वाचकहो, मे 2014 च्या अंकात आपण जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणीसाठी जनसंवाद यात्रेची सफर गडचिरोली जिल्ह्यापर्यंत केली. आता आपण ही सफर पुढे चालू करत आहोत. चंद्रपूर जिल्ह्यापासून 16 एप्रिल सकाळी 9.30 ते 12.30 शरदचंद्र पवार विद्यालय, व्याहाडखुर्द (ता.सावली) चा कार्यक्रम करून दुपारी 1.30 ते 3.30 राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व वाणिज्य महाविद्यालय(सावली) येथे कार्यक्रम सादर केला. पुढे 4.45 ते 6 सोमनाथ प्रकल्पाला भेट देऊन कार्यक्रम सादर केला. रात्री 8 ते 10 गोंडवन शिक्षक प्रसारक मंडळ, चंद्रपूर यांचे मातोश्री बालवाडी प्राथमिक, उच्च माध्यमिक तथा गर्ल्स अध्यापक विद्यालय येथे कार्यक्रम सादर केला.
दुसरे दिवशी 17 एप्रिलला सकाळी 9.30 ते 12 कला, वाणिज्य महाविद्यालय, बल्लारपूर येथून दुपारी 3.30 ते 5 सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन(सीटू) चंद्रपूर येथे कार्यक्रम करून पुढे रात्री 8 ते 10.30 ऊर्जानगर येथे कार्यक्रम सादर केला. दि.18 एप्रिलला आम्ही आनंदवन-वरोरा ग्रामपंचायत समिती येथे सकाळी 8 ते 9.30 कार्यक्रम सादर केला.

पुढे 19 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केला. वणी तहसील बोर्डी ग्रामपंचायत येथे कार्यक्रम सादर करून पुढे पांढरकवडा येथे सायंकाळी 6 ते 8 कार्यक्रम सादर केला. 20 एप्रिलला सकाळी वर्धा जिल्ह्यातील पहिला कार्यक्रम सकाळी 8 ते 11 जिल्हा समादेशक-होमगार्ड वर्धा येथे करून 11 ते 12.30 मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह उमरी(मेहरे) वर्धा येथे कार्यक्रम केला. सायंकाळी 5 ते 7 जयसेन सामाजिक संस्था, मसाळा(जि.वर्धा) येथे कार्यक्रम करून रात्री 9 ते 10 सेलसुरा गावात जाहीर कार्यक्रम केला.
दि.21 एप्रिल रोजी यवतमाळ जिल्ह्यात प्रवेश केला. सकाळी 10 ते 11.30 लालखिंड येथे कार्यक्रम करून दुपारी 1 ते 3 आंबेडकरनगर, दिग्रस येथे कार्यक्रम केला. रात्री ग्रामपंचायत कार्यालय, तरोडा येथे 9 ते 11 जाहीर कार्यक्रम सादर करून पुढे दि.22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात प्रवेश केला. दुपारी 12 ते 2 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अर्धापूर येथे कार्यक्रम करून सायंकाळी 4.30 वाजता लोकमत कार्यालय, नांदेडला भेट देऊन रात्री बौद्ध विहार, पावडेवाडी येथे जाहीर कार्यक्रम केला. दुसर्या दिवशी 23 एप्रिलला 10.30 ते 12.30 पोलिस मुख्यालयात नांदेड पोलीस उपअधिक्षक विजय कबाडे यांची भेट घेऊन पुस्तक देऊन सत्कार केला. (सदर पोलीस अधिकारी यांनी जादूटोणा कार्याक्रमांतर्गत पहिली केस नोंदवली आहे.) दुपारी 3 वाजता जलसंपदा विभाग वर्कशॉप, नांदेड येथे कार्यक्रम करून सायंकाळी 6 वाजता विष्णुपुरी, नांदेड बौद्ध विहारात कार्यक्रम सादर केला. दि.24 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुदखेड येथे कार्यक्रम सादर करून दु.4 वाजता किनवट येथील साने गुरूजी रूग्णालय, भारत ज्येष्ठ युवा अकादमी यांचे वतीने राष्ट्र सेवा दलाचे शिबीरात कार्यक्रम सादर केला. रात्री 8.30 वाजता मौ.हार्डप, ता.माहुर, जि.नांदेड येथे जाहीर कार्यक्रम सादर केला. दुसर्या दिवशी दि.25 एप्रिल रोजी नांदेडकडे प्रवास करून उमरखेड येथे मनोज मानकर पोलीस उपनिरीक्षक यांची घरी भेट घेऊन(सदर पोलीस अधिकारी यांचे आंतरजातीय लग्न अंनिसने लावले आहे.) रात्री 8 वाजता प्रभातनगर नागसेन विद्यालयाच्या प्रांगणात भैय्यासाहेब आंबेडकर हॉलमध्ये जादूटोणा विरोधी कायदा प्रभावी अंमलबजावणी जाहीर कार्यक्रम सादर केला.
दि.26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सिटी पोलीस ठाणे सभागृह हिंगोली येथे अधिकार्यांसाठी कार्यक्रम सादर केला. दुपारी 2.30 वाजता कळमनुरी येथे उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या सभागृहात कार्यक्रम करून रात्री 7 वाजता वसमतनगर येथे सुभेदार रामजीनगर बौद्ध विहार मध्ये कार्यक्रम सादर केला. दि.27 एप्रिल रोजी परभणी जिल्ह्यात प्रवेश करून सकाळी 6.50 वाजता पुणे व औरंगाबाद आकाशवाणी केंद्रावर जनसंवाद यात्रेची चर्चा करून सकाळी 9 वाजता ब्राम्हणगाव ग्रामपंचायत शेजारील मंदिरात कार्यक्रम सादर करून दुपारी 1 वाजता बोरी, ता.जिंतूर येथे जाधव साडी सेंटर समोर जाहीर कार्यक्रम केला. सायंकाळी 5.30 वाजता ज्ञानसाधना प्रतिष्ठानद्वारा संचलित रायरेश्वर महिला कनिष्ठ विद्यालय, धर्मापुरी येथे कार्यक्रम करून दुसर्या दिवशी 28 एप्रिलला सकाळी 8.30 वाजता सावित्रीबाई फुले कन्या विद्यालय येथे कार्यक्रम करून दुपारी 3 वाजता विश्वशांती शैक्षणिक संकुल येथे कार्यक्रम सादर केला.

पुढे रात्री लातूर जिल्ह्याकडे प्रवास करून सकाळी(29 एप्रिल) 8.30 वाजता गंजगोलाई येथे नागरिकांसमोर कार्यक्रम करून सकाळी 11.30 वाजता जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयातील सभागृहात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी कार्यक्रम करून सायंकाळी शाहू महाविद्यालय व्ही.एस.पी.हॉलमध्ये जाहीर कार्यक्रम. रात्री उदगीरकडे प्रवास करून 30 एप्रिलला सकाळी 9 वाजता उदगीर पोलीस ठाण्यात कार्यक्रम सादर केला. सायंकाळी 5 वाजता गटसंधान अधिकारी कार्यालय देवणी येथे कार्यक्रम करून निलंगाकडे प्रवास दुसरे दिवशी 1 मे ला सकाळी 8.30 वाजता नणंद, ता.निलंगा ग्रामपंचायजवळ कार्यक्रम सायंकाळी 8 ते 10.30 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंबाळवाडी, ता.चाकूर येथे कार्यक्रम करून औसा येथे मुक्कामी पोहचलो. दि.2 मे रोजी औसा गावात नगरपालिका व शहरवासीयांतर्फे कार्यक्रम आयोजित करून दुपारी 1.30 ते 2.30 लामजना जि.प.येथे कार्यक्रम सादरकेला.
रात्री उस्मानाबाद जिल्ह्याकडे प्रवास करून सकाळी 10 वाजता उमरगा येथे शिवाजी चौकात यात्रेचे स्वागत होऊन 10.30 वाजता मुरूमकडे रवाना. प्रतिभानिकेतन विद्यालयात कार्यक्रम करून पुढे काळा हिंबाळा या भूकंमग्रस्त गावात पोहोचलो. वादळीवारे पाऊस यामुळे कार्यक्रम रद्द करावा लागला. दुसर्या दिवशी 4 मे रोजी 8.30 वाजता ‘आपलं घर’ ला भेट देऊन 12.30 वाजता पोलीस अधिक्षक यांची भेट व चर्चा. रात्री 7.30 ते 9.30 आळणी या गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री 10.30 ते 11.30 चोराखळी, जि.उस्मानाबाद येथे गावात जाहीर कार्यक्रम केला.

पुढे रात्री बीड जिल्ह्यात प्रवेश करून दि.5 मे रोजी सकाळी 8.30 ते 10.30 बसस्थानक येथे जाहीर कार्यक्रम करून दुपारी 12 ते 2 ओडस येथे जाहीर कार्यक्रम केला. दुपारी 3 ते 5 अंबाजोगाई येथे योगेश्वरी शिक्षण संस्थेमध्ये कार्यक्रम करून रात्री 9 ते 10.30 पळसखेडा येथे गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री अंबेजोगाईकडे रवाना झालो. दि.6 मे रोजी 10 ते 11.30 परळी वैजनाथ येथे मराठवाडा शिक्षक संघातर्फे, समविचारी संघटना, गावातील नागरीक व शिक्षक यांचेपुढे कार्यक्रम करून दुपारी 1 ते 3 शिरसाळा येथे फिनिक्स ग्रुप व पंडित गुरू वारडीकर महाविद्यालयातर्फे गावात ढोल-ताशा वाजवून जल्लोषात स्वागत व कार्यक्रम रात्री देवदहीफळ येथे जाहीर कार्यक्रम करून बीड शहराकडे मुक्कामी. दि.7 मे रोजी सकाळी 9 ते 10.30 अंबील वडगाव या गावात जाहीर कार्यक्रम करून 12 ते 2 या वेळेत पोलीस अधिक्षक कार्यालयात पी.एस.आय., डी.वाय.एस.पी. यांच्यापुढे कार्यक्रम करून रात्री 5 ते 6.30 जाहीर कार्यक्रम समविचारी संघटना, महिला व बाल विकास व इतर ग्रामस्थ यांच्यापुढे कार्यक्रम करून रात्री 7.30 ते 9 वाजता गेवराई गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री जालना जिल्ह्यात मुक्कामी पोहचलो.
दि.8 मे रोजी दुपारी 2 ते 3 जिल्हा वकील संघ जालना यांचेपुढे कार्यक्रम सादर करून रात्री पांगरा गुडदे या गावात जाहीर कार्यक्रम सादर केला. दुसर्या दिवशी दुपारी 1 ते 2 इंदिरा गांधी मानवता साक्षर शिक्षण व व्यायाम प्रसारक मंडळ, जालना या ठिकाणी कार्यक्रम करून दुपारी 2 ते 4 कृषी विकास केंद्र येथे शेतकर्यांसमोर कार्यक्रम सायंकाळी 5 ते 7.30 पोलीस प्रशिक्षण केंद्र, जालना येथे कायद्याचे प्रशिक्षण एक हजार नवीन पोलीस भरती झालेल्या उमेदवारांना देऊन रात्री औरंगाबाद जिल्ह्याकडे रवाना दि.10 मे रोजी सकाळी 8 ते 9, 9 ते 10 असे एक एक तासाचे एकूण 6 कार्यक्रम दिवसभर चाटे क्लासेस, औरंगाबाद येथे घेण्यात आले. सायंकाळी 7.30 ते 10 आंबेडकर वस्तीमध्ये(बिजवाडी) या ठिकाणी जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. दि.11 मे रोजी मसनतपूर-अशोकनगर येथे सकाळी 8.30 ते 10 आंबेडकर वस्तीवर कार्यक्रम करून दुपारी 1 ते 2.30 सावित्रीबाई फुले वसतीगृह यांच्यापुढे कार्यक्रम करून सायंकाळी 6 ते 8.30 वैजापूर गावात जाहीर कार्यक्रम सादर केला. पुढे अहमदनगर जिल्ह्यात प्रवेश करून दि.12 रोजी सकाळी सह्याद्री ज्युनिअर कॉलेज, संगमनेर या ठिकाणी कार्यक्रम करून 10.30 ते 12.30 सह्याद्री विद्यालयात कार्यक्रम सादर केला. 13 मे रोजी सकाळी 8 ते 11.30 भानसहिवरा या गावात जाहीर कार्यक्रम करून दुपारी 12.30 ते 2.50 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, शेवगाव येथे कार्यक्रम सादर केला. पुढे सायंकाळी 6 ते 8 पाथर्डी या गावात अंनिस शाखेच्या वतीने कार्यक्रम सादर केला. दि.14 मे रोजी निमगाव वाघा येथे नवनाथ विद्यालयामध्ये कार्यक्रम करून जिल्हा हमाल पंचायत अहमदनगर येथे दुपारी 12.30 ते 2.30 कार्यक्रम सादर करून दुपारी 4.30 ते 6.30 घ- झठख कंपनीतील 40 महिलांसाठी कार्यक्रम सादर केला. रात्री सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याकडे रवाना.
दि.15 मे रोजी सकाळी मोहिते सरांच्या घरापासून वाजत गाजत करमाळा शहरातून यात्रेकरूंची मिरवणूक काढून डॉ.आंबेडकर, ज्योतिबा फुले पुतळ्यांना पुष्पहार घालून 11 ते 12.30 या वेळेत ज्ञानेश्वर वाचनालय, करमाळा येथे जाहीर कार्यक्रम डी.वाय.एस.पी.यांचे प्रमुख उपस्थितीत पुढे दुपारी 2.30 ते 4 जेऊर ग्रामपंचायत कार्यालयात मिरवणुकीने यात्रेचे स्वागत करून कार्यालयात कार्यक्रम. रात्री 6 वाजता माढा येथील शिवाजी चौकात छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती जयंती उत्सव समिती व रोटरी क्लब आयोजित जाहीर कार्यक्रम करून रात्री मोहोळला मुक्कामी. 16 मे रोजी निवडणूक निकाल असल्याने कार्यक्रम होऊ शकले नाहीत. यावेळेत गाडीची सर्व कामे पूर्ण करून आम्ही रात्री सोलापूर शहरात मुक्कामी पोचलो.
दि.17 मे रोजी सकाळी 10.30 ते 12.30 औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विजापूर रोड, सोलापूर येथे विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करून सायंकाळी 7 ते 9 सांगोला नगरपरिषद येथे जाहीर कार्यक्रम करून रात्री मुक्कामी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे पोहोचलो. सकाळी 9.30 ते 11 अल्फा बाईट कॉम्प्युटर्स या संस्थेत कार्यक्रम सादर करून दुपारी 2 वाजता वसुंधरा वाहिनी(आकाशवाणी, बारामती) वर कार्यक्रमाचे रेकॉर्डिंग केले. 3 वाजता ज्येष्ठ नागरीक संघ, बारामती यांच्यापुढे कार्यक्रम सादर केला. सायंकाळी 7 वाजता महात्मा फुले यांचे जन्मगाव खानवडी बेलसा येथे जाहीर कार्यक्रम करून यात्रा पुणे शहरात रात्री उशिरा मुक्कामी पोहोचली. दि.19 मे रोजी सकाळी 11 ते 12.30 पोलीस प्रशिक्षण केंद्र, लोणावळा येथे 550 महिला पोलिसांसमोर कार्यक्रम सादर करून दुपारी 2 वाजता नगरपरिषद, लोणावळा हॉलमध्ये सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी कार्यक्रम सादर केला. सायंकाळी 5 वाजता बुद्ध विहार, आकुर्डी येथे स्पर्धापरिक्षा अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करून रात्री 7 ते 9 क्रिएटिव्ह अॅकॅडमी येथे 450 विद्यार्थी-विद्यार्थिनीसमोर कार्यक्रम सादर केला. दुसर्या दिवशी 20 मे सकाळी 8 ते 10 ओंकारेश्वर पुलावर निदर्शने कार्यक्रमात यात्रेने सहभाग घेतला.(शहीद डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाला 9 महिने पूर्ण होऊनही तपास लागत नसल्याच्या निषेधार्थ) दुपारी 1 ते 3 साधना विद्यालय, हडपसर येथील वसतीगृहातील विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करून सायंकाळी 7 ते 8.30 स्वाभिमानी संघटना यांचेवतीने आयोजित कार्यक्रम करून रात्री सातारा जिल्ह्याकडे यात्रेने प्रवास सुरू केला.
21 मे रोजी सातारा जिल्ह्यातील शिरवळ या गावी सरपंच, तहसीलदार यांचे हस्ते स्वागत करून पोलीस स्टेशनमध्ये भेटी घेऊन गावातून फेरी काढली. दुपारी 2 ते 4 सुरभी कॉम्प्युटर येथे विद्यार्थ्यांसमोर कार्यक्रम करून सायंकाळी 6.30 ते 8.30 दिशा अॅकॅडमी स्टडी सेंटर, वाई येथे कार्यक्रम सादर केला. रात्री सातारा शहरात मुक्काम करून 22 मे रोजी पोवई नाका येथे सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक यांचे हस्ते स्वागत, पथनाट्य व संपूर्ण शहरातून रॅली काढून यात्रेकरूंचे स्वागत करण्यात आले. सकाळी 9.30 ते 11.30 सातारा पेशंटस्समोर कार्यक्रम सादर करून सायंकाळी 6.30 ते 8.30 रहिमतपूर येथे डॉ.नरेंद्र दाभोलकर सभागृहात जाहीर कार्यक्रम करून पिंपरी येथे मुक्काम केला. 23 मे रोजी सकाळी सांगली जिल्ह्यातील माहुली या गावात प्रवेश करून मा. आ. अॅड. सदाशिवराव(भाऊ) पाटील सभागृहात जाहीर कार्यक्रम सकाळी 10 ते 11.30 या वेळेत सादर केला. दुपारी 3.30 ते 5 वाजता विटा येथील क्रांतीसिंह नाना पाटील सार्वजनिक वाचनालय हॉलमध्ये कार्यक्रम करून सायंकाळी 7.30 ते 9 आटपाडी येथे मोफत वाचनालयात कार्यक्रम करण्यात आला. दि.24 मे रोजी तासगाव येथे सकाळी चौकात पोलीस निरीक्षक यांचे हस्ते स्वागत करून 10 ते 12 या वेळेत तासगाव पोलीस प्रशिक्षण केंद्रात 225 पी.आय. यांची कार्यशाळा घेण्यात आली. दुपारी 3 वाजता सांगली शहरात यात्रेचे स्वागत करण्यात आले व 3.30 ते 6 वाजता संपूर्ण शहरातून रॅली काढण्यात आली. पुढे यात्रा इस्लामपूर मुक्कामी रवाना झाली.
25 मे रोजी सकाळी 11.15 ते 12.30 महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे स्पर्धा परिक्षा प्रबोधिनीच्या(एम.पी.एस.सी.) विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम करून यात्रा पुढे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणला रवाना झाली. दि.26 मे रोजी सकाळी तळेगाव(तडे) मंडणगडकडे प्रवास करून गावात जाहीर कार्यक्रम सादर करून सायंकाळी 6 ते 8 चिपळूण येथील महिला मंडळ आयोजित कार्यक्रमात सादरीकरण करून रात्री रत्नागिरी शहरात यात्रा मुक्कामी पोचली. दि.27 मे रोजी 11 ते 12.30 देवरूख येथे आंबेडकर भवन येथे कार्यक्रम सादर करून सायंकाळी 6.30 ते 7.30 रत्नागिरी नगरपरिषद वाचनालय या ठिकाणी जाहीर कार्यक्रम करून यात्रा मुक्कामी सिंधुदूर्ग जिल्ह्यातील वैभववाडी येथे पोचली. 28 मे रोजी सकाळी 11.30 ते 12.30 दत्त मंदिर अगरी बाजारपेठेत जाहीर कार्यक्रम सादर करून दुपारी 4 ते 5 कणकवली पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कर्मचार्यांसाठी कार्यक्रम सादर केला. सायंकाळी 6 ते 9 सावंतवाडी येथे जाहीर कार्यक्रम व अॅड.दीपक नेवगी यांच्या स्किझोफ्रेनिया या पुस्तकाचे प्रकाशन करून यात्रा कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा या मुक्कामी पोहोचली. 29 मे रोजी श्रीमंत गंगामाई वाचन मंदिर, आजरा येथे सकाळी 9 ते 11 कार्यक्रम करून दुपारी 1.30 ते 2.30 चंदगड येथे कॉलेजमध्ये कार्यक्रम सादर करण्यात आला. दुपारी नेसरी या गावात मराठी विज्ञान परिषदेचे सर्व कार्यकर्ते व गावकरी यांनी यात्रेचे स्वागत केले. सायंकाळी 6 ते 8 गडहिंग्लज नगरपरिषदेतर्फे नगराध्यक्षा गौराबाई सोनोले यांनी स्वागत केले. समाजवादी प्रबोधिनी शाखा व कार्यकर्ते यांच्यापुढे नगराध्यक्षांच्या केबीनमध्येच कार्यक्रम सादर करण्यात आला. दुपारी 12.30 ते 1.30 राधानगरी येथील ज्येष्ठ नागरीक संघाच्या कार्यक्रमात यात्रेचे स्वागत व कार्यक्रम सादरीकरण करून दुपारी 3 ते 5 शिरगाव या गावात जाहीर कार्यक्रम करून रात्री 8 ते 9.30 वाकरे या गावात जाहीर कार्यक्रम सादर केला. दि.31 मे रोजी सकाळी 10.30 ते 12 कोडोली येथे चौकात जाहीर कार्यक्रम सादर करून दुपारी 2.30 ते 3.30 वाजता कुरूंदवाड येथे राष्ट्र सेवा दलातर्फे गावातून रॅली व चौकात जाहीर कार्यक्रम करून सायंकाळी 6 वाजता इचलकरंजी येथे यात्रा पोचली. अत्यंत भव्य असे स्वागत विविध परिवर्तनवादी संघटनांनी यात्रेचे केले. गावातून फेरी काढून सायंकाळी 6.30 ते 8 वाजता मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये जाहीर कार्यक्रम अत्यंत दिमाखदार असा पार पडला. रात्री यात्रा मुक्कामी कोल्हापूर शहरात पोचली ते 1 जून रोजी होणार्या समारोपाच्या कार्यक्रमाला. दुसर्या दिवशी सकाळी संपूर्ण कोल्हापूर(शिवाजी महाराज पुतळा विटंबना निषेध) बंद असताना देखील गावातील रॅलीने शाहू स्मारक हॉल येथे यात्रेचे आगमन समारोपाच्या कार्यक्रमासाठी झाले. समारोपाचा कार्यक्रम अत्यंत अनोख्या पद्धतीने आणि भावना विवश अशा मन:स्थितीत सुखरूप पार पडला.
अशा पद्धतीने सलगपणे 85 दिवस 33 जिल्हे पूर्ण करून ही यात्रा यशस्वीपणे पूर्ण झाली. आणि अंनिसच्या इतिहासात एक महत्वपूर्ण नोंद यानिमित्ताने झाली हे केवळ अंनिसच्या सर्व साथींमुळेच. त्या सर्वांना अंत:करणपूर्वक धन्यवाद!
–प्रशांत पोतदार
मोबा. 9421121328

एकूण दिवस-85, एकूण जिल्हे-33,
एकूण प्रवास-10,450 कि.मी.,
एकूण उपस्थिती – 31,894
काही ठळक नोंदी
सर्व थरातील समाजासमोर प्रबोधन कार्यक्रम- पोलीस अधिकारी, न्यायाधीश, वकील यांचे विशेष प्रशिक्षण- पुस्तक, सी.डी. यांची उत्तम विक्री- चळवळीत काम करू इच्छिणार्यांची 5000 हून अधिक नोंदणी- निवडणूक काळातही भरपूर प्रसिद्धी – 90% ठिकाणी टोल माफ – अनेक बुवाबाजीच्या प्रकरणांची तक्रार नोंद – यात्रेतील कार्यकर्त्यांची कुटुंबीयांप्रमाणे देखभाल.

जनसंवाद यात्रेतील प्रेरणादायी अनुभव
* शाळा, महाविद्यालये यांना सुट्टी असताना व लोकसभा निवडणुकीचा कालावधी असताना देखील यात्रेतील कार्यक्रमांना 80% ठिकाणी प्रचंड प्रतिसाद.
* सामाजिक बांधिलकी म्हणून फक्त विनंती केल्यावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 90% ठिकाणी यात्रेच्या गाडीला टोल माफ केला.
* संपूर्ण यात्रेत स्वत:हून रहाण्यासाठी लॉज करण्याची वेळ एकदाही आली नाही. सर्व शाखातील कार्यकर्त्यांनी आपले कुटुंबीयच असल्याप्रमाणे सर्व व्यवस्था व आदरातिथ्य केले.
* संपूर्ण यात्रेत अल्पोपहार चहा, जेवण याचा खर्च फक्त 20% आला. घरगुती पाहुणचार सर्व महाराष्ट्रभर झाला.
* यात्रेचे स्वागत अनेक ठिकाणी ढोल, ताशे वाजवून मिरवणुकीने जल्लोषात करण्यात आले.
* संपूर्ण यात्रेत जवळजवळ 5 हजार लोकांच्याकडून(सर्व थरातील) अंनिसमध्ये सक्रिय होण्यासाठी फॉर्म भरून इच्छा प्रदर्शित.
* अनेक विभागातून शाळा, कॉलेज सुरू झाल्यावर अशा स्वरूपाच्या प्रबोधनपर कार्यक्रमाची मागणी.
* यात्रेच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध परिवर्तनवादी संघटना मतभेद विसरून एकत्र.
* बुवाबाजीच्या फसवणूकीचे अनेक किस्से व तक्रारी यांची नोंद.
* डॉ. नरेंद्र दाभोलकर लिखीत व समितीची प्रकाशने तसेच कायद्याच्या सचित्र पुस्तिकेला प्रचंड मागणी.
* जळगाव जिल्ह्यात नरेंद्र महाराजांच्या भक्तांच्या गराड्यात कार्यक्रमाचे सादरीकरण. कार्यक्रमानंतर यात्रेला शुभेच्छा मिळाल्या.
* अनेक जिल्ह्यात पोलीस अधिकारी, कर्मचारी यांची प्रशिक्षण कार्यशाळा.
* अनेक ठिकाणी न्यायाधीश, वकील यांची प्रशिक्षण कार्यशाळा.
* वाडीवस्ती, झोपडपट्टी, बाजारपेठा, एस.टी. स्टँड, गावातील प्रमुख चौक अशा ठिकाणी भर उन्हातही कार्यक्रमाचे सादरीकरण.
* सकाळी 4 साडेचारला दररोज उठून आवरून कधी कधी प्रवास करून दिवसाला 3 ते 7 असे कार्यक्रम सादर करून रात्री झोपायला एक-दीड वाजायचा. तरीही कार्यकर्तेन थकता अत्यंत उत्साहाने सादरीकरण करत.
* कार्यक्रमाला कधी 1000 तर कधी दहा बारा असा प्रेक्षक वर्ग असूनही तेवढ्याच ताकदीने निराश न होता कार्यक्रमाचे संपूर्ण सादरीकरण केले जात.
* यात्रेतील गाडी जुनी असूनही कोणताही छोटा-मोठा अपघात न होता सुखरूप प्रवास.
* संपूर्ण यात्रेत कोठेही यात्रेला विरोध अथवा अडथळा निर्माण झाला नाही.
* यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांना चमत्कार सादरीकरण प्रशिक्षण प्रत्यक्ष अनुभवातून घेता आलं.
* तन, मन, धन या सर्व गोष्टींचा कृतीशील अनुभव घेता आला. छोट्या-छोट्या देणग्याही समितीला यात्रेसाठी मिळाल्या. चळवळीचे आधारवड असलेले हैदरभाई नुराणी, शहादा व रमेश माणगावे, जयसिंगपूर यांनी यात्रेची गाडी त्यांच्या गावात गेल्यावर डिझेल टाकी विनामूल्य पूर्ण भरून दिली.
* वर्तमानपत्र, स्थानिक इलेक्ट्रॉनिक न्यूज चॅनेल्स, राष्ट्रीय चॅनेल्स, आकाशवाणी यांनी ठळक व उचित प्रसिद्धी जनसंवाद यात्रेला दिली.
* यात्रेत महिला कार्यकर्त्यांचा लक्षणीय कृतीशील सहभाग.
* डॉ. नरेद्र दाभोलकर यांनी उभ्या महाराष्ट्र निर्माण केलेल्या विविध पातळीवरील कार्यकर्त्यांचं जाळं किती मोठं आणि त्याच निर्धारानं काम करतंय याची प्रचिती सर्वच ठिकाणी आली.
टीप : जनसंवाद यात्रा महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी गेली तेथील स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या भागातील पेपर कात्रणे, फोटो प्रशांत पोतदार, सातारा यांना पाठवून देणे. त्यांचा फोन नं. 9421121328,
ई – मेल – prashantspotdar@gmail.com