Categories
अभिवादन

विवेकाचे झाड

सप्टेंबर-ऑक्टोबर २०१३

ज्यांच्या कार्यकर्तृत्वावर त्यांच्या हयातीतच मला आदरपूर्वक गौरवाने लिहावयाचे होते, त्या माझ्या जिवलगाविषयी मरणोत्तर मला लिहावं लागेल, असं मला अंधुकसंही वाटलं नव्हतं. पण परवा ‘रक्षा’बंधनाच्या पहाटे डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या केली माथेफिरूंनी.

सर्वसाधारण स्वतःला उच्च विद्याविभूषित वगैरे समजणार्‍या मध्यम वर्गाला ‘अडाणी’ म्हणजे निरक्षर, कष्टकरी, वंचित, दारिद्य्रात जगणारा वर्ग ‘अंधश्रद्ध’ वगैरे वाटत असतो. पण त्यांच्या या तथाकथित ‘अंधश्रद्धा’ या पूर्ण भौतिक हेतूंनी प्रेरित असतात. ‘नारळ, कोंबडी, बकरं’ वगैरेचा बळी हा प्रसाद वाहणं असतं आणि अखेरीस ते ‘पोटा’शी म्हणजे जगण्याशी संबंधित असतं. पण या कृतीमागेही जे विवेकाचे अधिष्ठान पाहिजे ते नसल्यामुळे काहीवेळा ते विकृतीकडेही अमानुषपणे झुकणे शक्य आहे. उदाहरणार्थ बर्‍याच वर्षांपूर्वी घडलेले मानवतचे गुप्तधनाच्या हव्यासाने झालेले लहान मुलांच्या हत्त्येचे बळीकांड. आणि अशा घटना रोखायला बहुसंख्य समाजच बहुतेकवेळा पुढे होतो.

खरा धोका आहे तो दुसर्‍या प्रकारच्या अंध‘अभिनिवेशी’ श्रद्धांचा आणि तो अगदीच भयावह आहे. या अंधश्रद्धेचा बळी सामान्यतः ‘अडाणी’ समजला जाणारा वर्ग नाही. तर स्वतःला ‘सु’शिक्षित समजणारा उच्चविद्याविभूषितांचा. त्यातही चौदा ते चाळीस वयोगटातला तरुण समजला जाणारा अधिक संख्येने. या वर्गाला नेहमीच एक काहीतरी ‘थोर, उदात्त’ वगैरे करण्याची खुमखुमी असते. आपण ज्या समाजात, प्रांतात, देशात जन्माला आलो, त्याचं काहीतरी उत्तरदायित्व निभावण्याची एक आकांक्षा त्यांच्या मनात नैसर्गिकपणे असते. पण प्रस्थापित शिक्षणातून विविध प्रश्नांची नेमकी उत्तरे शोधण्याचे ‘ज्ञान’ आणि ‘भान’ मिळालेलेे नसते. (मेकॉले प्रणित ही शिक्षणव्यवस्था देशी सत्ताधार्‍यांनाही सोयीची आणि हवी असणारी आहे.) प्रचलित शिक्षण व्यवस्था मानवी मेंदूना फक्त माहितीची कोठारे बनवते. या माहितीचे विश्लेषण, संश्लेषण आणि अखेरीस अन्वयक ज्ञान बनवण्याचे उर्जाकेंद्र हे मेंदू बनू नयेत असलीच पोपटपंची या मेंदूत भरली जाते. मग या साक्षरांना दारिद्य्र दिसते, वाढणारी लोकसंख्या दिसते, वाढणारी आर्थिक -सामाजिक विषमता दिसते, त्यातून उद्भवणार्‍या धार्मिक, जातीय, वर्गीय दंगली दिसतात. तिची सहजसोपी, त्यांच्या विश्लेषक न झालेल्या मेंदूला पटणारी कारणे ते शोधू लागतात. आपल्या राजकीय-आर्थिक स्वार्थासाठी ती पुरवणारे संधीसाधू राजकारण्यांच्या, तथाकथित विचारवंतांच्या, बुवा महाराजांच्या रुपाने आपल्या समाजात आहेतच. मग आपल्या बेकारीची, दारिद्य्राची, हलाखीची कारणमीमांसा राखीव जागा, स्त्रियांचं शिकून नोकरी करणं, परधर्मीयांची वाढती लोकसंख्या, परप्रांतियांचं आपल्या भूमीवरचं स्थलांतर अशी मूलतः अशास्त्रीय पद्धतीने पुरवली जाते. कारण हे सहज दिसतं, सहज पटतं आणि चिकित्सा करायचं ज्ञानच जवळ नसल्यामुळे सहजच मेंदूत ठसतं. मग माझा धर्म, माझं राज्य, माझा देश याबाबतीत जी एक विवेकपूर्ण अस्मिता मनात रुजायला हवी, त्या ऐवजी उपरोल्लेखित राजकारणी आणि आध्यात्मिक बाबांचे स्वार्थ आणि सत्ताकांक्षेने भारीत मनोकामना पुरवणारी अतिरेकी विकृत अस्मिता जाणिवेत भरण्याचे षडयंत्र केले जाते. या तथाकथित अर्धशिक्षित मेंदूत ते कोंबणे सोपे असते. कारण त्यांना सांगितलेले असते की तुम्ही ‘सु’शिक्षित आहात, शहाणे झाला आहात आणि आपला धर्म, देश रक्षावयाची ‘जबाबदारी’ तुमच्यावर आहे. एकदा का ही ‘जबाबदारी’ आपल्यावर आहे आणि ही ‘जबाबदारी’ची विकृती या तरुणांत भरली की मग माणसाचा केवळ हैवानच होतो. या हैवानांच्या टोळ्यांनी मग त्यांचे सैतानी नेते आपल्या विकृत सत्ताकांक्षेपायी त्यांना सहज ‘बळीचे बकरे’ म्हणून वापरायला सुरुवात करतात आणि ही बकरीही काहीतरी ‘उदात्त’ कार्य म्हणून सहजच बळी जायला निमूट तयार असतात. माणसाला इतकं बीभत्स अवनत करायची ताकद या विकृत धार्मिक व राष्ट्रवादी आस्मितेत आहे. त्याचा अचूक वापर आजचे काही राजकारणी व बाबा-बुवा संगनमताने करताहेत.

शहीद दाभोलकरांच्या शवाला मुक्तानं-त्यांच्या कन्येनं अग्नी दिला. उपस्थित शोकाकुल कार्यकर्त्यांत मीही उभा होतो. कुणाल-अंनिसचा एक तरुण कार्यकर्ता- मला सांगत होता, त्याचा एक मित्र धर्मांध संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्या मित्राचं म्हणणं, ‘रक्षा बंधन म्हणजे रक्षण करायचं बंधन. (आपला धर्म आज संकटात आहे?) त्याचं रक्षण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि त्यासाठी एकातरी धर्मद्रोह्याला आपण संपवलं तरच आपल्या आयुष्याचं सार्थक झालं म्हणायला हवं. तेच रक्षाबंधन.’

लांडगे स्वतःच्या सुप्त आणि हिंस्र स्वार्थांना धर्माचं अवगुंठन देऊन त्याच्या संरक्षणासाठी आमच्या तरुण लेकरांना मानवधर्मासाठी आयुष्य वेचणार्‍यांचा वेध घ्यायला लावताहेत. लांडग्यांचा धर्म जोपासायला पुढं करताहेत. माणसुकीचा धर्म संपवू पाहताहेत.

राजा शिरगुप्पे