आभाळ सावळं होतं. सूर्य दूर डोंगराआड लुप्त होता. आणि बर्याच छोट्या छोट्या पक्ष्यांचा भलाथोरला थवा आभाळभर बेसुमार उधळत होता. त्यांचं एका लयीत उलट्यासुलट्या गिरक्या घेणं चालू होतं.
पाऊस पडण्याची अपेक्षा असलेला एखादा शेतकरी जसा आभाळाकडं आसुसल्या तोंडानं पाहत राहतो, तसा दावल खडकावर बसून त्या पक्ष्यांच्या गिरक्यांकडं पाहत होता. आता लाळ टपकेल अशा रीतीनं उघडं पडलेलं त्याचं तोंड आणि तांबरलेले डोळे पक्ष्यांवर रोखलेले. त्याच्या शेजारीच खडकावरच वारा, पाऊस यांचा मार खाऊन खरखरीत, जुनाट आणि काळपट झालेली अडीच हातांची मठी. मठीसमोरच्या एका दगडावर बसलेला रंगीबेरंगी फकीर, नुसत्याच चिंध्या पांघरल्यात असे वाटणारे विविधरंगी चिंध्यांचे त्याचे कपडे. रापलेला, मांसल चेहरा, भडक डोळे, जाड भुवया. गळ्यात काचाकवड्यांच्या माळा. हातात जाडसर विटके वाळे. बोटात मळक्या खड्यांच्या आंगठ्या. दाढीमिश्यांचं जंजाळ, आणि हातात धगधगती चिलीम… जगात असूनही जगात नसल्यागत त्याच्या हालचाली.
अलमाला कुणी तरी सांगितलं होतं, हाच तो चिंदी फकीर. बरंच काही कळतं म्हणे त्याला. खूप पोहोचलेला अवलीया आहे तो.
त्या चिंदी फकिरासमोर बसलेली अलमा. फकिराकडं पाहत. जगातला सारा आदर तिच्या नजरेत ठासून भरलेला. सुरकुत्यांनी पिंजलेलं तिचं तोंड. गावठी पद्धतीनं एक पाय दुमडून, एक पाय उभा ठेवून फाटका पदर सारखा करत ती बसलेली.
तिघांच्या अंगाखालून उतरत जाणारा खडक. खालच्या अंगाला तो एकाएकी तुटलेला. तिथं त्याचा कडा तयार झालेला. त्या कड्याखालून वाहणारा ओढा. ओढ्याच्या पलीकडं लवणातून पसरलेली गूढगंभीर दाट झाडी…. झाडीतून सुरू होत जाणार्या टेकड्या आणि त्याही पलीकडं सुरू होत जाणारे डोंगर…..
दावल जिथं बसलेला त्याच्या पाठीमागंच काही अंतरावर खडकावरच ऐसपैस असलेली खाकशावलीची दर्गा…..
चिंदी फकीरानं चिलमीचा एक जोरदार झुरका घेतला. चिलमीतली धग आणखी निखारली. त्याचे डोळे आकसले. कपाळावरच्या, घशाच्या शिरा ताणल्या गेल्या. मग दाढीमिश्यातून त्यानं गवताला आग लागल्यागत भकाभका धूर सोडला.
अलमा उत्सुकतेनं पाहत होती. लहान मुलीगत…..
चिंदी फकीर दणदणीत हसला. हसणं गडगडत खडकावरून ओढ्यात उतरलं. तिथं उलट्या झुडुपाला लटकलेलं एक बारकं वटवाघुळ चिरचिरत उडालं. अलमा दचकली. सावरली. पण दावल तसाच, स्वत:च्या बधीर अवस्थेत बसून. पक्षी पाहत.
“बहोत हरामखोर है ये खाकशा…..’ तोफेच्या आवाजात फकीर म्हणाला, दर्गाकडं हात उडवत आणि पुन्हा तसाच हसला.
अलमाच्या म्हातार्या शरीरावर काटा सरसरला.
खाकशावली आणि हरामखोर? हा फकीर धडधडीत शिवी देतो? तीही खाकशावालीला? बाप रे!
पण मग तिचं तिलाच जाणवलं, ह्या फकिराचं असंच असतं. ते स्वत:च प्रत्यक्ष वलीपीर असतात. आणि इथं वलीपीरांना ते धाडधाड शिव्या देतात. त्यात त्यांचं. त्या दुसर्या वलीपिरांबद्दल मित्रत्वच असतं. प्रेमच असतं. ममत्वच असतं. इतर सामान्य माणसांपेक्षा हे फकीर वलीपीरांच्या जास्त जवळचे असतात. त्या नात्यानं ते शिव्यासुद्धा देतात… त्यात रागाऐवजी कौतुकच असतं.
फकिराचं ते कौतुक अलमाला जाणवलं आणि ती आदराचं भरतं अंगावर घेऊन सावरून बसली.
दूरच्या डोंगरावरच्या पुसट होत जाणार्या शिखरावर आपली राठ नजर रोखत चिंदी फकीर हरवल्यागत बोलू लागला,
“यहांसे बहुत दूर एक गाव है. गुलबर्गा उसका नाम….”
गुलबर्गा नावाचे एक गाव. तिथं एक कोवळ्या वयाचं पोरगं होतं. मुसलमानाच्या घरात त्यानं जन्म घेतला. पण कधी धर्म म्हणून पाळला नाही. उंडारल्यागत वागणं हा त्याचा धर्म. कधी नमाज नाही. रोजे नाहीत. हादीस नाही. कुराण नाही. धर्माचं काहीच नाही. त्याच्या घरातले आणि शेजारचे सारे लोक त्याला नावं ठेवायचे त्याच्या आईबापाकडं बोट दाखवून इतर लोक म्हणायचे, यांनी एका काफीराला जन्म दिलाय.
आईबाप त्याला धर्म पाळ म्हणून समजावयाचे कधी कधी मारायचेसुद्धा. पण त्याच्यावर परिणाम शून्य असायचा. त्याच्या वयाची इतर पोरं धर्माचं सारं पाळायची. एकमेकांना हादीसमधले किस्से ऐकवायची. त्यावेळी हे पोरगं नुसत्या टिवल्याबावल्या करत असायचं.
एकदा असाच हा मुलगा निवांत झोपला होता, तर त्याला स्वप्न पडलं….
स्वप्नात एक भलामोठा ऐसपैस पसरलेला खडक आला. खडकाच्या शेजारी एक खळाळता ओढा. आसपास दाट जंगल. दूरवर डोंगर…. हळूहळू तो पसरलेला खडक करकर आवाज करत फाटत गेला. एखादं कापड फाटत जावं तसा. आणि त्या फाटलेल्या भागातून खूप खोलातून एक पांढरीशुभ्र कबर हळूहळू वर येऊ लागली. दोन हात आडवी, पाच हात लांब… आता ती कबर खडकाच्या वर येणार तेवढ्यात पेटी बंद व्हावी तसा खडक परत बंद झाला. आणि कबर परत आत गडप झाली. अन् पाठोपाठ खूपखूप खोलातून दबलेला आवाज आला, ‘दुनियामें शैतानोंका राज आ रहा है…. ऐं दीनवाले… दुनियाको बचाना है, तो मुझे बाहर निकाल…. बाहर निकाल मुझे…. बाहर निकाल…’
आवाज घुमत राहिला. पोरगं दचकून जागं झालं.
त्यानं त्या स्वप्नाकडं दुर्लक्ष केलं.
पण दुसर्या दिवशी त्याला तेच स्वप्न पुन्हा पडलं.
तिसर्या दिवशीसुद्धा तेच.
चौथ्या दिवशीसुद्धा….
पाचव्या दिवशी…
सहाव्या…
मग त्यानं ते स्वप्न घरातल्या लोकांना सांगितलं. सर्वांना आश्चर्य वाटलं. ती कबर अशा या काफीर माणसाच्या स्वप्नात का यावी म्हणून. आणि त्या स्वप्नातल्या आवाजानं अशा या काफीर पोरालाच, ऐ दीनवाले असं संबोधावं म्हणून….
पोराचा पंजगानी नमाजी बाप म्हणाला,
“कहीं तो कोई वली जमींनके अंदर गाडे गये है शायद…’
आठव्या…. दहाव्या… बाराव्या…. पंधराव्या दिवशीसुद्धा पोराला तसंच आणि तेच स्वप्न पडलं. आणि पोरगं झपाटलंच. सरळ उठलं. आणि घरदार सोडून चालायला लागलं.
खूप भटक भटक भटकलं… तसाच खडक, तसेच डोंगर, झाडी, ओढा शोधत राहिलं. पायांचा पार भुगा झाला त्याच्या….
भटकतच कधी तरी मावळतीच्या घाटावर शिरलं…
आणि अचानक त्याला तसाच, त्याच खुणांसह तो खडक सापडला. स्वप्नामुळं तो खडक त्याला पाठ झाला होता. त्याला आनंद झाला. याच खडकाखाली ती कबर आहे याची त्याला खात्री होती. शेजारीच एक खेडं होतं. सारी जुनाट, अडाणी माणसं. तिथं जाऊन यानं त्या लोकांना जमवलं. आणि त्या खडकाखाली कुठल्या तरी वलीची कबर आहे म्हणून सांगितलं. त्यांना बाहेर काढण्याचा प्रस्ताव ठेवला.
लोकांना पटेना. लोक त्याला वेड्यात काढू लागले. एवढ्या अखंड खडकाखाली अशी कबर असणं शक्यच नाही, आम्हाला तशी चिन्हं कधी आढळली नाहीत असं म्हणू लागले.
पण यानं हट्टच धरला, आपण खडक फोडू म्हणून.
लोकं म्हणाली, ठीकंय, पण खडक फोडायची मजुरी हवी आम्हाला…..
पोरगा बावरला, घरातनं तो असातसाच बाहेर पडला होता. अंगावरच्या कपड्यांचीही लक्तरं झाली होती. आतापर्यंत. पूर्ण भणंग झाला होता तो. तो काय देणार लोकांना?
पण त्याच रात्री त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं. त्याच खडकावर एका ठिकाणी एक मोठा दगड दिसला स्वप्नात. आणि त्या दगडाखालच्या पोकळीत एक मोहरांचा लखलखता हंडा….
त्यानं पुन्हा लोकं जमवली आणि आपण तो दगड हलवू म्हणाला. लोकं, चला, हा वेडा म्हणतोय ते एकदा पडताळून तर पाहू या, म्हणून तो दगड हलवायला तयार झाली.
पंचवीस गड्यांच्या कवेत न मावणारा तो मोठा दगड शेदोनशे माणसांनी जीव खाऊन रेटा देत घाम शिंपडून तिथून ढकलला. बाजूला केला. तर आत खरोखर भला मोठा लखलखता मोहरांचा हंडा….
तो ढकललेला दगड गडगडत खालच्या ओढ्याच्या एका डोहात जाऊन पडला. हंडा पाहून लोकांना त्या पोराच्या बोलण्याची खात्री पटली. मग त्यानं दाखवलेल्या ठिकाणी कबर बाहेर काढण्यासाठी खडक फोडायला लोकांनी सुरवात केली.
खूप काळ तेच काम चाललं होतं… खूप खोल खडक फोडल्यावर कधी राखेचे ढिगारेच्या ढिगारे लागले. लोक राख उपसू लागले. मग एकदाची ती कबर सापडली.
सारे लोक अवाक् झाले. हा चमत्कार पाहून सार्यांचे डोळेच फाटले.
ती कबर मग जपून वर काढण्यात आली. तिची प्रतिष्ठापना करण्यात आली. लोकांनी त्या पोराला विचारलं,
‘इन वलीका नाम क्या?’
आतापर्यंत तो पोरगं फकीर झालं होतं. दाढीमिशा वाढल्या होत्या. कपड्यांच्या चिंध्या तशाच अंगावर वागवू लागलं होतं. ते म्हणालं, “खाकशावली.’
राखेतून निघाले म्हणून खाकशावली.
जिथून ती कबर काढण्यात आली तिथं विहिरीसारखा खड्डा पडला. तिथं अजून राखेचे ढिगारे आहेत. कितीही उपसली तरी तिथली राख खपत नाही. ती राख खाकशावलीची उदी म्हणून वापरली जाते.
जिथं मोहरांचा हंडा सापडला तिथं एक मठी बांधण्यात आली फकिरासाठी. फकीर तिथं राहू लागला.
आणि जो दगड उतारावरून गडगडत कड्याखालच्या ओढ्याच्या ज्या डोहात जाऊन पडला, तो दगड डोहाच्या पाण्यातून अजूनही बाहेर तोंड काढून दिसतो. त्या डोहाचं पाणी कधीच आटत नाही. आणि आता ते पाणी लोक दुवाका पानी म्हणून वापरतात.
सापडलेल्या मोहरांतूनच खडकावर एक ऐसपैस दर्गा बांधण्यात आली. हीच ती खाकशावलीची दर्गा.
अलमा तोंड वासून भक्तीभावानं फकीर सांगत असलेली कथा ऐकत होती.
अंधार पडू लागला होता. आकाशातला पक्ष्यांचा थवा गडप झाला. पण दावल अजून त्याच अवस्थेत बसून होता. आकाशाच्या त्या कोपर्यातच डोळे रोखून. तोंड वासून.

फकिराची चिलीम विझली होती. आणि अलमाच्या अधू डोळ्यांना फकिराची आकृती म्हणजे एक अवाढव्य सावली भासू लागली होती.
कसला तरी झटका बसल्यागत अलमानं एकदम विचारलं,
“ वो दर्गा ढुंढनेवाले बाबा तुम तो नय ना?”
चिंदी फकिराची सावली गूढ, गडागडा हसली फक्त. आणि पुन्हा चिलीम भरू लागली.
अलमाचा प्रश्न तसाच अधांतरी राहिला.
पौर्णिमा. पूर्वेच्या आभाळानं चंद्राचं तांबूस कुंकू ल्यायलं. चंद्रप्रकाश आडव्या रेघेत फाकला. दर्गाचा सफेद घुमट आणखीन शुभ्र झाला. आणि कळसाची रूपेरी चंद्रकोर झळाळून उठली.
दर्गाच्या भोवतालनं दोन दोन पुरूष उंचीची आवाराची दगडी भिंत होती. आवाराच्या भिंतीलाच पूर्वेकडं तोंड करून ओबडधोबड कमान होती. बरेच अधलेमधले दगड निखळले होते तिचे. आणि कमानीच्या वरच नगारखाना होता. आत भलेमोठे दोन नगारे. आत शिरणारा चंद्राचा उजेड आणि एक टिमटिमता दिवा यांनी आतले नगारे आणि एका माणसाची सावली भलती गूढगंभीर वाटणारी…. आवाराच्या भिंतीला लागूनच तिन्ही बाजूंनी ओवर्या होत्या. जुनाट कौलारू छताच्या. आवाराच्या एका कोपर्यात उदीची ती बावडी. ओबडधोबड खडकात आपोआप पायर्या झालेल्या. आणि आत राख. मागच्या बाजूच्या भिंतीला एक लहानसा दरवाजा.
बाकी आवार मोकळं. त्यावर वाळू पसरलेली. आवाराच्या मधोमध, पक्क्या बांधणीची खाकशावलीची दर्गा. वर घुमट. त्यावर कळस. चंद्रकोर. चार कोपर्यांवर चार छोटे मिनार. संपूर्ण दर्गा सफेदीनं रंगवलेली. तिला चारी बाजूंनी लाकडी जाळ्या आणि आत एक मजार. तिच्यावर लालभडक किनारीचा पोपटी हिरवा गिलाफ. आणि बरेच फुलांचे शेरे. त्यातल्या फुलांचा कायमचा घमघमाट. वर्षानुवर्षं रूळल्यानं तो सुगंध भिंतींनासुद्धा लगटलेला. एक शांत गारवा. मजारच्या चारी बाजूंना लोखंडी जाळीचा लाकडी कठडा. मजारच्या पायथ्याशी दगडी ऊददान. एक नुसताच दगड. नारळं आपटायला. नारळाचं पाणी झेलून झेलून कळकटलेला. आणि एका कोपर्यात आढ्याला टांगलेल्या अनेक लोखंडी बेड्या, लोखंडी साखळ्या, कडी. घट्ट, लांबलचक वेगवेगळ्या मापाच्या, आकाराच्या…..
बाहेर आवारात, ओवर्यात अनेक माणसं इतस्तत: कुणी कुठंही, कसंही. त्यात बरीच माणसं रोगट दिसणारी. बहुतेकांचे चेहरे चिंताक्रांत, आकसलेले. काही माणसांच्या हातात, पायात, काहींच्या गळ्यात, कमरेला गुंडाळलेल्या बेड्या. काहींना बेड्याच्या साखळ्यांनी ओवर्यांच्या खांबांना बांधलेलं. तर काही जण तसेच अंगावर दागिन्यांगत बेड्या घेऊन आवारभर मोकळे फिरणारे….
दर्गाच्या पाठीमागच्या लांबपर्यंत पसरलेल्या खडकावर निरनिराळ्या दगडी चुली पेटलेल्या. कुणी भाकरी करतंय, कुणी कालवण. ही इथं काही दिवस राहायला येणार्यांनी केलेली स्वत:ची पोटाची व्यवस्था…. इथं यायची वेळ पडली की, तीन दगडं मांडून चूल करायची, इथला शेर संपला की, चूल मोडून आपली वाट धरणं, हा रिवाज.
या पेटलेल्या चुली दुरून पाहिल्या की रात्रीला नुसतेच लवलवणारे डोळे फुटलेत असं वाटतं. भयंकर दिसतं काही तरी.
अलमानं पण तीन दगडांची एक चूल मांडली होती. आणि ती घाईघाईनं दावल आणि स्वत:साठी सैपाक करत होती. खाकशावलीच्या हजेरीची वेळ जवळ येत चालली होती. त्याआधी सैपाक उरकून जेवून घ्यायला हवं होतं.
दावल घुमा होऊन तिच्यासमोर बसून चुलीतली हलती आग निश्चल डोळ्यांनी पाहत होता.
भाकरीचं पीठ मळताना अलमाच्या हातातल्या बांगड्या काटवटावर थडकून कटाक कटाक आवाज येत होता. एका लयीत- त्या लयीतच तिचं अंग मागंपुढं झुलत होतं. आणि चुलीतला लालपिवळा उजेड तिच्या मुखावरच्या सुरकुत्यांच्या रेखा आणखी जाळीदार करत होता.
“भला क्या रे दावल….” अलमा त्याला सांगू लागली.
त्याचं लक्षण नव्हतं. या दुनियेत नसल्यागत तो बसलेला.
पण अलमानं आपलं निवेदन थांबवलं नाही.
“ह्या बारीशकालेमें लोक खुल्लेपरच पकाना करते. उप्परसे जोरदार बरसात गिरती. पन एकबी चुल्ला बुजता नय.”
अलमा कुठं तरी ऐकलेली माहिती दावलला सांगत होती, की म्हणे या खाकशावलीच्या आवारात भर पावसात उघड्यावर सैपाक केला जातो. वरनं पाऊस पडत असतो. पण एकही चूल विझत नाही. खाकशावलीचा चमत्कार आहे हा. आवारातल्या ओवर्यांमध्ये किंवा छताखाली सैपाक केलेला खाकशावलीला आवडत नाही म्हणे….
दावल ऐकतोय की नाही याकडं तिचं लक्ष नव्हतं. तोंडाला चाळा असावा म्हणून बोलल्यागत ती बोलत होती. तर तो स्थीर नुसताच बसून. हूं नाही की चूं नाही.
तिच्या भाकर्या उरकल्या. मग हिर्व्या मिर्च्यांचा ठेचा केला तिनं. आणि एका जर्मलच्या थाळीत तिनंत्याला खायला वाढलं. पण तो ध्यानावर नव्हताच.
ले बाबा, जल्दी खा. हजरीका वखत आयलाय.”
पण तो सुम्मच.
तिनं मग स्वत:च त्याला हलवून, घास मोडून त्याच्या तोंडात द्यायला सुरवात केली. एखाद्या लहान बालकाला भरवल्यागत. आपोआप हलल्यागत त्याचं तोंड हलू लागलं. आता आलायंच तोंडात घास तर चावलाच पाहिजे असा एक कंटाळा होता त्याच्या हालचालीत. तोंड हलताना त्याच्या ओठावरच्या तरण्या मिश्याही हलत राहिल्या. अलमा डबडबलेल्या डोळ्यांनी त्या हलणार्या मिश्या पाहत त्याला घास भरवत राहिली. मनातच एक अधांतरी सवाल विचारत राहिली की, किती दिवस अजून हा भोग?
चंद्र आभाळात वरवर सरकू लागला. नगारखाना ओलांडून त्याच्या तिरक्या किरणांनी दर्ग्याच्या पहिल्या पायरीला पहिला स्पर्श केला आणि अगदी त्याच क्षणी नगारे वाजू लागले. नगारजी तालात नगार्यावर तुरपण टाकू लागला… ढींग ढींग ढींग डांग….. ढींग ढींग ढींग डांग…..
दर्ग्याच्या मुजावरनं दर्ग्यातल्या उददानात बचकभर उद टाकला. तिथून सुगंधी धुराचे भपकारे उठू लागले. धूर दर्गाभर पसरू लागला. मग आवारभर झाला.
आणि हजेरी सुरू झाली.
बेड्या घातलेली कित्येक माणसं रडू लागली. किंचाळू लागली. बेड्यातनं सुटण्यासाठी धडपडू लागली. तोंडाला येईल ते बोलू बडबडू लागली. बर्याच जणांच्या अंगात येऊ लागलं. नगर्याच्या घुम्यावर काही जण घुमू लागले. शरीरांना हिसके देऊ लागले. आचकूबिचकू लागले.
एक कोलाहाल माजला.
जसजसा उद चढत गेला. कोलाहलही चढू लागला.
खाकशावलीची हजेरी आली होती.
काही भुताटलेली झाडं. खाकशावलीच्या नावानं शिव्या देत होती. झाड सोडणार नाही असं किंचाळत होती काही जण छात्या पिटून घेत होते. काही जण केस ओढत होते. बर्याच आयाबायांच्या अंगातही वारं संचारलं होतं. त्यांना कपड्यांचं भान नव्हतं. केस पिंजारून त्या घुमत होत्या. किंचाळत होत्या. नाचत होत्या. लोळत होत्या. वेदनांचे विक्राळ टाहो सारीकडून उमटत होते.
चिंदी फकीर हातात लांबलचक आसूड घेऊन दमदार पावलं टाकत एखाद्या राक्षसी रखवालदारासारखा आवारात फिरत होता. मधूनच आसूड फडकावत होता. तोंडानं काही पुटपुटत होता…. आणि ज्यांना काही बाधा नव्हती असे बाकीचे सारे भेदरून हा सारा कोलाहल पाहत होते. हजेरीच्या या चमत्काराचं आश्चर्य करत होते.
दर्ग्यासमोरच अलमा दावलला घेऊन वाळूवर उभी होती.
दावल सुन्नपणे एकटक घुमटाच्या कळसावर चंद्रप्रकाशात चमकणार्या चंद्रकोरीला पाहत होता. त्याच्या गारगोटी नजरेत ती चंद्रकोर प्रतिबिंबीत झाली होती.
चिंदी फकीर त्याच्या जवळ आला. एखाद्या राक्षसाप्रमाणे त्याच्यासमोर उभा राहिला आणि फडाड्कन हवेत आसूड फडकावत म्हणाला,
“इसकोभी बेडीसे बांधना है क्या?”
अलमा काही तरी म्हणाली. पण आसपासच्या कोलाहालात तिचा आवाज तिलासुद्धा ऐकू आला नाही.
चिंदी फकिरानं डोळे मिटले. त्याचे ओठ आणि दाढी हलत राहिली.
अलमाला फकिराचं आत्ताचं हे रूप जरा वेगळंच वाटलं.
आणि अचानक चिंदी फकिरानं डोळे उघडले. वटारलेपणानं त्यानं दावलकडं पाहिलं. आणि तेवढ्यात अचानक त्याचा आसूड हवेत फिरला. सटाक्कन दावलच्या अंगावर बरसला.
“मां…” किती तरी दिवसानंतर दावलच्या तोंडातून किंचाळण्याचा आवाज ओसंडला.
अलमाला रडूच फुटलं.
फकिरानं दुसरा आसूड ओढला.
दावल खाली कोसळला. निपचित पडला. आवाजही आला नाही त्याचा. दोघांना तिथंच सोडून फकीर पुढं गेला. एका घुमणार्या बाईला आसुडानं बडवू लागला. ती बाई मोठमोठ्यानं हसत किंचाळत राहिली.
अलमा दावलला विसरून तो प्रकार पाहत राहिली.
नगारा वाजतच होता. चंद्र वर चढत होता. नारळ फुटत होते. बेड्या खळखळत होत्या. आसूड वाजत बरसत होते. माणसं किंचाळत होती. मुजावर उद चढवत काही तरी मंत्र पुटपुटत होता.
अलमा बधीर झाली होती.
अलमाचं गाव.
अलमा मण्यारकीचा धंदा करायची. दावलचा जन्म झाला आणि तिचा नवरा पैगंबरवासी झाला. तेव्हापासून अलमानं मण्यारकी करून दावलला वाढवलं.
गावात गणगोत होतं तिचं. धडंग दीर वगैरे होते. पण एकानंही अलमाला कधी मदत केली नाही. पण अलमानंही कधी काही मागितलं नाही त्याच्याकडं.
डोक्यावर बांगड्यांची पाटी घेऊन अलमा गावोगाव फिरायची. हाळीला जायची. आयाबायांना बांगड्या भरून त्यातनं जे काही सुटेल त्यात गुजराण करायची. दावलचा खर्च चालवायची. एकच इच्छा मनात धरून की, दावल मोठा होईल, मोठ्ठं बांगड्यांचं दुकान घालील. मग त्याला आपल्यासारखं गावोगाव गिर्हाईकं शोधत फिरावं लागणार नाही. तर गिर्हाईकच चालून त्याच्याजवळ येईल. मग दावलची आपण एखादी झकास पोरगी पाहून शादी करून देऊ. आणि मग सुनेवर सासुरवास गाजवत म्हातारपण काढू.
… दावलचं छोटंसं का होईना बांगड्यांचं दुकान आणि त्यात बसलेला मालक दावल, असं चित्र कायम अलमाच्या नजरेत तरळत असायचं. आणि ते चित्र पूर्ण करण्यासाठी अलमा आपल्या भटकंतीतनं मिळेल त्यातून थोडं थोडं काढून वेगळं टाकायची. मुंगीच्या पावलांनी धन जमवायची.
दावल काही शिकला नाही. गावभर उंडारणं किंवा अलमाबरोबर कधी तरी हाळीला जाणं हाच त्याचा उद्योग… लहानपण यातच संपलं त्याचं. मग तो वयात येऊ लागला….
आणि अचानक एक दिवस ते घडलं.
रज्जबचा महिना होता. तिच्या थोरल्या दिराकडं रज्जबचे कुंडे बनवले जायचे. कुंड्यांच्या दिवशी अलमाची थोरली देवरानी येऊन कुंडे खायला दावलला पाठवा म्हणून सांगून गेली होती.
अलमा दावलला दिराकडं जायला सांगून हाळीला निघून गेली.
दावल कुंडे खायला गेला. थोरल्या दिराला मूल नव्हतं म्हणून तो हे मन्नतीचे कुंडे करायचा. गोडाधोडाचे पदार्थ करून कुंड्यात भरून ठेवायचा. आणि आळीतल्या सार्या मुलांना बोलावून खायला घालायचा. जो खाणार असतो त्यानं स्वत:च्या हातानं त्या कुंड्यातनं काढून पाहिजे तेवढं खायचं असतं. कुणी त्याला अडवत नाही. या रिवाजाला धरून दावलनं कुंड्यात ठेवलेली खीरचपाती मनसोक्त खाल्ली. तृप्त झाला.
संध्याकाळी अलमा घरी परतली तर दावल घरात झोपलेला.
सांजेला झोपून राहणं वाईट म्हणून अलमानं त्याला जागं केलं. तो आळोखे पिळोखे देत उठला आणि अचानक बिछान्यात भडाभडा ओकला.
अलमा घाबरली.
रात्री पुन्हा एकदा त्याला तशीच उलटी झाली.
अलमानं त्याला विचारलं,
“क्यू रे, क्या हुवा? का कुच खाया क्या?”
“चाचाके ह्यां खीरचपाती खाया था दुपेरकू…’ तो म्हणाला.
“बादमें?”
“बादमें कुच नय.”
मग तिनं त्याला जेवण वाढलं. त्यानं थोडंच खाल्लं. आणि पुन्हा त्याला ओकारी झाली. खाल्लेलं उलटून पडलं.
अलमा जास्त घाबरली.
आसपासच्या आयाबायांनी उपाय आणि अंदाज वर्तवले,
“हलदीके दूधमें सूंट दालके दे उसकू” सैनाबी म्हणाली.
“उससे अज्वान हुयींगी तो भुनके दे थोडीशी.” हलिमाबुड्डी म्हणाली.
“बाहेर क्या क्या खाया गे इसने?” अलमाच्या धाकट्या देवरानीनं विचारलं.
अलमा म्हणाली,
“बडे देवरके ह्यां कुंडे खानेकू गया था आज….”
“हां…” धाकट्या देवरानीचे डोळे चमकले, “बराबर है फिर….”
“क्या?” बाकीच्यांची उत्सुकता जागली.
फुसफुसल्यागत पण सर्वांना ऐकू जाईल अशाआवाजात धाकटी देवरानी म्हणाली, “बडी देवरानी तो चुडैल हय, रज्जबके कुंडेमेसे खानेकू दी हुयींगी कुचतबी इसकू.”
सर्वांच्याच मनातले संशय फणा काढून उठले. आणि मग खूप बोलून झाल्यावर सर्व जणींचं एक मत झालं की, अलमाच्या मोठ्या देवरानीनं दावलवर करणी केली. त्याला खाण्यातून काही तरी दिलं. तिला स्वत:ला मूलबाळ नाही, म्हणून इतरांच्या पोरांवर जळते ती. रज्जबचे तिचे कुंडे मूल होण्याच्या मन्नतीचेच असतात.
आणि एवढं झाल्यावर अलमा तरातरा उठून थोरल्या देवरानीच्या दारात जाऊन उभी राहली. देवरानीच्या नावानं कडाडा शिव्या देऊ लागली. दीर आणि देवरानी बाहेर आली. क्या हुया, म्हणून विचारू लागली.
अलमा बोटं मोडत ओरडू लागली,
“काले मुंके, मेरे बेटेपर करनी करी तुने. रज्जबके पाक कुंडेमेसे कुचतबी खिलाई उसकू. मेरा गरीबकाच बेटा मिल्या व्हय तेरेकू?…. तेरा कभी भला नय हुनेका….”
थोरली देवरानी दार सोडून खाली आली आणि तावातावानं भांडू लागली. मी असं काहीच केलं नाही म्हणू लागली. तिच्या जोडीलं तिचा नवरा.
कडाक्याची भांडणं झाली. कुणी सोडवायला मध्ये पडेना.
शेवटी आजारल्यागत वाटणारा दावलच धावला. आपल्या आईला बाजूला करू लागला आणि थोरल्या चुलत्याला म्हणाला,
“जाव चाचा घरमें जाव…..”
चाचा ओरडला, “तेरे इस छिनाल मांकू लेके जा घरमें, गावगाव जागे लोकांके निच्चे सोके आती साली….”
दावल आपल्या आईबद्दल घाणेरडं बोलणं सहन करू शकला नाही. तो चुलत्याच्या अंगावर धावला. आणि चुलत्यानं त्याला काडकन एक थप्पड ठणकावली. दावल खाली पडला. उठलाच नाही… बेशुद्ध झाला.
आरडाओरड, गोंधळ, रडारड.
तेव्हापासून दावल बोलायचा बंद झाला. सुन्न झाला. कशातच नसल्यागत…. डोळे असूनही कुठंच पाहत नाहीसा झाला. लोक म्हणू लागले, त्याची वाचा गेली. त्याच्या चुलत्याच्या करणीनंच झालं हे….
तेव्हापासून अलमानं दावलवर खूप इलाज केले. हा वली, तो बाबा, हा पीर, तो फकीर, कसले कसले इलाज केले त्याच्यावर. अंगारे, धुपारे, झाडपाला, जडीबुटी. कुणी काहीहीइलाज सुचवावा आणि अलमानं तो अंमलात आणावा. कुणी काहीही सांगावं, अलमानं ते करून पाहावं. पण सुधारणा व्हायची नाही. फक्त अलमाचा वेळ आणि पैसा जायचा. मात्र दावल सुम्म तो सुम्मच. हलायचा नाही. डुलायचा नाही. नुसता एकटक कुठं तरी नजर रोखून बसायचा. जेवणाचं भान नसायचं. हसणं, खेळणं बंद झालं होतं. बसली जागा सोडत नव्हता. अलमाचा हातातोंडाशी आलेला मुलगा जिवंत असून मुर्दाड झाला होता.
अलमा रडत रहायची. काळजीनं वय वाढल्यागत झालं तिचं एकदम. सुरकत्यांनी जाळं विणलं झटपट. धंद्याच्या फेर्या कमी झाल्या. पण जगण्यासाठी पैसा आवश्यक होता. दोघांच्या पोटांना काही तरी आधार हवा होता. म्हणून रडतखुडत बांगड्या विकायला जाणं आवश्यकच होतं. दुसरा काही सहारा नव्हताच. पुन्हा अलमाचं दावलला दुकान काढून द्यायचं स्वप्न होतंच. तो अजूनही नीट होईल. मग आपण पै पै जमवून त्याला दुकान काढून देऊ. मग…. ते स्वप्न तिच्या नजरेत अजून जिवंत होतं. त्यासाठी ती जिवाच्या जोजारानं हळीला जातच होती…. लोक अलमाच्या दुर्दैवाला फक्त हळहळायचे. काही द्यायचे नाहीत. दोन चव्वल काढून. तशी अलमाची अपेक्षाही नव्हतीच.
यातच दिवस जात राहिले. दावलच्या मिश्या वयात आल्या.
एक दिवस सकाळीच चार फिरस्ते फकीर अलमाच्या दारात आले. हिरव्या चौकडीच्या लुंग्या गुंडाळलेले. पांढरे झब्बे घातलेले. डोईला साफे. खांद्यावर व्यवस्थित घडी घातलेल्या कांबळ्या. काळ्यापांढर्या दाढ्या. झोळ्या, चमले. एकाच्या हातात लोखंडी चिमटा. एकाकडं काचांचे तुकडे. एकाकडं खंजिरी. चौथा मोकळाच. तो त्यांचा म्होरक्या.
चिमटा, काचा, खंजिरानं ताल धरला. आणि चौघं एक सुरात, भरदार आवाजात गाऊ लागले,
‘या गौस, तेरा हैं सहारा
तेरे सदके हैं दुनिया…’
सारी सकाळ फकिरांच्या आवाजानं भारून टाकली.
अलमानं चिपट्यानं फकिरांना बाजरी वाढली. फकीर तिचं दार सोडून पुढच्या दारी निघाले. आणि अलमानं रडक्या सुरात हाक दिली,
“बाबा…”
फकीर थांबले. प्रश्नार्थक पाहू लागले.
“मेरा बेटा…” अलमानं सारं सांगितलं दावलबद्दल. फकीर आत आले. अदबीनं बसले. दावलला पाहत राहिले.
“कैसे हुआ ये?” म्होरक्यानं विचारलं.
“मेरे बडे देवरानीने करनी करी….”
म्होरक्यानं डोळे मिटले. जणू समाधीत गेला असावा.
बाकी स्तब्ध. उत्सुक दावल मात्र मुर्दाड.
थोड्या वेळानं त्यानं डोळे उघडून सांगितलं,
“करनी वगैरा कुछ नही. गावमें कही पीर है. पाक पीर. उनके मुजारके पास जाकर इस लडकेने नापाकी की है….”
“नापाकी?”
“हां. शायद पीरकी मजारके पास जाकर पेशाब या पैखाना किया है. और उसकी सजा भुगत रहा है.”
अलमाला धक्काच बसला. हे नवीनच कारण कळत होतं तिला. करणी वगैरे काही नव्हती म्हणे. तर गावातल्याच कुणा पवित्र पीराच्या कबरीजवळ जाऊन पोरानं लघवी किंवा शौचास केली असावी… आणि त्याचीच सजा भोगतोय आता तो. त्या पीरानं त्याला झपाटलंय.
चिमटेवाल्या फकिरानं मग एक किस्सा सांगितला,
“तुम्हारा बेटा अभीतक सलामत है, ये अल्लाका शुकर समझो एक बार ये हुआ के….”
एका रस्त्यावरून एक वरात चालली होती. अचानक त्यातल्या दुल्ह्याला जोराची लघवीला लागली. वरात थांबली. दुल्हा थोडा आडोशाला गेला. लघवीला बसला. पण बिचार्याला माहीत नव्हतं आपण चुकीच्या जागी बसलोय ते. तिथं एक गैबी पीराचं ठाण होतं… पुढं झालं असं की, वरातीतल्या सार्यांचे हातपाय वाकडे, लुळे झाले. एवढंच काय पण वरातीतले बैलसुद्धा पांगळे झाले….
“बाप रे!” अलमा सरसरली.
“ ये तो कुछ नही….” खंजीरवाला फकीर म्हणाला, “ऐसेही दुसरी बारात जा रही थी…”
अगदी तशीच दुसरी एक वरात चालली होती. तशीच नवर्याला लघवीला लागली. तसाच तो आडोशाला जाऊन बसला. तसेच तिथंही एक गैबी पीर होता. पण या वरातीला मात्र सजा वेगळी मिळाली. वरातीतली जेवढी माणसं ज्या ज्या अवस्थेत होती, त्या त्या अवस्थेत जागच्या जागी दगडात रूपांतरीत झाली. ती अजूनही तशीच आहेत….
ऐकून अलमाच्या छातीत कळ उठली.
“इससे तुम्हाराला बेटा बहोतही बेहतर हालतमें है. सोचो की, कही वैसीही हालत तुम्हारे बेटेकी हो जाये तो?”
अलमा हादरलीच. तिला कल्पनाच सहवेना. ती बधीर झाली. आपला मुलगा लुळापांगळा किंवा दगड होणं तिला विचारातही सहन होईना. ती केविलवाणेपणानं विव्हळली,
“नको बाबा, ऐसा हुनेकू नको… इसकू कुच इलाज नय क्या?”
“हं…” चारी फकीर विचारात पडले.
अलमाच्या प्रत्येक सुरकुतीत काळजी दाटून आली.
मग चौघांत काही तरी खुसूरफुसुर झाली.
मग म्होरक्या म्हणाला,
“इलाज है…”
“बोलो, बोलो. मैं कुचबी करनेकू तैयार हूं” ती घाईघाईनं म्हणाली. जणू ओठात आलेला इलाज फकीर आतल्या आत गिळून घेईल, असं वाटलं तिला.
“सौ रूपिया हादिया पडेगा.” एक फकीर म्हणाला.
अलमानं झटकन कमरेची पिशवी काढून पैसे मोजले. साठच भरले. घाईनं उठली ती. दावलच्या दुकानासाठी जमवत असलेल्या पैशातनं चाळीस रूपये काढून साठ रूपयात घातले. आणि अदबीनं शंभर रूपये फकिरासमोर ठेवले.
अगदी तुच्छ पदार्थ असल्यागत ते शंभर रूपये उचलून म्होरक्यानं झब्ब्याच्या खिशात ढकलले. आणि मग गंभीर आवाजात दाढी कुरवाळत म्हणाला,
“बुरहानपूर नामका गाव है….”
त्या गावी खाकशावाली नावाच्या पीराची दर्गा आहे. पीर जहाल आहे. कडक आहे. या पोराला ज्या पीरानं झपाटलंय त्या पीरापेक्षा खाकशावाली महान आहे. जमिनीखालून वर येतानाच खाकशावालींनी द़ृष्टान्त दिला होता की, मला या जगातल्या शैतानांचा खात्मा करायचाय. लोकांना दु:खमुक्त करायचंय… त्या खाकशावालीच्या दर्ग्यात भूतप्रेत, करणी, जादूटोणा, चेडा, भानामती असल्या सार्या प्रकारांवर इलाज चालतो. उतारा मिळतो. बडेबडे जीनसुद्धा तिथं नमतात. कसल्याही भुतानं झपाटलेलं असेल तर आपण खाकशावालीच्या हद्दीत शिरताच भूत झाड सोडून पळतं. जबरदस्त काही प्रकार असेल तर मात्र काही दिवस तिथंच दर्ग्यात राहावं लागतं. खाकशावालीची बेडी घालावी लागते. दर पुनवेला तिथं हजेरी असते. बाबाचा नगारा वाजू लागला की, भुतंखेतं ओरडू लागताच. तिथं चिंदी फकीर आहे एक. तो खाकशावलीच्या वतीनं झाडाला हिशोब विचारतो. झाडाला झोडून काढतो. चारदोन महिन्यांत कसलंही झाड मोकळं, ठणठणीत होतंच, चिंदी फकीर भुतं बाटलीत बंद करून ठेवतो.

चिंदी फकीर म्हणजे बाबांचा अस्सल भक्त. खूप रागीट आहे तो. सारखी चिलीम ओढतो. कुणाकडनं काही घेत नाही. असं म्हणतात की, एका पोराच्या स्वप्नात जाऊन खकशावलींनी मला खडकातून बाहेर काढ असं सांगितलं तोच हा चिंदी फकीर. सारे चिंध्यांचे कपडे पांघरतो अंगावर. म्हणून त्याला चिंदी फकीर म्हणतात. पीराच्या मुजावराकडं त्याचं जेवणखाण असतं. आपण फक्त एखादी गांज्याची पुडी नेऊन दिली की, फकीर खुश. कुणाचा पैसाअडका वगैरे काही घेत नाही तो.
या चिंदी फकिराचाही एक किस्सा आहे.
हा फकीर म्हणे रोज पहाटे जाऊन खाकशावलीच्या मजारला सलाम करतो. आता असले सलाम आपल्यासारखी माणसंही करतात. पण आपल्याला कधी आतून उत्तर येतं का? नाहीच. पण चिंदी फकीरानं सलाम केला की, त्याला कबरीतून उत्तर येतं. ते फक्त त्यालाच ऐकू येतं.
तर झालं असं की, एक दिवस का चिंदी फकीर सलाम करायला नेहमीप्रमाणे दर्ग्यात गेला. नेहमीप्रमाणे सलाम केला. पण नेहमीप्रमाणे उत्तर काही आलं नाही. फकिरानं पुन्हा सलाम केला. पण उत्तर नाही. असं तीन वेळा घडलं. मग फकिराला राग आला. आणि रागाच्या भरात त्यानं हातातला सोटा खाकशावलीच्या कबरीवर हाणला. आणि तिथनं तो ताडताड निघून गेला.
त्याच दुपारी फकीर गावच्या बाजारपेठेतून चाललेला होता. तर फाटक्या अंगाचा एक भिकारी त्याच्यासमोर येऊन उभारला. हात पसरून भीक मागू लागला.
फकिराचा पहाटेचा राग अजून संपला नव्हता. त्यानं त्या भिकार्याला झिडकारलं…
भिकार्यानं विचारलं,
‘गुस्सा क्यों करते हो?’
दु:ख सांगितल्यागत फकीर म्हणाला,
“मैने सुबे बाबाको सलाम किया. लेकीन जवाब न आया. मुझे तो जान जाने जैसे लग रहा है.”
भिकारी हसला.
“शायद बाबाने तुम्हारा इम्तहान लिया हो!”
‘फिर तो मैनेबी बाबाको डंडा मारकर इम्तहान लिया है. है बाबामें ताकद तो कुछ नजारा दिखायेगा वो.’
‘क्या नजरा देखोगे?’ भिकार्यानं विचारलं.
‘कुछभी.’
‘तो फिर ये देखो…’ म्हणत भिकारी फकिराकडं पाठ करून वळला. आणि त्यानं आपली पाठ उघडी करून फकिराला दाखवली. त्यावर सोट्यानं मारल्याचा काळानिळा वळ उठला होता. ‘ये हैं तुम्हाराी सहरकी करतूत….’
फकीर गोंधळला. बावरला. तो भानावर येईपर्यंत भिकारी बाजाराच्या गर्दीत मिसळून निघून गेला होता.
मग फकिराच्या लक्षात आलं की, खाकशावली स्वत: भिकार्याच्या वेशात आले होते. त्यांनी आपण पहाटे मारलेल्या सोट्याचा वळ दाखवला. त्या पावली फकीर धावत दर्ग्यात आला. आणि मजारवर पडून त्यानं ढसाढसा रडत माफी मागितली. तेव्हा मजारमधून आवाज आला की,
‘जा रो मत. तू तो मेरी औलाद जैसा है. औलाद गुनाहभी करें तो माफ किया जाता है…’
तर असे हे खाकशावली आणि चिंदी फकीर….
चारही फकीर मिळून अलमाला खाकशावलीची महती सांगत राहिले. मग म्होरक्या म्हणाला,
“तुम अपने बेटेको वहांपर ले जावो. दो-तीन महिने रहनेकी तैयारीमें जाना किसी सैतानवैतानकी बात होती तो अलग था. लेकिन आपले बेटेको तो एक पीरने जकडा है उनके छुटकारा पानेमें दो-तीन महिने लगेंगेही.. उसका बेटा बिल्कुल ठीक हो जायेगा. इसका इलाज तो सिर्फ पिरान् पीर दस्तगीर खाकशावलीके दर्गाहपरही होगा.”
फकीर चहा पीत नव्हते म्हणून अलमानं त्यांना दूध दिलं. ते घेऊन तृप्तपणे आल्या वाटेनं ते निघून गेले.
आणि अलमा खाकशावलीच्या दर्ग्यावर जाण्याच्या तयारीत जुटली.
दावलला बेडी चढवायची नाही. असं चिंदी फकीरानं आलमाला सांगितलं. ज्यांना भुताखेताचं लागीर झालंय, करणी, जादूटोण्याचा त्रास आहे, अशांनाच बेड्या चढवायच्या असतात. दावलचा प्रकारच वेगळा होता. त्यानं एका कुठल्या तरी पीराच्या ठाण्यात गंदगी केली होती. तो पीर दावलला शिक्षा देऊन घेत होता. पीरानं शुद्धबुद्ध हरून घेतली होती. त्यांना योग्य काळ भरल्याशिवाय ठाण्यावर राहाणंच भाग होतं.
“उस पीरसे खाकशावली बहोत बडे है…” चिंदी फकीर सांगत होता…
दावलला कह्यात घेणार्या पीराला खाकशावली समजावून सांगतील की, हा माझा माणूस आहे. त्याच्याकडून झाला गुन्हा मंजूर आहे. त्याला झाली तेवढी शिक्षा पुरे. आता तुम्ही त्याला सोडा…
पण तरी त्या पीरानं नाहीच ऐकलं तर खाकशावली त्या पीरालाच शिक्षा करतील… त्याला दावलला सोडायलाच लावतील.
सारं ऐकून अलमाला मोठा दिलासा वाटला.
दावल हडकून गेला होता अगदी. अलमानं कधी त्याचे खाण्यापिण्याचे हाल होऊ दिले नव्हते. चांगलं पोसलं हेातं तिनं त्याला. पण मध्येच हे लचांड त्याच्यामागं लागलं आणि पोरगं उतरतच गेलं. आज तर त्याची फक्त हाडकं उरली होती. आणि मेणाचा पातळ थर दिल्यागत त्याची कातडी शरीरावर ताणून चिकटलेली.
अलमा काकूळ नजरेनं त्याच्याकडं पाहत राहायची. पोरगं किती उतरलंय ते जोखल्यागत तिची नजर त्याच्या अंगावर फिरायची आणि दु:खी व्हायची ती… काय नशिबात वाढून ठेवलंय हे तिला कळायचं नाही.
पोरगं यातनं पार झालं तर, त्याला नीट धंदा काढून देऊन रांकेला लावून देऊ असा अजूनही तिला विश्वास वाटायचा. तिनं आजपर्यंत दाणा दाणा करत जमवलेली शिल्लक या दावलच्या विचित्र आजारावरच संपत आलेली होती. आता पहिल्यासारखा अलमाच्या अंगात जोरही राहिलेला नव्हता. हाळीला जाणं म्हणजे तिच्या जिवावर यायचं. हातपाय सुजायचे. पण पोरगं नीट होण्यासाठी ती हाळी करायचीच. जिद्द ही की, पोरगं भलं झालं की, आजारातनं, उजरलं तर पुन्हा जोरकस फेर्या मारून पैसा जमवू आपण आणि त्याला दुकान काढून देऊ. मग त्याची शादी करून देऊ… मग नातवंडं आपल्या अंगाखांद्यावर खेळतील. वगैरे…
इतरांना तिच्या या स्वप्नाचं काही वाटो ना वाटो, पण तिला मात्र ही स्वप्नं महान वाटायची. पोराशिवाय तिला या जगात दुसरं कुणी नव्हतं आणि पोराबाहेर तिची स्वप्नं नव्हती…. त्यातच हे खाकशावलीकडं येणं झालेलं.
चिंदी फकिरानं तिला चारदोन महिने इथंच राहावं असं सांगितलं होतं. इथंच राहायचं म्हटलं तर भरपूर खर्च होता. रोजचं खाणंपिणं करायला पैसा लागणार होता. झालं तर चिंदी फकीरासाठी एखादी गांज्याची पुडी अधूनमधून… आताच पैसा थोडा होता. तो थोडे दिवस पुरणार होता. पण नंतर काय, हा प्रश्नच होता. तरीही तिनं पोरगं पूर्ण बरं होईपर्यंत इथंच राहायचं असं ठरवलं होतं.
दुसरी पौर्णिमा जवळ येत चालली होती.
दावल जास्तच हडकला होता. पिवळा पडला होता. गवताच्या वाळलेल्या काड्या एकत्र जोडून एक आकृती तयार करावी, त्यात डोळ्यांच्या ठिकाणी दोन गारगोट्या ठेवाव्यात असा दिसत होता दावल.
त्याला अलमा रोज उद्दीच्या बावडीतली उदी लावत होती आणि ओढ्याच्या डोहातलं दुवाचं पाणी पाजत होती.
अलमाच्या इतर लोकांशीही बर्याच ओळखी झाल्या होत्या. कुठनं कुठनं लोकं आली होती. येत होती. बरं झाल्यासारखं वाटलं की जात होती.
खूप दूरच्या डोंगराळ प्रदेशातनं आलेली सुलेमा नावाची एक बाई अलमाच्या ओळखीची झाली. तिनं तिची जवान मुलगी इथं आणली होती इलाजासाठी. मुलीला कुणा भयंकर हडळीनं झपाटलं होतं. हडळ सुटता सुटत नव्हती. जहांबाज होती त्या मुलीला बेडी घातली होती. म्हणजे त्या बेडीत हडळीलाच बांधून ठेवलं होतं. बेडी सोडली की, ती मुलगी जोरजोरात किंचाळायला लागायची. अंग पिवळटायची. ती हडळ तिला त्रास द्यायची. छळायची. बेडीत असली की, तिला हा त्रास व्हायचा नाही. म्हणून तिच्या कमरेभोवती कायम बेडी असायची. तिला कुलूप लावलेलं असायचं.
सुलेमा बराच काळ झाला इथंच होती. अलमा नवीनच होती. त्यामुळे सुलेमा जुनेपणानं अलमाला माहिती सांगत होती.
“हजेरीके वखत खुद खाकशावली चिंदी फकीरके साथ घुमते र्हैते. जिनकू शैतान लगेलाय उनकू और चिंदी फकीरकूच दिखते वो. हारा साफा बांधेला र्हैता शिरकू बडी सफेद दाढी र्हैती और कभी कभी सफेद घोडेपर बैठके, हातमें तलवार लेके खाकशावली गावमेंभी फेरी मारते. आधे रातकू…”
खाकशावली कसे पांढर्या घोड्यावर बसून डोईला हिरवा साफा बांधून, हातात तलवार घेऊन गावात फेरी मारतात, गावाचं रक्षण करतात, याचं छान भक्तीरसपूर्ण वर्णन करत राहिली सुलेमा. आणि त्याच रसात ऐकत राहिली अलमा.
मग सुलेमा म्हणाली,
“मेरे बेटेपर तो खास मेहरनजर हैं बाबाकी….”
“कैसी?”
सुलेमानं सांगितलं, पौर्णिमेच्या पहाटेपर्यंत हजेरी सुरू असते. मग चंद्र ढळला की हजेरी थांबते. पण खाकशावली मात्र लगेच आपल्या मजारमध्ये शिरत नाहीत. ते सरळ नगारखान्यात जाऊन उभे राहतात. हाताची घडी करून नगारखान्याच्या खिडकीतून दर्ग्याच्या आवारात वावरणार्या आपल्या भक्तांकडं पाहत राहतात. सारे भक्त रातभराच्या श्रमांनी थकलेले असतात. पेंगुळलेले असतात. काही जण तर दमून झोपलेले असतात. चिंदी फकीरही आपल्या मठीकडं विश्रांतीसाठी गेलेला असतो. नगारजी नगारा बडवून दमलेला असतो. तो हजेरी संपली की पटकन गावातल्या आपल्या घरी निघून गेलेला असतो. एकच माणूस मात्र ताजातवाना असतो. दर्ग्याचा मुजावर. चांद त्याचं नाव. चांद मजारजवळ बसून असतो. मग नगारखान्यात उभ्या असलेल्या बाबांची चांदला गुप्त आज्ञा येते की, दर्ग्याच्या आवारात असलेली अमूक अमूक व्यक्ती जास्त पिडलेली आहे. जास्त दु:खात आहे. तिचं लागीर सर्वात मोठं आहे. ते लवकर सुटणार नाही. त्या व्यक्तीला माझ्याकडं घेऊन ये.
मग चांद दर्ग्याच्या बाहेर येतो. बरोबर त्या अमूक अमूक व्यक्तीजवळ जातो. अन् त्या व्यक्तीला आपल्या हातावर उचलून पायर्या चढून त्या नगारखान्यात पोहोचवतो. कितीही वजनदार व्यक्ती तो सहज उचलतो. फूल उचलल्यागत. हा बाबांचा चमत्कार. चांदला स्वत:ला मात्र बाबा दिसत नाहीत. पण ज्या व्यक्तीला वर नेलंय त्याच्यावरच्या भुताला मात्र स्पष्ट दिसतात. मग बाबांचे आणि त्या भुताचे संवाद होतात. चांद तिथंच शेजारी मान घालून बसून असतो. त्याला बाबांचे सवाल ऐकू येत नहीत. पण लागिराची उत्तरं मात्र ऐकू येतात… लागीर मी झाडाला सोडणार नाही वगैरे हट्ट धरून बसलं की, बाबा आपल्या तलवारीचं टोक त्याच्या गळ्यावर टेकवतात म्हणे. लागीर वेदनेनं विव्हळतं. मग खूप वेळानं चांदला कानात ऐकू येतं, याला घेऊन जा. तेव्हा चांद त्या व्यक्तीला परत खाली येऊन येतो.
एवढं सांगून सुलेमा अभिमानानं म्हणाली, जे लागीरखूप अवघड असेल त्यालाच खाकशावली बाबा नगारखान्यात बोलावतात. माझ्या पोरीचं लागीरही खूप अवघड आहे. गेल्या चार पौर्णिमांना माझ्या पोरीला बाबांनी वर बोलावून घेतलं, म्हणजे बघा, किती जबरदस्त असेल ती हडळ…!
“हां बया….” अलमा म्हणाली.
“एकादे बार तुमारे दावलकूबी उप्पर बुलाके लिंगे बाबा. उसपर बैठेले पीरबी जबरस्तच लागते… आन उप्पर बुलानेसे झाडबी जरा जल्दीच मोकला हुता. व्हां बाबाके साथ सिधा सामना र्हैता….”
दावललाही नगारखान्यात बोलावणं येण्याची शक्यता आहे हे ऐकून अलमाला खूपच बरं वाटलं.
दिवस नेहमीच असे जात होते. आजही चालला होता. दुपार चढली होती. सारी दर्गा पेंगुळली होती. ओवर्यांतनं माणसं सावलीला निवांत पहुडली होती. दावल तोंड वासून उताणा झोपला होता. तर त्याच्या शेजारीच बसून अलमा आणि सुलेमा आयुष्याची सुखदु:ख चघळत बसल्या होत्या. पैसा नसल्यानं दहेज देता येत नाही, त्यामुळं पोरीचं लग्न जमत नाही, त्यातच या हडळीनं तिला झपाटलं, असं सुलेमा पोरीबद्दल बोलत होती. अलमा ऐकत होती.
आणि अचानक दर्ग्याबाहेरून कुणी तरी मोठमोठ्यानं ओरडत असल्याचा आवाज ऐकू आला, कुणी तरी भयंकर चिडलं असावं.
कसा कोण जाणे पण दावल खडबडून जागा झाला.
अलमा आणि सुलेमा जागा सोडून दर्ग्याच्या बाहेर आल्या. पाठोपाठ बरीच माणसं. आणि अलमाचा पदर धरून दावल.
मठीकडून आवाज येत होता.
चिंदी फकीर तावातावानं काही तरी ओरडत होता. भयंकर संतापलेला दिसत होता तो. निळाकाळा झाला होता, आणि त्याच्यासमोर एक कोवळंशार पोरगं छातीवर हात बांधून काही तरी सांगत होतं शांतपणे.
सारे जण पुढं झाले. दोघांभोवती कोंडाळं झालं तसं फकिरानं एकदम माघार घेतल्यागत हात उडवून त्या पोराला सांगितलं,
“जाव, अपना काम करो. तुम्हारे मुंह लगना गलत है.”
ते पोरगं शांतपणे वळून निघत म्हणालं,
“मै तो आता रहुंगा.”
ते गेलं. चिंदी फकीर थरथरत राहिला.
कुणी तरी विचारलं, “क्या हुआ?”
“कुछ नही.” फकीर रागात म्हणाला.
संध्याकाळी दर्ग्याच्या आवारात भुमका उठली की, त्या पोराला भूत लागलंय. आणि त्यानं फकिराशी वाद घातला. ज्या लोकांनी, त्या पोराला पाहिलं होतं, त्यांना त्याचा शांतपणा आठवला. आणि खात्री पटली की, खरोखरच त्या पोराला एखाद्या शांत पण जबरदस्त भुतानं पछाडलेलं असावं. त्याशिवाय का तो एवढ्या रागावलेल्या चिंदी फकिरासमोर उभं राहण्याचं धाडस करू शकला?
त्यानंतर दुसरा दिवस.
तोच कोवळाशार पोरगा अलमासमोर बसला होता. शांतपणे तिला विचारत होता,
“मांजी, मेरेकू बोलो, तुम कायकू आय ह्यां?”
त्या पोराला भूत लागलंय अशा समजुतीनं अलमाना मनातनं त्याचा कळवळा आला. की भुतंखेतं कवळ्या पोरांनाच का धरतात? तिनं मायाळूनं विचारलं,
“तेरा नाम क्या है बेटे?”
“सौद.”
“क्या काम करता तू?”
“हमने दसपंदरा लडके-लडक्यांने मिलके एक संघटना निकालेलीय. मुस्लिम सुधार संघटना. उसके तरफसे हम मुसलमान लोगोंमें अच्छाईका काम करते. मैबी उनके तरफसेच ह्या आयलाय….”
अलमाला तो काय म्हणतोय ते नीटसं कळलंच नाही. तिला वाटलं, ह्या पोराच्या अंगावरचं संघटना नावाचं भूत बडबडतंय असलं विचित्र काही. तरीही तिनं विचारलं,
“गाव कौनसा तेरा?”
“एक गाव हुयींगा तो बोलू ना!”
हे त्याचं उत्तर तर तिला आणखीनच विचित्र वाटलं.
“तेरे साथ कोई आयला नय क्या?” तिनं विचारलं.
“नय.”
अलमाच्या मनात आणखीनच दया आली त्याच्याबद्दल आणि त्याच्या आईबापांबद्दल राग. काय आईबाप असतील या पोराचे, निर्दयी! एवढं कोवळं पोरगं इथं एकटंच सोडून गेलेत. कसं होणार या पोराचं?
ती पुन्हा विचारू गेली, तेवढ्यात त्या सौदनं विचारलं,
“मेरा छोडो मांजी, तुम्हारा बोलो, क्यूं आयेे तुम ह्यांपे?”
“क्या बोलनेका बाबा….’ कपाळावर हात लावत अलमा म्हणाली, “ये मेरा बेटा..” तिनं दावलकडं हात दाखवला. “कैसातुबीच करताय देख. हमारे गावमेंके एक पीरकी इसपर खपा नजर हुयी बोलते. कोनसेतुबी पीरके मजारके पास पिशाब कर्या इसने. तबसे बातच नय करता. गुमसुम र्हैता. भोत हडक्यायबी. इतनाच एक बेटा हाय देख मेरा…” तिच्या डोळ्यांत पाणी उभारलं.
“किसी डॉक्टरकू बताय क्या कभी?”
“डाक्तर क्या करनेवाला बाबा? ऐसे रोगांकू डाक्तर नय चलता.”
सौद हसला.
“ऐसा कुछ नै र्हैता मांजी. डॉक्टर के पास उसको लेना तुम. करनी, शैतान ऐसाबी कुछ नै र्हैता. सब दिलके खेल है….” त्यानं दर्ग्याच्या दारातून दिसणार्या खाकशावलीच्या कबरीकडं हात दाखवला, “ये दर्गामेंके फत्तर इलाज नय कर सकते. इलाज कर सकते तो, दुनियामें कोई बिमार नैं पडता था.”
खाकशावलीला तो पत्थर म्हणाल्याचं ऐकून अलमाचे खोल डोळे फाटलेच अगदी. तिला वाटलं, खरंच या पोराच्या बोकांडी जबरदस्त भूत बसलं असावं. अशी भुतंच मोठमोठ्या वलींना नावं ठेवतात, शिव्या देतात. तिच्या तोंडून वाक्य निसटलंच,
“भोत बडा शैतान लगेला दिखताय तेरेकू….”
“शैतान?” सौद हसलाच, “अरे मैं खुदच एक शैतान हूं.”
अलमा हादरलीच अगदी.
सौदनं आपल्या जवळच्या छोट्या वहीत काही तरी लिहून घेतलं. अलमाला वाटलं, हे लिहिणं म्हणजेही भुताटकीचा खेळ असावा.
सौदनं सुलेमाला विचारलं, “तुम कायकू, आय ह्यां?”
एका खांबाला उदासपणे टेकून बसलेल्या आपल्या पोरीकडं हात दाखवत सुलेमा म्हणाली,
“इसकू चुडेलने पकडेलाय.”
सौद पोरीकडं थोडा वेळ निरखून पाहत राहिला आणि म्हणाला, “इलाज है इसका…”
“क्या?”
“इसकी शादी करके देव. चुडैल आप भागींगी. इस उमरकी जरूरत है शादी. वो नयी हुयी तो फिर ऐसे शैताना लगते…”
सुलेमालाही त्याचं बोलणं भुताचंच वाटलं.
तेवढ्यात कुठून तरी चिंदी फकीर तिथं उगवला. सौदला तिथं पाहताच त्याच्या डोळ्यांत अंगार फुलला.
“तुम यहां क्या कर रहे हो?” तो ओरडला.
“तुम्हारा लोगोंको लुटने का धंदा बंद कर रहा हूं….” सौद हसत म्हणाला, “इन लोगोंसे कह रहा हूं की, इस दर्गामेंका पत्थर तुम्हारा इलाज नहीं कर सकता….”
“दर्गाको पत्थर कहते हो काफीर!” फकीर किंचाळला, “यहाँसे दफा हो जावो, नहीं तो इसकी सजा मिलेगी तुम्हें!”
“कौन देगा सजा?”
“मैं… खाकशावली देंगे.” फकीर चरफडत म्हणाला.
“देख लेंगे.” सौदनं उडवून लावलं.
“ठीक है.” दातओठ खात चिंदी फकीर दाणदाण निघून गेला.
अलमाबरोबर आसपासचे लोक घाबरून गेले. त्यांना वाटलं, खरंच या पोराला जबरदस्त भुतानं झपाटलेलं असावं. त्याशिवाय का हा फकिराला काहीही बोलतो? खाकशावलीला दगड म्हणतो?
अलमानं दावलच्या ओठांवर आणि गळ्यावर खाकशावलीची थोडी उदी लावली. स्वत:लाही तशीच लावली. ओढ्याच्या डोहातलं दुवाचं पाणी प्यायला दिलं त्याला. आणि ती संध्याकाळच्या कालवणाला गावातून काही तरी आणावं म्हणून दावलला दर्ग्यातच सोडून, सुलेमाला त्याच्यावर ध्यान ठेवायला सांगून निघाली.
जाताना तिला मठीसमोर चिंदी फकिराबरोबर बसलेले आणखी चार फकीर दिसले. हेच फकीर तिच्या घरी आले होते. त्यांच्या सांगीवरूनच अलमा दावलला घेऊन इथं आली होती. सारे जण चिलीम फुंकत बसले होते.
त्यांच्याकडं जाऊन त्यांच्याशी बोलावं असं तिला वाटलं. पण गावातून परतायला मग उशीर होईल, अंधार पडेल, गाव तसं थोडं दूरच, वाट कच्ची खाचखळग्यांची, म्हणून गावातून आल्यावरच त्यांच्याशी बोलू, वाटल्यास येताना त्यांच्यासाठी गांज्याची पुडी आणू असा विचार करून तिनं गावाची वाट धरली.
ती परत आली तेव्हा मठीसमोर कोणताच फकीर नव्हता. मग ती दर्ग्यात शिरली तर दावलही जागेवर नव्हता. तिनं सुलेमाला विचारलं,
“किधर गया दावल?”
सुलेमा म्हणाली, “सौद आयाता, बोल्या, दावलकू जरा खुल्ले हवापर घुमाके लाताव. दावल उसके साथ गया.”
अलमा घाबरली, त्या सौदला तर लागलंय मोठं भूत. त्यात त्यानं आपल्या पोराला फिरायला नेलं म्हणजे… चमत्कारिकच व्हायचं काही तरी.
गेले चारदोन दिवस सौद नियमानं तिच्याजवळ येऊन बसायचा. काहीबाही विचारायचा. बडबडायचा. लिहून घ्यायचा. इतरांजवळही जाऊन तसंच करायचा, कुणी तरी म्हणायचं, त्याला लिहून घेणारं भूत लागलंय. सौद दावलजवळही जाऊन बसायचा. मित्रत्वानं त्याच्या अंगावर थाप टाकायचा. दावलची नजर निश्चल असायची. पण तो एकटक सौदकडं पाहत राहायचा. दरम्यान कधी चिंदी फकीर फिरकलाच तर तो मात्र जळजळीत नजरेनं सौदकडं पाहायचा. लोक म्हणायचे, तो सौदच्या अंगावरच्या भुतावर रागावून आहे.
काल सौद दावलशी जरा लाडातच आला होता. पाठीवर थाप मारून म्हणाला होता, “उठो यार, ये शैतानबितान छोडो. तुम्हारे जैसे जवान ऐसे बैठेले अच्छे नही लगते…”
दावलच्या नजरेत चलबिचल झाल्यासारखी वाटली होती.
ते सारं ठिक होतं. दर्ग्याच्या आवारात कोणतंच भूत कुणालाच काही करू शकत नाही. कारण इथं बाबांचा अधिकार असतो. पण हे आवार सोडून बाहेर जाणं म्हणजे भयंकरच की. समजा सौदच्या अंगावरचं भूत उफाळलं आणि त्यानं आपल्या दावलला काही केलं तर?…. या विचारानं अलमा थरारली. आणि पुन्हा लगबगीनं दर्ग्याच्या बाहेर आली. तर ओढ्यापलिकडच्या झाडीतून खालच्या अंगानं दर्ग्याच्या दिशेनं कुणी तरी धावत येताना दिसलं.
संध्याकाळच्या सावळात अलमाला नीट दिसेना.
ते कुणी तरी धावत टेपाड चढून खूप जवळ आलं तेव्हा अलमानं त्याला ओळखलं. तो दावल होता. वार्यावर उडणार्या काडीसारखा तो पळत होता. आणि पळता पळता सारखा मागं वळून झाडीकडं पाहत होता. त्याला पाहताच अलमाचा जीव थिरावला.
दावल आला आणि अलमाला ओलांडून धावतच दर्ग्यात शिरला. त्याचं ओलांडणं असं की, जणू त्यानं अलमाला ओळखलंच नसावं किंवा स्वत:शिवाय कशातच लक्ष नसावं त्याचं. अलमाला आश्चर्य वाटलं. त्याच वेळी जाणवलं की, तो फार घाबरलाय कशाला तरी…
अलमा परत दर्ग्याकडं वळणार तर पुन्हा झाडीतून कुणी तरी बाहेर येताना दिसलं तिला. एक झुंड सावली विलग होत गेली. पाच सावल्या झाल्या.
त्या सावल्या पूर्णपणे दर्ग्याकडं आल्याच नाहीत. मधूनच रस्ता सोडून मठीकडं वळला. त्यांच्या मठीकडं वळण्यावरून आणि वेशांच्या अकारावरून तिनं ओळखलं की, ते पाच फकीर आहेत. चिंदी फकीर एक आणि तिच्या घरी आलेले ते चार जण….
अलमा माघारी वळून दर्ग्यात आली, तर दावल एखाद्या भेदरलेल्या कुत्र्यागत मांड्यांमध्ये हात दाबून ओवरीच्या एका कोपर्यात साचून बसला होता. जणू त्या कोपर्यानं त्याला गिळून घ्यावं अशी त्याची इच्छा असावी. नजर साकळून गेली होती त्याची आणि चेहर्याचं लुकडं कातडं आणखीनच ताणलं गेलं होतं. तो खूपच घाबरलेला जाणवत होता. आज किती तरी वर्षांनंतर भीतीची एक भावना प्रकर्षानं त्याच्या तोंडावर उमटलेली अलमाला दिसत होती.
अलमानं त्याला विचारलं,
“क्या हुआ रे दावल?”
तो गप्प.
“सौद मेरे साथमें था ना?”
तो ठार स्थिर.
तिनं त्याच्या खांद्यावर हात ठेवला तर तो एकाएकी प्रचंड शहारला. आणि पुन्हा वाळल्या कातड्यागत आकसून गेला.
आलमा गोंधळून गेली.
सकाळी कुणी तरी बोंब ठोकत आलं, ओढ्यापलिकडच्या जंगलात एक मुडदा पडलाय म्हणून.
दर्ग्यातले सारे शहाणे धावले तिकडं. अलमाला जायचं होतं, पण दावलला सोडून जावंसं वाटेना तिला. दावल अजूनही ओवरीच्या त्याच कोपर्यात बसून होता. तसाच मांड्यांमध्ये हात दाबून. भेदरलेला. कोपरा सोडायलाच तयार नव्हता तो. काल रात्री आणि आज सकाळीसुद्धा काहीच खाल्लं नव्हतं त्यानं. तोंडात घास घ्यायचा आणि पुन्हा जिभेनं बाहेर ढकलून द्यायचा. हातानं धरून उठवण्याचा प्रयत्न केला तर अंग आकसून घ्यायचं… डोळे टक्क उघडे होते त्याचे आणि अगदी समोरच्या आवाराच्या भिंतीवर खिळले होते. गोठलेले. जणू त्या भिंतीवर आरपार तो ओढ्यापलिकडची झाडी पाहत असावा.
पोरगं असं काय करू लागलंय हे अलमाला कळेना. त्याच्या नजरेच्या दिशेनं ती त्या भिंतीकडं पाहायची. तो एकटक काय पाहतोय तो शोधायची. पण भिंतीशिवाय तिला काही दिसायचं नाही. तेव्हा तिची नजर आपोआप भिंतीवरच्या आभाळात जायची. तर ओढ्यापलिकडच्या झाडीच्या डोईवरच्या आभाळात तिला कावळे आणि गिधाडं चक्रावताना दिसायची. एखाद्या गिधाडाचं भक्ष्य मिळाल्याच्या आनंदाचं चिरचिरणं मधूनच कानावर पडायचं. ती अंदाजानं ओळखायची की त्या जंगलात पडलेल्या मुडद्याभोवती ही गिधाडं, कावळे फेर्या घालतायंत.
मधूनच कावळे, गिधाडं एकमेकांचा पाठलाग करायची, एकमेकांना तारायची. भण्याच्या हक्कासाठी भांडल्यागत….
आणि मग पुन्हा तिची नजर हताशपणे कडं वळायची. मनात कळवळा माजायचा तिच्या.
सुलेमा त्या जंगलात जाऊन आली आणि येऊन अलमाच्या शेजारीच बसत, काळजीनं म्हणाली,
“काममेंसे गया देखो छोरा.”
“कौन?”
“ओ, क्या नाम उसका… सौद.”
“हां, उसका क्या?”
“उस सौदकाच मुडदा पड्यय जंगलमें.”
“मां गे!”
“पुरा बदन तुटेलाय उसका. मुंमेसे, नाकमेंसे भोत खून निकल्याय. सारा आंग कालानिल्ला व्हयलाय.”
“कैसा जी हुया ऐसा?”
“लोका बोलते, उसके उप्परका शैतान इतना जबरदस्त था की, उस शैताननेच उसकी जान लिया. खून निचडके निकाल्या आंगमेका….”
सुलेमा लोक काय म्हणतात ते सांगत राहिली. सौदचं भूत एवढं जबरदस्त होतं म्हणे की, त्यानंच शेवटी सौदचा जीव घेतला. त्याचं रक्त पिळून काढलं. सौद जर दर्ग्याचं आवार सोडून गेला नसता तर काही झालं नसतं. इथं त्याला खाकशावलीचं संरक्षण मिळालं असतं. पण त्याच्यावर त्या भुताचा एवढा प्रभाव होता की, त्या प्रभावाखाली तो तिकडच्या जंगलात गेला आणि जीव गमावून बसला. आधीच त्याच्या डोक्यावरचं ते भूत तो इथं इलाजासाठी आला म्हणून खवळलं होतं. त्यामुळंच ते चिंदी फकीराला उलट उत्तरं करायचं. डिवचायचं, आणि सौद इथनं कधी बाहेर पडतोय याची वाटच पाहायचं. काल संध्याकाळी सौद इथनं बाहेर पडला. खाकशावली बाबाच्या हद्दीबाहेर त्या जंगलात गेला आणि त्याला लागलेल्या त्या भुतानं बरोबर बदला घेतला….
अलमाचं डोकंच गरगरलं.
काल संध्याकाळी… सौद…. दावलसुद्धा त्याच्याबरोबर जंगलात गेला होता. जंगलात…. दावल घाबरत जंगलाकडून पळत आला… रडणं, हसणं, सुखदु:ख व्यक्त करणं, या सार्याच भावना पुसून गेलेला दावल काल पहिल्यांदा घाबरला होता… अजूनही… कदाचित सौदच्या अंगावरचं ते भूतच दावलला दिसलं…. मग त्याच्या पाठोपाठ येणारे पाची फकीर… ते…. ते….? कदाचित सौदला परत आणायला… कदाचित सौदचं भूत उतरावयाला जंगलात… कदाचित….
अलमाचं डोकंच दुखू लागलं.
पण तिनं एक ठरवून टाकलं. यानंतर कधी दावलला दर्ग्याबाहेर पडू द्यायचं नाही. कधीच नाही. न जाणो त्याच्या डोक्यावर बसलेल्या पीरानं त्याला खेचून जंगलात नेलं. आणि सौदसारखाच दावलचा जीव घेतला तर…. नको नको….
“मां….” अलमा अस्फुट किंचाळली.
अलमा मठीवर गेली.
पाचही फकीर मिळून चिलमीचा धूर काढत बसलेले. चिंदी फकीर सर्वात जबरदस्त. सर्वांचा प्रमुख वाटत होता.
चारी फकिरांनी अलमाला विचारलं,
“कैसी हो मांजी?”
“अल्लाकी, दुवा है…” थकल्या आवाजात ती म्हणाली.
“कैसा है आपका बेटा?”
“हैं वैसाच हैं.” मग हळूच घुटमळत तिनं विचारलं, “वो… कलका लडका…. सौद….”
चौघं चपापले. पण चिंदी फकिराचे डोळे तावले. नथन्या फुलल्या. तो चिडल्यागत म्हणाला,
“उसपर बैठा शैतान बहोतही खतरनाक था. खाकशावलीके खिलाफ बडबडा रहा था. तुम लोगोंको भडका रहा था. सो बाबाने सजा दी उसे…. सजा दी.” तो रागातच आडदांड हसला.
अलमा थरथरली.
“बाबाके खिलाफ बोलनेवालेका हश्र यही होता है.”
बाकीचे फकीरही हसले मग.
अलमानं भक्तीभावानं त्यांच्यासमोर गांज्याची एक पुडी ठेवली.
तीनचार दिवस ओढ्यापलिकडल्या जंगलावर गिधाडं आणि कावळ्यांची भ्रमणं चालू होती.
दावल अजूनही ओवरीच्या त्याच कोपर्यात बसून त्या झाडीच्या दिशेच्या भिंतीकडंच नजर लावून बसलेला असायचा. खायचा नाही. प्यायचा नाही. हलायचासुद्धा नाही. भरवलेले घास थुंकायचा.
अलमा हतबुद्ध होऊन रडायची.
अलमानं चिंदी फकीराला जाऊन सांगितलं, दावल आता नवीनच प्रकार करतोय.
खात नाही, झोपत नाही. फक्त एकटक….
चिंदी फकीर त्याला पाहायला आला.
तो दावलच्या अगदी नजरेसमोर जाऊन उभा राहिला. पण दावलची नजर शून्य. बर्फ. काही फरकच नाही. जणू फकिराच्या अंकातनं ती भिंत आणि भिंतीतून पलिकडची झाडी त्याला दिसत असावी….
मग फकिरानं ओढ्यातनं दुवाचं पाणी मागवलं. आणि ते पाणी हातावर घेऊन सप्पकन दावलच्या तोंडावर मारलं.
खडबडून जागा झाल्यागत दावल हडबडला. त्याचं लक्ष चिंदी फकिराच्या तोंडाकडं गेलं. तसा तो आऽ आऽ आऽ करत ओरडू लागला. आणि एखादं भयानक दृश्य पहायला लागू नये म्हणून झाकावं तसं तोंड झाकून घेऊ लागला. स्वत:शी छटपटू लागला. जीवघेण्या वेदना झाल्यागत…
एवढ्या वर्षानंतर दावलच्या घशातून एवढा सलग आवाज निघत होता. त्याचं ओरडणं चालूच होतं.
चिंदी फकीर गंभीरपणे म्हणाला,
“इपरके पीरका असर बहोतही बढ गया है और उसमें सौदका शैतान लगा हैं इसे….”
अलमा ढासळूनच गेली.
फकिरानं सांगितलं, दावलला स्वत: सौदच्या भुतानं झपाटलंय. मग दर्गाभर वार्ता पसरली, परवा मेलेल्या त्या सौद नावाच्या पोराचंच भूत झालंय….
तोवर झाडीवरच्या आभाळात भ्रमणारी गिधाडं, कावळी बंद झाली होती.
पौर्णिमा उगवली.
चंद्रकिरणांनी नगारखाना पार करून दर्ग्याच्या पायरीला पहिला स्पर्श केला आणि नगारा झडू लागला.
त्या तालावर भुताखेतांनी झपाटलेल्यांचा, करणी झालेल्यांचा, अंगात येणारांचा आणि त्यांना सांभाळणारांचा असा एकच कोलाहल दर्ग्याच्या परिसरात निनादू लागला.
चिंदी फकिरानं अलमाला येऊन सांगितलं,
“आज तुम्हारे बेटेकू बेडी चढायेंगे….”
अलमानं कसंबसं ओढत, रेटत दावलला ओवरीच्या कोपर्यातनं बाहेर काढलं. आणि दर्ग्यासमोर आणलं.
दावलला उभंसुद्धा राहता येत नव्हतं. पाच दिवस पोटात काहीच नव्हतं त्याच्या. हल्लक झालेला होता अगदी तो. शक्ती राहिली नव्हती त्याच्यात. नाजूक वेलीला काठीचा आधार द्यावा तसा आधार देत अलमा त्याला कसंबसं उभं ठेवत होती. मनात म्हणत होती, “बाबा खाकशावली… मेरे बेटेकू अच्छा करो बाबा…. अच्छा करो… इतना अकेलाच बेटा है मेरा… मेरे बुढतपनका आसरा…. ये अच्छा हुया तो इसकू बंगड्याका दुकान दालके दिऊंगी मैं…. आन उसके आनेवाले पैशेमेसे हरसाल तुमकू शेरनी चढाऊंगी… मेरे बच्चेकू बचाव बाबा… बाबा….’ तिचं मन रडू लागलं होतं.
दर्ग्याच्या आवारातल्या इतर झाडांची हजेरी घेत चिंदी फकीर आसूड फडकावत दावलच्या समोर येऊन उभा राहिला.
दर्ग्याच्या चांद मुजावरनं धावतपळत दर्ग्यातून एक बेडी आणून फकिराच्या हातात ठेवली. गळ्यात घालायचं एक लोखंडी कडं आणि त्या कड्यालाच नऊदहा हातांची साखळी…. ती बेडी.
“या बाबा खाकशावली….” फकिरानं आरोळी ठोकली. आणि बेडी घालण्यासाठी दावलची मान त्यानं वर उचलली.
दावलची बुबळं हलली. त्याची नजर फकिराच्या चेहर्यावर पडली. आणि भयंकर भूत पाहिल्यागत तो आऽ आऽ आऽ करत ओरडू लागला. मुक्या माणसानं ओरडावं तसा. अंगात जीव नसतानाही सुटण्यासाठी धडपडू लागला. पळायला पाहू लागला. त्याला सावरताना अलमाची तिरपीट उडाली. तिला वाटलं, बाबाची बेडी पाहूनच दावलच्या अंगावरचं सौदचं भूत घाबरलंय….
दावल दाद देत नाही असं पाहिल्यावर फकिरानं अलमाला सांगितलं,
“तुम छोड दो इसे.”
फकिराचा चेहरा रौद्र झाला होता त्यावेळी.
भेदरलेल्या अलमानं दावलला सोडलं. तसा अंगातली हवा संपल्यागत तो खाली जमिनीवर ढासळला. अलमा आधार देऊ गेली. पण फकिरानं तिला इशार्यानंच दूर ठेवलं. आणि त्याच वेळी तो आसूड उंचावून पडलेल्या दावलच्या फटके अंगावर मारू लागला. फडाक फडाक फडाक.
दावल आऽ आऽ आऽ करत छटपटत राहिला. तळमळत राहिला. उलथापालथा होत राहिला. त्याला उठताही येईना….
मग हळूहळू दावलचा आवाज मंद पडत गेला. थांबला. मग छटपटणंही बंद झालं. तो निपचित झाला. वाकडातिकडा गोळा होऊन पडून राहिला….
फकिराचे भीषण हात थांबले.
मग त्यानं खाली बसून दावलच्या गळ्यात बेडीचं कडं अडकवलं. आणि बेडीच्या साखळीचं दुसरं टोक अलमाकडं देत म्हणाला,
“कुछही देरमें ये उठकर बैठेगा, तबतक ये बेडी अपने हातोमेंही रखना.”
फकीर इतर झाडांकडं पाहायला पुढं निघून गेला. अलमा साखळीचं टोक घट्ट पकडून दावल उठण्याची वाट पाहत त्याच्या शेजारी वाळूवर बसून राहिली.
दावल तसाच स्तब्ध अचल, वेडावाकडा पालथा पडलेला.
आसपास कोलाहलही उत्तररात्रीपर्यंत जोशात, जोरात.
सकाळ झाली.
दावल उठण्याची वाट पाहता पाहता रात्री कधी तरी तिथंच वाळूवर लुढकलेली अलमा जागी झाली. अजून तिच्या मुठीत बेडीच्या साखळीचं एक टोक घट्ट धरलेलं. दुसर्या टोकाचं कडं अस्ताव्यस्त पडलेल्या दावलच्या गळ्यात जणू एखाद्या मालकानं त्याची साखळी धरावी, तसं दृश्य. रात्र अशीच सरली होती…. आता खाकशावलीची बेडी घातलीय म्हटल्यावर दावल काही काळातच नीट होईल असा अलमाला भरोसा वाटू लागलेला.
ती हालचाल करत उठून बसली. तशी खळखळ झाली साखळीची. अलमाला वाटलं, त्या आवाजानं तो उठेल.
मग ती थोडा वेळ तशीच वाट पाहत राहिली. पण तो उठेना.
तशीच जमिनीवर सरकत ती पुढं झाली. त्याच्याजवळ गेली. आणि त्याच्या पाठीवर हळूवार हात ठेवत तेवढ्याच मायाळू आवाजात तिनं त्याला हाक दिली,
“दावल….”
पण त्याची हालचाल नाही.
तिनं पुन्हा हाक दिली.
तो थंड.
पुन्हा हाक.
तो गार.
पुन्हा हलवून हाक.
प्रतिसाद नाही.
पुन्हा व्याकुळ हाक.
नाहीच.
मग तिच्या हाकांवर हाका सुरू झाल्या.
त्याचा प्राण रात्रीच कधी तरी निघून गेलेला. तर उत्तर कुठून येणार? शेवटी आभाळ भेदून जाईल असा टाहो फुटला अलमाच्या मुखातून. सारी दर्गाच थरारली.
चिंदी फकिरानं सांगितलं की, सौदके शैतानने दावलकी जान ली. आणि मग त्यानंच दावलच्या जनाज्याची व्यवस्था केली.
कुठल्या कुठल्या भागांतून नात्याच्या ना गोताच्या आलेल्या लोकांनी दावलला खांदा दिला आणि ओढ्यापलिकडच्या झाडीत त्याचा दफनविधी करण्यात आला.
आजकाल अंगानं भलतीच खालावून गेलेली जख्ख अलमा दर्ग्याच्या आवारात इकडंतिकडं हिंडत असते. अवतार भयंकर असतो तिचा. वस्त्राचं भान नसतं. झिंज्या पिंजारलेल्या असतात. आणि हातात असतात निरनिराळ्या आकारप्रकारांच्या रंगीबेरंगी बांगड्या एका धाग्यात त्या गुंतवलेल्या असतात….. त्या बांगड्या तिनं इथंतिथं मागून एकेक करत गोळा केलेल्या असतात.
अलमा खाकशावलीच्या आवारातल्या प्रत्येक बाईसमोर जाते. हातातल्या बांगड्यांचा गुच्छ खळखळ वाजवते. आपलं बोळकं वासून बेसुमार हसते. हसता हसताच रडू लागते. आणि रडता रडता केविलवाणं म्हणत राहते,
“बंगड्या भरते क्या बंगड्या? भरो जी…. भरो. मेरेकू पैशेकी भोत जरूरत हैं….. भोत जरूरत हैं… मेरे दावलकू दुकान निकालनेके देने काय… उसकी शादी करनेकीय….. बहू लानेकीय… जानजमान व्हायलाय छोरा…. किसने दिन रखनेका वैसाच उसकू?….’ भरते क्या, भरते बंगड्या?…. भरो जी…..” आणि बडबडतानाच पुन्हा हसू लागते. तेव्हा भेसूर भासते.
कुणीही तिच्या बांगड्या भरत नाही. कारण सर्वांना वाटतंय, की ती वेडी आहे म्हणून.
सुलेमा कधीचीच निघून गेलीय. स्वत:च्या पोरीला घेऊन. तिची पोरगी जाताना गरोदर होती.
अलमा तिथंच आहे.
पौर्णिमा येते.
अलमा दर्ग्यासमोर येऊन बसते.
चंद्रकिरणं नगारखाना ओलांडून दर्ग्याच्या पायरीला शिवतात. नगारा दणदणू लागतो. कोलाहल सुरू होतो.
आणि अलमा आळोखेपिळोखे देत अंग झटकत घुमू लागते. तिच्या रूपेरी झिंज्या चंद्रप्रकाशात चमकत राहतात…. चिंदी फकीर आसूड फडकावत तिच्यासमोर येऊन उभा राहतो. अलमा जीव खाऊन किंचाळत राहते. चित्रविचित्र आवाज काढते. अंगाला हिसके देत राहते. बिनझपाटलेली माणसं म्हणतात, दावलंच भूत झालंय आणि त्यानंच अलमाला झपाटलंय….
अन् चिंदी फकीर विखारी हसतो फक्त.
– राजन खान