धा. परदेशातून फ्रॉड करून आल्याचा बहाणा करून पत्रकार तरूणी या महाराजाकडे गेली तर त्याने तिला खडसावले तर नाहीच उलट अभय देऊन फ्रॉडमधील पैसा सुरक्षित ठेवण्याची हमी दिली व आश्रमात ठेवून घेण्याचे तिला अभय दिले. हा महाराज एक मासिकही प्रसिद्ध करतो ज्यात अवैज्ञानिक उपचारांचे समर्थन केलेले असते.
दुसर्या एका बाबाने आपल्या एका पुस्तकातील मंत्र दररोज 108 वेळा असे 11 दिवस म्हटले तर बलात्कारी व्यक्ती आपोआप नपुंसक होईल असं म्हटलं. कहर म्हणजे बलात्कार करणार्या व्यक्तीला नपुंसक करणार्या मंत्राचा जप व त्याचे तंत्र शिकवण्यासाठी आमच्या आश्रमातील संघाकडून मदत होईल असंही त्यानं जाहीर केलं.
बलात्कार करणार्या व्यक्तीला मंत्रतंत्राने शिक्षा करता येईल अशी बेछूट विधाने करणार्या महाराजांना आपण प्रश्न विचारला पाहिजे की, करा तुमचे प्रयोग सुरू. त्याची नोंद ठेवू या. समस्त स्त्री-वर्गाला त्यांच्या आश्रमातील मंत्र-तंत्राचे धडे देऊ या. पण जर स्त्रियांवरील अत्याचार थांबले नाहीत तर या बुवा-महाराजांना कोणती शिक्षा द्यावी याचा निर्णय स्त्रियांनीच करावा.
नुकतेच हैद्राबाद येथे बॉम्बस्फोट झाले त्यात वीस जणांचा बळी गेला. शंभरपेक्षा जास्त लोक जखमी झाले. या बुवा-महाराजांनी आपल्या मंत्र-तंत्राने हे बॉम्बस्फोट थांबवायला कोणी अडवले होते? करा की ते बाँब मंत्राने निकामी व होऊ द्या ना ते अतिरेकी नपुंसक!
भावातील ध्यान (Transdental medition) नावाचा एक योग प्रकार एका महर्षीने जगभर सुरू केलाय. या तंत्राने समाजातील गुन्हेगारी कमी करता येईल असा दावा या पंथीयांनी केला. त्याची चाचणी घेण्यासाठी या पंथाने विकत घेतलेल्या वैज्ञानिकांनी आवाहन केले. चाचणी झाली. निष्कर्ष काय? भावातील ध्यानानंतर गुन्हेगारीचे प्रमाण घटले तर नाहीच उलट त्यात वाढ झालेली आढळली.
हे तथाकथीत अध्यात्मिक गुरू आणि खरे संतपुरूष यात हाच फरक आहे. खरे संत चमत्काराचा दावा करीत नाहीत. ते मंत्र-तंत्राचा धिक्कार करतात. आणि सदाचरणाचा उपदेश करतात. सत्य आणि अहिंसा व समाज स्वास्थासाठी आवश्यक असणार्या मूल्यांचा पाठपुरावा करतात. नीतीचा उद्घोष करतात. साधे आचरण ठेऊन निष्कांचन रहातात. गाडगेबाबा, संत तुकाराम, बाबा आमटे हे खरे संत. पण तथाकथीत बुवा महाराजांचे कसे असते? ते अमाप संपत्ती गोळा करतात. काचेच्या महालात सिंहासनावर बसतात. स्वत:ला देवाचा अवतार समजतात. आणि मी मंत्र देतो तंत्र देतो असे सांगून अंधश्रद्धाळूंना आपल्या जाळ्यात ओढतात. 1999 साली जग युद्धांत नष्ट होणार आहे असा पुकारा करून एका भोंदूने स्वत:चे चित्र असलेले ताईत आपल्या भक्तांना वापरण्याचे आवाहन केले होते.
हे झाले बुवाबाबांचे. पण देशपातळीवर कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या प्रमुखांनीसुद्धा स्त्री अत्याचाराबाबत जी विधाने केली ती ऐकून धक्काच बसला. ‘स्त्रियांनी घराच्या मर्यादेत राहूनच घर सांभाळले पाहिजे’ असे विधान भागवतांनी केले. बलात्कार इंडियात होतात भारतात नाही असे म्हणून त्यांनी पाश्चात्य विचारसरणीमुळे अनाचार वाढला असं सूचित केलंय. स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सबल होण्यासाठी घराबाहेर पडल्या ही चूक होय असाच दृष्टिकोन अशा वक्तव्यावरून व्यक्त होतो. बिल ड्यूरांट हा जगन्मान्य इतिहासकार म्हणतो, ‘इतिहासात स्त्रीची अर्थोत्पादनाची क्षमता ज्या काळात संपलेली दिसली तेव्हा कुटुंबेच कोसळली नाहीत, तर संस्कृती आणि समाजाच्या व्यवस्थाही ढासळलेल्या दिसल्या.’
स्त्रियांना ‘घरी बसा’ असे सांगणार्या व मंत्र म्हणा असा उपदेश करणार्या या मंडळींची डोकी स्त्रियांनीच ठिकाणावर आणण्याची मोहीम देशभरातील स्त्रियांनी आता हाती घ्यावी.